धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८२ –
अकबराचा करीणा महाराजांच्या कानांवर घालण्यासाठी कवी कुलेश भेटीस आले. राजांनी विचारलेल्या कंठ्याच्या बाबीला अकबराने बेमुर्वतखोर जाब दिला होता – “हम शहेनशाह है। जी चाहे करेंगे/” ते उत्तर ऐकून, त्याच्या दिमतीला दिला घोडा आणि पावलोक छत्रपतींनी तत्काळ काढून घेतला होता. त्याला दिली जाणारी पेशगीची रक्कमही बंद केली होती. त्यामुळे खफा झाला अकबर आपल्या डेऱ्यांना जाळ लावून तळ उठवीत गोव्याच्या रोखाने जाण्यासाठी बांदा येथे पोहोचला होता.
राजांनी कुमक आणि पेशगी काढून घेतल्याने पुरत्या नाराज झाल्या अकबराचा पुढचा मनसुबा सांगताना कुलेश म्हणाले, “सुनते है, शहजादा फिरंगाण गया है।”
राजे विचारगत झाले. त्यांना मिळेल तेवढा शहजादा वापरायचा होता. हातचा जाऊ द्यायचा नव्हता.
“कुलेश, बऱ्या बारकाव्यानं ध्यान ठेवा शहजाद्याच्या हालचालींवर. तो फिरंग्यास सामील होता कामा नये. प्रसंगी त्यासच वापरा फिरंग्यांच्या बाबीनं.” राजांचा बेत मनी रुजबीत कुलेश गेले. कानी पडलेल्या फिरंगाणाच्या काळीजवेधी खबरेने बेचैन झालेले छत्रपती रायाजी-अंताजीसह आघाडी मनोऱ्याच्या रोखाने निघाले. त्या उंच मनोऱ्यावरच्या गडवाऱ्यावर त्यांचे खास बाबीचे निर्णय पक्के होत असत. दफ्तर, सिंहासनसदर, खासे महाल इथे खाशांना शोधून शेवटी खुद्द खंडोजीच मनोरा चढून आले. त्यांना बघताच महाराजांनी मनचा हेत बोलता केला.
“चिटणीस, चेऊलतर्फेच्या सुभेदारास लिहा. फिरंग्यांच्या कोटास घेर टाका.”
“जी.” कानी आल्या बाबी राजांसमोर ठेवण्यापूर्वी खंडोजी घोटाळले.
“बोला.” राजांनी त्यांची अडचण हेरली.
“स्वामी, दर्यावर भूमच्या ठाण्याला बावीस गलबतं आणि शंभरावर गुराबे उतरलेत.”
ते ऐकून महाराज निर्णय देत म्हणाले, “आपली शंभरावर गलबतं त्या तर्फेला रसद, नाखव्यांसह तयार ठेवायला सांगा दर्यासारंगांना. पुण्याला दामाजी रघुनाथांना राजगड, पुरंदर, शिवापूरला चढाईची नवी संचणी जय्यत करायला हारकारा द्या, खंडोजी!”
“जी. औरंगाबादेहून औरंगचा हेजिब शेख महंमद पणजीला फिरंगी विजरईला रुजू झाला आहे. त्यानं आपल्या दौलतीच्या खिलाफ फिरंग्यांनी उभे राहावे, अशी गळ घातली. आपणाला दिला जाणारा आताषी कारखान्यांचा वस्तभाव घेऊन येणारी जहाजं दर्यातून सोडू नयेत, असा खोडा टाकला आहे.” खंडोजींनी औरंगच्या तिरक्या चालीचा माग दिला.
“खंडोजी, मंगळवेढे भागात इदलशाहीचा मियाखान, सय्यदखान, हसनखान असा तालेवारीचा लढाऊ सरदार नुसता ठाण होऊन आहे. त्यांना या वक्ताला जोड देण्यास लिहा. केवळ मराठीच नाही, दख्खनेतल्या अवघ्या शाह्या आज ना उद्या औरंग पटात धरणार हे जाणून असावे, असे साफ कळवा त्यांना. आणि…” खंडोजींना कुडीभर निरखत क्षणैक थांबून राजे म्हणाले, “मोठ्या मोहिमेचा बेत आमच्या मनी आहे. तुम्हास घ्यावे म्हणतो संगती आम्ही. तयारीनं असा. ” खंडोजी आणि महाराज मनोरा उतरू लागले.
दोघांच्या मनी दोन टोकांचे विचार होते. याच वेळी पणजीच्या किल्ल्यात फिरंगी विजरईला शहजादा अकबर भेटला होता. त्याला मदत देण्याचेही फिरंग्यांनी कबूल केले होते. ही मदत होती, मक्केला जाण्यासाठी लागणारी लांब चालीच्या जहाजांची! पण – औरंगचा शेख महमद भेटताच विजरईने तीही चाल पालटली. मदत रोखली! अकबर अडवून पडला. बांद्याला ठाण झाला.
आता कडाक्याच्या थंडीने जोर धरला. पुरा रायगड धुक्याच्या दाट गोधडीखाली उत्तररात्रीपासूनच झाकाळून जाऊ लागला. अशाच एका थंडीच्या दिवशी राजांचा निरोप घेऊन रायगडाहून निघालेले येसाजी गंभीर पणजीला फिरंग्यांच्या दरबारात प्रवेशले.
फिरंगी विजरई कोंद-द-आल्वोर हा पोर्तुगीज वाणाचा गरम कोट घालून, उभट, लाकडी बैठकीवर बसला होता. त्याचे फिरंगी दरबारीही छोट्या लाकडी बैठकीवर बसले होते. येसाजींनी दुभाष्या शेणवीच्या मध्यस्थीने विजरईला रोखठोक सवाल केला, “फिरंगी मोगलांशी संगनमत करून चालवतात हे कसे?” वर फिरंगाणात चौल, तारापूर भागात दोन भुईकोट राजांनी कब्ज केल्याचे पाठबळ घेत येसाजींनी विचारले, “औरंगजेबाचा मोगली हेजिब शेख महंमद याच्याशी फिरंगी दरबारची बोलणी चालली ती कसली? मोगली जहाजे दर्यामार्गे ये- जा करतात, त्यास हा दरबार परवानगी देतो कसा?”
दुभाष्याने येसाजीचे प्रश्न कानी घालताच विजरई बिघडला! त्याने आपल्या दरबारची चाल न सांगता उलटाच सवाल केला की, येसाजी गंभीरांच्याकडे राजांची ओळखपत्रे आहेत काय?
ती “नाहीत’ हे ऐकताच, त्याने येसाजी गंभीरांना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. येसाजींनी त्या अपमानास्पद बाबीचा हारकारा रायगडी धाडला.
येसाजी गंभीरांची झाली मानहानी ऐकून, “फिरंग्यांची जहाजे दिसतील तेथे घेर टाकून कब्ज करा.” असा हुकूम आपल्या व अरबांच्या जोड आरमाराला राजांनी दिला.
कवी कुलेशही आता टिटवाळ्याच्या कुमकेला चार हजार धारकऱ्यांच्या पाठबळाने उतरले होते. त्यांची आणि इज्जतखान व रजपूत ५ पद्मसिंह यांच्या जोड सैन्याशी चकमक उडाली होती. काही झाले तरी कल्याण-भिवं भाग औरंगाच्या घशात पडू द्यायचा नाही याचा हंबीरराव, निळोपंतांनी विडाच उचलला होता. रामसेजचा औरंगचा चिवट घेर तर चाललाच होता.
या वेळी महाराजांच्या मनात फिरत होता फिरंगी! कुठे चिमट ठेवून नाक दाबावे म्हणजे फिरंगी तोंड खोलेल याचाच विचार करत, ते खासेवाड्यात फेर घेत होते. त्यांच्या भेटीला सुरनीस रामचंद्रपंत हाती खलिता घेऊन आले. तो फिरंगी दरबारचा पणजीहून आलेला खलिता होता. रिवाज, तपशील देऊन रामचंद्रपंत विजरईचा खलिता वाचू लागले –
“तुमच्या दरबारने वेंगुर्ला बंदरात दस्त केलेली आमची जहाजे अद्याप सोडली नाहीत. ‘आमच्या’ फिरंगाणात तुमच्या फौजांनी जाळल्या गावांची नुकसानभरपाई दिली नाही. तुमच्या वकिलाकडे दरबारचे ओळखपत्र नाही. अशा परिस्थितीत तुमच्याशी मैत्री राखणे अशक्यच आहे! सुलुखाचा काय असेल, तो निर्णय तातडीने घेऊन कळवावा. नाहीतर मोगल बादशहाशी मैत्रीचा सुलूख करणेचा निर्णय या दरबाराला घ्यावा लागेल!”
तो दरबारी रिवाजाचा खलिता नव्हताच. ती फिरंगी विजरईची मराठी दरबारला दिलेली छुपी तराटणीच होती!
“नाहीतर’ ह्या शब्दापासूनच महाराजांच्या कपाळीचे दुबोटी शिवगंध थडथडू लागले. “पंत, जाबसुद्धा देऊ नका या खलित्याचा! जो असेल तो साफ दावूच फिरंग्यास.”
महाराजांनीही निवाडाच सांगितला.
“पण एवढा औरंग तोंडीवर पसरला असताना या वेळी?” रामचंद्रपंतांना बोलल्याशिवाय राहवले नाही.
“केलाय त्याचाही विचार आम्ही पंत. हा मैत्रीच्या सुलुखाचा खाचा खलिता नाहीच. फिरंगी औरंगचीच जोड देणार. त्यास मिळण्यापूर्वीच त्याला तोडला पाहिजे. नाहीतर आज फिरंगाणात हैदोस घालणारा फिरंगी उद्या भोवतीचा मुलूख आणि पुरा तळकोकण कुरतडून खाईल. आम्ही राहू मैत्रीच्या सुलुखानं गाफील.”
“जी” रामचंद्रपंतांचीही मती गुंग व्हावी, असाच तिढेबाज होता तो खलिता.
“पंत, चांगोजींना सांगा आम्ही आजच गड उतरणार आहोत, गांगोली जवळ करण्यासाठी.”
“गांगोली?” विचारावेसे वाटले पंतांना, पण त्यांनी आवरले.
चांगोजींनी राजांच्या जाण्याची सिद्धता केली. गड उतरून, पाचाडचा पावलोक दिमतीला घेऊन राजे पादशाहपूरच्या पहिल्या मुक्कामावर आले. वेळ रात्रीची होती.
प्रल्हादपंतांबरोबर आलेला टोपीकरांचा मुंबईचा वकील परतीच्या मार्गावर होता. त्याचा मुक्कामही पादशाहपूरलाच होता. तो इंग्रज वकील हेत्री स्मिथ रात्रीचाच महाराजांच्या भेटीस आला. त्याबरोबर दुभाष्या राम शेणवीही होता.
शेणवी म्हणाला, “टोपीकर दरबारास प्रल्हादपंतांच्या मुंबई भेटीत झाल्या कराराची कागदपत्रे या वकिलासोबतच द्यावी महाराज!”
एकतर मजलेच्या मुक्कामावर, भलत्या अवेळी आणि टोपीकरांना आल्या वकिलाबरोबरच करारपत्रे द्यावीत म्हणून भेटणाऱ्या शेणवीचा राजांना संतापच आला. ते म्हणाले, “शेणवी, करारपत्रे काय उडून जाणार आहेत, आम्हासोबत? टोपीकर दरबार तर रिवाजात जाणता म्हणून महशूर. कसा आला हा वकील भलत्या जागी, अशा अवेळी तुम्हास घेऊन?”
शेणवीचे पायच लटलटू लागले. चाचरत कसेतरी तो सफाईचे म्हणून बोलला, “आम्हीच आणला त्यास. कसूर माफ असावा. तो जाईल. आम्ही राहू मागे, महाराज म्हणतील तेव्हा भेटू.”
“काही जरुरी नाही तुम्हीसुद्धा राहण्याची मागं! मिळणे ते मिळतील करारपत्राचे कागद रायगडी-दफ्तरातून प्रल्हादपंतांच्या हस्ते. या तुम्ही.” महाराजांनी शेणव्याचे शेपूटच तोडले.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८२.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.