महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,790

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६८

By Discover Maharashtra Views: 1329 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६८ –

महाराज विचारांवर फेर घेऊ लागले. त्यांच्या आणि धोंडशाला चाललेल्या अकबराच्या मनात टिपरी झडत होती, ती एकच – अलमगीर! आणि नेमक्या याच दिवशी, शाही सवारीच्या सजल्या हत्तीवर अंबारीत बसून झडती शाजणे, नौबती डंक्यांच्या उसळत्या गजरात, प्रचंड फौज पाठीशी घेऊन औरंगजेब बऱ्हाणपूरच्या वेशीत प्रवेशत होता! त्याची घारी नजर हौद्यातूनच बऱ्हाणपुराभोवतीची तटबंदी नीट उठली आहे की नाही, याचा तलाश घेत होती! खैरात मिळालेले फकीर, मुल्ला, मौलवी त्याला हात उठवून तोंडभर दुवा देत होते!

पालीहून रायगडी आलेले महाराज, गडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या दारू कोठारासमोर मांडलेली तोफांची भांडी निरखीत निळोपंतांना म्हणाले, “फरांसिसांच्या वकिलानं दिला शब्द पाळला पेशवे?”

“जी, आताषीचा बारदानाही त्यांनी पावता केला आहे.” निळोपंतांनी अधिकाचा तपशील दिला. पन्हाळ्यावर भेटलेल्या डच वकील लेफेबेरने आपल्या दरबारी शिफारस करून तोफा व दारूगोळा रायगडी पाठविण्याची व्यवस्था केली होती.

“मुहूर्त बघून या भांड्यांचं पूजन करून घ्या पंत.” कसल्यातरी विचारात गढलेल्या महाराजांनी, घोड्याचे थोपटावे, तसे गाड्यावरच्या एका तोफेचे पाठवान थोपटले. दारू कोठाराची बंदिस्ती नजरेखाली घालून ते निळोपंत, जोत्याजी केसरकर, येसाजी कंक यांच्यासह बालेकिल्ल्या कडे निघाले.

निळोपंतांनी एक महत्त्वाचा निरोप त्यांच्या कानी घातला, “कर्नाटकातून हरजीराजांचा हारकारा आला आहे. प्रांताच्या कारभारासाठी हरजींना पावलोपावली रघुनाथपंत हणमंत्यांना सल्ला विचारण्याचा प्रसंग येतो, हणमंते कोठीबंद असल्यानं…” निळोपंत अर्ध्यावरच थांबले.

छत्रपती रुकले. त्यांनी विचारले, “काय उपाय आहे यावर हरजींचा पंत?”

लगबगीने पेशव्यांनी हरजींचा बेत छत्रपतींच्या समोर ठेवला, “ते म्हणतात – हणमंत्यांकडील दफ्तरी कागदपत्रं ते सर्व जप्तीनं हस्तगत करण्याचा हुकूम व्हावा.”

महाराज विचारात पडले. रघुनाथपंतांचा कर्नाटकाचा कारभार चोख होता. फक्त कटाच्या घालमेलीच्या वेळी त्यांनी काही धरसोडी दाखविली होती. तसे केल्याने नतीजा काय पावतो, एवढे कळण्याएवढी शिक्षा त्यांना झालीही होती. निर्णय देत महाराज म्हणाले, “पंत, हरजीराजांना कळवा, रघुनाथपंतास मुक्त करून कर्नाटकाच्या मुजमूची अखत्यारी त्यांसच पुन्हा सुपुर्द करावी! कागदपत्रं बोलतात ते त्यांच्या कलमबाज धन्याच्या इशारतीवर! ते तसेच बोलते करून चालवावे. माणसे चुकतात, पण दुरुस्त करून घेणाऱ्यानं चुकून नाही चालत.”

अपेक्षा नसलेला निर्णय ऐकून निळोपंतांनी नेटके असलेले उपरणे पुन्हा नीट करीत रुकार भरला, “जी!”

“कंककाका, हंबीरराव केव्हासे फिरतात वबऱ्हाडातून माघारी? आम्ही वाट बघतोय त्यांची.” रामराजांच्या लग्नाच्या विचाराने छत्रपतींनी येसाजींचा माग घेतला.

“जी. परतीच्या वाटंबर हाईत सरलस्कर. चार-आट दिवसांत गड चडावंत त्ये.”

झडते मुजरे स्वीकारीत महाराज खासेवाड्याच्या सदरेला आले. तिथे खंडोजी, प्रल्हादपंत, खंडेराव पानसंबळ आणि बांदल मावळातून आलेला, दीपाई बांदल या बाईचा नातू शंकराजी अशा असामी होत्या.

शंकराजी खास वजेने छत्रपतींना भेटण्यासाठीच आला होता. तो कमरेत लवून बैठकीवर बसलेल्या साहेबस्वारींना म्हणाला, “सरकार, आमच्या आजीला थोरल्या धन्यानी दिल्याली मौजे पऱ्हेरची देनगी काही लाभत न्हाई. चोळीलुगड्याची देन हाय ती. पानी सोडावं का आमी त्येच्यावं?” त्रासल्या चर्येने त्याने हातातील कागदपत्रांची थैली, पुढे होत महाराजांच्या पायांजवळ ठेवली. मान खाली घातली.

शंकराजी दीपाई बांदलाचा नातू होता. त्याच्या बापाने – रायाजीने, थोरल्या स्वामींनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांवरच्या दोन वेळा केलेल्या चालीत मोलाची कामगिरी केली होती. त्यासाठी मेहर होऊन मौजे पऱ्हेरचे इनाम दीपाईला चोळी- लुगडे म्हणून खुद्द आबासाहेबांनी बहाल केले होते.

शंकराजीने पायांशी ठेवलेल्या थैलीवर टाकलेली नजर तशीच उचलून महाराजांनी खंडोजींना दिली. तत्परतेने पुढे होत त्यांनी थैली उचलली. आतील कागदपत्र बाहेर घेऊन ते पडताळू लागले.

“बांदल, सुमार असा. आबासाहेबांनी दिला शब्द पाळू आम्ही.” महाराजांनी शंकराजीला धीर दिला. अंदाजासाठी चिटणीस खंडोजींच्याकडे बघितले.

“या अस्सल सनदा आहेत स्वामी, थोरल्या स्वामींच्या शिक्के दस्तुराच्या.” खंडोजींनी रुजवात दिली. महाराजांनी शांतपणे शंकराजीला विचारले,

“कसली तकलीफ आहे तुम्हांस बांदल?”

“जी. मावळाचं कारभारी गोपाळ रायाजी हो कागद मानाय तयार न्हाईत! नवं आन म्हंत्यात.” शंकराजीने अडचण सांगितली.

“काय?” महाराजांची भुवई चढली. खंडोजींना तत्काळ आज्ञा मिळाली, “चिटणीस, गोपाळ रायाजींना कलमी समज द्या. बांदल आम्हास जातीनं भेटले. कागदांची रुजवात दिली आहे. कै. स्वामींनी मौजे पऱ्हेर दीपाईस चोळीलुगडे म्हणून इनाम दिल्हे आहे. ते अवलाद अफलाद तसेच चालविणे. ताज्या सनदेची उचूर न करीत जाणे. फिरून काडीचा बोभाट येईल तो जमेस नाही!”

मान डोलवून खंडोजींनी रुकार भरला. शंकराजीची चर्या, मिळाल्या न्यायाने उजळून आली. “धन्यांची म्हेरबानगी” म्हणत तो मुजरा देऊन निघून गेला.

“महाराज, बऱ्हाणपूरला ठाण झाल्या गनिमानं नांग्या पसरायला सुरुवात केली आहे.” महत्त्वाची बाब पुढे घेत प्रल्हादपंत क्षणभर थांबले. कानी पडेल ते ऐकायला सिद्ध असलेल्या महाराजांनी त्यांच्यावर नजर जोडली.

“चौदा हजार स्वारांच्या दिमतीनं बऱ्हाणपुराहून कूच झालेला हसनअलीखान तळकोकणचा रोख धरून मजलांनी येतो आहे. संगती त्याचा मजला हुसेन आहे.”

सांगितल्या चालीवर महाराजांचे ऐकण्यासाठी प्रल्हादपंत थांबले. विचारात गढलेले स्वामी बघून दुसरी वार्ता बोलावी की नको, या विचारात ते पडले.

“बोला प्रल्हादपंत, आम्ही सारे समजून आहोत. नाशिकपट्ट्यात शाबदीखान मुल्हेरला पोहोचला आहे. मुल्हेरच्या किल्लेदार देवीसिंहाचा जोर घेऊन तो आमच्या साल्हेरीला भिडला आहे. आमचे रूपाजी त्याला हुलकावण्या देत हररोज त्याच्यावर छापे घालताहेत.” बोलता-बोलता महाराज बैठकीवरून उठले. शून्यात पक्की रोवल्यागत दिसणारी त्यांची नजर जसे समोरचे साल्हेर-मुल्हेरच बघत असल्यासारखी दिसू लागली.

येसाजी, निळोपंत, पानसंबळ, आवजी, प्रल्हादपंत सारे जण त्यांच्या या आगळ्या मुद्रेकडे बघतच राहिले. क्षणार्धात त्या मुद्रेवरच्या शोधक डोळ्यांतले भाव पालटले. मान डुलवीत स्वत:शीच बोलल्यासारखे महाराज बोलले, “औरंग याहून पसरत्या नांग्यांनी येणार हे हेरून आहोत आम्ही पंत, चिटणीस. आम्ही पुन्हा चाल घेऊ, या रास्त हिशेबानं त्यानं नगरचं ठाणं शहजादा आझम, मुन्वर आणि किलिचखान यांची कुमक देऊन भक्कम केलं आहे. औरंग येतो आहे, तो राजरोस. वाजत-गाजत, हमला पुकारून पण…” डोळ्यांत चीड उतरलेले छत्रपती अस्वस्थपणे थांबले. कसलातरी पेच उकलण्यासाठी स्वत:त गुंतल्यागत झाले. भोवतीच्या असामी समोर नसल्यासारखे एकलेच पायफेर घेऊ लागले.

ते बघून न राहवलेले खंडेराव अदबीने म्हणाले, “काही अडचण, जोखीम असेल, तर हुक्‌म व्हावा धन्यांचा.”

खूप खोलवर मन टोकरत गेलेले महाराज, ते ऐकून भान घेत म्हणाले, “खंडेराव, कोंडाजी फर्जंद कुठं आहेत सध्यास?”

“कल्याण-भिवंडी भागात ते तुकाजी पालकरांच्या दिमतीत आहेत स्वामी.” प्रल्हादपंतांनी तत्परतेने पूर्तता केली. “प्रल्हादपंत, त्यांना तातडीनं रायगडी पेश घ्या. आमच्या भेटीस पाठवा.”

छत्रपतींनी एकांत घेण्यासाठी हात उठविला. या वेळी ‘कोडाजींचीच याद का व्हावी?’ हा विचार मनाशी घोळवीत प्रत्येक असामी बाहेर पडली.

गडाच्या आघाडी मनोऱ्यालगत असलेल्या शिळाबंद खलबतखान्याच्या कोनाड्यातील टेंभे ढणढणत होते. त्यांच्या तांबूस, पिवळ्या उजेडात तीन मुद्रा उजळून निघाल्या होत्या. बाहेर थंडीने गारठलेली रात्र गड धरून पसरली होती.

“सरलष्कर, हबशी हाताबाहेर गेला आहे.” बैठकीवर बसले महाराज हंबीररावांना चिंतेने म्हणाले. त्यांच्यासमोर वीरमांडा घेऊन, वऱ्हाडातून आलेले हंबीरराव आणि कल्याण प्रांतातून आलेले कोंडाजी फर्जंद बसले होते. कानांत प्राण आणून ते आपल्या धन्याचा सल ऐकत होते.

“उभा आपटा गाव जाळून गेला हबशी. नागोठाण्यात आपल्या कैद रयतेची नाकं छाटण्याएवढा माज भरला आहे त्यास. जंजिरा दर्यादोस्त झाल्याखेरीज आम्हास चैन नाही.” कोनाड्यातील पेटते टेंभेच जसे महाराजांच्या डोळ्यांत उतरले.

ते ऐकताना मिश्यांचे कंगोल ताठरलेले हंबीरराव चटक्या चिडीने म्हणाले, “आज्ञा करावी धनी. याच पावली भिडताव आम्ही जंजिऱ्याला… वऱ्हाडाची क्‍्येली ती गत जंजिऱ्याची केल्याबिगात त्वांड दावाय येतच न्हाई आमी.”

“नाही मामासाहेब, या दर्याच्या पाणसावजासाठी आम्ही तुम्हाला मोगलाईच्या तोंडावरून नाही काढू शकत, या ऐन समयी. त्यासाठीच कोंडाजींना याद घेतलंय आम्ही.”

छत्रपतींची नजर कोंडाजींवर खिळली. डोळ्यांसमोर जंजिरा तरळत असलेले कोंडाजी ‘जी’ म्हणत बसल्या जागीच सरसावले.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १६८.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment