महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,532

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८०

Views: 2515
9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८० –

“पेशवं आल्यात.” पुरुषा नावाच्या खिदमतगाराने महाराजांना भान दिले. “स्वामी, दोन खाशा असामी गड चढून आल्या आहेत. मिरज-अकोला तर्फेने सरलष्करांनी पाठविलेले धनाजी जाधव आणि शहजाद्यांकडून आलेले दुर्गादास.” पेशवे आत येताच म्हणाले.

“ठीक. त्यांना जोडीनंच पेश घ्या सकाळी. खूब हेताची बात करणं आहे त्यांच्याशी. तुम्ही जातीनं उतरा कल्याण प्रांतात कुमकेनिशी.”

“जी. महाराज…” बोलते निळोपंत कसे बोलावे, या विचाराने अडखळले.

“रुकलात पेशवे – बोला -” “सिद्दी कासमनं दस्त करून मुंबईला नेलेल्या आपल्या सारंगांपैकी – जे-जे धर्मांतराला राजी नव्हते, त्यांची कत्तल केली. आणि…“काय… काय झालं बोला पेशवे!”

“आपले जाया झालेले सारंग – सिद्दी मिस्त्री मुंबईत गेल्याची खबर आहे!”

कलमी सेवेवर बसल्या खंडोजींना छत्रपतींनी, राजा रामसिंगाला जाणाऱ्या खलित्यांचा मजकूर सांगितला – “दख्खनेत आला शहजादा, दुर्गादाससंगती फौजबंदीनं गुजराथ प्रांती अहमदाबादमार्गे धाडतो आहोत. आमचा तोडीचा सालार त्यांची जोड करील. तुम्ही जाणते आहात. अवघे एकवटून हिंदोस्थानात बादशहास काटशह घालावा.

बडीलधाऱ्यांनी मुगलांच्या केल्या मागील सेवेचे का चीज झाले, हे ध्यानी धरून पोख्त विचार ठेवून चालवावे… फिरलाच औरंग परतीने उत्तरेत, तर त्यास दस्त करण्याची उमेद राखावी…” या मतलबाचा तो खलिता होता.

खंडोजींनी रेखल्या खलित्यावर वाळूची चिमट शिवरली. “चिटणीस, खलिता धाडसाच्या, नेक जासुदाहाती द्या. खूप दूर जाणार तो.” खलितावळीकडं बघत राजे म्हणाले.

आबाजी सोनदेव वारल्यामुळं दरबार भरवून रामचंद्र नीळकंठ भादणेकरांना, महाराजांनी सुरनिशी मानवस्त्रे व शिक्के दिले. कुडाळापासून तुंगभद्रा नदीपर्यंतचा प्रांत त्यांच्या ताब्यात दिला. आबासाहेबांच्या हयातीत ही जोखमीची जागा अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती. ज्यांच्यामुळे महाराजांना न विसरता येणारी तापदराच झाली होती. महाराजांना आता फार जाणवू लागलं की, खंडोजी बल्लाळ मैदानी वकुबाचे असूनही कलमात अडकून पडलेत. त्यांनाही साजेशी मैदानी कामगिरी दिलीच पाहिजे. कलम सांभाळत त्यांनी हत्यारही चालविले पाहिजे.

खंडोजी, किल्लेदार, चांगोजी, कुलेश, रायाजी, अंतोजी यांच्या मेळाने गड उतरून महाराज पाचाडपागेसमोर आले. तिथे धनाजी-दुर्गादास त्यांना सामोरे आले. पागेसामने वीस हजारांचा घोडा व पावलोक हारीने शिस्त लावून उभा होता. राजांनी त्यांना रिवाजी निरोप दिला आणि ते पाचाडसदरेवर आले.

चौतर्फांनी आलेले खबरगीर पेश झाले. माणसांनी पाचाडसदर भरली होती. राजे अंथरल्या सदरबैठकीवरच्या गिर्दीला रेलले. आंबट, गोड-तिखट, खारट पदार्थांनी भरला थाळा समोर यावा, तशा सरमिसळीच्या खबरा राजांच्या कानांवर पडू लागल्या.

“पुरंदरच्या पायथ्याला बादशहाचा नातू मुइजुद्दीनसंगं झालेल्या झोंबाझोंबीत माणकोजी बल्लाळ कामी आले धनी!” खबरगीर अडखळत म्हणाला.

ते ऐकताच खंडोजी बल्लाळांची गर्दन तर झटका घेत वरच आली. पुन्हा अदबीने ती खाली घेताना पापणीकडा दहिवरल्या त्यांच्या. माणकोजी त्यांचे बंधू होते. महाराजही सुत्च झाले. खंडोजीच्या जवळ येत त्यांच्या खांद्यावर तळहात थोपटताना घोगरट आवाजात म्हणाले – “आमच्या टोपातलं माणिक आणि तुमच्या तर हातातलं कलमच गळलं. खंडोजी, तुम्हाला काय सांगावं आम्ही – धीरानं सुमार व्हा म्हणून?”

गडाच्या पायथ्याला बिरवाडीच्या नदीकाठाला धरून, अर्जोजी यादव, अण्णाजी मलकरे, हिरोजी इंदुलकर यांनी दिमाखदार शामियाना उठविला. हा शामियाना होता, कर्नाटक प्रांतातून राजांच्या भेटीसाठी येणाऱ्या रघुनाथपंत हणमंत्यांसाठी. कर्नाटक आणि मराठी मुलूख यांची ही भेट होती. रघुनाथपंत निवडक असामींनिशी एका मजलेवर ठाण झाले होते.

भेटीचा दिवस उजाडला. महाराज येताच बिरवाडीचा पुरा तळ सळसळून उठला. भोवतालची माणसं डोळ्यांत प्राण आणून काय घडणार म्हणून बघू लागली. सर्वांना माहीत होतं की, कर्नाटकात रघुनाथपंतांना काढणीबंद करण्याचा हुकूम राजांनी हरजींना दिला होता. गडभर आवई पसरली होती की, रघुनाथपंतांनी लांबीचा खलिता पाठवून, “खाशा भेटीसाठी येत आहोत’ असे कळविले होते. त्यामुळे उलट-सुलट अफवाच अफवा पसरल्या होत्या.

महाराज तळावर येताच शहाजणांची, तुताऱ्यांची कातरी लय घुमली. रघुनाथपंत जिंजीहून आल्या माणसांतून एकलेच पुढेसे झाले. ते नजरेस पडताच महाराजांच्या मनातले आठवणींचे वारूळ फुटले. तरातर चालत ते रघुनाथपंतांच्या सामने आले. आलेले रघुनाथपंत रिवाजासाठी कमरेत झुकून मुजरा द्यायला तळहात कपाळी भिडवू लागले. झटकन पुढे होत महाराजांनी तो आपल्या ओंजळीत धरून वर घेतला. खुद्द तेच वाकून रचना थपंतांच्या पायांना भिडविण्यासाठी आपला हात पुढे घेऊ लागले! आशीर्वाद द्यावा असेही आता कुणी नव्हते. रघुनाथपंत मागे हटले. उठवून राजांना त्यांनी वर घेतले.

दोघांच्याही डोळ्यांच्या बाहुल्या खिनभर एकमेकींना भिडल्या. खूप खोलवरचा मतलब जाणवला दोघांनाही. रघुनाथपंतांना छत्रपतींनी थेट ऊरभेट दिली. पंतांनी कितीतरी मायेने त्यांचे पाठवान थोपटले. पोख्त, जाणत्या वृद्धपणाला उभार- उमदे राजेपण भिडले. महाराजांनी हाताला धरून रघुनाथपंतांना भेटीच्या शामियान्यात घेतले. आत मजालसीच्या बैठकी अंथरल्या होत्या. राजांसाठी आणि पंतांसाठी गिर्दीची खास बैठक मधोमध येईल, अशी मांडली होती. त्यावर राजे, पंत बसले. तिला अदब ठेवून सारे खासे आपापल्या बैठकीवर बसले.

रघुनाथपंतांनी कर्नाटकातून आणलेली चाळीस लाख होनांची तबके छत्रपतींना पेश केली. महाराजांनी त्यांना स्पर्श दिला. निळोपंतांना नजर दिली. पेशवे निळोपंतांनी रघुनाथपंतांसाठी आणलेली मानवस्त्रे, ढाल-तलवार यांची तबके पुढे घेतली. पंतांनी ती आपलीशी केली. जगदंबेची भंडारापरडी मजालभर फिरली. तिची बोटे कपाळावर चढली. राजांनी रघुनाथपंतांना विचारले, “पंत, कर्नाटकाचा हालहवाल?”

“सुक्षेम. हरजीराजे नेटा-बळानं प्रांत रक्ष्न आहेत. कसल्याही भातेनं चिंता नसावी. जमल्यास खाशांनीच टाकावा एकदा फेर कर्नाटकात.”

“हरजीराजे तुमच्याशी कसे?” घडल्या – न टाळता आलेल्या प्रसंगांनी राजमन वेढून आले.

“जी. घरोब्यानं आहेत राजे आमच्याशी. वडिलांठायी मानतात आम्हास. त्यासाठीच आलोत आम्ही – काही मनच्या हेतानं. हयात गेली हत्यार पेलून, जिवाभावानं इजाजत होईल तर – तर काही बोलावं म्हणतो.” खूप पाहिलं, सोसलेली, आपली निडर वृद्ध नजर पंतांनी राजनेत्रांवर जाम रुपवली. भरली मजालस ती बघताना चुळबुळली.

“पंत, मनमोकळं बोला. नि:संकोच बोला. आता कुणाला मसलतीचं – मनाचं विचारावं, असं वबडीलधारं कुणी नाही. आबासाहेब, थोरल्या आऊ, समर्थ सारे जगदंबेला प्यारे झालेत.” सगळी मजालस महाराजांच्या कोंडीने, आपल्या अंगावर पडल्या जोखमीच्या जाणिवेने गंभीर झाली.

बोलण्यापूर्वी पंत क्षणैक थांबले. मनाची बांधणी तर त्यांनी आपल्या तळावरच केली होती – शब्दांची जुळणी करणे अवघड जात होते. कुठलाही उणा-अधिक शब्द तोंडून जाऊ नये यासाठी कोशिश होती. भंडाऱ्याची बोटे फिरलेल्या छत्रपतींच्या मुद्रेकडे बघत, पंत बोलू लागले – मनातले, रांगडे, स्पष्ट-साफ, निडर –

“थोरले महाराज जाऊन काही बहुत दिवस झाले नाहीत. तो मुलूख उजाड का होत चालले? पुंड-पाळेगार, फितवाखोर बळावत चालले, हे कोण मजालीनं?”

महाराजांच्या मनातील नेहमी सतावणारा सवालच पंत करीत होते. अंतर्यामी घुसळून निघालेले राजे वरवर शांत होते. मन पार तळवटापर्यंत उतरले त्यांचे.

“दिमतीचे सरदार, मंत्री बेदिल, अन्यायी जाले. त्यास मारणे रास्तच होते, तर रायगडी घेऊन एकांती मारायचे. ते सोडून सर्वांसामने का मारिले?” पंतांनी विचारले.

आता मजालस पुरी बेचैन झाली. कातर झाली. कैकांना वाटले महाराज आता तडक बैठकीवरून उठतील. कुणी सांगावे, या क्षणी पंतांना दस्त करण्याची आज्ञाही देतील! मजालसीत हंबीरराव होते. तेही रघुनाथपंतांच्या वकुबा-अधिकाराचे होते. त्यांना राहवले नाही. ते म्हणाले, “पंत, ग्येले ते काय चालीनं याची शानिशा झालीय सम्दी. कै. थोरल्या महाराजांनी बेलवडीवर भरल्या तळासामने सखुजी गायकवाडाचं डोळं का काढलंत? राजांच्या जिवावर उठल्या चाकरांचा काय मरातब कराय पायजे हुता तुम्हासारा?”

आता सरलष्कर-पंत यांचीच बोलाचाली वाढतेय का काय, अशा शंकेने मजालस थरकली. छत्रपतींनी मध्येच हात उठवून हंबीररावांना रोखून घेतले. आणि म्हटलं….

“सरलष्कर, सुमार असा. पंतांना बोलू द्या. त्यांचा अधिकार आहे तो.”

त्या बोलांनी पुरते निर्भय झालेले पंत म्हणाले, “आम्ही काय, पिकलं पान. आज आहोत – उद्या नाही. एवढा मातब्बर गनीम तोंडावर येऊन ठेपलाय त्याचा काही विचार केला आहे काय सरलष्कर?”

त्यांच्या या रोकड्या सवालाने मात्र महाराज बोलतेच झाले,

“पंत, काळजाचा सवाल केलात. त्यासाठी आम्ही काय करतो आहोत, ते आमचं आम्हास ठाऊक. मुलूख उजाड होतो आहे, तो औरंगच्या मारगिरीनं. तीस हजारांवर तवानी सैन्यसंचणी बांधलीय. जागजागी मोगली फौजेशी चकमकी झडताहेत. खजिना त्या भाराखाली वाकलाय. एका बाजूनं औरंगच्या फौजा चौतर्फानं दौलतीत घुसल्यात. ती संधी साधून दर्या धरून फिरंगी, हबशी उचल खाताहेत. इदलशाही, कुत्बशाही अंग मुरवून गुमान आहेत. काय करते, असते तरी आबासाहेब अशा समयास? पंत, तुम्ही बोलल्याचा राग-रोष नाही. हरजींना प्रांत ठाकेठीक राखून चालविणेस कळवा… आणि… आणि आता तुम्ही – तुम्ही नका जाऊ कर्नाटकात.”

महाराज काही विचाराने थांबले. तडक उठलेच. मजालसही उठली. प्रत्येक जण विचार करीतच बाहेर पडला.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८०.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment