महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,468

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८६

Views: 2524
6 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८६ –

विजरई आल्वोर आपल्या साथीदारांसह, भगदाड पडल्या फोंड्यात, निकराचा आखरी हमला करून शिरण्यासाठी फौजेची शिस्त मांडून तयारच होता. त्याचे वाजंत्री फिरंगी पडघम घुमवीत फौजेला चेतना देत होते. चित्रविचित्र किलकाऱ्या उठवीत होते.

तटावरून हवालदिल येसाजी-कृष्णाजी त्यांच्याकडे बघत आपल्या धारकऱ्यांना धीर देत गरगर फिरत होते. आता फोंडा होता, जिवा-मरणाच्या ऐन टोकावर. थोडा अवधी झाला तर….एवढ्यात उठल्या! “हर हर महादेव”च्या गगनस्पर्शी मर्दान्या किलकाऱ्या उठल्या. सरसरत येत्या धूळलोटांतून फडफडत येणारा भगवा जरीपटका येसाजी- कृष्णाजींना तटावरनं दिसला. पुरा फोंडा कोट तो बघताना चैतन्याने कसा सळसळून उठला. ऐलतीराला त्यानं साद दिली “हर हर म्हाः्येव.’ फोंडाही पैलतीरावरून कडाडला.

मध्ये सापडलेले फिरंगी गोंधळून मागे वळताना कुजबुजू लागले – “ता पळय. राजा इलो!” हा-हा म्हणता विजरईने अंग मोडून मांडल्या सैन्याची शिस्त पार विसकटली. तसे तटावरचे मावळे तर आनंदी जल्लोषाने आरोळ्याच आरोळ्या ठोक्‌ लागले. भिडले! पायदळ मध्ये घेऊन पाच हजार घोडदळासह संभाजीराजे थेट कोट फोंड्याच्या पायथ्याला भिडले. घेराचा आता रंगच पार पालटला. बगलेला उभ्या एकाही फिरंग्याची हत्याराला हात घालायची हिंमत काही झाली नाही. राजांचा तो जसा उपराळ्याचा हल्ला नव्हताच. होता फोंडा गडचढीचा हमेशाचा प्रघात! फोंड्यावर आता चक्क नौबती दुडदुडु लागल्या!

येसाजींनी आज आठ दिवसांनंतर फोंड्याचा दरवाजा उघडला. सामने थोरल्यांचे अंकुर, तडफदार, बांडे राजे बघताच डोळे अनेक आठवणींनी डबडबून आले म्हातारबाचे. रिवाज द्यायला ते कमरेत वाकताहेत, हे बघून राजे चटकन पुढे झाले. ऐन भराचे राजे आणि उतारवयाचे येसाजी यांची कडकडून ऊरभेट पडली. गोव्यातल्या किल्ले फोंड्यावर!

“कंककाका, तटातील धारकरी बाहेर काढा टाकोटाकीनं. फिरंगी माघार घेणार काढत्या पायांनी. त्यांचा आत्ताच पाठलाग केला पाहिजे!”

“जी.” येसाजी-कृष्णाजी घायपाती, लवलवत्या पानांसारखे हलू लागले.

राजांनी अंदाज बांधला तसेच झाले होते. विजरईने माघारीचा हुकूम देताच, त्याचीच वाट बघणारे त्याचे सैनिक आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळू लागले. दुर्भाटजवळ मावळी घोडाईतांनी माघार घेऊन दौडत्या फिरंग्यांना गाठले. मोर्चे धरलेल्या फिरंगी बंदुका कडकडल्या. मावळी घोडी बिचकून मुस्काटे फिरवू लागली. ते पाहून येसाजीपुत्र कृष्णाजीच बिथरला! त्याने आभाळाकडे गर्दन उठवून सर्व घोडाईतांचे पाठकणे सुरसुरून फुलवीत केवढीतरी मोठी किलकारी दिली. “हर हर हर महादेव.”

ती लढाई होती दौडत येणाऱ्या मावळी भालाइतांची आणि बंदिस्त मोर्चे धरत माघार घेणाऱ्या फिरंगी बंदुकधाऱ्यांची. फिरंगी मोर्चे पार विसकळीत झाले. घुसलेल्या काही मावळे भालाइतांच्या भाल्यांच्या माऱ्यातून खुद्द विजरई दोन वेळा नशिबाने सलामत निसटला होता. कित्येक फिरंगी नदीतून पोहत होते. कैक गळाभर पाण्यात जीव मुठीत धरून उभे होते. भेदरलेल्या विजरईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहिली. आणि – आणि अंगभर रक्ताने न्हालेला, मोर्चामागून मोर्चे फोडत चाललेला, अंगी गोळ्याच गोळ्या झेलून फुलल्या पळसवृक्षासारखा रक्तबंबाळ दिसणारा, घामेजला कृष्णाजी छाताडावर वर्मी गोळी लागताच ग्लानी येऊन घोड्यावरून कोसळला!! ज्या ठिकाणी जाया झालेले येसाजी, कांबळ्यावर आणून ठेवले होते त्या जागी, त्यांच्याशेजारीच कृष्णाजीलाही मावळ्यांनी घोंगडीवर झोपविले.

आता दोन्हीकडचा मार सुमार झाला होता. कित्येक फिरंगी आणि मावळे कामी आले होते. सांजावत आल्याने हत्यारे थांबली होती. महाराज घोंगडीवर झोपविल्या येसाजींजवळ आले. त्यांना बघून क्षीण आवाजात म्हातारबा येसाजी म्हणाले, “सुक्षेम हाईसा न्हव?” काय बोलावे तेच राजांना सुचेना. ते कृष्णाजीच्या घोंगडीजवळ आले. ती घोंगडीच रक्ताने चिंब झाली होती. कृष्णाजीने ग्लानीने भरलेले डोळे किलकिले केले. उजव्या पायपंजावर बसत राजे त्यांच्या जखमी देहभर, आईच्या मायेने हात फिरवीत म्हणाले, “ऐसा कैसा रे फुटोन गेलास तू कृष्णा!” त्यांनी भोवतीच्यांना आज्ञा केली, “या बापलेकांस आत्ताच कऱ्हाड प्रांती डोलीतून त्यांच्या गावी पोहोचवा.”

नेसरीच्या प्रतापराव गुजरांची, पुरंदरच्या मुरारबाजी आणि घोडखिंडीच्या बाजी देशपांड्यांची, मरणाचा लाकडी खोडा वळता करून घेणाऱ्या जंजिऱ्याच्या कोंडाजी फर्जंदांची याद व्हावी, असाच हाही प्रसंग होता – गोव्याच्या कृष्णाजी कंकाचा. सालसेत, बारदेशवर हंबीरराव उतरले. दुर्भाट-आगाशी मार्गे धर्माजी नागनाथ घुसले. राजांच्या तितोंडी फौजा निकराने गोव्यात शिरण्यासाठी पुढे घुसल्या. राजे आणि खंडोजी जुवे बेटावर चालून गेले. त्यांनी ते पहिल्याच धडकेत कब्ज केले.

जुवे बेट मराठ्यांनी ताब्यात घेताच विजरई हबकला. आता त्या बेटावरून एक खाडी पार केली की, जुन्या गोव्यातच मराठ्यांचा प्रवेश होणार होता! भयकातर झाल्या फिरंगी पाद्रयांनी, विजरईच्या तातडीच्या आज्ञेने सेंट झेवियरच्या चर्चमधील घंटा, धोका म्हणून रात्रीच्याच अखंड बदडायला सुरुवात केली!

बिचोलीहून आलेला अकबरही या हल्ल्यात राजांबरोबर होता. एकदा त्याने जंजिऱ्यावर खाडीच भरून काढू बघणारे राजे प्रत्यक्ष समोर पाहिले होते. आता गोव्याची खैर नाही, हे तो मनोमन जाणून होता.

जुवे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी विजरई चारशे सैनिकांसह भल्या पहाटेच, ते परत घेण्यासाठी खाडी पार करून निकरानं चालून आला. टेकडीवरचे राजे, त्याला टेकडी चढू देण्यासाठी प्रथम गुमान राहिले. तो माऱ्याच्या टप्प्यात येताच टेकडीवरून दगडी गुंड बरसवत राजे सैन्यासह टेकडी उतरू लागले.

“पळा पळा!” चालून आलेले फिरंगी मांडाची घोडी, नीट टेकडी उतरेनात म्हणून ती टाकूनच पळू लागले. त्यांना कळेना मावळ्यांचं भिर्र केवढं आहे?

यातच बगलेने आलेली तीनशे स्वारांची मावळी कुमक राजांच्या सेनेला मिळाली. जुवे बेटाच्या लगतच्या टेकड्यांवरून गोव्यातले फिरंगी विचित्र नजारा बघू लागले. उतरंडीवरून तेगी पेलत धावून येणारे मावळे आणि विजरईसह जीव घेऊन पळणारे फिरंगी! चार मावळ्यांनी विजरईचा घोडा घेरलेला बघताच काळजे चरकली फिरंग्यांची. दोम रोद्रिगो घोडा फेकत विजरईच्या मदतीला आला म्हणूनच जीवे वाचला तो! तरीही तलवारीचा एक निसटता वार बगलेला बसून घायाळ झालाच तो.

रोद्वरिगो केवढ्यानेतरी ओरडला – “खाडी पकडा. पळा.”

भेदरलेला, रक्तबंबाळ विजरई खाडीच्या रोखाने जीव तोडून जनावर फेकू लागला. त्याच्यावरच नजर खिळवून समोरच्या फिरंगी धारकऱ्यांशी लढणाऱ्या राजांनी आपला ‘चंद्रावत’ कौशल्याने बाहेर काढला. विजरईच्याच पाठलागावर फेकला.

टेकडीवरच्या बघ्यांना कधी नव्हे, असा नजारा बघणे भाग पडत होते. पुढे घायाळ, जीव बचावण्यासाठी दौडणारा पार भेदरलेला विजरई कोंद-द-आल्वोर आणि त्याला गाठण्यासाठी तलवार पेलून धावणारा सैतान ‘संबा!’ राजे एकलेच विजरईच्या मागे धावताहेत, हे पाहून चलाख खंडोजींनीही आपला घोडा त्यांच्या मागे दौडता काढला.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८६.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment