धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८४ –
रायगडी आलेले महाराज दोन गंभीर बाबींचा विचार करीत होते. शिलेखाना, अंबारखाना, दफ्तर, सिंहासनसदर कोठेही ते असले, तरी त्या बाबी सावलीगत त्यांचा पाठलाग करीत. एक बाब होती, वेलवण मुक्कामी रघुनाथपंत हणमंते यांचा काळ झाल्याची. मोठ्या उमेदीने कर्नाटकातून आल्या पंतांना मुजमूची जोखीम महाराजांनी दिली होती. रघुनाथपंत! बिरवाडी मुक्कामी त्यांच्याशी झाल्या भेटीच्या आठवणी राजमनात सारख्या फिरत होत्या. केवढी निडर असामी रघुनाथपंत!
शेवटी आपल्याच मनाचा कौल घेऊन राजांनी मुजुमदारीच्या सेवेची जोखीम रघुनाथपंतांचे चिरंजीव नारायण रघुनाथ यांच्या सुपुर्द केली. दुसरी गंभीर बाब होती, येसाजी गंभीर यांना पणजीत फिरंग्यांनी कैद केल्याची. ती कानी पडताच राजे समजून गेले की, फिरंगी दरबारची चाल काय आहे. तो दरबार आता औरंगच्या गळ्यात पडणार, हे शाबीत झाले होते.
अद्याप राजस्थानातील मिर्झाचा मुलगा, अंबरचा राजा रामसिंग म्हणावी तशी साथ काही राजांना देत नव्हता. खंडोजींना बोलावून घेऊन राजांनी रामसिंगाला दुसरा दीर्घ मार्मिक खलिता लिहायचा मजकूर सांगितला.
“फिरंगी! फिरंगी!’ या मनच्या भिंगरीवरच राजे जामदारखाना, आताषी कोठार, पाचाडपागा या ठिकाणांना सारख्या भेटी देत होते. येसूबाई, बाळराजे, भवानीबाई यांच्याशी निवांत बोलायलाही उसंत मिळत नव्हती त्यांना. असेच पाचाडपागेची जनावरे नजरेखाली घालत ते पेशवे, खंडोजी, रायाजी-अंताजी अंताजा अशा शेलक्यांसह पायफेर घेत होते. मधूनच उमद्या जनावराचे पाठवान थोपटत होते. जनावर अंगभर भोवरा उठवून, कान फडकावून साथ देत होते.
“खंडोजी, अंबरचा रामसिंग नाही साथ देत. आपली म्हणावी ती माणसं नाही, पण जनावरं किती लगोलग साथ देतात.” महाराज काही कढाने म्हणाले.
“जी, जनावरांची नजर समोर असते… माणसांची चौफेर फिरते! कुणीकडे स्थिरावेल सांगता येत नाही!” खंडोजी रांगडे बोलले.
राजांचे आपल्याकडे ध्यान जावे, म्हणून एक खबरगीर लगबगीने पागेच्या दरवाजात घुसला. राजांना जुहार देत न राहवून तिथूनच, अदबीने म्हणाला – “चांगभलं धनी, कल्याण-भिवंडीचा गनीमतळ उठला! औरंगाबादेच्या वाटेला लागल्यात रणमस्त, बहादूर, रुहुल्ला ढीग सम्दं खान! आपलं रूपाजी, सरलष्कर, मानाजी घाटा-पांदीत मिळंल तिथं छापं मारत्याहैत त्येंच्यावर.”
राजांभोवतीच्या सगळ्या माणसांचे चेहरे उजळ झाले. “जगदंब!” म्हणत राजांनी छातीवरच्या माळेला हात भिडवून क्षणैक डोळे मिटले. ज्या हेताने ते तारापूर-दमण भागात गेले होते, तो आता हाती घेता येणार होता. पण चाल काय असावी, औरंगची फौजफळी मागे घेण्यात? राजे विचारगत झाले.
ज्या मुरादीने औरंगने कल्याण-भिवंडी पटात घेण्यासाठी जंग-जंग पछाडले होते, ती पुरी झाली नव्हती. सगळी कोकणपट्टी मुंबईचा टोपीकर, पणजीचा फिरंगी आणि जंजिऱ्याचा हबशी यांच्याशी जोड घेत घशात घालायची. राजांचा दर्यामार्गच ताब्यात घ्यायचा. मग दर्या आणि माती यांची चिमट फौजीबळाने आवळायची. काफर, दगाबाज, सेवाच्या पहाडी माच कान करून त्याच्या पाक सुवासात नमाज पढायचा!
कल्याण-भिवं नामोश घेत परतणाऱ्या रणमस्त, बहादूर यांची आता तो खरड काढणार होता. एकट्या बक्षी रुहुल्लाखानाला मात्र जडावाचा खंजीर आणि घोडा बक्षून सर्फराज करणार होता. कारण कामगिरीच केली होती त्याने तशी मोलाची. भवानीच्या माळेतली एक-एक कवडी उचलून औरंगच्या तसबीहच्या माळेत गुंफण्याची, फितवेखोर फोडण्याची!
मृगाने झड धरली. पाऊसमाऱ्याखाली जागाजागी पडलेले मोगली तळ झोडपून निघू लागले. गडागडांना गवती झडपा चढल्या. रामसेजचा चिवट, नेक किल्लेदार अद्याप चिकाटीने घेर झुंझवीतच होता. तळकोकणवरचा औरंगचा फौजीताण कमी झाला, याच संधीचा फायदा घ्यायचा ठरविलेले राजे पडत्या पावसात येसूबाईचा निरोप आणि थोरल्या आऊंच्या व आबासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाडघाटीने राजापूरवर उतरले. आठ हजारांचे घोडदळ होते त्यांच्यासंगती. चेऊल उर्फ रेवदंड्याचे राघो विश्वनाथ, दमणचे हरी शिवदेव, दाभोळचे वेंकाजी निमदेव यांना तातडीचे हारकारे रायगडाहूनच गेले होते.
घसघसत्या पावसात तळकोकणच्या मर्दान्यांची खाशा डेऱ्यात खलबती बैठक बसली. मानकऱ्यांना मनसुबा खुला करीत राजे म्हणाले, “गनीम कल्याण भिवंडीवरून उठला. आता त्याचं पाठबळ घेत उचल खाणाऱ्या फिरंग्यास धडा देणं आहे! खुद्द आम्ही जाणार आहेत चालून रेवदंड्यावर, तुम्ही वकुबाचे ते आपापल्या ठाण्यावर सावध राहून रसद-शिबंदीची प्रसंगी कुमक करण्यास सिद्ध असावं. राघो विश्वनाथ, तुम्ही रेवदंडा प्रांतीचे. मुलखाचा काही तपशील?” राजांनी बेत खुला करीत राघोंना विचारले.
“जी. फिरंग्यांच्या कोटास दोम फरांसिस म्हणून सालार आहे. दिमतीला तोफखाना आहे त्याच्या. पावसात लागी पडायचा नाही त्याच्या तो. बळ धरून वेळेसच घेर टाकला पाहिजे.” राजांच्या मनसुब्याला राघो विश्वनाथांनी दुजोरा दिला. “स्वारी रेवदंड्यावर’ खल होऊन सर्वांना निरोपाचे विडे देण्यात आले. पावसाची तमा न करता कांबळी, काचोळी पांघरून खबरगीर रेवदंडा-दमण भागात पांगले.
पिरंग्यांविरुद्ध स्वराज्याच्या फौजेच्या आघाडीची ठिणगी ऐन पाऊसकाळात पेटली. रेवदंडा हल्ल्याचे मुख्य लक्ष ठेवून, कोरलाईचा किल्ला, अंजोर असा घेर धरत राजांच्या मावळी फौजा वर फिरंगाणात घुसल्या.
रेवदंडा पाडण्यासाठी दोरबाज धारकऱ्यांनी किल्ल्याच्या तटाला, पाऊसमारा अंगावर घेत शिड्या भिडविल्या. फिरंगी दोम फरांसिसने तटावरून दगड, बाण बरसवायला सुरुवात केली. खुद्द दोम हाती बंदूक घेऊन दोरबाजांवर बार टाकू लागला. पूर्वी जसा पन्हाळ्याला आबासाहेबांना घेरात कोंडत सिद्दी जौहराने घेर आवळला होता, तसाच आता दोम फरांसिसला कोंडत राजांनी घेर आवळला. त्या खबरीने जागा झालेला पणजीचा विजरई कोंद-द-आल्वोर मग पेचात पडला. त्याने याकुतखानाला व हबशी खैरतला मदतीचा खलिता दर्यामार्गे सुरतला धाडला.
राजे रोज घेरावर घोडाफेर टाकत होते. शिड्यांवरून कोसळलेल्या दगड, बाणांनी जाया झालेल्या धारकऱ्यांना धीर देत होते. भिजत, पावसाळी सांजा पाठीवर घेत परतत होते. अशाच एका सांजेला सुभेदार राघो विश्वनाथ त्यांच्या भेटीला डेऱ्यात आले. भिजल्या आवाजात म्हणाले, “कोल्हापूर-पन्हाळा प्रांत नेटानं आबादान राखून असणारे डबीर जनार्दनपंत हणमंते गेल्याची खबर आहे स्वामी!”
राघो विश्वनाथ आपल्या स्वामींच्या चर्येवरची घालमेल बघून पुढचे कसे बोलावे, याच विचारात पडले. मन बांधून शेवटी म्हणालेच, “थोरल्या स्वामींपासून मुन्शीच्या चाकरीत असलेला काझी हैदर औरंगाबादेत गनिमाला मिळालाय. बादशाहनं त्याला दहा हजारांची बक्षिसी आणि दोन हजार स्वारांची मन्सबी दिलेय!”
काही सांगावे झाले तर ते कोणास? गणोजी, कान्होजी पारखे झाले, त्या समयी श्रीसखींना वाटले तसेच राजांना वाटले. स्वत:च स्वतःशी बराच विचार करून त्यांनी राघोंना सांगितले, “आजच रायगडी खलितास्वार पाठवा, डबिरी जनार्दनपंतांचे पुत्र वासुदेवपंतांस सुपुर्द करण्यास कळवा.”
रेवदंड्याच्या वेढ्याला दीड महिना झाला. दोम फरांसिस चिवट झुंज देत होता. राजे हटायला तयार नव्हते. कल्याण-भिवंडी, मलकापूर, पन्हाळा, सोलापूर, रामसेज, वऱ्हाड, खानदेश, रायगड चारी बाजूंनी खबरा यात होत्या. हंबीरराव, केसो त्रिमल, नारूजी, संताजी जगताप, कुलेश, जागजागीचे लढाऊ म्होरके पावसातही आपापली जोखीम सांभाळून होते. घडल्या बारीक-सारीक चकमकीची, फितव्याची, खटकणाऱ्या खुट झाल्या बाबीची खडान्खडा खबर, नदी-नाले ओलांडत बहिर्जीचे नेक खबरगीर थेट रेवदंड्यांपर्यंत पोहोचवत होते.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८४.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.