महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,834

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८७

By Discover Maharashtra Views: 2486 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८७ –

गर्जत्या, फेसाळत्या, भरतीच्या खाडीतच भेदरलेल्या विजरईने घोडा घातला. पुरा गर्भगळीत झालेला विजरई प्राणभयाने सपासप खारट पाणी तोडत मध्ये उभी असलेली होडी गाठण्यासाठी जिवाचे रान करू लागला. होडीही त्याच्या रोखाने सरकू लागली.

चंद्रावतासह खाडीकाठाकडे दौडणारे राजे चुटपुटत ओरडले – “सोडू नको त्यास! उभी गावे जाळतो-बाटवतो -”

आणि पाठलागावरच्या बेभान, संतप्त राजांनी मांडाखालचा चंद्रावतच, अनावर चुटपुटीने दमदार टाच भरत थेट खाडीतच घुसविला!! खारट पाण्याचे चौफेर फव्वारेच फव्वारे उडाले. दहा हात आत घुसलेला चंद्रावत खाडीच्या, भरतीच्या ओढीला हां-हां म्हणता वाहतीला लागला. विजरईने होडी गाठलेली बघून आणि त्याला मारायला धावून येणारा “संबा’च घोड्यासह वाहतीला लागलेला बघून टेकडीवरचे बघे जल्लोषाने टाळ्या पिटू लागले.

राजे चंद्रावताच्या रिकिबीतले पाय आता सोडवू बघत होते. ते सुटले. एका हाताने वाहतीचा चंद्रावत आवरत दुसऱ्या हाताच्या बळाने तरंगते राजे चंद्रावतासह वाहतीला लागले. टेकड्यावर आता तर टाळ्या-आरोळ्यांचा पाऊसच पाऊस पडू लागला.

एकच क्षण – पण उभं आयुष्य सरकवून गेला तो राजांच्या डोळ्यांसमोर. मराठी दौलतच खारट पाण्यावर वाहतीला लागली. आणि टेकडीवरच्या बघ्यांची दातखीळच बसली. त्यांना घोड्यावरूनच एक माणूस जिवाच्या आकांताने खाडीच्या पाण्यात झेपावताना दिसला. सपासप हात मारत त्याने ‘संबा’ला, पाते लवायच्या आत गाठलेही. आपल्या हातांची जोड देत- देत तो वाहणाऱ्या संबाला खाडीकाठाकडे आणू लागला. कायदे राजांच्या हातून सुटताच चंद्रावतही अंगच्या बळावर पोहत काठाकडे निघाला.

घोड्यावरून पाण्यात झेप घेणारा तो पाणीदार वीर होता, खंडोजी बल्लाळ! बडोजीव अंगभर भिजले राजे-चिटणीस सुखरूप खाडीकाठाला आले. राजांनी बंडोजींकडे डोळाभर बघत त्यांना भावभिजली मिठीच भरली. आता राजे हंबीररावांची जोड करायला सालसेत, बारदेश प्रांतावर उतरले. हा तोच प्रांत होता, जिथे फिरंग्यांनी धार्मिक जुलमाचा हैदोस घातला होता. ज्या प्रांतात गरीब कोळ्यांच्या तरण्याताठ्या पोरी जबरीने बाटवून दिवसा त्यांचा धर्मप्रसारासाठी आणि रात्री त्यांच्या शरीरांचा उपभोगासाठी फिरंगी वापर करीत होते, अशा भिक्षुणींचे तीन मठ मावळी सैनिकांनी फोडले. सर्वांत मोठा मठ होता राचोलीचा. तो फुटताच, दावी तोडलेल्या सफेद गाई चौखूर उधळाव्यात तशा पांढरे झगेवाल्या कोळी-भिक्षुणी मानेवरचे जोखड उतरताच मुक्तपणे वाट फुटेल तिकडे पळू लागल्या. त्यांना मनमोकळे पळताना बघून घोड्यावर स्वार झालेले राजे समाधानी, भरल्या नजरेने सरलष्करांकडे बघत म्हणाले, “मामा, हे बघायला आमच्या थोरल्या आऊच पाहिजे होत्या आज.”

त्यांच्या मनात मात्र एका कठोर सत्याची टिटवी केकाटत गेली, “आमच्या राणूअक्का अशा मुक्त करण्याचं भाग्य लाभतं या हातांस तर!’

बारदेशच्या आभाळाने कधीच टिपले नव्हते, असे एक दृश्य सामोरे आले राजांच्या. सोलापूर-पंढरपूर भागात पाच-तास बैल एकाच दावणीला जखडून गावकीची समाईक इरजिक घालतात तद्वत सात फिरंगी पाद्री एकाच दावणीला जखडून टाकलेली एक मावळी तुकडी पेश झाली.

“काय करावं होंचं धनी? द्यावं का मासळीमारीच्या जाळ्यावानी फेकून दर्यात?” तुकडीचा म्होरक्‍या म्हणाला.

सगळ्या पाद्रयांच्या गर्दनी, देठ मोडल्यागत छातीवर पडल्या होत्या. राजे बारकाव्याने त्यांना निरखू लागले. “समर्थ राहू द्याच – दिवाकर गोसाव्यांसारखाही का नाही दिसत यांपैकी एकही जण? समर्थांच्या पायठशांवर धर्म वाट शोधीत चालतो असं वाटायचं! यांच्या? हे धर्माचीच पायवाट करून ती तुडवितात. दुसऱ्यांचे हक्क पायदळी कुचलतो तो कसला धर्म? एवढे कब्ज झालेत, तरी का नाही मनाला वाटत यांना बाटवावं? बाटवणं म्हणजे तरी काय? बाटतात ती शरीरं – मनं कुणाला आणि कशी येणार बाटवता?”

“हुकूम व्हावा धनी.” अनावर उताविळीने म्होरक्‍या म्हणाला. “बैलच आहेत हे; धर्माच्या घाण्यास जुंपलेले. जुलमाचे तेल गाळणारे. यांच्याही पाठीवर कोरडे ओढा आणि धिंड काढा यांची!” संतप्त राजे कडाडले. तिकडे पणजीत जुन्या देवळात, भेदरलेले फिरंगी एकजाग झाले होते. खांद्या-कपाळाशी हात नेत आकाशीच्या बापाची “करुणा’ भाकत होते. शवपेटीचे झाकण खोलून आज पहिल्याने विजरई कोंद-द-आल्वोर झेवियरच्या शवाच्या हातातील सुवर्णी धर्मदंड आपल्या हातात घेऊन वारंवार तो आभाळरोखाने उठवीत पुटपुटत होता – “राख, गोव्याची लाज राख. हा “संबा’ कसाही जाऊ दे. पण परत जाऊ दे. पाहिजे तर घेऊ दे गोवा त्याला – पण आमचे जीवन नको!”

फिरंगी जहाजे पोर्तुगालला कूच व्हायच्या सिद्धतेने गाठीचा सोन्या-नाण्याचा खजिना भरून पणजीच्या दर्यात सज्ज झाली होती. त्यात फिरंगी बायका-पोरे चढलीही होती. विजरईची ही झेवियरच्या शवाला आखरी करुणा होती. मग तो देऊळ सोडतानाच ती शवपेटीही घेऊन जाणार होता. देवळाच्या मोठाल्या घंटा ठणठणत होत्या.

दुर्भाट, जुवे, अंत्रुज, बारदेशच्या मावळी फौजा एकजाग होऊ लागल्या. राजे त्या पणजीत घुसविणार होते. त्यासाठी राजे, हंबीरराव, खंडोजी, धर्माजी दर्यात एकवट होणारी होडकी तळपत्या नजरेने बघू लागले. पण -‘पण'”ची माशी शिंकलीच! कवी कुलेशांनी धाडलेला रामोशी खबरगीर राजांना शोधत धापा टाकत आला. खबर ठेवत म्हणाला, “शाआलम लाखाच्या बळानं रामघाट उतरतोय! रांगच्या रांग लागलीया घाटात.”

“काय?” विस्फारल्या डोळ्यांनी राजे किंचाळलेच.

पुन्हा तोच प्रसंग आला – योजावे पण साधावे असे घडूच नये! शहाआलम आणि विजरई यांची कात्री आवळली जाण्यापूर्वी गोव्यात घुसविल्या सेनेसह फिरंगाणाबाहेर पडण्याशिवाय अन्य मार्गच नव्हता.

तहाला तयार झाल्या फिरंग्यांशी तह करण्याची जोखीम कुलेश आणि अकबर यांच्यावर सोपवून रायगडी आलेल्या राजांच्या मनी दोनच बाबी घोळत होत्या. कोकणात उतरलेला शहाआलम आणि मुंबईचा टोपीकर! फिरंग्यांनी मागे येसाजी गंभीर यांच्याकडे ओळखपत्रे नाहीत, अशी तक्रार केली होती. म्हणून गोवा सोडताना फिरंग्यांशी करायच्या सुलुखासाठी राजांनी कुलेशांना ‘कुलएख्तयार’ केलं. त्या सुलुखाची सारी बाबच त्यांच्यावर सोपविली. राजकारणाच्या सोयीसाठी कुलेशांची ही नामजादी होती. तीच कित्येकांना खटकली. “छंदोगामात्य-कुलएख्तयार’ – कनोजा भारी होत चाललाय, अशी खुसपूस उठू लागली.

आज्ञेप्रमाणं कुलेश-अकबर फोंडा, भीमगड येथे फिरंग्यांच्या वकिलाच्या भेटीगाठी घेऊन तहाची बोलणी करू लागले. फिरंग्यांशी चालल्या तहाबाबत अकबर एकदा रायगडावर राजांना भेटूनही गेला. टोपीकरांची मुंबईची बसकण आता स्वराज्याला घातक ठरणार, हे पारखलेल्या राजांनी त्यांच्यावरच लक्ष एकवट केले. टोपीकरांची कारंजा, एलेफंटा ही बेटे आणि माहीम, दंतोरा, सारगाव, कोळवा ही ठाणी मावळ्यांनी कब्ज केली. तेत्यसंच चालून जाण्यासाठी जावळी, कऱ्हाड, पुणे, पन्हाळा भागात नवी न्यसंचणी सुरू झाली.

अकबर राजांजवळ बापाविरुद्ध कुमक मागून थकला होता. म्हणत होता, “मला इराणला जाऊ द्या.” राजे त्याला चुचकारून फिरंग्यांशी चालत्या तहाची मध्यस्थी करण्याचे सुचवीत होते. मात्र मनात आता याला जवळ ठेवून घ्यावा की नाही? याचा विचार करीत होते.

शहाआलमला दक्षिण कोकणात पेरून औरंग आपण स्वत:च आदिलशाहीच्या विजापुरावर चालून जाणार अशी खबर होती. लाख फौजेनिशी कुडाळ, बांदा, डिचोली भागात फिरणाऱ्या शहाआलमची पाचावर धारण बसली होती. कारण दर्यामार्गे मिळणारी त्याची रसद मध्येच मराठ्यांनी लुटली होती. पाणोठे विखारी केल्याने त्यांच्या घोड्यांना पाणीसुद्धा मिळेनासे झाले होते. आबासाहेबांनी राखली तशी आदिलशाही राखणे भाग होते. राजांनी त्याच बेताने पेशवे निळोपंत आणि हंबीररावांना बोलावून घेतले.

“पेशवे, आदिलशाहीवर चालून जाण्याचा बेत दिसतोय औरंगचा. पाठबळ देऊन राखली, तर ती शाही खूप दिवस झुंजेल.” राजे स्वत:शीच बोलल्यासारखे बोलले.

“जी. आम्हीच जाऊ होतर आदिलशाहीच्या कुमकेला.” हंबीररावांना राजांचा विचार पटला.

“तुम्हासच पाठवू मामासाहेब, पण आत्ता नाही. योग्य समयास. निळोपंत, तुम्ही नव्या संचणीचा अठरा हजार लढाऊ विजापूरमार्गे कूच होईल ते करा.” राजे औरंगच्या चालीच्या मागचा विचार करू लागले. एवढ्यात दक्षिण कोकणातून घोडा फेकत आलेला खबरगीर विश्वासच राजांच्या भेटीला आला. त्याने आणलेली खबर राजांचा तणाव सैल करणारी होती.

“शाअलम मार खात-खात, हैराण होऊन परतीच्या वाटेवर घाटात पोहोचलाय धनी. लाखाच्या सेनेतलं अवघं चाळीस, पंचेचाळीस हजार उरल्यात त्येच्याकडं. त्येच्यातबी बळ न्हाई हत्यार पेलायचं. बापाला त्यानं नगरकडं सांडणीस्वार धाडलाय – “मुझकू घोडे और खेचर भेज देव. नहीं तो मर जाऊंगा मय वहाँ पहाडमें।”

ते शांतपणे ऐकून घेत राजे हंबीररावांना म्हणाले, “आता तुम्ही आम्ही संगतीच उतरू मुंबईजवळच्या पालतट्ट्यावर सरलष्कर.”

राजांचे बोलणे तुटकच राहावे, अशी बातमी निळोपंतांनी राजांच्या कानी घातली. “कऱ्हाड प्रांतात परतलेले येसाजी कंक तब्येतीने सुधारताहेत… पण कृष्णाजी जखमा फुटून गेले, स्वामी!”

कृष्णाजी! राजांचे मन खिन्न झाले. काही क्षण विचारातच गेले. कृष्णाजीला बायको आणि तीन वर्षांचा मुलगा आहे, या जाणिवेने राजे पेशव्यांना म्हणाले,

“कृष्णाजीस सालिना हजार आणि येसाजींना हजार होन मिळतील अशी व्यवस्था करा, पेशवे. आणि खंडोजींना हजार होन आणि पालखीचा मरातब द्या.”

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८७.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment