महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,700

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६२

By Discover Maharashtra Views: 1338 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६२ –

दुसऱ्या दिवशीच नागोठाण्याहून फेरजाब आला, “निवडीच्या सारंग, दर्यावर्दीचा जमाव झाला आहे.”

आले पन्हाळा सोडून महाराज अणूस्कुरा घाटाने कोकणपट्टीत उतरून नागोठाण्याला आले. सुभेदारवाड्यात दर्याकिनारीची “पणाची मसलत’ भरली. या मसलतीला दादाजी प्रभू, मायनाक, दौलतखान, गोर्विदजी आंग्रे, कोंडाजी व जागोजी फर्जंद, संताजी पवळा, महमद कावजी, नागोजी वाघमारे, सुंदरजी बाजी असा मर्दाना दर्यावर्दी जमला होता. सर्वांवर नजरेचा वल्हा फिरवीत महाराजांनी पण सांगितला, “हबश्यांचा जंजिरा, उंदेरी म्हणजे दर्यादौलतीच्या पायीचा साखळदंड! तुम्ही सारे ते दर्याचे बच्चे. एवढे हिमतीचे सारे असता हा साखळदंड निखळत नाही, हा कोण मामला? जोवर जंजिरा पडत नाही तोवर तुम्ही-आम्ही आबासाहेबांच्या आत्म्याला शांती देत नाही. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आम्ही दर्याचा पण मांडतो आहोत. जो कुणी बाका जंजिरा, उंदेरी पटात घेईल, त्यास दोन शेर सोने, शिरपेच आणि पालखीचा मान देऊन आम्ही त्याचा मरातब करून चालवू.”

छत्रपतींची आव्हानी नजर सर्वांवर फिरली. प्रत्येकाला मानविडा देण्यात आला. तीन हजार आरमारी चाकरांना सहा महिन्यांचा पगार आगाऊ आदा करण्यात आला. नागोठाणे, पेण, आपटे भागात एक फटका टाकून महाराज पन्हाळ्याला परतले. दोन दिवस झाले. नित्याप्रमाणे सोमेश्वराचे, रंगरूपी पिंडीचे दर्शन घेतलेले छत्रपती बालेकिल्ल्यात आले. बागलाण, गोवा, मुंबई, खानदेशात जाणाऱ्या खलित्यांचे मजकूर चिटणिसांना सांगितले.

माध्यान्हकाळ झाला. थाळ्याची वर्दी असल्याने महाराज सदर सोडून उठले. बाहेर आर्द्राच्या ढगांनी आभाळाला दाट छपरी धरली होती. तस्तावर धरलेल्या छत्रपतींच्या हातावर तस्त्याने पाणधार धरली. पोसाने हात टिपत माजदालनात मांडलेल्या चौरंगावर महाराज बसले. बाहेर हत्यारी पहारा फिरत होता. खंडोजी आणि म्हलोजीबाबा जंजिऱ्याच्या पणाची बातचीत करीत खडे होते. माळवदाच्या दगडी कठड्याला रेलून कवी कुलेश ढग भरले आभाळ न्याहाळत होते.

एक खिदमतगार पोसबंद तबक घेऊन माजदालनात आला. भोजनाचे तबक छत्रपतींच्या मांडलेल्या चौरंगीवर ठेवून पोस हटविताना त्याचा हात नाकळेलसा थरथरला. भातमुदीला घेर धरलेल्या वाडग्यातून गरम वाफा उठल्या. महाराजांनी एक एका वाडग्यावर बोट ठेवून पदार्थाची नावे विचारली. खरिदमतगाराने अदबीने पदार्थ सांगितले. नको असलेले वाडगे महाराजांनी तबकातून उचलून बगलेला ठेवले. तरीही तबकात राहिलेल्या चार वाडग्यांवर खिदमतगाराची बारीक नजर खिळून होती.

तबक मनाजोगे बघून महाराजांनी खिदमतगाराला निरोपाचा हात उठविला. प्रत्येक पदार्थातील अंशभाग घेऊन तो तबकाबाहेर ठेवून महाराजांनी गडव्यातील पाणधार तबकाभोवती फिरवून ‘चित्राहुती’ दिली. परब्रह्म अन्नाला डोळे मिटून नित्याचा नमस्कार करून त्यांनी बाही मागे घेत तबकात हात घातला.

मूद फोडून तीवर कालवणाचा वाडगा रिता करून छत्रपती भात कालवू लागले. मनात असंख्य विचार फिरत होते त्यांच्या. घास घेण्यापूर्वी सहज त्यांची नजर तबकातील हातावर गेली. वावटळीने, दाटले ढग सरासर पिटळले जावेत, तसे त्यांच्या मनी घोळणारे राजकारणाचे विचार कुठच्या कुठं पसार झाले. आक्रसल्या डोळ्यांनी महाराजांनी तर्जनीवरची रंग पालटून हिरवट-निळी पडलेली मूळची पांढरीशुभ्र खवली-अंगठी निरखली! त्यांची उजवी भुवई कमानी बाक घेत वर चढली. डोळे विस्फारले गेले. नाकपुड्या फुलल्या. अंगभर सरसरत फिरणाऱ्या रक्ताबरोबर कानपाळी लालेलाल झाली. कपाळावरची उभी शीर टपटपून थडथडू लागली. हात एकदा तबकाबाहेर घेऊन त्यांनी खातरजमा केली. तबकापासून दूर होताच अंगठी पांढरट होत होती. हात आत जाताच पुन्हा हिरवट-निळी पडत होती.

त्या रंगबदलत्या अंगठीबरोबरच छत्रपतींच्या डोळ्यांतले रंगही सरासर पालटू लागले! झेंडू फुटल्या राजसंतापाने त्यांचे उभे अंग थरथरू लागले. कपाळावर घामथेंब तरारून उठले. हात झटकून, तबक तसेच पुढे लोटून उठता-उठता, बाहेरच्या माणसांचे थरकून पाणी व्हावे असे छत्रपती कडाडले, “म्हलोजी, त्या नमकहरामास चारा हा थाळा! घेऊन या त्याला आमच्या सामने!”

भेदरलेले म्हलोजी, खंडोजी, कारभारी त्रिंबकजी, पहारेकरी आत धावले. येडबडलेल्यांना काय झाले, तेच कळेना. फणा उभारलेल्या जहाल, विषारी नागसर्पाकडे बघावे, तसे थाळ्याकडे बघणाऱ्या महाराजांचे ओठ थरथरू लागले. संतापाने त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. नजर थाळ्यावरून हटेना. म्हलोजी, खंडोजी, कविजी थाळ्याकडे आणि महाराजांकडे गोंधळून आलटून-पालटून बघतच राहिले.

“ज्यानं थाळा लावला त्या हरामखोरास आणा अगोदर आमच्यासमोर. दगलबाज…” ताफेचे भांडे तडतडावे तशी राजाज्ञा सुटली. पहाऱ्याचा धारकऱ्यांनी मुदपाकात जाऊन भाल्याची टोके पाठीला लावून त्या खिदमतगाराला छत्रपतींच्यासमोर पेश घातला. बोचके बांधून तो गड सोडायच्या तयारीतच होता.

“त्यातले चार घास बाहेर नेऊन कुत्र्यासमोर ठेवा.” थाळ्यावर बोट रोखून महाराजांनी पहाऱ्याच्या हवालदाराला सुनावले. हवालदाराने ‘जी’ म्हणत चौरंगावरच्या तबकातले थोडे अन्न वाडग्यात घेऊन ते बाहेर नेऊन चुचकारत एका कुत्र्यासमोर घातले.

खरिदमतगार नुसता लटलट कापत होता. छत्रपती त्याच्यासमोर आले, “ते अन्न पचवायची शामत आमच्या आतड्यात नाही. तुझ्यात दिसते! चल आटप. ते घेऊन टाक सर्वांसामने!” महाराजांनी तबकाकडे बोट रोखले. त्यांच्या डोळ्यातून कशा नुसत्या ठिणग्याच ठिणग्या उडत होत्या.

“नगं धनी नगं.” सर्वांच्या अंगावर काटा सरकावा असे कळवळून ओरडत खिदमतगार महाराजांच्या पायांवर स्फुंदत कोसळला.

“खामोश!” छत्रपतींचे रोखले बोट काही तसूभर हलले नाही. खिदमतगार गदगदत महाराजांच्या पायांना बिलगला. त्याला ठोकरून महाराजांनी धारकऱ्यांना आज्ञा दिली – “घाला ते अमृत याच्या नरड्यात.”

पाठीच्या भाल्याची पाती चारी बाजूंनी कचाकच रुपताच ख्रिदमतगार मुकाट उठला. डोळ्यांतून टपटपणाऱ्या आसवांत मळूनच त्याने छत्रपतींना पेश केलेल्या थाळ्यातील अन्न गुमान गिळले! दालनातील सर्वाचेच डोळे त्याच्यावर खिळले होते. जे समोर चालले होते, ते ताणल्या डोळ्यांनी बघण्याखेरीज कुणाच्याच हाती काही नव्हते.

खिदमतगाराचे डोळे काही वेळातच पांढरे होत गरगर उलटे फिरू लागले. तोंडाला फेसाची तार आली. अंग काळेनिळे पडू लागले. बसला होता, तो कलंडून थेट आडवा होऊन आचके देऊ लागला. ते बाहेर प्राणांतिक यातनेने केकाटणाऱ्या कुत्र्याच्या विव्हळण्यात मिसळू लागले.

लगबगीने पुढे होत त्याची बाराबंदी मुठीने घट्ट पकडत म्हलोजींनी त्याला गदगदा हलवून विचारले, “आरं, कुनाच्या भरीला पडून कक्‍्येलास हे वंगाळ? बोल. आरं बोल.”

त्याच्या ओठातून फक्त फेसाची तार घरंगळली.

“तोडला असता तरी तो बोलला नसता म्हलोजीबाबा. पुरा विचार करूनच तो उतरला होता यात.” गले एकामागून एक असे पहिल्या कटातील असामींचे चेहरे महाराजांसमोर फिरून एक यातनाभरला नि:श्वास टाकून दालन सोडताना महाराजांनी हवालदाराला आज्ञा केली, “बाहेरचे कुत्रे फेकून देऊ नका, खोलीचा खड्डा घेऊन ते गाडा. विखारी आहे ते. या इमानी चाकराला अंधारबावेवर डाग द्या.”

माळवदाच्या रोखाने चाललेल्या महाराजांच्या डोळ्यांपुढून धाकलू धनगराची मूर्ती हलता हलत नव्हती. कानात समर्थांच्या खलित्याचे वचन घुमत होते – “अखंड सावधान असावे!”

छत्रपतींच्यावरचा विषप्रयोगाचा कट फसला होता! आर्द्राच्या कोसळत्या धारांचे गढूळ पाणलोट होत, पन्हाळ्याच्या चारी कड्यांवरून कोसळत होते.

विषप्रयोगाच्या कटाची पाळेमुळे शोधण्यासाठी छत्रपतींनी पन्हाळ्यावर जंग-जंग कसून तपास घेतला. काहीच हाताशी आले नाही. पुराव्यानिशी कुणावरही अदावत घेता येत नव्हती. येऊन टळल्या प्राणघाती प्रसंगाने मात्र महाराजांना जिव्हारी वेदना झाली होती. बसला पाऊस सुमार होण्याची महाराज वाट बघत होते. शक्‍य तितक्‍या लवकर रायगडी जाणे आवश्यक होते. तिथे अफवांचे पीक उठू देता कामा नव्हते.

बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या मजल्यावर एका दालनात, बाहेर कोसळणाऱ्या आर्द्राच्या धारा बघत महाराज झरोक्याशी उभे होते. ‘संशय’ हा मनाचा सर्वांत छळवादी देणेकरी असतो. तो सशाच्या पावलांनी मनात शिरतो आणि हत्तीच्या पावलांनी थैमान घालू लागतो. मन शंकेखोर झाले की, माणसाला स्वत:ची सावलीसुद्धा मारेकरी वाटू लागते.

वारंवार साकळून येणारा संशय महाराज निकराने परतविण्याचा प्रयत्न करीत होते. फार कठीण जात होते ते. संशयाला येण्याची वाट माहीत असते, जाण्याची दाखवावी लागते. एकतर त्याला शरण जावे लागते, नाहीतर मुळावर त्याला निपटूनच काढावे लागते. तडजोड, सुलूख नाही करता येत त्याच्याशी. त्याला शरण जाण्यात माणूसपणच हरवून बसण्याचा धोका असतो आणि त्याला निपटून काढण्यास लागतो बळकट पुरावा. शंकाकुशंकांनी महाराज पुरते बेचैन, हैराण झाले. बाहेर कोसळणाऱ्या आर्द्राधारा त्यांच्या मनाला धुऊन नेऊ लागल्या. काही मार्ग गवसेना.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६२.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment