महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,46,069

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७८

By Discover Maharashtra Views: 1317 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७८ –

पाचाडपागेला निवडीचा घोडा जय्यत करण्याची आज्ञा सैसांना देऊन दफ्तरी आलेल्या छत्रपतींना पंडितराव मोरेश्वर सामोरे आले. हातची कागदी वळी उठवीत म्हणाले, “समर्थमठात सज्जनगडी शिष्यगणांत शिगेची घालमेल पडली आहे स्वामी.”

“मठात?” ते ऐकतानासुद्धा महाराजांना कसेतरीच वाटले.

“जी. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व मठांची देखरेख दिवाकर गोसाव्यांनी बघावी, अशी इच्छा केली होती. सज्जनगडाच्या स्वामी समुदायाची व्यवस्था मात्र भानजी आणि रामाजी गोसाव्यांनी बघावी, अशी आज्ञा केली होती. दिवाकर त्याप्रमाणे वागत होते. पण मध्येच उद्धव गोसाव्यांनी कटकटी खड्या केल्यात. सज्जनगडाच्या आपल्या किल्लेदार जिजोजी काटकरांनी त्यांच्या बगलेत जाऊन करू नये ते केलंय महाराज.”

“जिजोजींनी? काय करणीचं?” महाराज तो घोळ नीट ऐकू लागले.

“जिजोजींनी भानजी आणि रामजींची द्रव्य-पात्रे व मठवस्त्रे आपल्या अधिकारात उद्धव गोसाव्यांना दिलीत स्वामी!”

“काय मजालीनं?” महाराजांच्या डोळ्यांत संतापाची तिडीक उतरली. “पंडितराव, काटकरास आज्ञापत्र द्या – अवतार पूर्ण करण्याअगोदर स्वामींनी केली तीच आज्ञा! द्रव्यनोभास्तव उद्धव गोसावी कटकट करतात. त्यास भानजी-रामजींची मठवस्त्रे छिनावून देण्याचं तुम्हास प्रयोजन काय? द्रव्य, वस्त्र जसेच्या तसे मागते भानजी- रामजींचे स्वाधीन करणे! दिवाकर गोसावी समक्षात बोलतील ते करून चालवू. समर्थशिष्यांच्या या घालमेलीत पडावयास तुम्हास प्रयोजन नाही!” मोरेश्वर आज्ञापत्र सिद्ध करायला निघून गेले. महाराजांच्या मनात मात्र विचार फिरून गेला, ‘समर्थांची ‘जय जय रघुवीर’ ही गोसावी नांदी पुरती विरली नाही, तोच ही तऱ्हा! पेरते हात कितीही पुण्यवान असले, तरी बियाणेच गणंग लागावे त्यास काय?’

जंजिरा वेढ्यातून आले येसाजी कंक, हिंमतराव, नारुजी त्रिंबक यांच्या मेळाने महाराज रायगड उतरले. दिवस उनतापीचे होते. मृग तोंडावर धरून महाराजांनी घोडदळांसह पाचाड सोडले. खेड, चाकण अशा मजला टाकत ते नाशिकपट्टयात पट्टागडाजवळ उतरले. इथं रामसेजला कुमक द्यायला मुजफ्फरखान, रणमस्तखान, मुहर्रमसिंह याचा भरीचा तळ पसरला होता. त्यावर मराठी घोडदळाने एल्गार धरला.

महाराज औंढा-पट्टागडाच्या भागात आल्याची खबर लागलेले रूपाजी-भानाजी निवडया घोडाईतांसह एका सकाळी महाराजांच्या तळावर हजर झाले.

भेटीस आल्या रूपाजींना आवेगी ऊरभेट देताना महाराज म्हणाले, “नावास साजेशी रूपवान मर्दानगी केलीत – करताहात. रूपाजी आम्ही संतुष्ट आहोत.”

“ह्यात्री “रूपा मोजदा’ म्हंजे ‘सैतानाचा ल्योकच’ म्हनत्यात उभ्या गनीम तळावर!” मानाजी हसत रूपाजींकडे बघून म्हणाले.

“सही आहे मानाजी, सैतानांच्या चालीला सावाचा जाब देऊन नाही भागत!” महाराजांनीही हसून रूपाजींची सफाई आपणच दिली. रूपाजी-मानाजींचा मरातब करून त्यांच्या सोबतीनेच रत्रिबकगड, बागलाण असा टापू महाराजांनी स्वत:च्या नजरेखाली घातला. रामसेजची राखण करणारे फिरते तळ पारखून घेतले. नवी कुमक, हत्यारे, आताषी, रसद यांची जोड देण्याचा धीरदिलासा रूपाजींना देऊन महाराज रायगडाकडे परतले. जो अंदाज महाराजांनी केला होता, तीच चाल खेळत औरंगजेबाने या मृगापूर्वी चार दिशांना चार नख्या पसरल्या!

मीर मुहम्मद मोमिन या सरदाराच्या पिछाडीला सहा हजारांचा तुरुक हशम देऊन त्याला सुरत बंदराच्या रोखाने पिटाळला.

गोव्याला फिरंगी विरजईकडे खासा हेजिब पाठविला. त्याच्या बरोबर असलेल्या शाही खलित्याचा मजकूर होता – “काफर संभाला मदत तर करू नयेच, पण त्याच्या खिलाफ लागेल ती मदत फिरंगी दरबारनं मागावी. तुरंत पोच होईल!”

सर्वाहून विषारी नख होते, रुहुल्लाखाताला नगरच्या तळाकडे पाठविलेल्या पत्रात. रुहुल्लाखानाला आलमगिराचा नेक हुक्‍्म होता – “मिळेल ते मराठी देशमुख, हवालदार, जुमलेदार, किल्लेदार, मन्सब खिल्लत बक्ष करून शाही चाकरीत तुरंत रुजू करावा!”

औरंगाबादेच्या भरल्या शाही दरबारात तर अनिरोधसिंह आणि किशोरसिंह अशा कडव्या रजपुतांची दिम्मत देऊन संभाजीराजांवर खासा नामजाद केल्या आपल्या बज्ञ्याला – अज्जनमशहाला, शाही दुवा देण्यासाठी तख्त सोडून औरंग फराशीवरच उतरला. अज्जमच्या तलम जाम्याचे टोक उचलून ते चुंबत सर्वांना साफ ऐक्‌ जाईलसं पुटपुटला –

“अलहम्दुलिल्लाह!”

आल्या काळाला निर्धाराने तोंड देण्यासाठी पावसाळ्याचे पाठबळ घेऊन प्रांतोप्राती तवानी सैन्यमंचणी करणे आवश्यक होते. चिटणीस खंडोजी, दफ्तरदार चिमण गावकरांच्या मदतीने त्यासाठी तपशिलाची पत्रे सिद्ध करून महाराजांच्या दस्तुरासाठी आणीत होते. दाभोळचे गंगाजी दादाजी, पुण्याचे दामाजी रघुनाथ, साताऱ्याचे अंबाजी मोरदेव, कऱ्हाडचे वेंकोजी रुद्र, फोंड्याचे धर्माजी नागनाथ अशा चौतर्फाचे सरसुभे मजऱ्या, वाडीत जातीने जाऊन पत्राबरहुकूम बांडे गडी एकवट करीत होते.

उत्तरेत औरंग नाही म्हणून बंड करून उठलेल्या सुलतान ताराला चाचपून बघण्यासाठीही एक खलिता, खंडोजींना एकांती घेऊन महाराजांनी सिद्ध करावयास सांगितला.

पावसाळा तोंडी आल्याने वऱ्हाडातून हंबीरराव, कोकणातून कवी कुलेश, सोलापुराहून आनंदराव रायगडी परतले होते. दर्यावर भांडण मांडून मराठी आरमाराने इंग्रजी गलबते लुटली होती. पेण भागात सिद्दी कासमवर नजर ठेवीत ऐंशी-एक गलबते मायनाक आणि सिद्दी संबूळच्या दिमतीत फेसाळत्या दर्यात ठाण धरून होती. दादाजी रघुनाथांचा जंजिऱ्याचा घेर बळकटीने अद्याप उभाच होता. थळभागात जलकोट खंदेरीचे रक्षण करीत पाच हजारांचे आरमार डोळ्यांत तेल घालून होते.

मृगाने शिगेची झड धरली. रामसेजच्या पायथ्याला शाबदीखानाला कुमक करायला बादशहाने धाडलेल्या खानबहादूर कोकलताश, कासमखान, दलपत, करणसिंह यांच्या फौजा नाशिकमध्ये तळबंद झाल्या.

दफ्तरखान्याच्या झरोक्यातून दिसणाऱ्या पावसांच्या रेघा निरखीत महाराज खंडोजींना आदिलशाही आणि कुतुबशाही दरबारला जायच्या पत्रांचे मजकूर सांगत होते.

त्याची साखळी तोडत पहाऱ्याची वर्दी आली – “बहिजी आल्यात.” महाराज दरवाजाकडे बघत रुकले. पावसात पुरा भिजला, घोंगडी लपेटलेला बहिर्जी जुहार भरताना गडथंडीने काकडला. नेटाने दाताची थड थोपवीत म्हणाला, “अवरंगाबादंचा खबरी माग खुटला धनी. लई कसबाचं धा जासूद गनिमाच्या तावडीत फसलं. कोतवाली चबुतऱ्यावर औरंगाबादंत सम्द्यांच्या डुया मारल्या हराम्यांनी!”

दहा खबरगीर म्हणजे चालते-बोलते दहा कोटच! हेलावून गेल्या महाराजांना जासुदांच्या नायकाला धीरा-सांत्वनाचे काय बोलावे तेच कळेना. तसेच चालत ते बहिर्जीसमोर आले. त्याच्या खांद्यावर चढल्या राजहातापाठोपाठ त्याच्या कानी फक्त तुटक राजबोल पडले, “पेहराव बदलून धुनीची धग घ्या पहिल्यानं बहिर्जी…”

गडाच्या लोहारमेटावर आता हत्यारांच्या घडाईच्या ठिणग्या रातध्याऊ उसळत होत्या. फिरत्या चक्रावर शिकलगार त्यांना पाणी देत होते. बहिर्जी गड चढून दोन दिवस झाले नाहीत तोच रामसेजभागातून संभाजी जगतापांनी पाठविलेला हारकारा रायगडावर आला. त्याने बहिर्जीहून काळीजतोडीची खबर खालच्या मानेने महाराजांसमोर ठेवली – “रजपूत पद्मर्सिंगाच्या तळावर घातल्या छाप्यात रूपाजी भोसलं जाया झाल्यात! जखमा बांधून रत्रिबकगडाच्या तळात पडून हाईत!” ते ऐकताना महाराजांना आपलाच उजवा हात जाया झाल्यासारखे वाटले.

कर्नाटकातून हरजीराजांनी पाठविलेला जैतजी काटकर रायगड चढून आला. मुजुमदार खंडेराव पानसंबळ त्याला घेऊन महाराजांना पेश झाले. कर्नाटकप्रांती या दरम्यान खूप उलथापालथी झाल्या होत्या. हरजीराजे हिकमतीने कर्नाटकचे राज्य वाढीस लावीत होते.

“कबजी येत्यात,” कुलेशांचा कारभारी आत येऊन वर्दी ठेवून गेला. कनोजी माटाची गुलाबी पगडी धारण केलेले कुलेश नमस्कार करीत दालनात आले.

“शहजाद्याची काही हालचाल कविजी कोकणात?” ते येताच राजांनी त्यांना मुद्दयावर घेतले.

“जी. उत्तरमें राजा रामसिंग को लिखा है शहजादाने।”

“आम्हीही लिहिले आहे. जाबाची वाट बघतो आहोत. पण कविजी, जो वकुब मिर्झा राजात होता, तो नाही दिसत आम्हास त्याच्या कुंवरात.”

“जी. मिर्झा आदमी मैदान का, रामसिंग कोठीका।”

कितीतरी वेळ महाराज कविजींशी राजकारणावर बोलत राहिले. जायला निघताना कुलेशांनी चौल तर्फेची एक बाब महाराजांच्या कानांवर घातली – “चौलमें जिवाजी विनायकने फिरंगोंका एक जहाज दस्त किया है। खंबायतके बेपारी रामचंद्रदास का माल है उसमें। जहाज उसका नहीं।॥ फिरंगी जहाज मांगते है।”

“ठीक आहे. पण त्या मागणीत आमचा अरबांशी असलेला दर्यादोस्ताना आपणास पसंत नाही, हे लिहिणारे फिरंगी कोण?” महाराजांचा नूर बघून काही न बोलताच कवींनी निरोप घेतला!

तो मामला तोडून टाकण्यासाठी याद घेतल्या पेशवे निळोपंतांना मात्र महाराजांनी आज्ञा केली, “चौलात दस्त केले गलबत फिरंग्यास सुपुर्द करण्याचा जिवाजींना हुकूम द्या. आणि निवडीची माणसं तुकडीनं चौलाच्या कोटाभोवती पेरा!”

पहिला कळला, पण दुसऱ्या हुकमाची अटकळ निळोपंतांना काही लागली नाही. महाराज नुसते फेर घेत राहिले. जंजिऱ्याचा सल निखळत नव्हता. दिसावा; पण हात घालता येऊ नये, असा जंजिरा खोबणीत बसला होता. रामसेज तर घेरात पडला होता. “रामसेजची काय खबर पंत?” महाराज आपल्याच विचारात होते.

“शाबदी-कासमखानांनी पावसाळा असताही कोटाला पान लावण्यासाठी तीन वेळा जबर उचल खाल्ली. आपल्या किल्लेदारानं तिन्ही हमले फेकून दिले स्वामी.”

“पंत, गडउपराळा करण्यासाठी एक हजारांची घोडेपथकं आजच रामसेजच्या वाटेला लावा.”

“जी. दोनशे मण आताषीच्या गोणी घेऊन सलाबतखान रामसेजच्या कुमकेला गेल्यानंच शत्रू उचल खातोय.”

“कुडाळच्या गणोरामांना, डिचोलीच्या मोरो दादाजींना जमेल तितका आताषी साठा रामसेजच्या कुमकेसाठी त्रिंवकगडाला केसो त्रिमलांकडं पावता करण्यास तातडीनं कळवा.”

कुलस्त्रीने हातचा कुंकुकरंड न सोडण्यासाठी जंग-जंग पछाडावे, तसे रामसेजसाठी महाराज जिद्दीला पेटले होते. रामसेजचा किल्लेदार तर हमल्याचा सासूद लागताच गडावरून जडशीळ दगड-धोंडे, ओल्या लाकूड गाठी उतरंडी धरून लोटत होता. आभाळातून पाऊस, गडावरून ही मारगिरी याने शाबदीखान पुरता हैराण झाला होता.

गडतट धरून त्याने लावलेले सुरुंग उधळून त्याखाली त्याचीच माणसे गाडली गेली होती. “रामसेज’ उड्डाणातल्या रामभक्त “हनुमंता’च्या पवित्र्यात ताठ खडाच होता!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १७८.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment