धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६० –
“कविराज, चला जरा मावळमाचीवरून मासाहेबांच्या सदरेचं दर्शन घेऊन येऊ.” जाता-जाता त्यांनी कुलेशांना फर्मावले. कविजी, जोत्याजी यांच्यासह महाराज मावळमाचीकडे चालले. महाराजांनी पाठीमागून येणाऱ्या कवी कुलेशांचे एका बाबीकडे ध्यान वेधले. “छंदोगामात्य, आम्ही तुम्हाला ‘कविजी’ म्हणतो, तसे आमच्या मावळ माणसांना जमत नाही. ते तुम्हाला “कबजी’ म्हणतात. कुलेश म्हणायला अवघड पडतं, म्हणून ‘कलुशा’ म्हणतात. तुम्ही नाराज तर नाही यावर?” हे सांगताना छत्रपतींना आपला उल्लेख मोगल, आदिल, कुतुबशाही व टोपीकर, फिरंगी दरबारात ‘संभा’ असा केला जातो हेही आठवले.
“हुम नाराज नहीं स्वामी!” कवी कुलेश हसत उत्तरले. माचीवरून पाचाडच्या सदरेचे दर्शन घेणाऱ्या महाराजांच्या मनात एकच शब्द घंटानादासारखा घुमत होता – ‘पुत्रकामेष्टी यज्ञ.
“दोन पुत्र कैदेत असताना हा यज्ञ करायचा! आम्ही या कवींना म्हणालो, जीवन हे काव्य आहे, पण ते साधं काव्य नसून एक खंडकाव्य असतं. ओठांवर हसू वागवीत, अंतरंगातील अग्निखाया कुणाच्याही दृष्टीस पडणार नाहीत, याची खबरदारी घेतच ते वाचावं-अनुभवावं लागतं! ”
रायगडावर विधियुक्त पुत्रकामेष्टी यज्ञ पार पडला. आता त्र्यंबकला पोहोचलेल्या अकबराला पालीच्या सुधागडावर नेण्याची जोखीम राजांनी चिटणीस बाळाजी आवजी व बहिर्जी भोसले यांच्यावर सोपवली आणि डिचोली भागात उतरण्यासाठी रायगड सोडला. समवेत खंडोजी बल्लाळ, येसाजी गंभीरराव, कविजी वगैरेंना घेतले. पोलादपूर महाडमार्गे कोयनाघाट चढून, जावळीचे देशाधिकारी काशी रंगनाथ, मलकापूरचे देशाधिकारी बापूजी त्रिंबक यांची जोड घेत महाराज पन्हाळ्यावर आले. जवळ-जवळ एक सालानंतर ते पन्हाळ्यावर येत होते.
माळवद उतरून सदरेला आल्या छत्रपतींना मुजरा देत खंडोजींनी कानी घातले, “दमण भागात आपल्या शिबंदीनं फिरंग्याची काही घरं जाळली आणि काही असामी कलम केल्या आहेत महाराज. बार्देश भागात फिरंग्यांनी पंधरवड्यापूर्वी आपला एक गाव पेटवून गावचौकीत लाकडं रचून दिवसाढवळ्या आपली माणसं जाळली होती, त्याचा जाब दिला गेला दमणभागात.”
छत्रपती काही बोलणार तो पन्हाळ्याचे सरनौबत म्हलोजीबाबा आत आले. लवून म्हणाले, “वलंदेजी सायब आलाय. भेटावं म्हन्तोय धन्याखत्री.”
महाराजांनी म्हलोजींना संमतिदर्शक हात दिला. घोळदार किरमिजी अंगरखा घातलेला, दोन्ही बगलांना झुरमुळ्यांसारखी झालर असलेली पायघोळ विजार चढविलेला, उंचापुरा, गोरापान डच वकील लेफेबेर दुभाष्यासह आत आला. महाराजांसमोर रुजाम्यावर गुडघे टेकून त्याने मान लवविताना डोकीवरची पांढरेशुभ्र पीस खोचलेली घेरदार टोपी उतरली. ती उजव्या बाजूला हवेत डोलवून अभिवादन केले. तो पॉडेचरीहून आला होता. त्याच्या दुभाष्याने डच दरबारची अर्जी छत्रपतींना पेश केली.
“महाराज, डच दरबारची विनंती आहे. त्यांना पांदेचरी भागात व्यापारासाठी सवलती आणि तांब्याची नाणी पाडण्यास परवानगी देण्याची मेहर व्हावी.”
आबासाहेबांच्या वेळेपासूनच डचांचे संबंध दौलतीशी जिव्हाळ्याचे होते. महाराजांनी दुभाष्याला अभय देतानाच एक अट घातली, “आम्ही ही अर्जी मंजूर करू; पण एका शर्तीवर. डचांनी आम्हास बंदुका ब तोफा देण्याची व्यवस्था केली पाहिजे.”
दुभाष्याने लेफेबेरला छत्रपतींची अट सांगितली. ती ऐकून त्याने अदबीने होकारार्थी मान डोलावली. महाराजांनी ती बाब कविजींच्यावर सोपवून डच वकिलाला सन्मानपूर्वक निरोपाचे विडे दिले.
दुपारचा थाळा घेऊन छत्रपतींनी गडाच्या चिटणिसांना बोलावून पुढे राजापूर, कुडाळ, डिचोली भागात द्यावयाच्या खलित्यांचे मजकूर सांगितले. पन्हाळ्यावर आपण सुखरूप पोहोचल्याचे रायगडी येसूबाईना कळविण्याचीही सूचना त्यांनी चिटणिसांना केली. चिटणीस निघून गेले. महालात महाराज एकटेच फेर घेऊ लागले. आत येऊन उभ्या राहिलेल्या म्हलोजींच्याकडे त्यांचे ध्यान गेले नाही. म्हलोजी बाहेर जावे की कसे, या विचाराने चुळबुळले आणि आल्या पावली बाहेर जायलाही निघाले. पण त्या हालचालीने महाराजांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांना थोपविण्यासाठी छत्रपतींनी विचारले, “काय आहे म्हलोजीबाबा? निघालात ते? ”
“तसं खासं काय न्हाई – पर.” म्हलोजी चाचरले.
“काय आहे? बोला. संकोचू नका.”
“योक धनगर आलाय. धाकलू म्हन्त्यात त्याला. किती सांगितलं तरी मनावर घ्याय तयार न्हाई. खाशांशी भेट पायजेच म्हणतोय.”
“कशासाठी?”
“काय तर देनगी द्यायची हाय त्येला धन्यार्री म्हनं!”
“आम्हाला? नीट तपास घ्या त्याचा. त्याला देणगी पाहिजे असेल, म्हलोजीबाबा.
“धा येळा इच्चारलं. त्यो द्याची हाय म्हणून धोसरा घेऊन बसलाय.”
“घेऊन या त्याला.” महाराजांचे कुतूहल चाळवले. खांद्यावर कांबळे टाकलेल्या, अंगात दशांच्या बंदांनी काचोळे आवळलेल्या, डुईला लाली धनगरी मुंडासे गुंडाळलेल्या, कंबरेच्या लाकडी खोबणीत धारदार विळा खोवलेल्या, लंगोटीबाज धाकलू धनगरासह म्हलोजी आत आले. म्हलोजींनी महाराजांना मुजरा देण्यासाठी परोपरीने त्याला खुणावले. फाकड्या धाकलूच्या मुंडाशात ते काही केल्या शिरले नाही!
महाराजांनी त्या रांगड्या धनगराला विचारले, “कोण बाबा तुम्ही? कुठून आलात? कोण काम? ”
खांद्यावरचे घोंगडे कडेधारी हाताने नेटाक करीत त्याने उत्तर दिले. फव्वाऱ्याच्या धनगरी बोलीत – “धाकलू जी म्या. धन्गर – धन्गर. म्हसाईच्या दरडीचा. ऱ्हाज्या कोहोन?” निर्भय धाकलूने महाराजांनाच विचारले, “राजा कोण? ”
छत्रपतींना समोरचा धनगर अरबी घोड्यासारखा ऐटदार वाटला. त्याला धीर यावा म्हणून ते म्हणाले, “आम्हीच ऱ्हाजे! ”
“बिऱ्हुबाचं चांगभलं!” धनगराने त्या नांदीनेच आपल्या रिवाजाप्रमाणे मुजरा दिला. थेट दंडवत घालून.
“ही भॅट हाय ऱ्हाजा, धन्गराची.” वर उठताच धाकलूने लंगोटीच्या शेवटाची गाठ उकलून चुनखडीसारखा एक पांढराधोट तुकडा काढला आणि तो महाराजांच्या पायांशी ठेवला.
ओणावून तो उचलून निरखत महाराजांनी विचारले, “काय आहे हे धाकलोबा? ”
“खवूल हाय त्यो. जित्या खवल्या मांजराच्या पाटीवयनं टोकनुन कहाडलाय! ”
“आम्हाला कशाला दिलात हा?”
“लई गुणकारी खवूल त्यो. तसा म्हिळत न्हाई. खवल्या मांजर जिता घावला, तर त्येच्या पाटीला चुना थापून रातभर त्येला डालाया लागतो. सक्काळाला त्येचा योकच खवूल, असा मेंढराच्या लवीगत पांडराशिफुर हतो का, त्योच टोकनून कहाडायचा. रानची दवलत हाय ती ऱ्हाजा. गाडगंभर सोनं दिलं का न्हाई म्हिळायची.”
“पण उपयोग काय याचा?” महाराजांचे कुतूहन आता शिगेला पोचले.
“इखबाधंला लई पलट्या असतो त्यो खवूल! त्येची अंगठी वळ अन् लाव बोटाला. आसपास इखार आला की अंगठी रंग पाल्टून शिफुर हाय ती हिरवीन्हिळी पडती. तुज्या थाळ्याचा राखनदारच म्हन की त्यो खवूल.” रानचा राजा असल्यासारखा धनगर छत्रपतींशी एकेरीच बोलत होता.
हातातला खवूल डोळाभर निरखताना महाराजांची चर्या कशी उजळून निघाली. तसेच पुढे येत धाकलूच्या खांद्यावर हात चढवून तो हलकेच थोपटून महाराज म्हणाले,
“धाकलोबा, फार-फार मोलाची देणगी दिलीत तुम्ही आम्हाला. बोला. काय बक्षिसी देऊ आम्ही तुम्हाला? मागाल ते मिळंल. जमीन, जनावर, धान्य, हत्यार, वस्त्रं, सोनं.”
रानझरा खळखळून जावा, तसे धाकलूचे डोळे कसल्यातरी अपार निर्मळ तेजाने झळझळले. मुंडासे डोलवीत तो म्हणाला, “ऱ्हाजा, तू बिऱ्हुबा आमचा! खंयाला हात टेवलास का घ्याई पावली माजी. काय नगं दयेवा. चांगभलं.” उभा धनगर पुन्हा सरळ आडवा झाला आणि त्याने आपले मुंडासे छत्रपतींच्या पायांवर ठेवले. दंडवत घातला. त्याला उठवून ऊरभेट देणाऱ्या महाराजांचा ऊर भरून आला.
रानझुळकीसारखा आला तसा धाकलू महालाबाहेर पडला आणि मसाईच्या दरडीच्या वाटेला लागला.
हातातील खवूल निरखणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना थोडीसुद्धा कल्पना नव्हती की, रायगडी सोयराबाईंच्या महालातून कानमंत्र घेऊन बाहेर पडलेल्या अण्णाजींनी मंत्रिवाडीतील आपल्या वाड्यात एका गुप्त कारस्थानाची खलबती बैठक बसविली होती. राघो वासुदेव, बापू माळी, सूर्या निकम, हिरोजी फर्जंद, अण्णाजींचे बंधू सोमाजी दत्तो, त्र्यंयकहून परतलेले चिटणीस बाळाजी आवजी अशी मंडळी दबक्या आवाजात अण्णाजींशी बातचीत करीत होती. एक काळेकुट्ट कारस्थान एकांती रचले जात होते.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६०.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.