धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९१ –
मत्रिबाडीतील निळोपंतांच्या वाड्यावरचा खासगी कारभारी भेटीला आल्याची राजांना वर्दी आली. कारभारी यावा असे सहसा कधी घडत नव्हते. काय झाले असावे, या शंकेनेच राजांनी पेशव्यांच्या कारभाऱ्याला पेश घेतले. तो भीत – भीत म्हणाला, “धन्यांनी आपली भेट मागितलेय. ते येऊ शकत नाहीत इथवर महाराज.”
“का? काय झालं पेशव्यांस?”
“पोटशुळानं तळमळताहेत ते एकसारखे अंथरुणावर.” कारभारी उत्तरला.
“काय?” महाराजांच्या कानात जसा शब्द – बाणच घुसला होता.
राया, अंता, खंडोजी, पुरुषा, जोत्याजी असा माणूसमेळ घेत, ते निळोपंतांची तब्येत बघायला मंत्रिबाडीकडे निघाले. महाराज येताहेत या वार्तने बाडी खडबडून उठली. इथे एका हारीत सुरनीस, डबीर, न्यायाधीश, अमात्य यांचे एकालगत एक वाडे होते. प्रत्येकावर हत्यारी पहारेकरी होते. निळोपंतांना बघण्यासाठी प्रवेश करायला म्हणून राजांनी वाड्याच्या पायरीवर पाय ठेवला मात्र; राजांच्या मनी, आठवणीच आठवणी उतरल्या.
“हा तोच वाडा होता, जिथे मोरोपंतांनी आपला देह ठेवला होता. अखेरच्या क्षणी त्यांनी आपल्या चिरंजीवांच्या – निळोपंतांच्या हाती पेशवाईच्या मुद्रा आणि एक भिकबाळीचा करंड ठेवला होता. मोरोपंत! सावलीसारखे आबासाहेबांच्या पाठीशी असणारे, कसे निघाले आम्हास कैद करायला फौजबंद होऊन पन्हाळ्याकडे? बिरवाडीला रघुनाथपंत मजालसीत बोलले तेव्हा मोरोपंत हवे होते. तेच देऊ शकले असते हणमंत्यांना पटेलसा जाब. त्यांच्या या वाड्यावर – त्यांच्यावर हत्यारी पहारे बसवावे लागले आम्हास. त्यांचे पद आम्ही त्यांच्यामागे निळोपंतांना दिले. त्यांच्या तोंडी कधी खंत नाही आली आपल्या वडिलांबद्दल. कसले क्रणानुबंध हे?’
समोर आलेल्या निळोपंतांच्या बंधूंसमवेत – गंगाधर मोरेश्वरांच्या बरोबर राजे पेशव्यांच्या वाड्यात प्रवेशले. तळमळत्या स्थितीतही निळोपंत रिवाजासाठी पलंगावरून उठू लागले. पुढे होत राजांनी त्यांना लेटते केले. शेजारी बसून तब्येतीची वाजपूस करू लागले. असह्यवेदनांनी पेशवे, डोळे घट्ट मिटून घेत तळमळतच म्हणत होते – “ही उदराची व्यथा नको त्या समयास आली स्वामी.”
“पंत, तुम्ही बरे वाटेतो आराम घ्या. तुमच्या पेशवाई दफ्तराचे काम बघतील तोवर गंगाधरपंत.” राजांनी पेशव्यांच्या मनावरचे दडपण सुमार केले.
मंत्रिबाडीतून आलेल्या राजांना चांगोजी काटकर एका असामीसह सामोरा झाला. ती असामी होती कारवारची. संताजी पावला नावाची.
“महाराजांच्या फौजेचं पाठबळ घेत कारवारात राम दळव्याची बंडाळी मोडून काढली आम्ही धनी.” रिवाज देत संताजी म्हणाला. महाराजांच्या चर्येवर, ते ऐकताना समाधानाची लकेर पसरली.
ऐन उन्हतापीचे दिवस सुरू झाले. अशा उन्हाळ्यातच औरंगने विजापूरला चहूबाजूंनी घेर टाकला. विजापूर कोटाला भक्कम खंदक होता. त्याचा आधार घेत आदिलशाही फौज कोट निकराने लढवू लागली. कुतुबशाहीने विजापूरच्या मदतीला तीस हजारांची सेना पाठविली. आता दक्षिणेच्या तिन्ही शाह्या आणि दिल्लीची मोगलाई यांचे लक्ष एकवटले ते विजापुरावर. याच विजापुरात शहाजीराजांना काढण्या घालून फिरवण्यात आले होते. इथेच बड्या बेगमेच्या दरबारात ‘सेवा को जिंदा या मुर्दा पेश करूंगा’ अशी कसम खात खान अफजलने असर महालात विडा उचलला होता. आणि तीच आदिलशाही राखायला हंबीरराव घोडदळासह विजापुरा भोवती घिरट्या घालत होते. मेलगिरी पंडित मध्यस्थी करीत होते.
हरसूलच्या गंगाधर नागनाथ नावाच्या, दाढी कोरलेल्या एका असामीला घेऊन कुलेश खासेवाड्याच्या सदरेला राजांना पेश आले. सोबत आणल्या असामीची ओळख करून देत कुलेश म्हणाले, “नेताजीराव को बडे स्वामीने पावन कर दिया है। इस बेचारेको भी दिया जाय!”
गंगाधर नागनाथ हरसूलचा – मूळ मोगली चाकर – ब्राह्मण, त्याला जबरीने मुसलमान करण्यात आले होते. आपले शुद्धीकरण करून धर्मात घ्यावे, म्हणून तो एवढ्या लांबवर गड चढून आला होता.
“महाराज, दया करा. माणसात घ्या मला.” म्हणून स्फुंदत तो राजांच्या समोर धाडकन कोसळलाच. राजांनी पुढे येत, वाकून त्याला उठते केले. थोपटून त्याला शांतवत कुलेशांना विचारले, “काय करता येईल यांच्या शुद्धीकरणासाठी छंदोगामात्य?”
“जी. इसको प्रायश्चित्त लेना पडेगा। पश्चात विधिनुसार धर्मप्रवेश करना पडेगा!”
“प्रायश्चित्त कोण प्रकाराने केले पाहिजे, यास समजावून सांगा. बाब धर्मखात्याची असल्याने मोरेश्वर पंडितांच्या देखरेखीखाली यास शुद्ध करून घ्या.” राजांनी गंगाधरचे पडेल खांदे दिलासा देत थोपटले. त्यांचा मनोमन कसलातरी विचार चालला होता.
“का? आमच्या रयतेवरच शुद्ध करवून घेण्याची नौबत का यावी? नेताजी तर सरनौबत होते. हा मामुली इथवर आला म्हणून लागेल तडीस. जे येणार नाहीत, येऊ शकत – धजत नाहीत त्यांचे काय? आम्हाला का वाटत नाहीत, हाती कब्ज झालेले मोगल, फिरंगी, पाद्री, टोपीकर, हबशी यांना बाटवावे असे?’ बराच वेळ महाराज त्या विचारात गुंतून राहिले. कुलेश आणि गंगाधर गेल्याचेही त्यांच्या ध्यानी आले नाही.
पेशवाईची नव्याने सूत्रे हाती घेतलेल्या गंगाधर मोरेश्वरांना राजांनी बोलावून घेतले. चेऊल भागातील रयतेला द्यायच्या सवलती त्यांना सांगितल्या. हबश्यांचा पुरा बंदोबस्त राहावा, या विचाराने ते गंगाधर मोरेश्वरांना म्हणाले, “जंजिरा कोटाच्या तर्फेनं नव्या नामजादीची पत्रं पाठवा पेशवे. खंदेरीवर माणकोजी, सागरगडावर उदाजी पडवळ आणि सुभानजी खराडे, कुलाबा कोटावर भिवजी गुजर ही वकुबाची माणसं नामजाद करा. त्यांना तातडीनं नेमल्या जागा जवळ करायची समज द्या.”
महाराज सांगत होते, ते ध्यानपूर्वक ऐकणाऱ्या गंगाधर मोरेश्वरांना काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे, हे राजांनी ताडले. मध्येच थांबत त्यांनी विचारले, “आमच्या निळोपंतांची तब्येत बरी की कशी?”
“जी. कालपासून ठीक आहेत ते. थोडी विश्रांती घ्यावी लागेल. आम्हाला म्हणायचं होतं…” बाब वर्माची असल्याने गंगाधर अडखळले.
“बोला. काय आहे?” राजांना ते कशाबद्दल सांगणार याचा काही अंदाज आला नाही.
“कर्नाटककडची – तंजावरची खबर आहे की -”
“काय? बोला.” राजांच्या कपाळीचे शिवगंध आक्रसले.
“एकोजी महाराजांचे चिरंजीव अर्जुनजी तंजावर सोडून मोगलास मिळाले!”
“जगदंब’ म्हणत, इंगळी डसल्यागत राजे बैठकीवरून उठले. मन बधिर झाले त्यांचे.
विजापूर नजरेच्या टप्प्यात राहावे, यासाठी आता औरंगजेबाने आपला प्रचंड तळ नगरहून सोलापूरला हलविला. कुतुबशहाच्या, दिलजमाईच्या आलेल्या खलित्यात त्याने दोन वर्मी अटी घातल्या. त्यातली एक होती, पूर्वी पेशकश म्हणून वीस लाख पगोडे देणाऱ्या कुतुबशहाने आता एक कोट वीस लाखांची पेशकश द्यावी! दुसरी अट होती, आकण्णा आणि मादण्णा या हिंदू अधिकाऱ्यांना दरबारातून ताबडतोब बडतर्फ करावे! या अटी नव्हत्याच. उद्या आपल्या फौजा गोवळकोंड्यावर उतरणार याची ती दिलेली सरळ समज होती.
औरंगच्या मराठी मुलखातून फौज मागे घेण्याच्या एकाच खेळीवर आता शतरंजचा पटच पालटला. राजा बाल उमरीचा आणि सरदारांत बेदिली याचा फायदा घेण्यासाठी औरंगने कमकुवत आदिलशाहीच पटाखाली धरली. तिला राखण्यासाठी कुतुब आणि मराठशाही धडपडू लागली. कोकणातील वतनदारांची बंडाळी मोडण्यात सचिव रामचंद्रपंतांची ताकद खर्ची पडत होती. त्यांना रायगडी यायलाही फावत नव्हते. त्यासाठीच शंकराजी नारायण यांना याद फर्मावून राजांनी सचिवपदाची जोखीम त्यांच्यावर सोपविली.
जशी शुद्धीकरणाची बाब काट्यासारखी राजांच्या मनी सलत होती, तशीच आणखी एक बाब होती. मुलखातल्या बागलाणपासून कारवारपर्यंतच्या वरघाटातील भिल्ल, कोळी, धनगर अशा अश्राप, असहाय लोकांना गुलाम म्हणून खरेदी करून त्यांचे तांडेच्या तांडे सिद्दी व टोपीकर बोटीवर लादून दूरदेशी पाठवीत होते. माणसांना जसे काही वालीच नव्हते कुणी. याला पायबंद घालणे आवश्यक होते. नव्याने नामजाद शंकराजी नारायण यांना त्यासाठी राजांनी याद घेतले.
“शंकराजी, वरघाटाची रयत गुलाम म्हणून हबशी व टोपीकर खरेदी करून त्यांचा दूरदेशी विक्रा मांडतात. कशी जातात ही माणसं, काही माग?” शंकराजींच्या ध्यानीमनी नसलेली बाब पुढे आली.
“जी. जकात भरतात त्यांची दरडोई तीन पगोडे खजिन्यात. गरीब, अन्नाला मोताद माणसं एवढ्यावरही गुलाम म्हणून जायला तयार होतात!”
“तीन पागोड्यांस एक माणूस! शंकराजी, अशी रानावनातली जी माणसं आहेत, त्यांच मन वळवून संचणी करायला कळवा घाटाघाटातील सुभेदारांना. यातूनही शिपाईगिरीपरीस गुलामगिरीच चखोट मानून जे दूरदेशी जायला राजीच असतील त्यांच्यासाठी खरेदीदारावर दरडोई बारा पगोडे जकात जारी करा!” राजे कडव्या निकालाने बोलले. हुकुमाची तातडीने तामिली करण्यासाठी शंकराजी निघून गेले.
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९१.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.