महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,504

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७४

Views: 1360
7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७४ –

याच वेळी बऱ्हाणपुरातील आपल्या शाही वाड्यात बोलवून घेतलेल्या, वऱ्हाडवर नामजाद सरदार इरजखानाला पटावर घेत, हातची तसबीहची माळ नाराजीनं उडवीत औरंगजेब त्याची शाही खरड करताना म्हणत होता – “मुगलाईमें महड दिनदहाडे पेशकश उसूल लेते है। तुम खिल्लते पेहनकर खाली मार खाते हो! कैसा करते हो बंदोबस्त? लईम कही के!”

“धडाड धुम्म!” गांगोलीच्या वेशीबाहेरच्या माळरानावर पावणे-चार मण वजनांचे गोळे फेकताना, गाड्यावर जखडलेल्या चार तोफा झटका घेत मागे हटू बघत होत्या. जखडलेले भक्कम साखळबंद त्यांना रोखून धरत होते. गांगोलीत आलेल्या छत्रपतींनी कुडाळ आणि डिचोलीच्या कारखान्यांतून आताषी दारूचे नमुने मागवून घेतले होते. ते कसे काम देतात, याचा सरतपास महाराज जातीने बघत होते. नमुने मनाजोगते झालेले बघून संतुष्ट झालेले महाराज गांगोलीच्या सरसुभ्यांना म्हणाले, “कौल जगदंबेचा. सरसुभे, समाधान आहे आम्हा की, मुलखात आताषी बनविण्याचे आबासाहेबांचे स्वप्न आम्ही पुरे करू शकलो. आता या तोफा गांगोलीतच ठेवा – कबिला आहे आमचा इथं.”

“जी.” सरसुभ्यासह महाराज गांगोलीच्या वाड्यात आले. चिटणिसांकरवी त्यांनी कुडाळ, डिचोलीला, “आम्ही कारखाने नजरेखाली घालण्यास येत आहोत.” अशी पत्रे पाठविली. सदरी काम उरकून दुसऱ्याच दिवशी त्यांनी येसूबाई, धाराऊंचा निरोप घेऊन कुडाळचा मोहरा धरला.

मणावारी आताषी दारू बनविणारे कारखाने बघून, तिथल्या दळवी, सावंत, सुभेदार अशा कसबी कारागिरांची नाववार वाजपूस करून, छत्रपती कुडाळ-डिचोलीहून कोयना घाटीने साताऱ्यावर उतरले. संगती पाच हजार घोडालोक होता. तो साताऱ्यातच ठेवून जोत्याजी केसरकर, रायाजी-अंतोजी आणि कुडाळहून मिळालेले कवी कुलेश अशा निवडक असामींसह महाराज सज्जनगडाच्या पायऱ्या चढू लागले.

पायरीपायरीला त्यांच्या मनात आठवणींचे पान परतू लागले. “सज्जनगडी समर्थांच्या सेवेत दाखल व्हा.’ असे लिहिणारे महाराजसाहेब. शेवटच्या घटकेला, समर्थांचा बोध ऐकावा वाटतो म्हणणाऱ्या थोरल्या आऊ, ‘याहून विशेष ते करावे.’ असं आम्हास तळमळून लिहिणारे समर्थ! धर्मकारणातून राजकारण सांधू बघणारे समर्थ. राजकारणातून धर्मकारण घडवू बघणारे आबासाहेब. दोन्ही कारणांतून उभ्या मराठी दौलतीचं, सुखदुःखाला बांधलेलं एकच घरकुल नांदतं करणाऱ्या थोरल्या आऊ! मरणावर मांड जमविणारी केवढ्या कुवतीची ही माणसं!

समर्थांची समाधी बांधून त्यावर चंदनी ओट्यात समर्थ-पादुका जडविण्याचे काम केलेले रामचंद्रपंत सामोरे आले. कल्याणस्वामी, दिवाकर गोसावी, रामचंद्रपंत यांच्या सोबतीने महाराजांनी गडावरच्या समर्थ समाधीचे दर्शन घेतले. समाधीच्या पादुकांना माथा भिडवला. मठाच्या अडी-नडी ऐकून घेतल्या. कल्याणस्वामींनी दिला तीर्थप्रसाद ओठांआड करून महाराज सज्जनगड उतरले. कवी कुलेशांना कोकणात जाण्यासाठी निरोप देऊन रायगडाच्या वाटेला लागले.

गडावर येताच मोरेश्वर पंडितरावांना याद घेऊन त्यांनी आज्ञा केली, “पंडितराव, सज्जनगडी समर्थांच्या रावळाची व्यवस्था दरोबस्त होईल ते करा. चाफळ मठाच्या रामनवमीच्या यात्रेस वस्त्र, धान्य, गल्ला यांची सालिनाची मोईन करून द्या.”

“स्वामी” आत आल्या निळोपंतांनी खाशांची तंद्रा मोडली.

“बोला पेशवे.”

“अलाहाबादहून उत्तरेकडची कुणी असामी आली आहे. गंगाराम म्हणून. खाशांची भेट मागते आहे.”

महाराज काही बोलणार एवढ्यात पहाऱ्याने वर्दी आणली, “जासुदांचं नाईक आल्यात.” महाराजांनी मानेनेच तिला होकार दिला. मोगली हशमाचा वेश पेहनलेला बहिर्जी जुहार देत आत आला. “बादशा औरंगाबादंच्या ठाण्यावर उतारला धनी!! कालच्या नवमीला. कुत्बशाही अन्‌ इदलशाहीचं मातबर सर्दार त्येला भेटून ग्येलं. विज्यापूरच्या बाळ बादशाला त्येनं नऊ लाखांचा गल्ला पाठविलाय – फौजांची गाठ बांधाय. विज्यापूरचा शेनापती सर्जाखान दिकुन औरंगाबादंला येऊन ग्येला.”

बसल्या महाराजांचा पाठकणा ताठ झाला. बैठकीवरून उठत हात पाठीशी बांधून ते फेर घेऊ लागले. खबर देऊन आला बहिर्जी बाहेर पडला. कानी पडल्या वार्तेने चिंतातुर झालेले निळोपंत ‘येतो स्वामी’ म्हणत लवून जायला निघाले.

“निळोपंत, कोण असामी भेटीस आली म्हटलंत? पेश घ्या.” गंगारामने नजराणा म्हणून आणलेली सरपोसबंद, सुवर्ण होनांची तबके प्रथम आली. नंतर भेटीला आलेल्या हिंदोस्तानी सरदार गंगारामला पंतांनी आत आणले.

गंगाराम क्षणैक भारल्यागत समोरचे राजर्बिडे सुरूर्पण बघत राहिला. लागलीच स्वत:ला सावरीत दोन्ही हात जोडून म्हणाला, “जय सियाराम की महा नरेश.” महाराजांनी रिवाजासाठी हात जोडले.

“बोलो.” महाराजांनी मूळ धरले.

“कुछ मनसुबा लिये आया हँ महाराज। पहले उत्तरमें बहादूरखानके फौजमें था। तंग आ गया ह| कैसा अनाचार, मंदिर, ग्रामोंका विध्वंस! औरतोंका कुत्तेहाल!”

“मनसुबा बोले.” महाराज सावध झाले.

“बादशहा दख्खनमें उतरा है। निश्चय हे, उत्तरमें बंगाल-बिहारके मुल्कमें बगावत करने का। जान की कीमतपर।”

महाराज विचारात गेले. कुणी सांगावे उत्तरेत रजपूत, जाट आणि गंगारामसारख्या अनेक असंतुष्टांनी उठाव केला, तर उत्तरी राखण्यासाठी दक्षिणेतून औरंग उठेलही.

“कुलदेवता कौन तुम्हारा?” महाराजांच्या तेजवंत, रोखल्या डोळ्यांतले भाव गंगारामला उमगलेच नाहीत. त्या डोळ्यांत तो खेचल्यासारखा झाला.

“जी! वाराणसीके काशीविश्वेश्वर शिवजी।”

“पंत, स्फटिक घ्या.” ध्यानीमनी नसलेली आज्ञा एकदम निळोपंतांना मिळाली. ते देवमहालाकडे निघून गेले आणि थोड्याच वेळात एक सुवर्ण तबक घेऊन परत आत आले. पुढे होते महाराजांनी ते तबक आपल्या हाती घेतले. गंगारामसमोर येत ते तबक उठवून, डोळे गंगारामच्या डोळ्यांत रोवूनच टाकीत महाराज खणखणीत भोसलाई बोलीत म्हणाले, “इसपर हाथ रखके कसम उठाव ईमानकी।”

गंगारामने एकदा तबकाकडे बघितले. झटकन आपला उजवा हात तबकात ठेवून एक बिल्वदल उचलून कपाळाला भिडवीत तो इतबार देत बोलला – “जान के साथ-साथ टूटेगा – ईमान नहीं।”

महाराजांची नजर, उत्तरी वेष धारण केल्या गंगारामच्या तगड्या देहभर सरसर फिरली. मनोमन कसलातरी माग घेऊन गेली. “हमारे बडे महाराजका दैवत है ये।” हातचे तबक किंचित वर घेताना बांधून टाकणारे बोल त्यांच्या तोंडून शांतपणे निघाले.

“परम भाग्य!” आता तर गंगाराम तबकातल्या झळाळ शिवलिंगाकडेच बघू लागला. ते थोरल्या महाराजांचे नित्य पूजेचे स्फटिक शिवलिंग होते!

हातचे तबक निळोपंतांकडे देत महाराज गंगारामला म्हणाले, “ठीक है। हम फैसला देंगे)” त्यांनी निरोपाचा हात उठविला. गंगाराम-निळोपंत रिवाज देऊन जायला निघाले.

“पेशवे, यांना दोन दिवस गडावर ठेवून घ्या. सारी व्यवस्था नीट ठेवा यांची “जातीनं.” महाराजांनी ‘जातीनं’ या शब्दावर दिलेला जोर निळोपंतांनी हेरला!

प्रल्हादपंतांशी खल केलेले निळोपंत निर्धाराने महाराजांच्या भेटीस आले. मानेवर केसावळ रुळती पडलेल्या, छातीशी भुजा बांधलेल्या, पाठमोऱ्या छत्रपतींना पेशव्यांनी मुजरा भरला.

“कर्नाटकातून हरजीराजांचा सांडणीस्वार आला आहे खलिता घेऊन स्वामी.” निळोपंत म्हणाले.

“मोठ्या शर्थीचं राजकारण केलं हरजीराजांनी कर्नाटकात. म्हैसूरच्या सरलष्कर कुमारय्यानं मदुरेचा नायक चोक्कनायक याच्या राजधानीवर – त्रिचेनापल्लीवर जोरावारीचा हमला केला. तिथल्या कोटाला घेर टाकला. भेदरून चोक्कानाथानं हरजीराजांची आणि जिंजीच्या काकासाहेबांची मदत मागितली. हरजींनी जहाली करून जैतजी काटकर आणि दादाजी काकडे यांच्या मेळानं त्रिचेनापल्ली गाठली. म्हैसूरच्या कुमारय्याला तर दस्त केलाच, पण मदुरेचाही मारता येईल तेवढा मुलूख मारला.”

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७४.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment