महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,488

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६४

Views: 1356
8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६४ –

येसाजी दाभाडे आले. त्यांची चर्या भेदरलेली दिसत होती. त्यांना बघताच महाराज म्हणाले, “येसाजी, जरा आमच्याबरोबर या.” गोंधळल्या येसाजींना कळेना कुठे जायचे आहे. तरीही ‘जी’ म्हणत ते महाराजांच्या मागून चालू लागले. पुढे वर्दी न देताच छत्रपती संभाजीमहाराज थोरल्या महालाकडे चालले! जे आजवर निकराने टाळले होते, त्याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी.

सोयराबाईच्या महालाच्या दरवाजावर बसलेल्या चौकीच्या पहाऱ्याचे धारकरी देत असलेल्या मुजऱ्यावर ध्यान नसलेले महाराज थोरल्या महालात प्रवेशले. त्यांना बघून कुणबिणी फाणाफाण झाल्या. महाराज एकचालीत तसेच आतल्या दालनात गेले. त्यांना बघताच रामराजे पुढे येताना गोंधळून म्हणाले, “महाराजसाहेब!”

त्यांना जवळ घेत त्यांचे खांदे थोपटताना महाराजांनी त्यांना हलकेच दुरुस्त केले, “दादामहाराज म्हणा आम्हाला!” विचित्र शांतता दालनात दाटून आली. छत्रपतींना बघून सुखदालनाकडे जायला निघालेल्या सोयराबाईंचे पाय “थांबा!” या एकाच जरबी शब्दाबरोबर थबकले. त्या शब्दात हुकमत होती. दरारा होता. आज सोयराबाईना मानमुजरा मिळाला नाही.

“खूप सोसले आम्ही. आता आपण स्वस्थ बसाल, तर बडी मेहर होईल आमच्यावर! एवढेच सांगण्यासाठी आलोत.” छत्रपतींनी मासाहेबांना कोपरापासून स्पष्ट हात जोडले. “आम्ही बदनाम होत नाही, दस्त होत नाही, विषबाधा आम्हाला लागू पडत नाही, हे शाबीत झालं आहे आता!” असह्य कढाने अस्वस्थ झालेले महाराज थांबले.

“आमच्या – आमच्या मरणातच आपलं समाधान असेल, दौलतीचं हित असेल तर-तर द्या आम्हाला जहराचा प्याला या बाळराजांच्या साक्षीनं, आम्ही तो मुकाट गिळू!”

आयुष्यात असे काही कधीच न ऐकलेले समोरचे स्त्री-बानदान खळबळून गेले. निर्धारी, फेकून देणारे जनानी बोलत ताडकन उठले, “येसाजी, मराठ्यांचे छत्रपती, पुराव्याशिवाय प्याद्यांनाही अदावतीत घेत नाहीत. जनाना असामीला तर नाहीच नाही, हे जरा समजुतीनं सांगा.”

“खामोश! मासाहेब म्हणून पडीनं बोललो याचा अर्थ भलताच घेऊ नका. तुमच्या हातानं पावन झालेली पत्रं शहजाद्यानंच दिलीत आम्हाला पाठवून. इच्छा असेल तर दाखवू तो दर्पण. “या रामराजांच्या मातोश्री, आबासाहेबांच्या नावचे कुंकू कपाळी घेतलेल्या म्हणूनच तुम्हाला अखेरची समज द्यायला आलोत आम्ही. भडकलेली आहे हवस तुमची. आवरा ती.” संतापाने महाराजांना धड बोलताही येईना.

शेपटीवर पाय पडल्या नागिणीसारखी समोरची कडवी राजस्त्री खवळून उठली. फणा फुत्कारला, “येसाजी, आम्हास उणं-वावगं बोलावया समंध नाही. समज द्या तुमच्या छत्रपतींना. आम्ही आरोपित आहोत याची खातरजमाच असेल, तर मनचाही सजा देण्यास ते मुखत्यार आहेत!”

ते ऐकताना महाराज सुन्न झाले. भेदरलेले रामराजे त्यांना बिलगले होते. त्यांचे हात हलकेच उकलून छत्रपती दालन सोडताना कडवे बोलले, “येसाजी, मासाहेबांना सजा फर्मावण्याएवढे नादान छत्रपती मराठ्यांच्या गादीवर कधीच येणार नाहीत, हे सांगा एकेकाळच्या महाराणींना. भोसल्यांच्या कुळीचा राणीवसा सजासुद्धा मागत नाही – घेत असतो! काही अक्षम्य गैरबर्ताव झाला आहे असं वाटतच असेल तर महाराणी मुखत्यार आहेत, आपली सजा आपण घ्यायला!” मनाची पार घालमेल झालेले महाराज तरातर बाहेरही पडले.

गडावर श्रावणी रात्र उतरली. थाळा झालेले महाराज सुखदालनात उभे होते. जरीबुंदीचा पिवळाजर्द शालू नेसलेल्या येसूबाई आत आल्या. त्यांना बघताच कटवाल्यांचा विचार मनी घोळणाऱ्या महाराजांना वाटले, ‘यांच्या शब्दांतच मागणं घालावं यांच्याकडं की, या बनावाच्या निवाड्यात… तुम्ही तेवढा आता आपला शब्द नका खर्ची घालू… यांनी शब्द घातला तर कठीण होईल… आणि आता तर या मुद्राधारी महाराणी आहेत.’

“पक ऐकणं होईल?” येसूबाईंनी शांतता फोडली.

“त्याआधी आम्हीच काही मागावं म्हणतो.” महाराज सावध झाले. “शोकणं व्हावं. पन्हाळ्याच्या बनावाची सारी हकिकत आलीय आमच्या कानी. आमचं त्याबाबत एकच म्हणणं आहे….”

“राणीसाहेब….”

“की पुरती शहानिशा होताच गुन्हेगारास स्वारीनं योग्य वाटेल, ती सजाच फर्मावावी! कुणाबाबतही हात राखू नयेत आता. पुरात उफाळणारी नदी समजू शकते; पण मोहरा वळवून गावात घुसणारी विनाशकारी नाही! तिला बांध घालून वेळीच तोडावं लागतं.”

त्या बोलण्याने खरे तर महाराज दिपले होते. पण वरवर तसे न दाखविता त्यांनी “श्रीसखी’चा सूर तसाच पुढे धरला. “आणि राजे गणोजी असले यात तर?”

महाराज अंदाज घेताहेत हे पुरते ओळखलेल्या येसूबाईनी तडफेची आण दिली, “तो निवाडा स्वारीनं आमच्यावरच सोपवून बघावा!”

प्रसन्न झालेल्या महाराजांनी डुईचा टोप उतरून तो येसूबाईंच्या हाती दिला. तो तबकात ठेवण्यासाठी महाराणी चौरंगीकडे जाऊ लागल्या. त्यांना बगलेने बघताना महाराजांना संस्कृत काव्यातील “स्वकीया’ नायिका आठवला. येसूबाई टोप ठेवण्यासाठी ओणावल्या. त्यांच्या शालूवरच्या बुंद्या चिराखदानी उजेडात झळझळून लखलखल्या. महाराजांना वाटले – ‘आवतीभोवती तारकांची महिरप घेतलेली वीजवेलच ओळंबली आहे की काय?”

टोप ठेवून वर होणाऱ्या त्या वीजवेलीला छत्रपतींच्या बळकट बाहूंची आकाशी कव केव्हा पडली तेच कळले नाही! ‘श्रीसखी’ क्षणभर उभ्या देही थरारली. मग श्रावणी उन्हाची उबदार तिरीप रायगडाच्या उंच, भक्कम मनोऱ्यांच्या बाहूत शिरून विसावावी, तशी त्या मर्दानी कवेत मिटल्या डोळी विसावली!

गोव्याहून येसाजी गंभीराचा माणूस आला. येसाजींनी कळविले होते, “डिचोलीच्या मोरो दादाजींवर फिरंगी दरबार सक्त नाराज आहे. त्यांनी फिरंग्यांची दोन शिबाडे डिचोलीत बेहिसाबी अडकवून ठेवली आहेत.”

महाराजांनी निळोपंतांना याद घेऊन निर्णय दिला, “पंत, आता मोरो दादाजींना बडतर्फीचा हुकूम द्या. त्यांच्या जागी विनायक उमाजींची नामजादी करा.”

“जी, सुधागडच्या जिवाजी हरींच्या निरोपाचं काय करायचं महाराज? शहजादा अकबर आपल्या अखत्यारीखाली सैन्यसंचणी करतो आहे.” निळोजीपंतांनी अकबराच्या हालचालींकडे छत्रपतींचे लक्ष वेधले.

“पंत, त्यासाठी तर या नेताजीकाकांना बोलावून घेतले आहे आज.” काहीतरी मनी बांधून महाराजांनी सूचना केली. नेताजी बरेच दिवस उत्तरेत राहिले होते, याचा विचार धरून महाराज त्यांना म्हणाले. “काका, तुम्ही वीस हजार होनांचा खजिना घेऊन निवडक धारकऱ्यांच्या शिबंदीनं पालीला जा. शहजाद्यांची भेट घेऊन त्याला स्पष्ट समज द्या. मुलखात राहणे असेल, तर सैन्यसंचणी करता येणार नाही. जसे तुम्ही आपल्या मुलखाचे शहेनशाह मानता तसे या राज्याचे आम्ही आहोत. तुम्ही रिवाज सोडू नये, आम्ही पाहुणचार सोडणार नाही. लागल्यास त्याला होनाचं पाठबळ द्या. माणसांचं नाही.”

“जी. आम्ही शहजाद्यावर बारीक नजर ठेवू.” नेताजींनी जोखीम उचलली. महाराजांनी त्यांना निरोप दिला.

काही बोलू इच्छिणारे निळोपंत घोटाळले आहेत, हे ताडून महाराजांनी त्यांना बोलते केले, “सांगा निळोपंत, अडखळू नका.”

पंतांनी क्षणैक ओठांवरून जीभ फिरविली अडखळतच त्यांनी वृत्तान्त दिला, “जिवाजी हरींचा दुसराही एक निरोप आहे स्वामी.”

“कसला?”

“मुजुमदार अण्णाजीपंत, चिटणीस बाळाजीपंत, चिरंजीव आवजी, सोमाजी दत्तो अशा असामींना जेरबंद करून पालीजवळच्या परळीच्या ठाण्यात आणलं आहे!”

खाडकन उठते होत महाराज म्हणाले, “या – याच खबरीची वाट बघत होतो आम्ही. पेशवे, कशाला उल्लेख केलात त्यांचा मुजुमदार आणि चिटणीस म्हणून! कशासाठी जोडलेत ‘पंत’ हे आदरवचन त्यांच्या नावामागं? त्या जोखमीच्या पदांचा त्यांनी आपल्याच करणीनं काला करून टाकला आहे. जिवाजी हरींना कळवा, आम्ही जातीनं येतो आहोत परळीला!”

“जी!” निळोपंत लगबगीने लवले. त्यांना कळून चुकले आता परळीची खैर नाही.

येसाजी कंक आणि चांगोजी यांना सोबत घेऊन महाराज बालेकिल्ल्याबाहेर पडले. त्यांची पावले कैदखान्याच्या कोठीकडे वळली. कोठडीत बापू माळी, सूर्या निकम, राघो वासुदेव अशी कटाची वीस हस्तक माणसे काढणीबंद होती. त्यांपैकी एकाचीही मान छत्रपतींच्यासमोर वर झाली नाही.

त्या सर्वांवर नजर फिरवीत महाराज धारी बोलले, “बघून घ्या एकदा आम्हास डोळे फाडून. पिशाच्च नाही हे आमचे. खुद्द आम्ही आहोत! तुमच्या स्वामिकार्याचा मरातब करण्यासाठी जगदंबेने जीवे राखले आहे आम्हाला. येसाजीकाका, आम्ही हुकूम देऊ तसाच बिलाकसूर मरातब करा यांचा.” महाराजांनी पाठ फिरवली.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६४.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment