महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,534

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७६

Views: 1350
9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७६ –

औरंगाबादेतल्या शाही वाड्यातील दरबारात याच वेळी आलमगीर नाशिकहून बोलावून घेतल्या हसनअली खानाच्या खांद्यावर हिरवीकंच खिल्लत टाकत त्याला म्हणाला, “उन्नीस हजार हशम दिये है, अब तुम्हारी देखना है, तुम्हारा करिश्मा!”

रूपाजी-मानाजी बागलाणकडे सरकले. महाराज रायगडावर परतले. जालन्याच्या चपेटीने औरंगजेब पार खवळून उठला होता. आपले हात सर्वांत प्रथम मराठी मुलखात पसरायचे, हे तर त्याने दक्षिणेत उतरतानाच मनोमन ठाणून टाकले होते. औरंगाबादेचा जाबता नीट बसताच त्याच्या जहाल कारवाईला तोंड फुटले. औरंगाबादेत भरल्या बड्या दरबारात आलमगिराचा वजीर असदखानाने, आलमपन्हांची इच्छा दरबारला जाहीर केली – “आका अली खान शहाबुद्दीनको खास मोहीमपर नामजाद करते है। खान, हरहिम्मत तरकीबसे जमीनदोस्त करना हे, मरहट्टोंका किले रामसेज।”

“खैर आलमपन्हा.” म्हणून कमरेत झुकून बादशहाला तसलीम देत शाबदीखानाने नामजादी पत्करली. बीस हजारांची फौज, निवडीचा पठाण-तुर्क हशम, तोफखान्याचे गाडे पाठीशी ठेवून, औरंगबादेच्या मशिदीत तीन वेळा नमाज पढून दलपत बुंदेल्याला घेऊन खान निघाला – किल्ले रामसेजवर!

जुंपले! ज्याची अटकळ केवळ महाराजांनीच नव्हे, तर त्यांच्या लहान-थोर सरदार साथीदारांनी केव्हाच बांधली होती, ते कडवे भांडण जुंपले.

रायगडावर या वेळी नको त्या दोन वार्ता येऊन थडकल्या होत्या. अंजदीव बेटावर जलकोट उठविण्यासाठी उतरलेल्या मराठ्यांवर फिरंग्यांचा कॅप्टन परेरा अचानक चालून आला होता. तोफांचा भडिमार करून त्याने मराठ्यांना बेटावरून हुसकून लावले होते, आणि एक मंदिर धूळदोस्त करून त्यावर उंच-उंच चौकोनी कळसाचे चर्च उभे केले होते.

तसाच राजांचा खेडचा जमीनदार चिमणाजी मतलबी हेतूने मुगलांना मिळाला होता आणि हणमंतगडाचा दस्त केला मुगली किल्लेदार सैद निजावत मराठ्यांच्या कैदेतून पळाला होता.

रायगडाच्या चिटणिसी दफ्तरातील बैठकीवर चिटणीस खंडोजी कलमी सेवेवर बसले होते. विचारांच्या लयीवर दोन्ही तळहात एकमेकांशी घुसळीत, फेऱ्या घेत- घेत महाराज त्यांना खलित्याचा मजकूर सांगत होते :

“रजपूत कुलावतंस, सूर्यवंशी अंबर नराधिपराजे रामसिंघ प्रति हिंदुपदपादशहा, क्षत्रियकुलावतंस राजा शंभू यांची विज्ञापना उपरी विशेष -” मायना रेखून वाळू शिवरून खंडोजींनी कान टवकारले. धीरोदात्त राजबोल त्यांच्या कानावर पडू लागले. तसे कागदावर उमटू लागले. “सांप्रत उत्तराधिप-आलमगीर खडी फौज, खजानासुद्धा मुलखात भिडला. त्याजवर गैरमर्ज होऊन देशी आल्या शहजादा अकबरास आसरा दिल्हा आहे. त्याशी भेट-खल जहाला. यासमयी तुम्ही उत्तरेत जोर धरता, तर दिल्लीस शहाजाद्यास तक्तनशीन करण्याचा मनसुबा आहे. इराणच्या शहास शहजाद्याने जोड देण्याचे कलमी कळविले आहे. शहजादा दिल्ली तख्तास येतो, तर दगडापरिस वीट मऊच आहे. जरोरीने तुमचा मनसुबा पावता होईल, तसे करावे…” खंडोजींनी सिद्ध केल्या पत्रावर राजांनी दस्तुर दिला.

दफ्तरखान्यातून बाहेर पडल्या छत्रपतींना अदब देत जोत्याजी केसरकर बोलला – “नाशिक फाट्याला गणेशगावच्या खिंडीत रूपाजी-मानाजींनी शाबदीखानाला येरगाटला. जोरावारीची चकमक झडली. खान रामशेजच्या रोखानं कूच झाला.”

“आम्ही जगदीश्वराच्या दर्शनास जातो आहोत. तिकडेच पाठवून दे पेशव्यांस लगोलगीनं.” महाराज चालतच बोलले. उजवे झाले. जगदीश्वराच्या रावळात आले. त्यांना सामोरे येत पुजाऱ्याने तबकातील बिल्वदले आणि सफेद फुलांची ओंजळ भरून ती छत्रपतींच्या हाती ठेवली. गाभाऱ्यात जाऊन ती ओंजळ शिवर्षिडीवर वाहून महाराजांनी गुडघे टेकून आपले मस्तक शाळुंकेवर ठेवले. बाहेरच्या चौकात कुणीतरी दिलेला घाटेचा टोल कानी पडताच त्यांच्या मनात शिवबोल घुमून उठले – “आज ना उद्या औरंग दक्खनेत उतरणार याची जाण ठेवा – मावळा व्हा त्यासाठी!”

मस्तक उठवून त्यांनी पिंडीवरचे एक बिल्वदल अलगद उचलले. ते कपाळी भिडवून कमरेच्या शेल्यात ठेवून दिले. गाभाऱ्याबाहेर येताच त्यांना निळोपंत सामोरे आले. महाराज म्हणाले, “आत जाऊन दर्शन घेऊन या. बोलणे आहे.” निळोपंत दर्शन घेऊन आले. विचारगत महाराज त्यांना शिवालयाच्या चौकातच म्हणाले, “नाशिक तर्फेला किल्ले मुल्हेरवर मोगली किल्लेदार कोण आहे पंत?”

“जी, रजपूत राजा देवीसिंह.”

“ठीक. आपल्या साल्हेरीच्या किल्लेदार परसोजीस पायरोवीनं हुशार राहण्याचा निरोप द्या. रामसेजला घेर पडतो बघून तो साल्हेरीहून रामसेजला कुमक करू बघेल. हातचा साल्हेरीच गोत्यात येईल.”

“जी. आजच हारकारा गड उतरेल.” निळोपंत पुढे काही बोलू बघणार एवढ्यात एकाएकी गडाची नौबत दुडदुडु लागली. महाराजांचे कपाळ आक्रसले.

“हरजी आले की काय पंत?” नौबतीच्या रोखाने बघत महाराज बोलून गेले. क्षणातच रावळासमोरच्या वळणाच्या रोखाने धावत्या पायांची धपधप उठली. छातवान वर खाली झपापणारा, उजळत्या नजरेचा रायाजी रावळासमोर आला. पायीची पायताणे तिथंच भिरकटत तो चटक्याने चौकातच घुसला. लगबगीने बोलला, “खंडूबाचं चांगभलं धनी! गडाला बाळ किसन आलं! रानीसाबासत्री गांगुलीत बाळराजं झालं.”

वळून शिवर्पिडीला सरसे होत भरल्या मनाने पापण्या मिटून, जोडल्या हातांची जुडी कपाळीच्या शिवगंधावर टेकविताना राजओठांतून कुलवंत बोल उमटले – “जगदंब!”

गांगोलीचा खासेवाडा आंबवतीच्या आराशीने सजला होता. सदरबगलेला पिपाणीच्या सुरावटीत मुरलेला चौघडा दुमदुमत होता. आघाडी दरवाजावर दुहाती रसवंत पानांच्या सघड केळींचे उंचेपुरे खुंट उभे होते. कमानी चौकटीला सुवर्णपत्रा मढविलेल्या श्रीफळाचे तोरण लटकले होते. सिंदखेड, फलटण, कागल, कर्नाटक अशा चौफेरीने आल्या आप्तेष्ट-पाहुण्यांनी वाडा गजबजला होता.

बारशाचा वद्य त्रयोदशीचा दिवस उमटला. आज शंकराचा शिवकर वार होता – सोमवार. कधी नव्हे एवढे माणूस गांगोलीला दाटले होते. खासेवाड्याच्या सदरी मांडलेल्या गिर्द्या, रुजाम्यांच्या बैठकीवर ठेवणीचा पेहराव अंगी घेतलेले महाराज बसले होते. सरश्या हाताला रामराजे होते. रायगडचा सेवेकरी मंत्रिगण दुहाती अदबीने खडा होता. वाड्यात प्रवेशत्या हर पाहुण्या-आप्तेष्टांची, सरदार-दरकदाराची नाववार वर्दी महाराजांसमोर येत होती. तालेवारीची असामी येताच महाराज बैठक सोडत होते.

सामोरे जाऊन खांदाभेट देत होते. गाववेशीवर मांडल्या तोफांची भांडी ठरावीक अंतराने दडदडत फुटत होती. आत देवमहालात सुवासिनींनी ‘दगडी-गोपा’ पाळण्याखालून वरून फिरवून घेतला. सजल्या ताराऊंनी हात देऊन बाळ पाळण्यात घातले. आपल्या पाठीची टकण देत पाळण्याला तिवार झोका दिला. बाळाच्या कानाशी आपले ओठ भिडवीत त्यांना नाव सांगितलं… “शिवाजीराजे!’

रणहलग्या, शहाजणे, नगारे यांची झडझडच उसळली. तोफांची भांडी साखरमुठी वाटल्या जाऊ लागल्या. उभी गांगोली धुंदावली. सदरेवरचे राजहात वस्त्रे, धान्य, धन यांची दाने वाटण्यात झटू लागले. दिवस मावळला तरी वाड्याची वर्दळ आवरेना. शेवटी आतली धाराऊच कमरेवर हात ठेवून बाहेर आली. राजांकडे बघत म्हणाली, “आतं आमच्या नातवाचा मुखोटा बगताईसा का कसं?”

“ते राहूनच गेलं!” म्हणत हसून राजे उठले. त्यांच्या मनचेच धाराऊ कवडेपणाने बोलली होती. सदर सोडून आत बाळंतिणीच्या दालनाकडे चालताना त्यांनी रायाजीला हेताची नजर दिली. रायगडावरून आणल्या बाळबाळंतिणीच्या मानकरी राजसाजाचे सरपोसबंद तबक घेऊन रायाजी त्यांच्या पाठीशी झाला.

महाराज येसूबाईच्या दालनात प्रवेशले. येसूबाई मंचकावरून उठत्या झाल्या. बाळराजे सुख झाले होते, तरीही त्यांना अलगद उचलून त्यांनी महाराजांच्या हाती दिले. शंभूनेत्र “शिवमुख’ निरखू लागले. स्वत:ला हरवून गेले. त्या दोघांना तसे बघताना भरून पावलेल्या येसूबाईच्या मनी आबासाहेबांची आणि थोरल्या आऊंची सय दाटून आली. त्यांची काजळभरली पापणी फडफडली. ओलावली. निकराने ते आठवणीचे कातरपान परतून त्या म्हणाल्या, “नाव आबासाहेबांचंच ठेवलंय यांना.”

“होय ऐकलं आम्ही ते. आपल्या हयातीत आबासाहेबांनी आभाळीच्या तारका खेचून आणाव्यात तशा शेकड्यांनी फत्ते घेतल्या, यांना जन्माचं नक्षत्र लाभतंय “शततारका.’ आबांच्यासारखंच यांनी येश घ्यावं.” हातच्या बाळराजांना येसूबाईंच्या हाती देत महाराज म्हणाले. त्यांनी रायाजीला नजर दिली. मानकरी साज तबक घेऊन तो येसूबाईच्या समोर आला. येसूबाईंनी बाळराजे मंचकावर ठेवले. तबकाला रिवाजी हातस्पर्श घेऊन रायाजी बाहेर जायला निघाला.

“थांब रायाजी.” महाराजांनी पुढे होत त्याच्या हातातील तबकावर ठेवलेला नाजूक नकशीचा करंड उचलला. रायाजी निघून गेला. हातचा करंड येसूबाईंच्या हाती ठेवीत राजे म्हणाले, “तुमच्यासाठी खास मोलाची भेट आहे ही.” तो “लाकडी’ करंड बघून, नाही म्हटले तरी येसूबाईंना हसू फुटलेच.

“हसलातशा?” महाराज त्या गैरसमजात गेल्या असतील ते ताडून म्हणाले. “काही नाही – आवडला आम्हास!” मन दडवीत स्त्री-जबान बोलली.

“लाकडी आहे, ते वरचं दास्तान. तुमच्यासाठी कुंकवाचा करंड आत आहे!” महाराजांनी खोचक सफाई केली.

येसूबाईंनी उतावळीने दास्तान खोलले. आत झळझळत्या सोन्याची एक मोठी अंगठी होती! मासोळीच्या वाणाची तिची घडाई होती. मासोळीच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी दोन माणिकखडे जडविले होते. ती अंगठी पाहून येसूबाई पुन्हा हसत म्हणाल्या, “ही सोनाराची गफलत म्हणावी की चेटूक! करंडाची अंगठी झाली आहे!”

महाराजांनी काही न बोलता दासतानातून ती अंगठी उचलली. शमादानाच्या उजेडात तिचे माणिकखडे लखलखले. तिला बगलेकडून चिमटीत पकडून महाराजांनी चिमट परतली. मासोळीच्या पसरट पाठवानाचे टवळे खुले झाले. पोटातील मेणमळल्या कुंकवाचा रंग माणिकखड्यागत झळाळला! येसूबाईंनी ते पाहून झटकन पायीच्या जोडव्यांवर नजर टाकली!

“पसंत करंड श्रीसखींना?” येसूबाईंच्या जाबाची वाटही न बघता, त्यांचा डावा हात आपल्या हाती घेऊन राजांनी त्यांच्या करंगळीत ती अंगठी भरूनही टाकली. येसूबाईंनी तिच्या खुल्या टवळ्याला बोट भिडवून कणभर कुंकू कपाळी लेवते घेत मुक्‍यानेच करंडाला पसंती दिली!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७६.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment