महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,28,106

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७०

By Discover Maharashtra Views: 1390 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७० –

“पंत, आपल्या कारवारतर्फेच्या सुभेदारास असेल त्या कुमकेनिशी अंजदीव बेटावर चाल घेण्यास हुकूम द्या. अंजदीव दस्त झाले पाहिजे. फिरंगी त्यावरही डोळा ठेवून आहे, हे कळवा त्यास.”

पंतांच्या ध्यानीमनी नसलेला कोलदांडा छत्रपतींनी फिरंग्यांविरुद्ध खोलला. त्याने समाधान पावलेल्या निळोपंतांनी टोपीकरांची एक बाब पुढे घेतली,

“मुंबईचे टोपीकर एका वजेनं नाराज झालेत स्वामी.”

“कोण वजेन?”

“नागोठाण्यात गैरअंमल करणाऱ्या हबश्यांना मदत करता, असा आरोप ठेवून आपल्या सुंदरजी बाजींनी गोऱ्यांची दोन गलवतं नागोठाण्याच्या बंदरात अडकवून ठेवली आहेत. त्यासाठी टोपीकर घायकुत करताहेत.”

“निळोपंत, एका समयास चौबाजूंचा गनीम पेटता ठेवणे लागीचे नाही. सुंदरजींना कळवा, जरब देऊन टोपीकरांची गलबतं खुली करणे.”

“जी. कुतुबशाही दरबारकडून एक नजराणा आला आहे, स्वामी. चार लाख पगोड्यांचा तबकाचा.”

महाराज हसून निळोपंतांना म्हणाले, “तो नजराणा नाही पंत, ती मदत आहे. आम्ही आलमगिराविरुद्ध खडे ठाकावे, यासाठी आलेली! आमच्या अभिषेकसमयीही एवढी रक्कम नव्हती आली कुतुबशाहीकडून. पाहुण्याच्या काठीनं साप मारणं, हे तर राजकारणच आहे! शहाला पोच देऊन कळवा. दिला दोस्ताना पावला. समयास आम्हाला माणूसबळ लागेल. दख्खन पैशानं नव्हे, तर माणूसमेळानं राखणं आहे.”

चार दिवस उलटले. मुहूर्ताच्या ठरल्या दिवशी, भल्या पहाटे कुणबिणींच्या तांड्यात सरंजामाने जाऊन येसूबाई गडदेबी शिर्काईची ओटी भरून आल्या. गांगोलीला जाणारे पडदाबंद मेणे सातमहालासमोरच्या हमचौकात हत्यारबंद धारकऱ्यांच्या घेरात सिद्ध झाले होते.

सकवारबाईची पायधूळ घेऊन येसूबाई रामराजे व ताराऊ यांच्यासह आपल्या स्वारींच्या दर्शनासाठी बैठकी दालनात आल्या. त्यांच्या संगती आता पार थकलेली, डुईवरची केसावळ साफ चुनेरंगी झालेली, भोसलेकुळीची सावली म्हणूनच जिंदगी जगलेली धाराऊ होती. रूपा नावाची एक खास कुणबीणही होती. येसूबाईना बघताच महाराज पाच पावले पुढे झाले. हाती नेसूचा पदरशेव धरून, सुवर्णकंकणांचा किणकिणाट उठवीत महाराणींनी आपल्या कुंकबळाला तिवार नमस्कार केला. मुजरा करू बघणाऱ्या रामराजांना जवळ घेत, समोरच्या खालगर्दनी येसूबाईशी कसे बोलावे, याचा छत्रपती मनाशी मेळ घालू लागले. त्यांना एवढेच म्हणायचे होते, “तब्येतीस सांभाळून असा.”

पण येसूबाईच म्हणाल्या, “येऊ आम्ही? स्वारीनं तब्येतीस सांभाळून असावं!”

जी.” कधी नव्हे तो अदबरिवाजी बोल महाराजांच्या तोंडून सुटला. आणि ते बोलून गेले, “आम्ही येतो आहोत मनोऱ्यापावेतो पायसोबतीला.” विचारांच्या घालमेलीत राहिलेला नमस्कार धाराऊला द्यावा, म्हणून तिच्या पायाला हात लावण्यासाठी महाराज झुकले. त्यांच्या टोपावर हात ठेवीत म्हातारी म्हणाली, “असू दे रं माज्या लेकरा! तुज्या पोटाला थोरलंच येनार हाईत!”

ते ऐकताना कानशिले सरसरलेल्या येसूबाई पाठमोरे होत बाहेरही पडल्या. शिबंदीने वेढलेले मेणे पालखी दरवाजाने आघाडी मनोऱ्याजवळ आले. क्षणभर थांबले आणि गड उतरण्यासाठी चालू लागले. छत्रपतींच्या मनात विचार उठला. “आता एकल्या जाताहात. याल तेव्हा?”

“धनी…” रायगडाच्या खासेवाड्याच्या सदरेला छत्रपतींच्या समोर रुजू झालेल्या, घामाने डबडबलेल्या नाईक बहिर्जीच्या तोंडून शब्द फुटता फुटत नव्हता. कृूचितच दिसणारी बहिर्जीची विचित्र मुद्रा बघूनच महाराजांच्या सेवेत असलेली निळोपंत, प्रल्हादपंत, आवजी, मोरेश्वर व केशव पंडित अशी खाशी मंडळीही हटत्या पावली मुजरा देत सदरेबाहेर पडली. सदर एकांती झाली.

रामोशी मुंडासे डुलवीत बहिर्जीची पाणावली नजर खिनभर धन्यावर खिळली. देठ मोडल्यागत क्षणात त्यांच्या पायांवर घरंगळली.

“नाईक…” चरकल्या मनी समोरून राजबोल उठले.

डोळ्यांसमोर काहीतरी काळजाची तोड करणारे प्रत्यक्ष बघतच असल्यासारखी बहिर्जीची गर्दन पुन्हा इुलली. डोळ्यांवाटे दोन-चार थेंब टपटपले. खांद्यावरून ओघळते कांबळे, त्याला धनी समोर असतानाही सावरावेसे वाटले नाही.

“नाईक काय झालं?” बैठकीवरून तडक उठत छत्रपतींनी विचारले.

बहिर्जींचे ओठ थरथरले. सदर चिरत इमानी रामोशीबोल कुचमतच बाहेर पडले. “घात झाला धनी – आपलं कोंडाजी ग्येलं, धनी!!” उमळत्या कढाने रामोशी नरड्याची घाटी गुदमरली.

नाईक अंगभर थरकलेले छत्रपती कळवळले. “नाईक – हे असं कसं? काय झालं नाईक?” मनच्या कढाला थोपा देत दौलतीचा नेक खबरगीर बोलू लागला, “महाराज, टेहळ घेत कोंडाजी हबश्याच्या कोटावर सावधानगीनं हुतं. पर आपल्याच मान्सानं गळा कापला सम्द्यांचा. सरकार फितवा झाला.”

“कुणी केला?” शोकाच्या जागी छत्रपतींच्या मनी संताप उसळला.

“हुरामजाद्या कुमाजी देसायानं!” बहिर्जीचा आवाज आता सुटा झाला. ते ऐकताना छत्रपती अस्वस्थ-हैराण झाले.

“बेमान देसाई हबश्याच्या कानाला लागला. कोंडाजी स्वांग घिऊन आल्यात. दारवंच्या कोठाराला, संधी साधून बत्ती द्याय टपल्यात. याचा माग कुमाजीनंच हबश्याचा दिला. रातोरात सम्द्या मान्सांसकट कोंडाजीस्त्री त्येनं दस्त क्येलं. रातभर कोरड्यांचा त्येनं मारा देऊन बोलतं करायची कोशिस क्येली. कांदडीतच बोलत कोंडाजी काही बधलं न्हाईत. एक असामी काही डरला व फुटला न्हाई त्येचा.”

त्याही स्थितीत एक खोलवर समाधानाची छटा महाराजांच्या मनभर पसरली.

श्वास घेत नाईकाने कोंडाजींचा धीरोदात्त शेवट आपल्या धन्याच्या कानी घातला.

“कोंडाजी बधत न्हाई ह्ये ऐकून चिडल्याला खुद्द शिद्दी खैरात फाटचं त्यासी बघाय आला. कोंडाजीम्होरं येत त्येंच्या तोंडावं थुकत म्हनला – ‘कुत्ते, तेरा सर काटके खंबेपर लटकायेंगे। बता दे व्हांसे अपने मालिकको – जंजिरेपर बदनजर रखनेवालेका ये हाल होता है!”

“हबश्याने सम्द्यांच्या डुया मारण्याचा हुकूम आपल्या जल्लादांस्नरी दिला.”

शोक, संताप, खंत यांनी छत्रपतींचे मन कोंदटून आले. झावळलेले डोळे सुन्न एकटक झाले. “धनी, मर्दावानी, कोंडाजी मौतीला सामोरं ग्येलं. उगवतीबरोबर कोंडाजींची गर्दन पहिल्यानं लाकडी खोड्यावर, चार हबश्यांनी दाबून झुकावली. जल्लादानं धारेचा सपाता उचलला. आन्‌… आन्‌ या वक्ताला मात्र जिवाच्या नेटानं उसळी घेत कोंडाजी ताठ खडं जालं. जंजिऱ्यावर पाऊल ठिवल्यापासत्रं पहिल्यानंच मावळीत ठाशीनं गराजलं – “आरं, व्हय आमी राजाची मान्सं हाव. मरनाला चाळ करून बांदल्यात रं आमी पायांस्री! ह्यो लाकडी खोडा तेवढा वळता करून रायगडाकडं फुडा करून ठेवा रं!”” बहिर्जीला कोंडाजींची ती मुद्राच जणू दिसत असल्याने पुढे बोलवेना. गलबलून गेलेल्या छत्रपतींच्या नेत्रकडा दाटून आल्या. हात छातीवरच्या संन्यासी भवानीमाळेवर चढला.

एकाएकी बहिर्जींची खाली पडलेली नजर झटका घेत वर उठली. छत्रपतींच्या डोळ्यांना थेट भिडली. थबथबते बोल त्याच्या तोंडून सुटून समोरच्या राजपावलांवर पडले. “धनी, कोंडाजींची मावळी काही हबश्यांना कळंना. तसं हात झटकून कोंडाजींनी आपल्या हातांनीच खोडा होवा तसा फिरवून रायगडाकडं फुडा करून घेतला! मान खोड्यावर ठिवायच्या अदुगर गडाला – धन्यास्री मुजरा देत कोंडाजी म्हनलं, ‘आमच्या रगताचा भंडारा उधाळला म्हाराज जलकोटावं! कसुराची माफी असावी. चाकराची सय ठेवावी… जै भवानी….’

“सरकार, उगवतीबराबर कोंडाजीसकट पन्नास असामींच्या मुंड्या दर्यात उठविलेल्या खांबावं हबश्यांनी लटकावल्या. दर्याच्या वाऱ्यावर हिकाळत त्या मिटल्या डोळ्यांनी ह्यो गडच बघत हुत्या शेवटच्या बक्ताला!”

छत्रपतींनी डोळे मिटले होते. त्यांच्या छातीवरच्या माळेवर त्यांच्या राजआत्म्याच्या कढ टपटप टपकत होता. पडले कांबळे उचलून बधिर बहिर्जी सदरेबाहेर बाहेर पसरत्या दाट थंडीच्या अंगीही काटा उमटावा, असे रायगडाच्या सिंहासनसदरेला घेरून टेंभे पेटून उठले होते. पुऱ्या सिंहासनचौकाला जागत्या हत्यारी पहाऱ्याचे कडे पडले होते. जगदीश्वराच्या सांजआरतीचे नाद, नुकतेच गडाला थोपटून भोवतीच्या दऱ्यांत विसाव्याला उतरले होते.

सिंहासनसदरेत दर्यापट्टीतूत एकवट झालेला सारंग आणि लढाऊ म्होरका वीरमांडांवर बसला होता. त्यात महाडचे सरसुभा दादाजी रघुनाथ देशपांडे, त्यांचे बंधू विसाजी रघुनाथ, मायनाक भंडारी, दौलतखान, गोर्विदजी जाधव, उदाजी पडवळ, गोर्विद कान्हो, सुभाना खराडे, भिवजी गुजर, माणकोजी अशा असामी होत्या. सिद्द्याला पारखे होऊन मराठी दौलतीच्या चाकरीत, कुराण-किताब उचलून आणभाकेवर आलेले सिद्दी संबूळ आणि सिद्दी मिश्री, तर बैठकीत आघाडीला होते. सर्वांच्याच मनात एक खारट सल साकळून आल्याने कुणीच काही बोलत नव्हते.

सदरी मसलतील रिवाजाची भंडारापरडी फिरली. दौलतीच्या सिही सारंगांनीसुद्धा तिची बोटे गळपट्टीवर घेतली.

उगवतीला पुढा धरून असलेल्या हुजूर बैठकीवर छत्रपती बसले होते. त्यांच्या चर्येवरून त्यांच्या ‘मनात घुसळणारा दर्या’ मात्र कुणालाही पारखता आला नसता. इतकी ती शांत होता. छत्रपतींच्या दुहाती निळोपंत, दत्ताजी त्रिमल, खंडराव, पालीहून आलेले कवी कुलेश, प्रल्हादपंत, येसाजी कंक अशी खास माणसे उभी होती.

निळोपंतांनी मसलतीचे तोंड फोडले, “कोण वजेनं साहेबस्वारीनं सर्वांस याद घेतलं, हे सारे जाणता. औरंगाबाद, नगरप्रांत धरून दिल्लीश्वर उतरला आहे. समुद्रमार्गे त्याचा हस्तक याकुतखान दंडाराजपुरीवर आला आहे. एकीकडून जंजिऱ्याचा हबशी व याकुत आणि दुसरीकडून स्वत: आपण अशी कैची टाकून दौलतीची गळचेपी करण्याचा मनसुबी डाव गनीम बांधून आहे. त्याच बळावर जंजिरा उचल खातो आहे. हबशी खैरत बेहद्द जुलुमावर गेला आहे. त्यास ठिकाणावर आणणं ही मसलत आहे.” निळोपंत क्षणैक थांबले.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७०.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment