महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,684

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७५

By Discover Maharashtra Views: 1353 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७५ –

महाराज संथ वळले. जागरणाने, अखंड विचाराने त्यांची चर्या ओढलेली स्पष्ट दिसून येत होती. धीमी पावले टाकीत, ते निळोपंतांजवळ आले. “पंत, राजांना संतोषाचा खलिता द्या. तुम्ही आमच्या संगती चला.” म्हणत त्यांनी पहाऱ्याला नजर दिली.  तिचा मतलब पकडत पहारेकरी आत आला. आतल्या दालनात जाऊन त्याने टोपाचे तबक आणून, झुकते होत महाराजांसमोर धरले. महाराजांनी टोप मस्तकी घेतला. खासेवाड्याच्या सदरेवर ते आले. पायऱ्या उतरून आघाडी मनोऱ्याच्या रोखाने चालू लागले. पाठी निळोपंत होते. मराठी फौजफळ्यांच्या बऱ्हाडातील हालचाली महाराजांच्या कानी घालत ते म्हणाले, “नागोजी बल्लाळांनी बारा हजारांच्या दिमतीनं बेदरला घेरा घातला. तिथं मुकर्रबखानाशी त्याची हातघाई झाली. त्याला हूल देऊन नागोजी मेहेकर, सोलापूरची ठाणी मारून त्या भागात फिरते आहेत.”

“हंबीरमामांची कोण खबर आहे?” महाराजांनी विचारले. “जी. किल्ले कासमजवळच त्यांची आणि इरजखानाची चकमक झडली. इरजखानाच्या कुमकेला मुकर्रबखान आला तसं बगल देत सरलष्कर थेट आकोल्यापावेतो भिडलेत वऱ्हाडात.”

“जगदंब!” महाराज मनोऱ्याच्या मावळतीवरून पाचाडात दिसणाऱ्या थोरल्या आऊंच्या वाड्याकडे एकटक बघत होते. तिथली रिवाजाची घंटा ठणठणत होती. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे निळोपंत, गंगाराम हिंदोस्थानीला घेऊन महाराजांसमोर सिंहासनसदरेला रुजू झाले. दुहाती मुजुमदार खंडेराव पानसंबळ आणि सुरनीस रामचंद्र नीलकंठ उभे होते. चिटणिसी बैठकीवर खंडोजी बाळाजी बसले होते.

गंगाराम विस्फारल्या डोळ्यांनी सिंहासन बघत आत आला. त्याने रिवाज दिला. महाराज सदरी बैठकीवरून उठून उभे राहिले – “मुजुमदार, हिंदोस्थानीस मरातबाची वस्त्रे द्या.” त्यांनी खंडेरावांकडे बघितले. खंडेरावांच्या शेजारी उभा असलेला तबकधारी पुढे झाला. महाराजांनी तबकाला हात लावला. गंगारामने त्या तबकाला हात लावून ते स्वीकारते केले. दरबार नसल्यामुळे सिंहासन रिकामे होते. गर्दन उठवून एकदा ते निरखीत महाराज गंगारामला बोलले, “चुना दस हजार हशम दे रहे है, हम तुम्हारे दिमतमें हिंदोस्थानी। मुल्क पराया है। हशमोंकी हिफाजत रखना। जगदंब, फत्ते रखेगी।” हात उठवून महाराजांनी बैठक घेतली.

“जै सियाराम की, क्रीपा महाराज.” चमकत्या डोळ्यांचा गंगाराम कमरेच्या तेगीच्या मुठीवर हात भरत कमरेत झुकला. तसाच हटत्या कदमांनी मागे गेला.

महाराजांनी उत्तरेत उठाव करायला त्याला सैन्यबळ द्यायचा निर्णय घेतला होता. “खंडोजी, उत्तरेत मथुरेच्या त्रिमलांना, अंबरला राजा रामसिंगांना गंगारामची जोड करण्याची पत्रं सिद्ध करून पाठवा.”

“दादाजी आलेत.” गंगारामला निरोप देऊन आल्या निळोपंतांनी दादाजींचा नाजूक मुद्दा समोर ठेवला.

“पेश घ्या.” आज्ञा मिळाली.

तगड्या छातीचे, धिप्पाड दादाजी रघुनाथ मुजरा देत आत आले.

“बोला दादाजी, जंजिऱ्याच्या घेराचा करीणा का कुचमला आहे?” सत सी आम्हाकडून काही कुचराई झाली नाही – होणार नाही.” दादाजी निर्धारी दिसत होते.

“मग का पडत नाही जलकोट? चार महिने झाले घेर पडून.” बसले महाराज जरबी होत, खडेच झाले.

“जी. सरकारकून म्हणावी तशी जोड देत नाहीत आम्हास.”

“मतलब?”

“कवी कुलेशांनी, मोहीम फत्ते झाली तर स्वामींना शिफारस करून आम्हास सुरनिशी बक्ष करण्याचं वचन दिलं होतं. मोहिमेत फत्ते झाली, तर याहून मरातब करतील स्वामी याचा भरोसा आहे आम्हास. पण ही मोहीम त्यासाठी नाही लावली जोराला आम्ही महाराज.” दादाजी शांत होते.

“तुम्ही गैरहिशेबी राजापूरवाडीवर का गेलात चालून? खजिन्याची हकनाक उधळण कोण मनसुब्यानं केलीत?” छत्रपतींची जबान करडी झाली.

“महाराज…” दादाजी अडखळले.

“जाणता याचा नतिजा? सरकारकुनांचे रोजाना खलिते येताहेत तुमच्या उधळणीचे. बोला, काय सफाई आहे तुम्हाकडं?”

“महाराज… कसं बोलावं – पण आम्ही चार चाकर म्हंजे आपली सावली. सफाई म्हणून नव्हे, सल म्हणून पेश ठेवू. पण फक्त आपल्यासमोर – एकांती.” दादाजींनी महाराजां भोवती उभ्या असल्या मातब्बरांवर नजर फिरविली. त्यांची चर्या काळवंडली.

हात उठवून छत्रपतींनी खंडोजी, खंडेराव, रामचंद्रपंत, निळोपंत यांना इशारत दिली. सिंहासनसदर एकांती झाली. “बोला” म्हणून महाराज विचारमग्र झाले.

“काया बोलावं स्वामी? हबश्यांनी आमच्यावर डूक धरून आमचा आपटा गाव दिवसाढवळ्या लुटला. शरम वाटते… आम्ही मोहिमेत गुंतलेले हेरून हरामखोरांनी काळजाचा लचकाच तोडलाय आमच्या.” दादाजींनी आपला भरीचा मुखडा एकाएकी ओंजळीत लपता घेतला तसे महाराज चरकले.

“दादाजी, सुमार व्हा. साफ सांगा – काय झालं?”

“स्वामी, आमच्याच घरची अस्तुरी नेली हरामजाद्यांनी!! त्या चिडीपायीच घालून घेतलं आम्ही वाडीवर. एक डाव नव्हे – अनेकवार. कधी तर गाठ पडेल त्याची, हिशोब पावता करता येईल म्हणून. आगळ झालीय खरी स्वामी. या सिंहासनचौकातच गर्दन मारावी आमची. आपल्याच हातानं!” संताप, शोक, असहायता अशा विचित्र भावनांनी दादाजींचा उभा देह थरथरू लागला.

चमत्कारिक नजरेने महाराज दादाजींकडे नुसते बघतच राहिले. त्यांना दादाजी दिसेनासेच झाले. त्यांच्या जागी दिसू लागले खुद्द स्वत: श्रीमन्महाराज संभाजीराजे! भोवतीचा उभा सिंहासनचौक पोटतिडिकीने आक्रोशू लागला – “दुर्गा, दुर्गा!”

बाळंभट, अनंतभट, मोरेश्वर पंडितराव यांच्या देखरेखीखाली रायगडावर कै. आबासाहेबांचे दुसरे वर्षश्राद्ध विधिपूर्वक पार पाडले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराज रायगड उतरून पाचाडात आले. पाचाडपागेचा दहा हजार घोडा शिस्त धरून मैदानावर उभा होता. निवडीचे घोडाईत त्यांचे कायदे पेलून खडे होते. संताजी जगताप, जानराव जानोजी, हिंमतराव अशा बोलावून घेतल्या बाक्‍्या सरदारांच्या मेळाने छत्रपतींनी कुमावत घोड्यावर मांड घेतली. इशारतीचा हात उठविला. शहाजणांच्या, रणहलग्यांच्या कडकडाटात घोडदळाचे भिरे टापांवर पडले.

वरंद घाट पार करून पुण्याला पहिला मुक्काम पडला. पुण्याचे सरसुभे दामाजी रघुनाथ छत्रपतींच्या भेटीस आले. त्यांच्याकडून पुरंदर-सासवडची खबर उचलून कोरेगाव, श्रीगोंदे, अष्टी, पाथर्डी मार्ग महाराज तीन दिवसांतच जालन्याच्या वेशीवर ठाकले! जालना – औरंगाबादेच्या ऐन मोगली ठाण्यापासून पन्नास कोसांवरचे गावठाण. इथे नाशिक-बागलाणातून उतरलेले रूपाजी भोसले आणि नागोजी गोरे मराठी फौजेला मिळाले. जालन्याला दौडत्या टापांचा घेर पडला. भेदरलेले जालनेकर निवाऱ्यासाठी खानजान महमद या दरवेश्याच्या मशिदीत घुसले. महमदाने मशीद बंद करून घेतली. जालना लुटीवर पडला.

घोडा फेकत आलेले रूपाजी, वेशीवरच्या महाराजांसमोर कायदे आखडीत रुकले. फव्वारीच्या मावळीत म्हणाले – “रयतावा, जात-हशम सम्दं मसुदीत घुसल्यात. फकीर दरवाजा खोलीत न्हाई. धनी, काय करावं?”

“त्यास समज द्या. धर्माच्या स्थानास धका लावायची इच्छा नाही आमची. पाठीशी घातली माणसं गुमान बाहेर खुली करावी त्यानं.” रूपाजींनी तसाच घोडा फेकत खान महमद दरवेश्याला आरडून ओरडून समज दिली. आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. ते कानावर पडताच महाराज संतापून कडाडले – “फकीर असून राजकारण खेळतो! त्यास धडा दावा. दार उघडून बाहेर खेचा गनीम! फकिरास-स्थानास इजा-धका बसता कामा नये.”

मावळी फळ्यांनी खान महमदाच्या बगलेत घुसलेली जालनेकर मंडळी अल्लाद बाहेर काढली, काढणीबंद करून वेशीवरच्या साहेबस्वारीसमोर जधथ्याने नेण्याच्या कामाला मावळी धारकरी लागले. इतक्यात… शिंगाड्यांची धोक्याची चाल देणारी इशारत झडू लागली. एकदा शाही हजामत झालेला इरजखान – जालन्याची कुमक करायला येत असल्याची खबर आली होती. दस्त असामी तशाच टाकून मराठे आले तसे म्हणता-म्हणता उडाले!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७५

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment