धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८८ –
“संबाःला कसलीही मदत न करण्याबद्दल औरंगने आदिलशाहाला लिहिले. मराठी-मोगल-फिरंगी यांच्या फौजी धावणीमुळे दक्षिण कोकणात तर दुष्काळ पडला. मुंबईच्या केजविनने आपल्या हलाखीचे पत्र लंडनचा राजा चार्ल्स याला लिहिले. त्यात त्याने म्हटले – “आपल्या लगत असलेल्या “’शंभूजी’ या ताकदवान राजाने पोर्तुगीजांचा चाळीस मैलांचा पट्टा बेचिराख केला आहे. तीस हजारांवर त्याच्या सेना मुंबईचा रोख धरून भोवती पसरल्या आहेत. आपल्याजवळ फक्त दीड- दोनशे आपले आणि शे काळे सैनिक आहेत. शंभूजीने आपल्याकडे साठ तोफा, चारशे पिंपे आताषीसामान, कथील, लहान-मोठी जहाजे-कापड यांची मागणी केली आहे. मागण्या पुऱ्या झाल्या नाहीत, तर मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. काय करावे? पोर्तुगीजांचा तपशील ध्यानी ठेवून तह करावा असे वाटते!”
पालतट्रा धरून कारंजा-एलेफंटा असा फेर टाकून, मुंबई आणि वसई भागातील टोपीकर आणि फिरंगी यांच्याशी एकाच वेळी दुहेरी चालून जाण्याच्या इराद्यात असलेले राजे रायगडी परतले.
सिंहासनसदरेवर त्यांना रात्रीची वर्दी आली – “पणजीहून आलेले फिरंगी हेजीब घेऊन कुलएख्त्यार कुलेश भेटीस येताहेत.” पाटगावला मौनीबाबांच्या दर्शनासाठी गेलेले कुलेश तिथे भेटलेल्या फिरंगी वकील मंडळासह तसेच रायगडी आले होते. त्यांच्यासंगती फ्रायर, कॉन्सिको, थेमुडो, पाद्री ऑगस्टीन, अल्बुकेर्की अशी मंडळी होती.
वकीलमंडळाने राजांना नजराणा दिला! मोठ्या धास्ती अदबीने ते पेश आले होते. अल्बुकेर्की, कुलेश व अकबर यांच्याशी झाल्या बोलण्याचा तपशील दुभाष्या राम नाईक याच्या मध्यस्थीने राजांना देत होता. मनातून राजांना फिरंग्यांशी तहच करायचा नव्हता, काही ना काही कारण पुढे करीत राजांनी फिरंगी व वकीलमंडळाला तीन रात्री रखडविले.
तिसऱ्या रात्री वैतागलेल्या अल्बुकेरकीने तहाबाबतचा निर्धार व्यक्त केला. “आमचा दरबार अंजदीव बेट सोडणार नाही! राजे मागतात ती बक्षिसी मिळणार नाही!”
“मतलब?” राजे ते ऐकताना बैठकी आसनावरून उठलेच. त्यांची चर्याच काटेफड्यागत लालबुंद झाली. “कुलेश, या फिरंग्यास सांगा – आम्ही सांगतो त्या तहाच्या अटी मान्य नसतील, तर वरफिरंगणातून आमचे पेशवे हटणार नाहीत. भीमगडाच्या कैद्यांना सोडले जाणार नाही. बारदेशात कब्ज केल्या तोफा परत केल्या जाणार नाहीत! जरूर तर आम्ही पुन्हा चालून येऊ!”
अल्बुकेकी ते रूप पाहूनच चळाचळा कापायला लागला. वकीलमंडळातील एकट्या फ्रायरच्या मनात मात्र राजांचे ते स्वरूप बिंबून राहिले. राजे बिरवाडीला आले. इथे उतरण्यासाठी आबासाहेबांनीच खासेवाडा बांधला होता. त्याच्या सदरेवर प्रल्हादपंत, इंग्रज वकील गॅरी यासह भेटीस आले. मुंबईच्या गव्हर्नर केजविनने लिहिलेल्या पत्राला लंडन दरबारचे पत्र आले होते. म्हणून तर केजविननं आपला वकील टाकोटाक धाडला होता.
“टोपीकर कर्नाटकात वखारीच्या सवलती मागताहेत. फिरंग्यांचे समजून आमचे पकडलेले ‘प्रेसिडेंट’ नावाचे जहाज परत करावे म्हणतात.” गॅरीला पुढे घालीत प्रल्हादपंत म्हणाले.
राजांनी इंग्रजी वकिलाला अंगभर निरखला. ‘हे टोपीकर फिरंगी, डच, फ्रांसिस कोण कोठच्या देशीचे. दर्यापट्टया धरून मिळेल त्या दरबारचे पाय चाटत जागजागी वखारी घालतात. आज घालतात – उद्या हातपाय पसरतील. औरंग खासाच उतरला नसता फौजबंदीनं दख्खनेत, तर आम्हीच घेतला असता यांचा समाचार. पण या बिकट समयास चौफेर गनीम ठेवावा तो किती?’ राजमनात विचार आले.
शांतपणे राजांनी प्रल्हादपंतांमार्फत गॅरीशी बोलणी केली. थॉमस विल्किन्स आणि दुभाषी राम शेणवी गॅरीच्या मदतीला असल्याने चांगली तीत दिवस ही बोलणी बिरवाडीत चालली. तहाच्या अटीचा मसुदा प्रल्हादपंतांना सिद्ध करायला सांगून राजे रायगडाकडे गेले, पण प्रल्हादपंत टोपीकरांना मसुदा देऊन नेहमीप्रमाणे गड चढले नाहीत. त्यांची आणि मानाजी मोरे, गंगाधरपंत, राहुजी सोमनाथ, वासुदेवपंत यांची कसलीतरी एकांती बैठक ठरली होती, तिकडे ते निघून गेले, या वेळी शहाआलम आणि औरंगजेब या बेटाबापाची अहमदनगरमध्ये भेट होत होती. बापाने पाठविलेल्या घोड्यांच्या आणि खेचरांच्या मदतीने शहाआलम कसातरी घाट चढून आला होता. एक लाखांपैकी आता फक्त चाळीस हजार सैनिक शिल्लक होते त्यांच्या संगती!
गर्दन टाकून नगरच्या किल्ल्यात पेश झालेल्या शहजाद्याला औरंगजेब केवढ्यातरी नफरतीने म्हणाला, “वो बागी अकबर कमसे कम अकेला गया। तुम हशम लेकर गये और उन्हे गवाँंकर आये। जूरत कैसी हुई काला मुह लेकर आने की? तुम भी क्यों नहीं गये उसके साथ?”
बिचारा शहाआलम काय जाब देणार होता? शरमिंदा होऊन तो बापासमोरून निघून गेला.
संभाच्या जनान्यातल्या बायका खुल्दाबादेत कोठीत आहेत, याचा फायदा घेऊन मावळे जालन्यापर्यंत छापे घालतात याने चडफडणाऱ्या औरंगजेबाने वजीर असदखानाला बोलावून फर्मावले, “संबाके जनानेकी औरते भेज दो बहादूरगड। पहरा जारी रक्खो साथ”
बादशाहाच्या हुकमाने हुकमाने राणूआक्का बहादूरगडात हलविण्यात आल्या. पेडगावच्या दाराने त्याबद्दल लेखी पोचपावती बादशाहाला पाठविली.
मृग तोंडावर आला. रामसेज, कल्याण, भिवंडी, बागलाण, पुणे अशा प्रांतातून उन्हात घामाने निथळलेले बहिर्जी, विश्वास, महादेव असे खबरीखात्याचे खासे पाठोपाठ रायगड चढू लागले. चारीबाजूंनी रायगडावर खबरा थडकू लागल्या. “औरंगजेब रामसेज, तळ कोकणातील काही किल्ले इथं मोजक्याच शिबंद्या ठेवून फौजा मागं घेतो आहे. त्याचे जागोजागचे सरदार औरंगाबाद जवळ करताहेत!”
औरंग आणि माघार? असे कधीच घडले नव्हते, त्याच्या हयातीत. अगदी वयाच्या चौदाव्या वर्षापासून तो स्वारी शिकारीत होता. पण ‘माघार’ अशी तो पहिल्यानेच घेत होता. गेली तीन वर्षे मराठी मुलूख पाडण्यासाठी त्याने जंग-जंग पछाडले होते. हाती काहीसुद्धा आले नव्हते त्याच्या. फक्त लढाया, घेर, कत्तली यांतच पुरी तीन वर्षे जाया झाली होती त्याची. जाता-जाताही त्याने रायगडावरच चालून जायचा गाजीउद्दिनखानाला हुकूम दिला होता.
“हंबीरराव, रूपाजी, कुलेश, रामचंद्रपंत सगळ्या खाशांस चढ्या घोड्यांनी रायगड जवळ करण्यास लिहा. फर्मानं आल्या खबरगिरांकडूनच धाडा चौफेर.”
निळोपंतांना, सरसर फेर घेत राजे आज्ञेमागून आज्ञा देत होते. ते आपल्याच विचारात गढले होते. ‘का घेत असावा औरंग फौजा मागे? काय हेत आहे त्याचा यात? पावसाळा तोंडावर ठेवून या चाली आहेत त्याच्या की पावसाळा उलगताच जोरावारीनं पुन्हा धरणार तो मोहरा?
आता तर राजांना उसंतच नव्हती. निळोपंत, खंडोजी एकामागून एक थैलीस्वार गड उतरवू लागले. जागोजाग पांगलेले मंत्री सुभेदार राजथैली मिळताच रायगडाच्या वाटेला लागले. इंग्रज वखारीचा मुंबईहून सारखा तगादा लागला होता. “सुलुखाचे कागद शिक्कामोर्तब करून पक्के पाठवून द्या.” त्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. राजांनी ती पुरी बाबच प्रल्हादपंतांवर सोपविली.
हंबीरराव, रूपाजी, कुलेश, संताजी – गुजराथेतून परतलेले धनाजी, रामचंद्रपंत, दौलतखान नेमक्या खाशांची रायगडाच्या सिंहासनसदरेला उन्हतापीच्या गेन दिवसांत मसलती बैठक बसली. पेशवे निळोपंत मसलत खोलत म्हणाले, “सांप्रत गनीम पावसाला सुरुवात होण्यापूर्वी मुलूखभरची फौज मागे घेतो आहे. खबरा आहेत, तो आदिलशाहीवर चालून जाणार. त्यावर भरोसा ठेवून गाफील राहून नाही निभायचे. खाशांना पाचारण केलं आहे, ते या मसलतीसाठीच.”
“शहाआलम नगरहून निघून सोलापूरमार्गे चालला आहे. बादशाहाचा आदिलशाहीवरच रोख दिसतोय.” रामचंद्रपंतांनी सुचविले. “मध्येच गाठून तोडला पाहिजे त्यास.” राजे निर्धाराने बोलले.
“विजापुरावर ग्येला त्यो तरी पेशवं म्हंत्यात तसं गाफील राहून न्हाई भागायचं.” हंबीरराव राजांच्या मनातलेच बोलले.
“सरलष्करांचं सही आहे. त्यासाठीच मसलतीत घेतलंय साऱ्यांना. पाऊस आहे म्हणून सुमार राहू नका कुणी. मिळेल ती संचणी पावसात खडी करून धाडावी लागेल आदिलशाहीच्या मदतीस.”
कितीतरी वेळ मग खोलवरचे बोलणे झाले. जमल्या खाशांना बारीक-सारीक सूचना देण्यात आल्या. सगळ्यांना निरोपाचे विडे देण्यात आले. अशा वेळी नेहमी बोलणारे प्रल्हादपंत गुमान राहिलेले कुणालाच नाही कळले. मसलत संपताच ते, राहुजी, माताजी मोरे प्रल्हादपंतांच्या मंत्रिबाडीतील वाड्यात एकमेकांना भेटले. बराच वेळ दबक्या आवाजात काहीतरी बोलत राहिले.
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १८८.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.