महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,694

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६५

By Discover Maharashtra Views: 1350 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६५ –

अखत्यारी येसूबाई र्‌॒ आणि निळोपंतांच्या हाती सोपवून दोन दिवसांनी महाराजांनी रायगड सोडला. त्यांच्याबरोबर जोत्याजी, रायाजी-अंतोजी आणि निवडीचा फक्त पाचशे मावळा होता. दिवस श्रावणाचे होते. परळीकडे चालल्या महाराजांच्या मनात उन्ह-पावसाची आल्टीपल्टी धरली, “या वेळी आबासाहेब असते आमच्या जागी, तर त्यांनी काय केलं असतं? बदअंमल केला म्हणून रांझेकर पाटलाचे हात कलम करविणारे, चुगल केली म्हणून उत्रोलीकर खंडोजी खोपडयाचे हातपाय उतरविणारे, बाजी घोरपडे, चंद्रराव मोरे यांना नेस्तनाबूत करणारे, मोहितेमामांच्या दंडात काढण्या चढविणारे, गुजरकाकांना, “खान गर्देस मिळवावा नातर तोंड दावू नये’ असा हुकूम देणारे, नेताजींना बडतर्फ करणारे, चिंचवडच्या मोरयाबाबांना, “तुमची बिरुदे आम्हास द्या, आमची तुम्ही घ्या’ असे स्पष्ट बजावणारे, एकोजी काकांना, “धाकटे ते धाकटे, बुद्धीही धाकुटी दाखविली’ असा ठपका ठेवणारे आणि – आणि प्रत्यक्ष आम्हाला आरोपित म्हणून दरबारी पेश घेणारे आबासाहेब कसे वागले असते त्या क्षणी? आजवर कधीच न अनुभवलेले आगळेच राजबळ त्यांच्या मनी थळी करून आले.

परळी आली. सामोरे आलेल्या जिवाजींच्यासह महाराज परळीच्या सरकारवाडयात आले. दुपारचा थाळा आणि विश्रांती होताच तिसऱ्या प्रहराला जिवाजींना छत्रपतींची आज्ञा झाली, “दस्त असामी पेश आणा.”

परळीच्या सरकारवाड्याच्या सदरेला काढणीबंद अण्णाजी, बाळाजी, आवजी, हिरोजी, सोमाजी असे खासे महाराजां समोर आणण्यात आले. सर्वांच्या चर्या काळ्याठिक्कर पडल्या होत्या. त्यांना बघताच अपार खंत आणि अनिवार संतापाने मन भरून आलेले महाराज बैठकीवरून उठले. अण्णाजींकडे तर त्यांना बघावेसेही वाटेना. “केवढ्या उलट्या काळजाचा आणि आतल्या गाठीचा हा माणूस! मुजुमदार म्हणून ज्या हातांनी मुजरा करीत होता, त्याच हातांनी पाठीत खंजीर खुपसण्याचा कट रचीत होता. हे बाळाजी! ज्या कलमानं आमच्या अभिषेकाची आमंत्रणं रेखली त्याच कलमानं अकबराला पत्रं देणारे! आणि हा हिरोजी. आबासाहेबांच्या खाटल्यावर झोपून त्यांना आगम्ऱ्याच्या कोठीबाहेर काढणारा आणि आम्हाला मात्र सरणावर झोपवायला निघालेला!

ही तीच माणसे आहेत की त्यांची विद्रूप भूते?’

पिळवटल्या छत्रपतींच्या तोंडून चिरणारे करडे बोल उठले, “इमानदार चाकरांनो, नीट बघा. आम्ही जिवंत आहोत! आणि आहोत तेही मराठ्यांचे छत्रपती – शहजादा अकबर नव्हे! एकवार माफ करून, विश्वासाच्या जागा पुन्हा तुमच्या हाती दिल्या त्याचे बरे पांग फेडलेत! शरम वाटते तुम्हाला “चाकर ‘ म्हणण्याचीसुद्धा!” छत्रपतींचे ओठ थरथरले.

“बोला. कुठली सजा घ्यायला सिद्ध आहात सारे केल्या कर्तुवाची?” कोरडा फुटावा तसा महाराजांनी रोकडा सवाल केला. खालमुंडीने सारेच चिडीचाप झाले. ती कोडग्या शांततेची कोंडी महाराजांना असह्य झाली.

अण्णाजींच्याजवळ जाऊन त्यांना गदगदा हलवीत छत्रपती कडाडले, “जबान झडली काय? बोल. आणखी कुठलं देशकुलकर्ण बहाल करावं तुला, या बहादुरीबद्दल?”

अण्णाजी ढवळून निघाले तरी मान टाकून गुमान बसले.

“प्रसंग साधून बरी धरते दातकुडी? बोल – कुठली सजा द्यावी?” महाराजांचे डोळे अण्णाजीवर निखारे पाखडू लागले. निर्धार बांधलेले अण्णाजी मान वर घेत थंडपणे म्हणाले, “जी महाराणींना दिली जाईल ती! त्यांची आज्ञा पाळण्याचाच काय तो गुन्हा झाला आहे आमच्याकडून.”

“खामोश…” अण्णाजींच्या बिनतोड वर्मी जाबाने क्षणभर कोंडमारलेले छत्रपती संतापाने नुसते थरथर कापू लागले. त्यांच्या अधिकाराचा टवकाच उडविला होता अण्णाजींनी. त्यांना नीट समजावूनच द्यायला पाहिजे होते की, “जगाला ‘महाराणी’ असलेल्या त्या आम्हाला ‘मासाहेब’ आहेत! छत्रपती नुसते राजमुद्रा धारण करत नसतात, तर कुलवसा म्हणून भवानीची माळही छातीवर वागवितात!”

“जिवाजी, जरा वेत घ्या.” राजबोलाच्या ठिणग्या त्या सदरेवर उधळल्या. नूर ओळखून “जी” म्हणत जिवाजी आत गेले. वावभर लांबीची आंगठ्याइतकी जाडीची वेताची छडी महाराजांच्या हाती देत थिजल्या मनाने ते बगलेला भयभीत उभे राहिले. भोवतीचा पहारा गांगरून पुतळ्यागत झाला.

भयानक शांतता सदरेला पळभर कुचमून पडली. उभे अंग संतापाने सरसरलेले महाराज गर्जले, “हा वेत उभा धरला की दंड म्हटला जातो, आडवा केला की लाठी होतो. जसा बघावा तसा दिसतो. तशाच रायगडावर आहेत त्या तुला महाराणी, आम्हास मासाहेब. आम्ही त्यांना सजा करू शकत नाही. तुला सोडू शकत नाही. हरामखोर!”

स्सप करीत वेत अण्णाजींवर उतरला!!! आणि मग “नादान. ही हरामजादगी? दगाबाज, मुजोर.” असे प्रत्येक वेताबरोबर कडाडत सात-आठ वेत अण्णाजींवर सपापत उतरले. त्या प्रत्येक माराबरोबर अण्णाजी विव्हळत वेडेवाकडे झाले.

कपाळ घामाने डबडबलेल्या महाराजांनी थरथरत्या हातचा वेत फेकताना कठोर, कठोर आज्ञा केली, “जिवाजी, या साऱ्यांना घोड्यांवर लादून रायगडास पाठवा. निळोपंतांना हुकूम द्या – यांची यांच्या हस्तकांसह दावण बांधून गडावर धिंड काढा. दवंडी पिटून या खाशांना सर्वासामने हत्तीच्या पायी देण्यास सांगा! यांच्या हस्तकांना टकमक टोक दाखवा. घेऊन जा यांना.” फरफरता पोतच जसा छत्रपतींच्या रूपाने सदरेवरून अदृश्यही झाला.

आठ दिवस किनारपट्टीत देख टाकून, पन्हाळ्यावर जाऊन सोलापूर, पेडगाव, औरंगाबाद भागात पेरावयाच्या सैन्याची म्हलोजीच्या मदतीने बांधणी करून महाराज रायगडी परतले. त्यांनी दिल्या आज्ञेप्रमाणे खंडेराव पानसंबळ आणि खंडोजींच्यासह निळोपंत पेश आले.

कटवाल्यांना सजा देऊन पंधरा दिवस झाले होते. महाराजांसह कुणाच्याच हाती काही नसावे, असे विचित्र वातावरण गडावर पसरले होते.

थिजल्या मनाच्या, खालच्या मानेने समोर उभ्या असलेल्या खंडोजीच्याजवळ छत्रपती आले. शांत धीरगंभीर बोल खंडोजींच्या कानी पडले, “कधी-कधी वाटतं हा अंगचा राजपेहराव उतरून ठेवावा. याच्या भाराखाली मन, आत्मा कोंडून जातो. उतरून तो द्यावा तरी कुणा हाती या दबीनं आम्ही सुंद होतो. आबासाहेबांकडून आलेला हा पेहराव आम्हाला उतरविता येत नाही. चिटणिसी रक्त अंगी नांदवीत असलेल्या तुम्हीही हातचे कलम बगलेला ठेवता कामा नाही. तुम्हा-आम्हाला नाती नाहीत. आहे ते नाते एकच. सिंहासनाच्या सेवेचं. आम्ही-तुम्हाला चिटणिसी अखत्यार देणार आहोत. तुमचा इरादा?”

हे असे काही ऐकायला मिळेल, समोर येईल याचे भान नसलेल्या खंडोजींचे डोळे डबडबले. ही त्यांची सर्वांत मोठी कसोटी होती. नियतीने समोर ठेवलेली. इमान देण्याची.

खंडोजींनी क्षणाचाही विलंब केला नाही. वाकून महाराजांच्या पायांना हात भिडवीत ते घोगरे म्हणाले, “आम्ही स्वामींच्या पायाचे, सिंहासनाच्या पायरीचे सेवक आहोत. कलमी सेवा इतबारे करू.” त्यांना वर घेताना समाधानाने भरलेल्या महाराजांच्याही नेत्रकडा ओलावल्या.

ते खंडेरावांना म्हणाले, “पानसंबळ, तुम्ही गोमाजींचे वारस. त्यांनी थोरल्या आऊंची सेवा केली म्हणजे सर्वांचीच सेवा केली. मुजुमदारीची जिम्मेदारी आम्ही तुम्हावर सोपवीत आहोत.” खंडोजी आणि खंडेरावांना मानवस्त्रे देऊन, भरल्या दरबारी त्यांना शिक्के-मुद्रा बहाल करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. त्याने समाधान पावलेल्या निळोपंतांना मात्र जागीच आज्ञा ऐकावी लागली, “पंत, जिंजीला हरजींना तातडीचा हुकूम द्या. त्या शामजी नाईक पुंड्याला दस्त करण्याचा..”

निळोपंत मान लववून सर्वांसह निघून गेले. बाहेर दाटल्या अश्विनी आभाळासारखे महाराजांचे मन वेढून आले, “केवढं कठोर हे राजत्रत! ज्याचं पालन करताना खुल्या ओठी कुणालाही मना तळची खळबळ सांगता येऊ नये! कसल्या यातना झाल्या असतील अण्णाजी-बाळाजींना हत्ती पायी चितचुराडा होताना! बघवल्या असत्या त्या उघड्या डोळी समोर? खरंच का फर्मावू शकलो नाही कुठलीही सजा आम्ही मासाहेबांना? आम्ही कठोर? दुबळे? किंकर्तव्य? की सर्वांपासून अलिप्त? किती माग घ्यावा या अलिप्तपणाचा, ठाव लागत नाही. कुणालाही तो बोलून दाखविता येत नाही. आमच्यातले छत्रपती त्या अलिप्तपणातच अहोरात्र वास करतात. आमच्या साऱ्या शक्ती राबवून घेतात. त्यांच्यामागून फरफटत जाते, ते आमच्यातले माणसाचे मन. आम्ही – आम्ही असतो बाळाजी- अण्णाजींच्या जागी तर!’ माणसाने छत्रपतींना सवाल केला. संभाजीराजातला माणूस आणि छत्रपती यांचे द्वंद्र काही काळ तसेच चालू राहिले.

त्या माणसाला आपलाच राजपेहरावधारी देह हत्तीच्या प्रचंड पायाखाली चुराडा होतो आहे, असे भयानक कल्पनाचित्र दिसू लागले. छत्रपतींना त्या देहातून रक्तचिळकांड्याऐवजी दिसू लागल्या अंगी भिनल्या विषाच्या चिळकांड्या! त्या देहातील माणूस आक्रोशू बघत होता. त्याच देहातील छत्रपतींनी त्यांचे तोंड हाताने दाबून बंद करून टाकलेले दिसत होते. दीर्घ निःश्वास टाकून महाराजांनी ते चित्रच मनातून झटकून टाकले.

नवरात्राचे दिवस आले. पाचाडात होम, कुळधर्म करून दसरा पार पडताच महाराजांनी रायगड सोडला. निवडक असामींनिशी ते पन्हाळ्याकडे गेले. त्यांच्या मनी एका भक्कम मोहिमेची आखणी होत होती. पावसाळा हटताच तिला हात घालायचा होता. पन्हाळगड चढताना त्यांना वाटले – ‘या गडाशी आपलं कसलंतरी गूढ नातं आहे.

आबासाहेबांची अखेरची भेट इथंच झाली. रचलेले दोन्ही कट कोसळले, ते आम्ही या गडावरच असताना. पाखराच्या कोटरागत जिवाभावाचा हा गड वाटतो.’

धुक्याने घेर टाकल्या पन्हाळ्यावर आठवडा लोटला आणि बाहेरचे धुके मनात साकळून यावे, अशी खबर महाराजांच्या कानांवर पडली. मोगलाईत चकरा टाकणाऱ्या विश्वासने ती उचलली होती. सर्वांत भयानक खबर. कसली? एक प्रचंड हिरवा ढग चालून येतो आहे – “औरंगजेब अजमेरहून दख्खनस्वारीवर कूच झाला आहे!! तीन लक्ष पावलोक, तेवढेच घोडाईत आणि प्रचंड तोफखाना घेऊन. तेरा कोटींचा खजिना दास्तानी ठेवून. त्याच्या संगती आहेत शहजादा मुअज्जम, कामबक्ष, नातू बेदारबख्त व मुहजुद्दीन. बक्षी रुहुल्लाखान, असदखान, रणमस्तानखान, एतिकादखान, शहाबुद्दीनखान, महमद अमीन, हसनअलीखान, लुत्फुल्लाखान, मातबरखान, बहादूर मुरादखान, तबियतखान, राव दलपत बुंदेला असा निवडीच्या सरदारांचा ताफा त्याच्याबरोबर चालून येतो आहे. बऱ्हाणपूर, औरंगाबादेची ठाणी आगवानीसाठी गजबजून गेली आहेत.”

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६५.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment