महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,850

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६७

By Discover Maharashtra Views: 1352 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६७ –

कार्तिकाचा शुद्ध पक्ष धरून कविजी, प्रल्हाद निराजी यांच्यासह निवडक शिबंदी घेऊन छत्रपती रायगड उतरले. निजामपूर, रोहा अशा मजला ठेवत पालीच्या शिवेवर आले. शिवेवर आपल्या माणसांनिशी जिवा हरी रुजू होते. डुईला केशरी साफा बांधलेला, मध्यम वयाचा, ठसठशीत अंगलटीचा एक तगडा रजपूत मर्दानाही आगवानीसाठी खडा असलेला महाराजांना दिसला. तो डोळे जोडून मराठ्यांच्या छत्रपतींना निरखत होता.

पायउतार झालेले महाराज जिवाजींची अदब घेत पुढे झाले. त्या रजपूत सुरम्यावर नजर खिळलेले महाराज त्याच्यासमोर येताच त्याने नम्रभावे गुडघे टेकून, गर्दन झुकवून रजपुती रिवाज दिला. जिवाजींनी तत्परतेने त्याची ओळख पटती केली, “हे दुर्गादास राठोड! शहजाद्यांचा दोस्ताना राखण्यासाठी दक्षिणेत आलेत.”

“जय एकलिंगजी, पादशहा सलामत मुल्क मऱ्हाट के खिदमतमें तसलीम।”

दुर्गादास पुन्हा मानेत लवला. छत्रपतींनी झुकून आदराने राठोडला वर घेत ऊरभेट दिली. सर्वांसह राजस्वारी सुधागडच्या खासेवाड्यात आली. थाळे आणि विश्राम होताच कलत्या दुपारीला कविजी, नेताजी पालकर, प्रल्हादपंत अशा असामीनिशी महाराज बैठकीच्या दालनात आले. जिवाजींनी दालनाचा सरंजाम उंची लोड, गिर्च्या, रुजामे टाकून देखणा केला होता. छत्रपतींनी बैठक घेतली.

शहजादा अकबर पाली भागातील कसबा धोंडश्याला एका साध्या कौलारू घरात तळ देऊन होता. त्याची माणसे उघड्या माळावर राहुट्या टाकून होती. जिवाजी अकबराला आणण्यासाठी त्याच्या तळावर गेले होते.  “कविजी, आज तिथी कोणती?” महाराजांनी पाठीशी उभ्या असलेल्या कुलेशांना विचारले.

“जी. कार्तिक शुद्ध त्रयोदशी.” कवींनी पूर्तता केली. महाराजांनी बैठकीवरच्या तबकातील एक गुलाबी गेंद उचलला. त्याला चिमटीत फिरका देत कसल्यातरी विचाराने ते गिर्दीला रेलले.

तीन सालांपूर्वीचे असेच थंडीचे दिवस त्यांना आठवले. “तो माहुलीचा संगमघाट… सरसरत चाललेल्या नौका… पठाणी तळ… तगडा, बेगुमान दिलेर! भटकल्या क्षणांवर वाया गेलेलं आणि कधीच न पुसता येणारा काळिमा घेऊन आलेलं पुरतं एक साल!’

“आता भेटीस येणारा अकबर आणि त्या वेळचे आम्ही यात तफावत काय? अकबर आपल्या जन्मदात्याविरुद्ध बंड करून आला आहे. आमचं होतं आबासाहेबांविरुद्ध बंड? अकबराला दिल्लीच्या तख्ताची आस जडली आहे. आम्हाला होती रायगडाच्या सिंहासनाची? नाही – नाही. मग कोणाविरुद्ध होतं आमचं बंड? तो तर आमचाच आमच्याविरुद्ध पुकारला उठाव होता. गाफील, अविचारी.

“तो समजून घेण्याची कुवत होती आबासाहेबांच्यात म्हणूनच तर आम्ही परतलो. नाहीतर? हा अकबर परतेल आपल्या जन्मदात्यांकडं, कधी मनात आलं तरी? घेईल औरंग त्याला आपल्या छातीशी पित्याच्या मायेनं? आणि हा तरी काय करील, आपल्या बापाचं जर याच्या मनासारखे फासे पडून दिल्लीतख्त याच्या हाताशी आलं तर? आमच्या स्वप्नात तरी कधी आबासाहेबांबद्दल वेडंवाकडं आलं होतं? ही – हीच ती तफावत आहे. मोगली राजकुळ रक्तापेक्षा तख्त मोलाचं मानतं आणि मराठी राजकुळ रक्ताचं तख्तच मोलाचं मानतं!’

जिवाजी लगबगीने दालनात आले. तिवार मुजरा करत दरवाजाकडे हातरोख देऊन म्हणाले, “शहजादा अकबर येताहेत.”

छत्रपती बैठकीवरून उठले. जरीकोयऱ्यांच्या नक्काशीचा सफेद, तलम जामा अंगी घेतलेला, पाचूपदकाचा हिरवाकंच मोगली, बसका किमॉश मस्तकी चढविलेला, चुणीदार तलम तुमान पेहनलेला तरणाबांड शहजादा अकबर आत प्रवेशला. त्याच्या छातीवर छत्रपतींनीच नजर केलेला मोतीकंठा होता. कोरल्या दाढीची चर्या काटेफड्याच्या बोंडागत लालबुंद होती.

नकळत क्षणभर दरवाजातच खिळून पडल्या अकबराने नजर एकवटून समोरचे मर्दपण निरखले – बऱ्हाणपूर दफा करणारे! एकच विचार त्याच्या मनात सरकून गेला – शाही हास्य खुलवीत, हात पसरते घेऊन शहजादा अकबर तरातर पुढे आला. छत्रपतींनी त्याला खांदाभेट दिली. त्याचा हात हाती घेत इतमामाने त्याला बैठकीवर आणून बसविले. मिर्झा यहुद्दिन शुजाई, वकील अब्दुल हमीद, दुर्गादास राठोड ही शहजाद्याची विश्वासू माणसे त्याच्या बगलेला अदबीने उभी राहिली.

परस्परांनी एकमेकांना नजराण्यांचा रिवाज केला. छत्रपती आपल्या हातचा गुलाबगेंद अकबराच्या हाती देत म्हणाले, “हा तुमच्या देशीचा गेंद. आमचा पहिला मेहमान. आम्हास आवडतो!”

राजे काव्य बांधतात हे ऐकून असलेला शहजादा दिलखुलास हसत उत्तरला, “बहुत खूब शायरी मिसाल है ये आपका राजासाब। हम भी अच्छे लगेंगे आपको।” दिलेला गेंद त्याने चटकन नाकाशी नेला.

एकांत घेण्यासाठी आपल्या माणसांना महाराजांनी हात उठवून इशारत दिली. ठरल्याप्रमाणे कवी कुलेशांखेरीज सर्व बाहेर पडले. अकबरानेही दुर्गादास राठोडाखेरीज आपल्या माणसांना निरोप दिला. छत्रपतींनी सावधपणे भेटीच्या विषयाला हात घातला, “आमच्या देशीचे हे दख्खनी हवामान मानवेल तुम्हास शहजादे?”

“शाही हवासे ये जरेदरेंकी हवा कम खतरनाक है, राजासाब!” रोख ओळखून आपल्या बापाबद्दलची सूचक नापसंती अकबराने नोंदवली. एकमेकांचा अंदाज घेत मने खुली होऊ लागली.

“आमच्याविरुद्ध बांधल्या बनावाचे कागदपत्र थेट आम्हाला धाडून थोर काम केलं आहे तुम्ही शहजादे.” महाराज अकबराचे ते कृत्य विसरूच शकत नव्हते.

“वो इनकी करामत है।” अकबराने दुर्गादासाकडे हात केला. तगडा राठोड नम्रपणे लवला.

“आम्ही नाही समजलो.” महाराज दुर्गादासाकडे बघत बोलले.

“बो इनकी नेक सलाह थी राजासाब – बडे इमानदार है दुर्गाजी| इनकी मसलत थी, खलिते आपको पेश करनेकी।” पहिल्या नजरभेटीतच दुर्गादासाबद्दल महाराजांचे मत चांगले झाले होते, ते वाढले. आपल्या सेवकाबद्दल गौरवाचे बोल काढणाऱ्या अकबराबद्दलही ते अनुकूल होत चालले.

“पुढचा मनसुबा काय तुमचा शहजादे?” छत्रपतींनी मूळ धरले.

असंख्य चावऱ्या आठवणींनी अकबराची लालगौर चर्या वेढून आली. जन्मदात्याविषयीचे तिखट, कडवे बोल त्याच्या जबानीतून सुटले, “आलमगीर हिंदोस्तांको दफा कर देगा राजासाब। ये कोई तरीका है सल्तनतका कि रियाया हैरान हो? जिजिया, बुत्शिकनी, जुल्म और कत्ल! कैसे रहेगा हिंदोस्तांका भरोसा शाही खानदानपर? आलमगीर अपने आपको और शाही खानदानको खतरेमें डाल रहा है। ये रोकना है, जानकी कीमतपर।” तो बोलला ते सत्य होते, पण कितीतरी अवघड! आपल्या बापाचे दोष अकबराला अचूक कळले होते, पण त्याच्या अफाट ताकदीचा अंदाज समजण्यास शहजादा अपात्र होता.

“सही आहे तुमचं शहजादे, पण आलमगिराच्या फौजीबळाचा खयाल ठेवला पाहिजे. ज्याच्यापुढं तुमचे दादाजी बादशहा शहाजहान, चाचा दारा, मुराद शिकस्त झाले, त्याच्याशी हा जंग आहे. त्यासाठी काही मसलत?” शांतपणे महाराजांनी अकबराला, त्याच्या रक्ताची आलमगिराने लावलेली वासलात कौशल्याने कानी घालून सुरावर घेतले. अकबर दाराचा जावई होता आणि त्याच्या विचारांवर बरीचशी दाराचीच छाप होती. सरळधोप चाल बोलीभाषेला ठीक असली, तरी राजकारणाला ती लागी नसते! औरंगजेबासारख्या पाताळयंत्री व शूर प्रतिस्पर्ध्याबाबत तर ती कधीच नसते. छत्रपती ते जाणून होते. आग्ऱ्याची कोठी ते काही विसरू शकत नव्हते.

अकबराने छातीवरचा मोतीकंठा क्षणभर चाळवला. औरंगजेबाला शिकस्त देण्याची मनची मसलत त्याने खोलली, “बिल्कुल दुरुस्त है, आपका खयाल राजासाब। अब आलमगीर दख्खनपर चला आ रहा है। हम उत्तर में राजस्तान लौटना सोचते है। हिंदोस्ताँमें आलमगीरकी होड लेनेकी ताकद दोही मुल्कोंमें है – रजपूत और मरहट्टोंके।

जयपूरका राजा, मिर्झा राजे जयसिंग का कुंवर रामसिंग आलमगीरपर खफा है। आलमगीरने मिर्झा जयसिंगको दगा देकर जहर खिलवाकर उसे कत्ल किया, उसका बदला रामसिंग चाहता है। हमें उम्मीद है, दुर्गाजी और रामसिंगकी मदतसे हम रजपुतोंको इकठ़ा बॉ्धेंगे। पर्शियाके शाहको भी हाथ देनेके लिये लिखा है, हमने….

“राजासाब, इस वक्त आप जोड देते होंगे, तो आलमगीरका नामोनिशाँ मिटा देंगे हम|” अकबर उजळत्या डोळ्यांनी मुद्दयावर आला.

“आम्ही जोड करावी ती कसली?” महाराज शांतच बोलले.

“चुना पचचीस हजार मरहदट्टा हशम साथ देनेकी। यही वक्त है, हमारा जंग अजमानेका।” अकबराचे कान महाराजांचा होकार ऐकायला आसावले. मोठ्या आशेने तो राजांच्या डोळ्यांत बघू लागला.

छत्रपतींची नजर दुर्गादास राठोडकडे वळली. अकबरापेक्षाही कानी आल्या माहितीवरून महाराजांचा दुर्गादासावर अधिक भर होता. हा राठोड संगतीला होता, म्हणून तर अकबर अजून जिवंत होता!

“दुर्गाजी, तुमचा विचार?” छत्रपतींना राठोडाच्या नेकीचा विश्वास होता म्हणून त्यांनी सवाल केला.

“जी. आलमगीर पहला हथियार मरहट्टोंपर धरेगा राजासाब। आदिलशाही और कुतुबशाही सल्तनतके मांडलिक है। मरहद्रे नहीं। अब दक्खन लडाना आपके खंदेपर है। चाल आलमगीरकी और जबाब आपका ऐसाही ढंग रखना चाहिये। पहले आलमगीरको फौजके साथ दकक्‍्खनमें झुलाना होगा। वही मौका होगा उत्तरमें रजपुतोंके छलांगका। सोचकर आप फैसला रखना राजासाब।” मुरब्बी दुर्गादास महाराजांच्या मनातलेच बोलला.

“बिल्कुल दुरुस्त दुर्गाजी. शहजादे, दुर्गाजींची मसलत आम्हास पटते. औरंगजेब दक्षिणेत गुंतला तरच तुमच्या उठावाला आम्ही माणूसबळ पुरवू शकू. मातब्बर गनीम ऐन तोंडावर असता गाठीची फौज आम्ही कुठेच दूर गुंतवू शकत नाही.” छत्रपतींनी अकबराला निर्णय दिला.

खट्टा झालेल्या अकबराला हातच्या चुरल्या गेंदाच्या पाकळ्या बैठकीवर केव्हा उतरल्या हे लक्षात आले नव्हते, तरी महाराजांनी ते टिपले होते.

आवाजात समजुतीची हल्लक भरून महाराज अकबराचा हात थोपटीत म्हणाले, “शहजादे, तुमचा सल आम्ही जाणतो. पण मनाच्या जहालीने राजकारणे चालत नाहीत. तुम्ही आमचे मेहमान आहात, आमच्या राज्यात सुखरूप आहात. विश्वास ठेवावा. मौका येताच तुमचे मनसुबे कार्यी लागतील, धीर ठेवा. जयपूरच्या राजा रामसिंगांना आम्ही लिहू. तुम्हीही लिहा. तुमच्या भेटीचा निवाडा समयच देईल.”

“ठीक है राजासाब। हम रुकते है, लेकिन खयाल रखना जबतक हम आपके मुल्कमें है, चैनकी नींद नहीं देगा आलमगीर आपको।”

ते ऐकताना महाराजांना म्हणावेसे वाटले – “आजवर ती कधीच लाभलेली नाही आम्हास.” वरकरणी हसत ते म्हणाले, मात्र “प्रत्यक्ष आपल्या फर्जंदाची नींद हराम करणाऱ्याचा आमच्याबाबतचा तेवढा अधिकार मानतो आम्ही शहजादे।”

निरोपाचे विडे आले. ते घेऊन बैठकीवरून उठणाऱ्या शहजाद्याच्या हाती समोरच्या तबकातील एक तवाना गुलाबगेंद पुन्हा देत महाराज नुसते हसले. न राहवून अकबराने भावभऱ्या डोळ्यांनी छत्रपतींच्या खांद्यांना खांदे भिडविले. आपल्या माणसांसह तो आपल्या तळाकडे निघाला. पाच पावलांची रिवाजी सोबत त्याला करून महाराज थांबले. पाठमोऱ्या अकबराची जाती पावले बघताना त्यांच्या मनात विचार एकवटून आले – “किती वनवास आला आहे, या पावलांच्या वाट्याला. औरंग! कसल्या मुशीचा हा असामी? हा कसला नातेसंबंध?’ गुंतत चाललेल्या मनाला तोडून समोरच्या कुलेशांना ते म्हणाले, “कविजी, तुम्ही शाहजाद्यांच्या सोबतीत इथंच राहा. त्यांच्यावर नजर ठेवा. राजकारण म्हणून नाही, तरी भांबावून तो भलतीच उचल खाण्याची शक्‍यता आहे. यास सावरले पाहिजे.”

“जी.” कुलेशांनी राजाज्ञा झेलली.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६७.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment