महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,644

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७१

By Discover Maharashtra Views: 1346 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७१ –

आपल्या जवान पोराचे शिर काढून नेलेल्या खैरतचा काटा मनात रुपत असलेला, “पालखी’ नावाचे गलबत बहाल करून थोरल्या छत्रपतींनी नावाजलेला मायनाक भंडारी एल्गाराचे बोलला, “ह्ये लई झालं. असं टांगतं किती दिस ऱ्हायचं? आमी, दवलतखान, संबळखान. आंगरं मिळून आरमारी फाट्याच्या एकवटीने जंजिऱ्याला धडका द्यावा म्हनताव.”

“नांदगाव, मुरुड, मांडला अशी पायदळाची फळी करून होड्यांवाटे जंजिऱ्याच्या खाडीतून चाल घ्यायची आम्ही शिकस्त करू.” मायनाकाला दादाजी रघुनाथांनी उचलून धरले. सर्वांनी त्या दोन्ही जाणत्यांना डुया डुलवून, हात उठवून जोड दिली.

छत्रपती काही बोलत नव्हते! त्यांच्या डोळ्यांसमोर उभी होती पन्हाळ्याची सज्जाकोठी! शेवटच्या भेटीत आबासाहेबांनी काढलेले शब्द त्यांच्या काळजाला तोडत होते – “जंजिऱ्यावर सिही पाय देऊन आहे, याची चिंता बाळगा. मावळा व्हा!”

महाराज काहीच बोलत नाहीत, हे ध्यानी आल्याने गोंधळलेले मसलतकरी चिडीचाप झाले. मसलत कुचमली. छत्रपतींचे मौन सोसवेनासे झालेला म्हातारा मायनाक पोटतिडकीच्या धाडसाने म्हणाला, “धनी, कशागुणं चिंता एवढी? आमी हायकी. इडंद्या आमस््री. ह्यो सुल्तानढवाच बडीवताव दर्यावर.”

त्या मायेने, मनाच्या एका टोकावर जाऊन थडकून आलेल्या छत्रपतींनी एकदा भंडाऱ्याकडे नजर दिली. बैठक सोडत ते खडे झाले. म्हणाले, “भंडारीकाका, आम्ही… खुद्द आम्ही भिडणार आहोत जंजिऱ्याच्या हबश्याला!!”

चटका बसावा तशा समोरच्या कैक पगड्या वर उठल्या. सिद्दी संबूळ- मिस्त्रींच्या तोंडून शब्द सुटला – “इन्शाल्ला!” खांद्यावरचे कांबळे हातफेरांत कवटाळून बगलेला उभ्या असलेल्या नाईक बहिरजींचे रामोस मुंडासे अभिमानाने डुलले.

डोळ्यांत रुद्र उतरलेल्या छत्रपतींच्या, स्वत:शीच बोलल्यासारख्या आज्ञा सुटू लागल्या – “प्रल्हादपंत, अरबी आरमाराचा दोस्ताना घेण्यासाठी नेकीचे हारकारे टाकीनं गड उतरून किनारा गाठतील ते करा. अरबांना त्यांच्या संगती साजेसे नजराणे द्या. निळोपंत, तुमच्या दिमतीला फौज घेऊन तुम्ही कल्याण प्रांतानं फळी धरणं आहे.

येसाजीकाका, गड, पाचाड महाडतर्फेच्या तोफा गोलंदाजांसुद्धा एकजाग करून तुम्ही जातीनं त्या दर्याच्या वाटेला लावा.

“आमचा हरएक नेक सारंग आज पाहुणचार घेऊन उद्याच गड उतरेल. आपल्या दिमतीचा आरमार लोक घेऊन, शिड्या, दोरबाज, बंदुकबारदार यांच्या बंदिस्तीनं आमच्या हुकमाची वाट बघत दर्यावर सिद्ध राहील.

“दादाजीप्रभू, तुम्ही विसाजी, अंत्याजीनं सोबतीनं महाडात भोवतीची फौजशिबंदी साधून आमची वाट बघाल. निळोपंत, साऱ्यांना विडे-वस्त्रे द्या.” महाराजांनी हात उठवून बैठक घेतली. मान घेऊन मसलतकरी बाहेर पडले.

छत्रपतींनी थोपवून घेतलेले मायनाक भंडारी, कवी कुलेश, बहिर्जी एवढ्याच असामी आता उरल्या. “नाईक, रायगड, जंजिरा, कल्याण या भागात तुमचे शेलके खबरगीर दौडते ठेवा.” बहिर्जीला आज्ञा मिळाली.

तो आपले जाळे कसे पेरायचे याचा बेत आखत निघून गेला.

“कविजी, तुम्ही शहजादा अकबराला धोंडश्याला खलिता धाडून या मोहिमेत त्यास आमच्या सोबत येण्यास लिहा. यानिमित्ताने त्याचे खरे-खोटेपण शाबीत होईल. मैदानी कसब पारखता येईल.” छत्रपतींनी कुलेशांनाही निरोप दिला.

आता सोबतीत मागे राहिलेल्या एकट्या मायनाकाला महाराज हसत म्हणाले, “चला भंडारीकाका, आपण आज संगतीने थाळा घेऊ!”

मायनाकाच्या सोबतीने महाराज मुदीच्या दालनात आले. छत्रपतींच्या चौरंगीसमोर मांडल्या पाटावर बसायला म्हातारा भंडारी संकोचला. त्याला घरोबा देत महाराज म्हणाले, “सारंग संकोचू नका. तुम्ही घरचे. पाट घ्या.” मायनाक अदबीने आपल्या सरकारांसमोर बसला. थाळे आले. चित्राहुती देऊन छत्रपतींनी घास घेतला. मायनाक मात्र पार गोंधळला होता. एकट्या आपणालाच आज धन्यांनी का बगलेला काढावे, याचा पेच काही उकलत नव्हता त्याला.

मायनाकाचा पहिला घास घशाखाली उतरला आणि पाठोपाठ त्याच्या कानांवर बोल पडले, “भंडारीकाका, तुम्ही दर्याच्या नाळेचे. त्याच्या हर लाटेची लग तुम्हास पारखीची. हबश्याच्या बसकटीची दुबल जागा कोण? जलकोटाला पान मारील त्या खाडीचा बाण, तपसील काय?”

म्हाताऱ्या भंडाऱ्याच्या पांढरमिश्या थरकल्या. आत्ता त्याच्या डुईत दिवा लागला! पाटावरच सावरून बसत तो म्हणाला, “जी. कोट लई बंदीचा हाय. भवत्यानं भरीचा तट फिरलाय. खाडीची वाट हीच हबश्याची दुबल जागा हाय. खाडी असेल तीस-चाळीस वाव लांब आन्‌ चौफेरानं आठ एकशे वाव रुंद. खाडी ही दुबल जागा हाय ह्ये हेरून हबश्यांनी आपली तोफांची भांडी खाडीचा म्होरा लावूनच मांडल्यात.”

प्रत्येक घासाबरोबर महाराज भंडाऱ्याला काही विचारीत होते. मायनाक जंजिऱ्याच्या भोवतालची जानकारी खडान्खडा समोर ठेवीत होता.

रायगडावर दाटत चालली रात्र एकच पाणस्वप्र बघत होती. जंजिरा! जंजिरा!!

खवळत्या पश्चिम दर्याच्या लाटाच लाटा पाठोपाठीने सरकत जंजिऱ्याच्या खाडीच्या किनाऱ्यावर आदळून, फेसाळत फुटत होत्या. खाडीचा किनारा धरून वीस हजार मावळी लढाऊ लोकांच्या लाटाच लाटा तळ बांधण्यात गढल्या होत्या!

रायगडाहून निघालेले छत्रपती महाडला दादाजी व विसाजी नरसप्रभूंची जोड घेऊन सुधागडावर शहजादा अकबर व दुर्गादास यांचा मेळ जमवून वीस हजारांच्या मातबर फौजेनिशी येऊन जंजिऱ्याला अटीतटीने भिडले होते.

बांधल्या जाणाऱ्या तळाची उठावणी नजरेखाली घालून, येसाजींनी रोखल्या तोफांचे मोर्चे पारखून छत्रपती खाडीच्या तोंडावर आले. त्यांच्या संगती शहजादा अकबर, दुर्गादास, दादोजी व विसाजी, कवी कुलेश, येसाजी अशा असामी होत्या. उद्या पेटणाऱ्या जलयुद्धाचा माग घेत सांजेचा सूर्य दूरवर मावळकोटावर लोंबकळत होता. क्षणभर त्याला निरखलेली छत्रपतींची रुद्रनजर पाणघेरात दूरवर दिसणाऱ्या जंजिऱ्यावर खिळून पडली.

“हा हाच तो मुजोर अड्डा आहे. मायनाकांच्या मुलाचे, आमच्या कोंडाजींचे आणि कैकांचे शिर उपटून नेणारा. आमची किनारपट्टीची गोरगरीब रयत होडक्यात घालून पसार करणारा. दूरदेशी हबसाणात त्यांचा गुलाम म्हणून विक्रा मांडणारा. आबासाहेबांची झोप हराम करणारा खारट सल इथंच दबा धरून आहे.’ केवढेतरी विचार त्यांच्या मनी थडथडत सरकू लागले. छत्रपतींची शोधक नजर खाडीभर सरसर फिरली. काही एक मनी बांधून पक्के झाले. खवळत्या दर्याला आणि डुबत्या सूर्याला, मान देऊन ते तळाकडे परतले.

त्याच वेळी जंजिऱ्याच्या तटावर येऊन सिही खैरात व सिही कासम किनाऱ्यावर रेंगाळणाऱ्या मावळी फौजेचे जाळे विस्फारल्या बुबुळांनी बघत होते. त्यांचे ओघळले, जाड ओठ उठता वर उठत नव्हते! मनोमन पुरती हाय खाल्लेले हबशी वर उसन्या धैर्याने आपल्या माणसांना काही हुकूम फर्मावीत होते.

सांजावले आणि ‘उद्या काय’ असा सवाल घालीतच हिवाळी अंधाराने मराठा तळ, जंजिरा आणि पश्चिम दर्या आपल्या पोटात घेतला. फुटत्या पहाटेला सादवीत मराठी नगारे, चौघडे, शहाजणे, शिंगे यांची कल्लोळती झड उसळली. झडते मुजरे आपलेसे करीत दादाजी व विसाजी प्रभू, येसाजी कंक, कुलेश, शहजादा व दुर्गादास अशा शेलक्यांच्या मेळातून महाराज जंजिराखाडीच्या तोंडावर आले. जलकोटाचा मोहरा धरून मांडल्या तोफांच्या गोलंदाजांनी छत्रपतींच्या साक्षीने भांड्यांना मानाचे कोंबडे दिले.

उगवत्या सूर्याची सोनेरी कोर फुटली तसे एक खंबीर, निग्रही राजबोट जंजिऱ्यावर त्रिशूलासारखे रोखले गेले! तळपत्या डोळ्यांखालचे थरथरते, संतप्त ओठ आज्ञा देत कडाडले – “सरलष्कर, द्या भांड्यास बत्ती! लोटा विसकक्‍्या दर्याच्या पाठीवर!”

“हुर हर म्हादेव! जय भवानी!”चा रणगजर तडाडला आणि किनारा दणाणून टाकीत तोफांची पाच भांडी झटका देत फुटली. सव्वाशेरी वजनाचे तोफगोळे जंजिऱ्याच्या तटावर दणाणत आदळले. वीस-वीस होडक्यांचे तांडे “विसक्यांनी’ एका मागोमाग एक असे दर्याच्या लाटांवर हिंदकळत पुढे सरसावले. ते पट्टीचे पोहणारे दोरबाज, शिडीबाज, बंदूकबारदार यांनी भरले होते. हुकमाप्रमाणे समुद्रावर कडे करून आलेली मायनाक, दौलतखान, आंगरे यांची लढाऊ गलबतं जंजिरा जवळ करण्यासाठी झेपावली. दिमतीला अरबांची आरमारी फळीही बगला धरून सुटली.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७१.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment