धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८५ –
रात्रभर आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत राहिला. रेवदंड्याचे थकले- भागले फिरंगी घरट्याघरट्यांत आराम घेत राहिले. भल्या पहाटेच, पडल्या पावसाने कातावलेले फिरंगी पहारे बदलत असताना, संभाजीराजांनी तलवारीचे टोक रोखून मावळ्यांना रेवदंड्याचा हल्ला निकराचा करताना चेतावनी दिली, “हर हर महादेव!” श्रावणी पहाट थरकून गेली. मावळी फौज तुटून पडली.
तीन आघाड्यांनी एकाच पहाटेला तोंड फोडले, रेवदड्यांचे मेरी चर्च, किल्ला आणि मोरावचा किल्ला, चर्चचा फिरंगी संरक्षक डोमिगो गोम्स याने तर कानडी तोफजींना पावसाळी चिखलात राबवून चर्चच्या मनोऱ्यावरच तोफा चढविल्या!
पावसाळी ढगाळला दिवस चढत होता. तिन्ही मारगिरीच्या जागांवर मावळे शिडया लावत, तोफगोळे झेलत, दगडबाणांचा मारा पेलत, इरेसरीने लढत होते. तिन्ही फिरंगी ठाण्यांनी मावळ्यांची हाय खाल्ली. पावसामुळे, तोफबाणांच्या माऱ्याने मावळ्यांनाही म्हणावे तसे यश नव्हते. हा किल्ला पडला तर वेंगुर्ला, दाभोळ, नागोठणे, रेवदंडा अशी दर्यासाखळी बांधून मुंबईकर गोऱ्यांशी प्रल्हादपंतांनी केल्या मैत्रीच्या तहाची जोड घेत राजांना मराठी आरमार बळकट करायचे होते. अरबांच्या मदतीने चाललेला फिरंगी-मोगलांचा दर्यादोस्ताना तोडायचा होता.
रेवदंडा, दमण, वसई भागात घुसलेल्या राजांच्या फौजांमुळे धास्तावून गेलेल्या विजरईने, प्रजेसह पाद्रयांनासुद्धा फर्मान काढले – “संभाजीराजा चालून येत आहे. मिळतील ती हत्यारे घेऊन असाल तेथे जंगास सिद्ध राहा!” याच वेळी कल्याण-भिवंडीत मार खाऊन परतलेल्या रणमस्तखानालाही “बहादूरखान’ ही किताबत देऊन औरंगने त्याचा मरातब केला होता. का? तर त्यालाच आता आदिलशाहीच्या विजापुरावर धाडावयाचा होता.
रमजानचा महिना असल्याने औरंगाबादेच्या दौलतखान्यात येऊन बादशाह रोजा धरून होता. थुंकीही न गिळता पाळाव्या लागणाऱ्या, कोरड पडल्या उपाशी तोंडानेच तो विजापूरच्या शिकंदर आदिलशाहाला लिहायच्या खलित्याचा मजकूर सांगत होता. मनी
“अलिजांना आपलाच काही शक आला की काय?” ही धास्ती धडक भरत असताना प्रत्यक्ष त्याची सूनच तो मजकूर रेखीत होती – आज पहिल्यानेच त्याने आपल्या सुनेलासुद्धा राजकारणी मतलबासाठी कलमी सेवेवर घेतले होते!
सरत्या पावसाळ्यात तिहेरी पट्ट्यांचा शतरंज खेळीला पडला. औरंगाबाद, पणजी आणि रायगड असे ते पट्टे होते. खेळे होते मोगल, फिरंगी आणि मराठे. रेवदंड्याहून राजांना रायगडी परतावेच लागले होते, कारण पणजीचा विजरई तळफिरंगाणात चालून येण्यासाठी हत्यारे, सैन्यसंचणी यांची जय्यत तयारी करतो आहे, अशी पक्की खबर होती. त्याला लढाऊ सामान पुरविणारी दोन गलबते पोर्तृुगालहून, सात-दर्यापार होऊन पणजीला उतरली होती.
औरंगजेबाची कल्याण-भिवंडीवरची पिछेहाट ही राजांनी केल्या अंदाजाप्रमाणे हूल होती. बाहेर तुरळक पाणसरी कोसळत होत्या. खासेमहालात बोलावून घेतल्या निळोपंतांना राजे म्हणाले, “पेशवे, बिचोलीत ठाण झाल्या अकबरास कळवा की तुम्ही आणि दुर्गादास मिळून कारवारात डचांची भेट घ्या. डचांची पडेल ती मदत शहजाद्याच्या बोटाच्या आकडीने खेचली पाहिजे. त्यासाठी मरातबाचा नजराणा पाठवा बिचोलीस…
मात्र… मात्र कंठयासारखा अलंकार नका पाठवू नजराण्यात!”
“जी. रेवदंडयाचा घेर म्होरक्याविना पावसात आहे. तेव्हा – निळोपंतांनी मोलाची बाब पुढे घेतली.
“नाइलाजानं उमेदीनं घातला घेर सोडून आलोत आम्ही पेशवे. वरफिरंगणावरचा आमचा घेर सुटावा म्हणून फिरंगी तळकोकणावर दाव टाकणार आहे. प्रसंगी बेळगावमार्गे रामघाटानं औरंगजेब त्याला कुमक करणार अशी खातरीची खबर आहे. औरंगजेबाला -“दिल्लीतख्ताचा शहेनशहा’ म्हणवून घेणाऱ्या – अकबराला दस्त करायचं आहे. आणि त्याच मार्गानं आपल्या मुलखातही घुसायचं आहे.”
“फिरंगी-मोगलांची जोड पडली, तर पुरा तळ आणि वरकोकण गिळंकृत केल्याशिवाय औरंग राहणार नाही महाराज.” निळोपंत आपल्या स्वामींच्या मनातलेच बोलले.
“त्यासाठी आम्ही वरफिरंगाणात रेवदंडयाचा वेढा तुमच्या देखरेखीखाली देणार आहोत.”
“जशी आज्ञा. आम्ही जाऊ कुमकबंद होऊन रेवदंड्यावर.”
पेशव्यांशी ठरल्या मनसुब्याप्रमाणे महाराज त्यांना संगती घेऊन रायगड उतरले. आणि पडत्या पावसात आठ हजारांची फौज दिमतीला देऊन महाराजांनी निळोपंतांना पाचाडपागेसमोर निरोप दिला. महाराजांनी अटकळ बांधली तसाच या वेळी औरंगाबादेतून आपल्या आबाजानांचा जामा, गुडघे टेकून चुंबत औरंगजेबाचा लाडका शहजादा शहाआलमही वाजतगाजत वेशीबाहेर पडला. त्याच्या दिमतीला तुर्की, पठाण, मोगल, फितूर मिळून पंचेचाळीस हजारांचे सैन्य होते! त्यात तोफखान्याचा दरोगा आतषखान होता. लुत्फुल्ला, इखलास, जान निसार, सादत असे खान होते. आणि पहाडी, डोंगरदऱ्यांच्या मुलखाची शहाआलमला अचूक आणि इमानेइतबारे माहिती पुरविण्यासाठी नागोजी माने नावाचा सातारातर्फेचा, रहिमतपूरचा, एक “माहीतगार’ मराठा सरदारही होता. सुरतहून दर्यामार्ग पणजीला धान्य, शस्त्रे आणून, ती त्याला पुरविली जाणार होती.
भेटीस आलेल्या शहजाद्याला औरंगने कानमंत्र दिला होता. “बांदा, बिचोली, पणजी भागात फिरणाऱ्या बागी अकबराला दिसेल तिथं कत्लच करावा!”
भावाचा भावानेच काटा काढावा हे दोघांचाही “बाप’ शांत-थंडपणे सांगत होता. तिहेरी पट्ट्यांचा शतरंज सुरू होता. पाऊस उलगला. बेत साफ करणाऱ्या फिरंग्यांच्या हालचाली सुरू झाल्या. ते पणजीची मांडवी खाडी ओलांडून लगतची गावे रात्री-बेरात्री बेचिराख करू लागले. कैद माणसे सक्तीने बाटवू लागले. माणसे हवालदिल झाल्याच्या खबरा रोजाना रायगड चढू लागल्या. चौल भागात घेर टाकून बसल्या निळोपंतांच्या कानी त्या पडताच पुरा रेवदंडा, दमण, वसई पट्टा त्यांनी पटाखाली धरला. त्याने भेदरलेले चार हजारांवर फिरंगी मुंबईच्या पंखांखाली आसऱ्याला गेले.
पणजीची घुसखोर चाल पारखूनच बोलावून घेतलेले येसाजी कंक आणि फोंड्याचे सुभेदार धर्माजी नागनाथ महाराजांच्या भेटीसाठी आले. येसाजींच्या बरोबर त्यांचा ऐन बांडा मुलगा कृष्णाजी बघताच महाराजांना धनाजी जाधवांचीच आठवण झाली. कृष्णाजी मल्लखांबासारखा घोटीव आणि ताठ अंगकाठीचा सावळा गडी होता.
“कंककाका, फिरंगी आज ना उद्या फोंड्याच्या कोटाकडे मुसंडी मारणार. तुम्ही, धर्माजी आता फोंडाफळी नेटाक ठेवावी.” महाराज येसाजींना म्हणाले.
“बरी कामदारी सोपवलिसा धनी. आम्हावर हाय न्हवं फोंडा, काळजीच करू नगा त्येची. ह्या पोराला तेवढ्यासाठनंच आणलाय संगट.” उतार झाले तरी खड्या बोलीचे येसाजी कृष्णाजीकडे हातरोख देत म्हणाले.
धर्माजी नागनाथांना राजांनी रसद, कुमक, फिरंग्यांच्या लढाईचं तंत्र यांची तपशीलवार माहिती दिली. धर्माजी, येसाजी, कृष्णाजी गडावर एक मुक्काम टाकून फोंड्याकडे उतरले.
आपल्याच विचारात राजे हिरकणी माचीवरून दिसणारा, फरशीच्या आकाराचा सूर्यास्त बघण्यात हरवले होते. डावे-उजवे मुधोजी, चांगोजी, खंडोजी उभे होते. कुणीच काही बोलत नव्हते. एवढ्यात जोत्याजी केसरकर लगालगा माचीवरच आला. राजांना स्वतःत डुबलेले पाहून सांगावे की नको, या विचाराने घुटमळला. काहीतरी विचाराने महाराजच वळले. जोत्याजी आता मात्र सामोरा झाला.
“धनी, दिलेरखानाची खबर हाय…” तो चाचरला.
“जोत्याजी, नाव नका काढू आम्हासमोर त्याचं.” महाराजांच्या मनात क्षणभरातच दिलेरच्या गोटातले साल सरकले.
“जी ती पाळीच यायची नहाई आता कुणावर! दिलेरनं आपल्या गोटात हिरकणी खाऊन जीव दिला धनी!!”
“क्राञय जोत्याजी, काय म्हणालात?” आज पहिल्यानेच फारा दिवसांनी राजांच्या उभ्या देही काटा सरकला.
“खरं हाय धनी – बादशानं त्येची समद्या म्होरं लई खरड क्येली. म्हनला, “तुम जैसा सालार है नमकहराम, फते क्यू नहीं की मुलूखमें?’ आन् बेइज्जतीने बिघाडला खान तसाच आपल्या डेऱ्यात परतला आन्…”
दिलेर! रामराजांच्या मासाहेब! गोदावरी! मावळतीला जाणाऱ्या ब्िंबाच्या तिकोनी फरशीगत जळजळीत विचारच विचार शंभूमनात फिरू लागले आणि मग बराच वेळ अनेक रूपांतला पठाण दिलेर तेवढाच महाराजांच्या मनात रेंगाळत राहिला.
राजापुरात एकीकडून राजांनी फर्मान दिलेल्या शिबंद्या येऊन मिळत होत्या, दुसरीकडून फोंड्याचा घेर फिरंगी बळकट करताहेत अशा खबरांवर खबरा येत होत्या. आता राजापूर मराठी फौजेचा जंगी तळच झाले होते. तीस हजारांवर मावळा तिथे डेरेदाखल झाला होता. धर्माजी, नागनाथ, हंबीरराव, खंडोजी त्या पुऱ्या तळाची देवघेव बघत होते. धर्माजींना बोलावून घेत राजांनी फर्मावले, “सुभेदार तुम्ही फ्रेंचाच्या वखारीत जाऊन त्यांच्या विजरईची भेट घ्या. त्यांना साफ समज द्या. इथून फिरंग्यास कोण्या वजेची कुमक करण्याची आगळीक त्यांनी करू नये. इथला आमचा तळभार वाढला आहे. तातडीच्या खर्चासाठी दीड हजार पागोडेही कर्ज म्हणून देण्याची मागणी घाला त्यास.”
“जी, फोंडा आता अधिक नाही तग धरायचा. आठ दिवस झाले. येसाजी कुमकेची वाट बघत नेटानं घेर झुंजविताहेत.” धर्माजी फोंड्याचे सुभेदार असल्याने त्यांनी चिंतेची बाब पुढे घेतली.
धर्माजींना राजे काही बोलणार तोच डेऱ्याबाहेर ‘ठो ठो ‘ अशी कुणीतरी सरळ बोंब ठोकल्याचा मोठा आवाज आला!
राजांनी धर्माजींकडे चमकून बघितले. काही क्षणातच एका इसमाला दंडाला धरून खंडोजीच आत आले. त्याला पुढे घालत म्हणाले, “नायकवडी आहे हा फोंडा कोटाचा. काही फिर्याद आहे म्हणतो. मिनत्या केल्या सांगत नाही. म्हणून शेवटी खाशासामनेच आणावा लागला.” खंडोजी वैतागलेले दिसत होते.
धर्माजींनी आपल्या प्रांतीच्या नायकवडीला ओळखले. त्याच्याजवळ जात त्याचा दंड खंडोजीच्या हातून सोडवून घेत म्हणाले, “बोंब मारून फिर्याद करायचा हाच रिवाज आहे तळकोकणात चिटणीस! काही बेअदब केली नाही त्यानं.”
महाराज नायकवडीच्या समोर आले. राजांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी तो आडवाच झाला. त्याला राजे म्हणाले, “उठा. बोला. निडरपणे फिर्याद बोला तुमची.”
“माजी एकल्याची न्हाई!” धीर चेपलेला नायकवडी फिर्याद ठेवत म्हणाला, “मुलखाची हाय. कशापायी धनी अडकून पडल्यात हतं? आमचा पोंडा तर जाणारच; पर भोवतीचा मुलूखबी जाणार फिरंग्याच्या घशात. जे असंल त्ये आजच कराय पायजे.”
राजांच्या मनातली बाबच छेडली फिर्यादी नायकवडीने. वळते होत राजांनी विचारलं, “आणि काही फिर्यादी?”
“आज लई जोराची हालचाल चाललिया फिरंग्यांची फोंड्याभवत्यानं. आज रातीलाच घालील, त्यो वर्माचा हमला कोटावर.”
“खंडोजी, हंबीरमामांना बोलावून घ्या. धर्माजी, पाच हजारांचा निवडीचा घोडालोक तयार ठेवा. जमेल तेवढे, पायदळ आत्ताच कूच करा फोंडामार्गानं. आम्ही – खुद्द आम्हीच जाऊ येसाजींच्या कुमकेला!” राजे निर्धारी बोलले. आला नायकवडी समाधानाने डेऱ्याबाहेर पडला. आत आले खिदमतगार राजांच्या अंगी बख्तर, ढाल, हत्यारे चढवू लागले. याद फर्मावलेले हंबीरराव आले. “आम्ही फोंड्यांची कुमक करायला राजापूर सोडतो आहोत सरलष्कर. तुम्ही आमची वर्दी मिळताच पुऱ्या जमावानं येऊन मिळा. फोंडाच नाही, फिरंगाणच धरायचा आहे घेरात!” राजे त्यांना म्हणाले.
“आम्ही संगतीच आलो तर…” राजांना एकले पुढे सोडणे हंबीररावांच्या जिवावर आले.
“पुरा तळ हलायला वेळ लागेल. त्यासाठी तुम्ही मागे असा.”
लढाऊ साज अंगावर घेतलेले राजे बाहेर पडले. धर्माजी, खंडोजी, हंबीरराव यांना गाठीच्या फौजेवर ठेवून, त्यांनी सिद्ध झाल्या “चंद्रावता’वर मांड घेतली.
“जय भवानी’ त्यांनी हंबीररावांसह सर्वांचा निरोप घेत टाच भरली. उधळत्या चंद्रावताच्या आघाडी खुरातले चंदेरी कडे उन्हात झमझमू लागले!
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८५.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.