धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८१ –
दुपारी रघुनाथपंतांनी दिलेला खाना घेऊन महाराज गडाच्या वाटेला लागले. विचारच विचार, मृगाच्या आभाळागत भरून आले त्यांच्या मनात. ते कुणाशीच काही बोलले नाहीत.
रात्री सुखदालनात हुलग्याच्या माडग्याचा कटोरा घेऊन आलेल्या येसूबाई त्यांना विचारगत बघून म्हणाल्या, “तब्येतीत काही सुमार स्वारींच्या?”
महाराजांनी येसूबाईना निरखले. त्यांना आठवले ते आबासाहेबांनी येसूबाईना दिलेली शिक्केकट्यार. ‘श्रीसखी राज्ञी जयति'” या मुद्रेची आपणच दिलेली जोखीम. त्यांना बघताना रघुनाथपंतांशी झालेली सारी मुद्दयाची चर्चा मनात फिरली. येसूबाईच्या कानी भेटीचा सर्व करीणा घालून राजांनी त्यांनाच विचारलं, “सल्ला काय तुमचा पंतांच्या बाबतीत?”
येसूबाई विचारगत झाल्या. मग निर्धारानं म्हणाल्या – “आम्हाला वाटलं…”
“काय?”
“पंतांवरच मुजमूची जोखीम सोपवावी!”
“आणि खंडेराव आहेत मुजुमदार त्यांचं काय?”
“एकांती घेऊन समजूत काढावी त्यांची.”
येसूबाईच्या मनाप्रमाणेच झाले. रघुनाथपंतांना मरातबाने मुजुमदारीची वस्त्रे देण्यात आली. कर्नाटकाची मुजुमदारी त्यांचे चिरंजीव तिमाजी रघुनाथ यांना देण्यात आली. खंडेरावांची समजूत नीट पटवून हे झाले. महाराज सिंहासनसदरेवर फेर घेत होते. भोवती अदबीने उभे असलेले निळोपंत, प्रल्हादपंत, खंडेराव, रघुनाथपंत खालमानेने चिंताक्रांत उभे होते. फेर थांबवून राजांनी प्रल्हादपंतांना विचारले, “पंत, तुम्ही टोपीकरांच्या दरबारातून आलात. काय चाल आहे गोऱ्यांची?”
“जी. ते राजी झालेत हबश्यांना थारा न द्यायला. मुगलांची गलबतंही दर्या ओलांडणार नाहीत, याची हमी दिलेय त्यांनी.” शेजारी उभ्या हेत्री स्मिथ या गोऱ्या वकिलाकडे हातरोख देत त्यांनी त्याची ओळख छत्रपतींना करून देत म्हटले, “हे त्यांचे हेजिब, हेत्री म्हणून.” हेत्री गुडघ्यांवर बसत लवला. डुईची उंच माटाची, पीसधारी टोपी त्याने उतरून हलविली. त्याच्याकडे नजराणा नाही, या जाणिवेनं प्रल्हादपंत लगबगीने म्हणाले, “स्वामी, गोऱ्या दरबारनं दिला होता नजराणा यांच्या संगती. पण….”
“आम्हाला तो पेश न करता यांनी मध्येच ठेवू घेतला – असंच म्हणायचं आहे तुम्हाला पंत!”
“क्षमा असावी. तसं नाही – पण हे आणि आम्ही निघालो मुंबईहून करंजामार्गानं इकडं येण्यासाठी. पण चार हबशी गलबतांनी रोखला आमचा दर्यामार्ग. यांना आणि आम्हाला गलबतात दडून राहावं लागलं. शरम वाटते; पण यांच्याकडचा नजराणा आणि आमचं सामान लुटून नेलं हबश्यांनी उंदेरीकडं.”
महाराज ते ऐकून संतस होतील अशा भयाने प्रल्हादपंतांनी गर्दन टाकली. राजांना ती जाणवली. त्यांच्याजवळ येत ते म्हणाले, “न्यायाधीश, नजराणा गेला याची एवढीसुद्धा खंत करू नका. तुम्ही – तुम्ही सुक्षेम परत आलात हाच आम्हाला नजराणा.” गोऱ्या वकिलाकडे हात करून, “यांची साजेशी देखभाल करा.” असे म्हणून राजांनी हेत्रीला नजराणा देवविला.
हेत्री पुन्हा लवला. उठून जायला निघाला. त्याला बोलण्यातले काहीच कळले नव्हते. पटली होती, ती राजांची मर्दानी सौंदर्याची मूर्ती! पंत व हेत्री निघून गेले.
कवी कुलेश अकबराचा वकील अब्दुल हमीद याच्यासह भेटीला आले. “स्वामी, शहजादाको हिंदोस्थान जानेमें कामयाबी नहीं मिली। खान सरहुल्लाने आकर सब रास्ते रोक दिये। बडी मुश्कीलसे वापस लौटे शहजादे।” औरंगने आपल्या बेट्याची केलेली अचूक नाकेबंदी कुलेशांनी सांगितली. महाराजांच्या कपाळी जाळे एकवटले. चटकन त्यावर त्यांनी सवाल घातला – “धनाजी कुठं?”
“जी. धनाजी गये गुजराथमें भडोचको तसनस किया है। दुर्गादास है, उनके साथ।”
“तुम्ही शहजाद्याच्या पिछेहाटीचं सांगितलंत कुलेश. आणखी काही?” धनाजींच्या आगेकुचीने महाराजांना दु:खातही सुख शोधावे लागले. तेही आपल्यापाशीच ठेवत कुलेशांना त्यांनी विचारले.
“हम समझे नहीं.” खुद्द कुलेशच गोंधळले त्या सवालाने.
“कविराज, याद असेल, आम्ही मरातबानं नेताजींच्या बरोबर नजराणा पाठविला होता शहजाद्यांना. त्यात मानाचा म्हणून मोत्याचा कंठाही दिला होता, दिल्लीचे “शहेनशाह’ बनायला निघालेल्या शहजाद्यांना! काय करीणा त्या कंठ्याचा? आलाय कानी?”
कुलेशांनी चमकून अकबराच्या हेजिबाकडे बघितले. ही मामुली बाब महाराजांपर्यंत कशी पोहोचली एवढ्या धामधुमीत असा त्या नजरेचा मतलब होता. “आका अलीने वो कंठा बक्ष दिया, एक लवंडी को हुजूर!” अब्दुल हमीद बेफिकिरीने अकबरापुढे बोलावा, तसा महाराजांसमोर बोलून गेला.
“खामोश!” छत्रपती संतप्त होत कडाडले. नाकपाळी लालावत रुंदावली त्यांची. श्वास चढीला पडल्याने भरदार छातवान वर-खाली लपापले. अकबराने मरातबी कंठा “मामुली’ मानला याची चीड होती त्यात. त्याहून शिगेचा संताप होता – त्याच्या मामुली हेजिबाने या देशीच्या स्त्रीला ‘लवंडी’ म्हटले याचा.
“कुलेश, जाब विचारा याचा शहजाद्याला!” आपल्याच विचारात महाराज तरातर निघूनही गेले. अब्दुलने शरमेने गर्दन खाली टाकली.
दारूकोठारावर, शिलेखान्यावर देख टाकून सिंहासन सदरेवर आल्या राजांना खंडोजी बल्लाळ उत्तरेतून परतल्या गंगाराम हिंदोस्थानी सोबत पेश झाले.
“बोला हिंदोस्थानी?” “जय सियाराम’ म्हणत नमस्कार करणाऱ्या गंगारामला राजांनी विचारले. त्याच्या उत्तरेतल्या कर्तृत्वाचा हवाल ऐकायला ते उत्सुक होते.
“बिहारमें मोंघीर कब्ज किया हमने नरेश! आप के फौजी आदमी बडे तेज है राजासाब.” गंगाराम गौरवाने म्हणाला. “हिंदोस्थानी पाटण्यावरही गेले होते चालून उत्तरेत… पण…” छत्रपतींना गंगारामच्या सगळ्या बाबींची माहिती मिळावी, या हेताने मध्येच खंडोजी बोलले.
“रुकलात चिटणीस?”
“दाबजोर फौजीबळाच्या जोरावर तिथल्या मुगल सुभेदारानं पिछेहाट घ्यायला लावलेय हिंदोस्थानींना. फेर मदतीची उमेद राखून आलेत ते दक्षिणेत.”
“खंडोजी यांना नजराणा द्या. पाचाडपागेचा, उत्तरेची हवा सोसेल, असा तगडा पावलोक द्या.” आणि हिंदोस्थानी कडे बघत महाराज म्हणाले, “दोन दिवस थांबा हिंदोस्थानी. फार टप्प्यानं आलात, विश्रांती घ्या.”
“जय सियाराम की! नमस्कार घालून गंगाराम निघून गेला.
कल्याण-भिवंडी भागातून रणमस्तखान आणि बहादूरखान यांच्या धुमाकुळीच्या खबरा येऊन पोहोचल्या होत्या. त्यासाठी खास बोलावून घेतलेले हंबीरराव, मानाजी, केसोपंत, रूपाजी आणि तुकोजी पालकर यांच्या सोबतीने खुद्द महाराज कल्याणवर उतरले. कल्याणला छोटेखानी कोट होता. तो राखण्यासाठी महाराज दिवसभर फळी फळीवर घोडा फेकत होते. एके दिवशी संध्याकाळी, दिवसभर थकले, श्रमले महाराज तळावर परतले. या आघाडीचे रूपाजी, केसोपंत, निळोपंत त्यांना सामने आले. त्यात नव्हते जाया झालेले हंबीरराव आणि तुकोजी. मनच्या काही विचाराने महाराज म्हणाले, “तुकोजींना बोलावून घ्या. हा पडला घेर तसा नाही निपटायचा.”
“काय झालं पेशवे?” चरकलेल्या महाराजांनी विचारले.
“जी, तुकोजी गेले स्वामी!” छत्रपतींसकट सर्वांनी उसासा टाकला.
चौल, गोवा, वऱ्हाड भागातून खबरा येतच होत्या. कल्याणात गुंतून पडणे शक्यच नव्हते. तुकोजींना अगीनडाग देऊन, मोहीम निळोपंत व हंबीररावांवर सोपवून महाराज रायगडाच्या वाटेला लागले.
गडावर आल्या छत्रपतींना खानदेश भागात बेरूरला मावळ्यांनी केल्या यशस्वी हमल्याची आणि खजिना भरणाऱ्या भरपेट लुटीची, बिदरला केल्या चौथ वसुलीची दिलाशाची खबर मिळाली. नळदुर्गतर्फला राजांचा सरदार भिकुलाल याची कासिमखानाबरोबर गाठ पडली होती. खानाचा मीर अबिद दिवाण मारला गेला होता.
गोव्याहून आलेले येसाजी गंभीर महाराजांना खासगीत पेश झाले. फिरंग्यांनी गोव्यात घातला धुमाकूळ खाशांसमोर ठेवताना म्हणाले, “काही रया राहिली नाही फिरंगाणाची धनी. पणजी सोडून फिरंगी लगतच्या अंत्रुज, सालसेत, बारदेश भागात चालून येत्यात भल्या पहाटेचं. कानडी माणूसमेळ आणि नव्या माटाच्या बंदुका आहेत त्याच्याकडं. अशीच गत राहिली तर…” कसे सांगावे म्हणून येसाजी रुकले. छातीवरून उतरलेले उपरणे मनच्या पिळाने मुठीत चुरगाळले गेले त्यांच्या.
“तर काय होईल, बोला, येसाजी.” महाराजांची गर्दन झटकन वर झाली.
“फिरंगी गावं लुटत नाहीत नुसती स्वामी! किरिस्ताव व्हायला राजी नसलेल्या उभ्या गावची माणसं चूड पेटवून जाळतात भर चौकात! घरचा कर्ता माणूस मेला, तर डोंबाच्या वृत्तीनं सरकारजमा करतात त्याची सारी मालमत्ता. आडा-विहिरीत पावाचे उष्टे तुकडे टाकून, ते पाणी पिताच धर्म बुडला, अशी भूमिका उठवतात. तरण्याताठ्या पोरी बाटवून भिक्षुणी म्हणून नेतात आपल्या देवळात. पांढरे झगे चढवून धर्माच्या प्रसारासाठी भरीस घालतात त्यांना दिवसभर आणि रात्री…” येसाजींनी मानच खाली टाकली. त्यांच्या पापण्या दहिवरल्या. उपरण्याची मूठ चाळवता-चाळवता गपकन थांबली.
कानी पडणारे ते शब्द ऐकून छत्रपती सैरभैर झाले. जखमी वाघागत नुसते फेरच फेर घेऊ लागले. फिरंग्यांच्या करणीचा संताप, चोहोतर्फांनी औरंगनं फेकलेल्या दौलतीवरच्या, ठिकठिकाणच्या फौजांचा ताण, हबशी, गोरे यांची संधिसाधू चाल, त्यांच्या भोसलाई मनात अनेक विचारांनी थैमान घातले.
“हीच गत राहिली तर पुरा फिरंगाण किरिस्ताव होईल महाराज. जमेल तशी माणसं फिरंगाण सोडून कारवार, बेळगाव, वरघाटात परागंदा होताहेत. तगून आहेत ती;
जीव मुठीत धरून हडबडलीत.” डोळ्यांतल्या पाण्याचे थेंब खळकन ओघळले येसाजींच्या उपरण्यावर.
परडीभर पसरता भंडारा, जगदंबेच्या मानकरी भुत्याने एकवटून घ्यावा तसे, काही एक विचाराने छत्रपतींनी आपले मन एकवटून घेतले.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८१.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.