धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७२ –
पेटले! एक कुचमलेले पाणभांडण निकराने पेटले. सावध सिद्द्याने याकुतखानाच्या मोगली गलबतांचा समुद्रावर थोपा केला. खाडीतून हबशी खलाशी भरलेली होडकी फेकली. जंजिऱ्यावरच्या तोफांतून सुटलेले गोळे किनाऱ्यावर येऊन आदळू लागले. दिवस चढू लागला तशा मराठी तोफा चवताळून आगच आग पाखडू लागल्या.
छत्रपती जातीने गोलंदाजांना चेतावणी देत होते. थकले गोलंदाज हटवून तवाने भांड्यांन भिडवीत होते. रानचित्त्यासारखे खाडीच्या तोंडावर भिरभिरत होडक्यांचे तांडे दर्यावर लोटीत होते. जंजिऱ्यावरून येऊन आदळणाऱ्या गोळ्यांनी फेकलेल्या पाण्याच्या झपकाऱ्यात महाराज, शहजादा भिजून चिंब झाले. मध्यान्ह चढली तशा तोफा थांबल्या. तळाला थाळ्याचा हुकूम मिळाला.
मोठ्या उत्सुकतेने छत्रपती खाडीला डोळे लावून उभे होते. पाण्याच्या तळपत्या लाटांवरून काही काळे ठिपके त्यांना हिंदोळत येताना दिसले. ती उलटी झाली होडकी होती. रिकामी! काही मराठी – काही हबशी. पाठोपाठ काही घायाळ झाले धारकरी, पाण्यावर हात मारीत किनाऱ्याला कसेबसे येऊन थडकले. त्यांच्या अंगावरच्या जखमा खाऱ्या पाण्याने चरचरत होत्या. तळावरचा लढाऊ लोक त्यांना खांद्यावरून वाहून उपचारासाठी राहुट्यांत नेत होता. थाळ्याचे भान नसलेले छत्रपती जातीने जखमींची विचारपूस करीत राहुट्यांत फिरून आले. सिद्दी कडव्या झुंजीला तयार झाला आहे, हे त्यांना कळून चुकले.
दिवसभर आताषीचे गाडे, तोफा ठेचून-ठेचून रिकामे झाले. पाण्यावर लोटलेली होडकी, काही मध्येच खाडीच्या उदरात गडप झाली. काही या किनाऱ्याला, काही जंजिऱ्याच्या तटाला पालथी होत भिडली. तोफांनी जंजिऱ्याच्या तटाचे टवके उडवून सिद्द्याला जरब बसविली. दोन्ही बाजूंचे कित्येक धारकरी पाण्यात गडप झाले. दिवस मावळला. पुरा मराठी तळ जागा होता. जंजिऱ्यावर हत्यारी हबशी हशम डोळयांत तेल घालून, नंग्या तेगी पेलून तटभर फिरत होते. मध्ये असंख्य जिवांचा बळी घेतलेली खाडी लयीवर गर्जत, घुमत होती.
दुसरा, तिसरा, चौथा असे बारा दिवस सतत मराठी तोफांची दणदणती गोळामार जंजिऱ्यावर गरगरत आदळत राहिली. भेदरलेले समुद्रपक्षी खाडीचा परिसर सोडून दूर गेले. जंजिऱ्याचा तट आता पार उद्ध्वस्त झाला होता. किनारपट्टीवरच्या टोपीकर, फिरंगी वखारींनी तर मुंबई, सुरत, गोवा अशा आपल्या बड्या दरबारांना खलिते धाडले – “सिद्दी खैरतची आता खैर नाही. राजा संभू जंजिरा दर्यात डुबविल्याखेरीज माघारी परतत नाही!”
मराठी तळावर जखमींची संख्या वाढत होती. पाण्यावरून तरंगत आल्या वीर प्रेतांना आगीनडाग दिला जात होता. जंजिरा आता एकाच जबर धडकेचा धनी होता. समुद्रावर मराठी हबशी गलबते चवताळून एकमेकांना आग ओकत झोंबत होती. धोका दिसताच दूर हटत होती. पुन्हा भिडत होती. पंधरावा दिवस फटफटून उठला. नेहमीसारखे बख्तरधारी छत्रपती शहजाद्यासह शामियान्याबाहेर पडले. आज त्यांची चर्या मात्र वेगळी दिसत होती. स्वत:त डुबल्यासारखी. रात्रभर त्यांचा डोळ्यास डोळा जमला नव्हता. शेलक्यांसह ते खाडीच्या तोंडावर आले. बगलेला उभ्या असलेल्या निवडीच्या मावळी धारकऱ्यांनी त्यांना रिवाजी मुजरा दिला. धन्याची आज्ञा होताच, ते मागचे सर्व मागे टाकून होडक्यांत चढणार होते. त्या सर्वांवर छत्रपतींची जिम्मेदार नजर एकदा फिरली.
“दादाजी, दर्याची ओहट केव्हापासून धरते?” छत्रपतींनी सवाल टाकला. सवाल गोंधळात टाकणारा होता.
“कालपासूनच ओहोटीला सुरुवात झाली महाराज.” दादाजी उत्तरले.
“जगदंब!”
भोवतीचे सरदार, ज्याच्याशी झुंज मांडली तो प्रत्यक्ष हबशी, कशाचेच भान नसल्यागत महाराज आता फक्त खाडीलाच निरखू लागले. दोरखंडांनी आवरून धरली होडक्यांची विसकी लाटांवर डुचमळत होती. एक धारदार नजर खाडीच्या पाळामुळांचा माग घेत स्थिरावली होती. त्या मागचे सेनापती मन विचारात गेले होते.
“महाराज, गडी सोडायचा हुकूम व्हावा.” येसाजी कंक अदबीने म्हणाले.
“नाही! कंककाका, ही होडक्यांची विसकी पाण्यावरून दूर हटवा. भुईला घ्या ती.” कुणालाही न कळणारा हुकूम छत्रपतींच्या तोंडून सुटला.
“जी!” येसाजी चमकले.
“जल्दी करा. होडकी हटवा!” हुकूम दुबारीने पक्का झाला.
असंख्य हात होड्यांना भिडले. त्या किनाऱ्यावर घेण्यात आल्या. खाडी खुली झाली. लाटाळत गर्जू लागली. सगळी खाडीच पिऊन टाकायला निघाल्यासारखे छत्रपतींचे डोळे आता लखलखीत दिसू लागले! आपल्याच विचारात त्यांनी खाडीचा पुरा काठ धरून एक सरसरता फेर टाकला. फरफटल्यासारखे दादाजी-विसाजी, येसाजी आपल्या धन्यामागून धावले. ते पार गोंधळून गेले होते. स्वामी हे असे आकरीत दिसताहेत, करताहेत ते का, कुणालाही काही उमगत नव्हते.
एकाएकी सर्वांनाच चक्रावून टाकतील असे पहाडी, हिंमतवान, हुकमी शंभूबोल साक्षात दर्याच्याही पोटात गोळा उठवीत बाहेर पडले – “ही खाडी भांगा देते, तर जंजिरा आत पडतोच आहे! सरलष्कर, दादाजी-विसाजी, तळाचा हरएक धारकरी मेहनतीस जुंपा. दगडगोट, लाकूडगाठी, कापडगोणी जे मिळेल त्याने भरतीपूर्वी ही खाडीच रिचवून टाका!! जंजिरा पाडणेच आहे. आबासाहेबांस त्याविना शांती नाही, आम्हास चैन नाही.”
दोघेही एकमेकांना हाडवैऱ्यासारखे निरखीत होते. खाडी, काठावरच्या खारट राजमर्दाला आणि काठावरचा पुरुषी दर्या, समोरच्या खवळत्या खाडीला! ते ठाशीव स्वामीबोल तापल्या शिसरसासारखे कानांत उतरल्याने भिन्न झालेले शेकडो डोळे समोरच्या खाडीच्या लाटा-लाटा पिंजू लागले. छत्रपतींची पुष्ट, ताठर गर्दन एकदम झटका घेत घुमली. मागे पसरल्या हजारो इमानदार डुयांवर, निखारे पाखडत पसरावेत तसे बोल आज्ञा देत उधळले, “बुजवून टाका ही खाडी!”
पुराणात कधी काळी प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन तगड्या सेनापती जांबुवंताने अशीच आज्ञा दिली होती, आपल्या हजारो वानरसेनेला. आज आपल्या आबासाहेबांचे नाव ओठांआड ठेवून अशीच आज्ञा दर्याकाठाला पेटून उठली होती. शंभूओठांतून! हजारो मावळ्यांच्या लाटाच लाटा तो चित्तथरारक हुकूम ऐकून लपापला. कुणीतरी बेभानीने सर्वांचे पाठकणे शहारून उठतील अशी रणआरोळी फोडली, “हर हर म्हाद्येव!” हजारो नरड्यांच्या घाट्यांनी लकलकत ती वरच्यावर उचलली. मांडचोळणे पिंढऱ्यार पिंढऱ्यांवर तटतटून आले. बाराबंद्या छाताडांवर कचल्या.
हां-हां म्हणता मावळी फौजेने रांगा धरल्या. या देशीच्या मातीच्या पाठीवर आजवर शेकडो यज्ञ झडले-घडले होते. हा एकमात्रच आगळा होता. साक्षात पाणयज्ञ! थोरल्यांनी दर्याच्या छाताडावर जलकोट उठविला होता – सिंधुदुर्ग, धाकल्यांनी दर्या हटविण्याचा पण मांडला! या यज्ञात आहुत्या पडल्याच होत्या – असंख्यात मावळ्यांच्या देहांच्या. समिधा वाहण्यासाठी हजारो हात आता सिद्ध झाले – दगड, विटा, लाकूड, फाटी मिळेल ते खाडीच्या वासल्या जबड्यात लोटण्यासाठी मावळी तुकड्यांनी शिस्त धरली.
हे असे काही बघा-ऐकायलाही न मिळालेले फक्त दोनच जीव ताज्जुब करीत, भुवया चढवून ती प्रचंड हालचाल नुसते बघतच राहिले – एक शहजादा अकबर आणि त्याचा नेक सल्लागार दुर्गादास! पंधरावा दिवस मावळला. आता मात्र रणधीर मावळा खाडीला इरेसरीने भिडला. सतत दहा दिवस शेकडो मण वजनांची चीजवस्तू पाण्यात अखंड कोसळली होती. खाडीचे पाणी आता किनाऱ्याचा बांध फोडून हाताहातांनी चौवाटा पसरू लागले.
एवढे दिवस एकाएकी बंद झालेल्या तोफा बघून मरहट्यांची चाल काय याचा अंदाज पकडण्यासाठी सिद्दी खैरात व कासम जंजिऱ्याच्या तटावर येऊन किनारा निरखू लागले. त्यांना काहीच उमगेना. पंचविसावी सांज कलतीला आली आणि सिद्दी खैरातच्या खोपडीत मशाल लागली! “या खुदा, तो बा!” इंगळी डसल्यागत तो चीत्कारला. कासमच्या निबर कानाशी आपले जाड पडेल ओठ भिडवीत काहीतरी हबशीत कुजबुजला.
त्या रात्री जंजिरा आपल्या हबशी हशमांच्या भरोशावर सोडून, हाय खाल्लेल्या सिद्दी खैरात-कासमनी एका होडीतून चक्क जंजिरा सोडला! दर्यात दूरवर असलेल्या एका खडकाळ टेकडीवर जाऊन ते ठाण झाले.
सव्विसावा दिवस फुटला; पण मावळी तळाला याचा काहीच माग नव्हता. उरफोड करीत हजारो हातांनी; पायांत पकडलेला खाडीचा भुजंग उचलून फेकण्यासाठी शिकस्त केली. पाणी आता शरण येत चालले. खाडी बगलांनी पसरू लागली! फत्ते आणि फत्तेच तोंडावर दिसू लागली.
दिवस सत्ताविसावा उमटला. आज तर छत्रपती पुरते निग्रही, हट्टीच दिसत होते. अंगावरचा मळका जामा फेकावा तसे आज ते खाडीला पुरते हटविणारच होते. मग कोंडला मर्दाना, हत्यारे पेलत जंजिऱ्यावर थेट सुलतानढवाच बडविणार होता! हा ‘सल’ निखळणार होता – कायमचा! हजारो हात दगडगोटे, लाकूडगाठी, गोणी तोलून लयीत दर्यात फेकू लागले. खाडी भांगा देत फाकत चालली. समुद्रवाळूवर आपली भक्कम पावलं रोवून महाराज उभे होते. डावे-उजवे अकबर, दुर्गादास, येसाजी खडे होते.
दुपार झाली. छत्रपतींनी हात उभवून राबत्या माणसांना थाळ्याची इशारत दिली. दमली, थकली माणसे मुजरे भरीत थाळ्यांसाठी थांबली. क्षणभर छत्रपतींनाही वाटले, “आज शहजाद्यांसंगती मनभरा घास घ्यावा, जंजिरा आता पडतोच आहे.”
ते शामियान्यात आले. खाशांची मुदीची तबके चौरंगीवर मांडली होती. डुईचा टोप समाधानाने उतरून छत्रपतींनी तो दस्तानी तबकात ठेवला. तस्तात हात क्षाळून ते अकबरासह मांडल्या चौरंगीवर येऊन बसले. म्हणाले, “शहजादे, तुम्ही आमचे खासे मेहमान! स्वारीशिकारीत असल्याने तुम्हास साजेसा खाना या समयी आम्ही देऊ शकत नाही. नाराज तर नाहीत ना तुम्ही!”
जे समोर चालले होते, ते मावळ्यांचे ‘दर्याभांडण’ बघून पार दडपून गेलेला औरंगपुत्र अकबर पहिल्याने कसनुसे हसला. शेजारी बसलेल्या दुर्गादास राठोडाकडे हेतुपूर्ण बघत म्हणाला, “राजासाब, आप खाते हे क्या, बिल्कुल नाचीज है। करते जो है, वो खास दख्खनी मरहट्टी!”
छत्रपती त्यावर मनापासून हसले. एकदा समोर दिसणाऱ्या खाडीला आपली अभिमानी नजर देऊन त्यांनी थाळ्याला चित्राहुती दिली. समाधानाने ओठांआड घेण्यासाठी ते अन्नवस्त कालवू लागले – इतक्यात – इतक्यात खुद्द येसाजी कंकच लगबगीने शामियान्यात शिरले. त्यांची चर्या पार पडेल – मार खाल्लेली दिसत होती. नरड्याची घाटी आवंढा घोटल्यागत हलवीत ते अदब देत घोगरले, “धनी, गडावयनं रामचंद्रपंत आल्यात – लई -”
छत्रपतींच्या हातातील घास तबकातच घोटाळला.
“कोण? पंत?” जी
“आत घ्या.” महाराजांनी तबक तसेच पुढे सारले. रामचंद्रपंत आत आले. नमस्कारासाठी त्यांनी जोडलेले हात थरथरले. क्षणातच पंतांनी डुईवरची पगडी उतरून घेतली! चरकलेले छत्रपती झटका बसावा, तसे उठले. चिंबले, थरथरले शंभूबोल शामियाना शहारून टाकत कळवळले – “पंत! काय झालं?”
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७२.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव