धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९२ –
“गुलामी! केवढा कलंक हा माणुसकीवरचा! जनावर, लाकूडफाट्यासारखा माणसाचा भाव. घाण्याच्या बैलासारखे लादलेले जिणे. कुठून आले हे हबशी, टोपीकर? बेधडक इथली माणसे खरेदी करतात. कुणाकडे जावे त्या गुलामांनी आसऱ्याला? आबासाहेबांनी जहाजावर चढविलेल्या बाळाजींना त्यांच्या मातेसह, दिले पैसे भरून उतरून घेतले. गुलामीतून मोकळे केले. गेले असते बाळाजी कुठल्यातरी देशी गुलाम म्हणून तर? काय झाली असती त्यांची गत? बाळाजींना आबासाहेबांनी जहाजावरून उतरून घेतले. आम्हाला त्यांना कटावाच्या आरोपापोटी हत्तीच्या पायी द्यावे लागले! मांडवीच्या खाडीत वाहतीला लागलेला आमचा घोडा त्यांच्या खंडोजींनी बचावला! कसला तिढा हा हयातीचा? का उकलत नाही?’
आपल्याच विचारांत हरवलेले, सैरभैर महाराज महाली फेर घेत असताना जोत्याजी केसरकर बाळराजांच्यासह आला. त्याच्या भुजेवरून उतरताच बाळराजे दुडक्या चालीने येऊन राजांच्या पायांना मिठी भरत बिलगले. त्यांना मायेने वर घेत त्यांची पाठ थोपटीत राजे म्हणाले, “तुम्ही नाही कुणाचे गुलाम हे ठीक आहे.”
बाळराजांना ‘गुलाम’ या शब्दाचा अर्थच कळला नाही. ते गोंधळून आपल्या आबांकडे बघू लागले.
“बोलत नाही ते जोत्याजी?” बराच वेळ जोत्याजी गुमान राहिला, हे ध्यानी येऊन राजांनी सहज विचारले.
“हेरी काय नाय पर कानावर भल्या फाटेचंच आलंय याक.”
“काय?” बाळराजांच्या पाठीवरचा फिरता हात थांबवत राजांनी विचारले.
“म्हंत्यात भागानगरात औरंगजेबाच्या चिथावणीनं बहकलेल्या कुतुबशाही सरदारांनी आकण्णा आन् मादण्णा यांचा खून केला. भरचौकात भोकसलं त्येस्री!”
अंगावर वीज कोसळावी तसेच वाटले राजांना ते ऐकताना. याच आकण्णा आणि मादण्णा यांच्या मध्यस्थीने आबासाहेबांपासून दौलतीने गोवळकोंड्याशी सलोख्याचे संबंध राखले होते. भागानगरच्या भेटीत तर आकण्णांच्या घरी जाऊन आबासाहेबांनी “विश्वासू घर’ म्हणून भोजनही घेतले होते. आमची माणसे फोडून जसे आम्हाला औरंग हैराण करतो आहे, तसेच हे खून करवून कुतुबशाही खिळखिळीच केली आहे त्याने… “औरंग! काय हवस आहे या माणसाची?” महाराज स्वत:शीच पुटपुटले.
मृगाचे दिवस आले. आता पाणधार केव्हा धरेल याचा नेम नव्हता. आदिलशाहीवरचा औरंगच्या फौजांचा ताण वाढत होता. मेलगिरी पंडित, सर्जाखान आणि शिकंदरशहाला भेटून विजापूरहून परतले होते. त्यांनी सर्जाखानाचा तातडीच्या मदतीचा निरोप आणला होता. आता गाठीच्या आणि राजकारणात तरबेज कुलेशांना आदिलशाही आघाडीवर पाठविण्याशिवाय मार्ग नव्हता. समोर याद घेतल्या कुलेशांना राजे म्हणाले, “माणसं पुरविल्याशिवाय आदिलशाही तगत नाही छदोगामात्य.”
“सोचते हे हमही जायेंगे आदिलशाही कुमक के लिये)” कुलेशांनी, राजांनी विचारण्यापूर्वीच जोखीम पेलण्याची तयारी दाखविली.
“मनचे बोललात आमच्या कुलेश. आजच गड उतरा आणि पन्हाळगडाच्या रोखानं कूच व्हा! तिथलीही शिबंदी पाठीशी घेत आदिलशाहीत उतरा. शहजादा आझमच्या फौजा येतील आडव्या तुम्हाला मिरज प्रांतात.”
“जी. हम आजही गड छोडेंगे।” कुलेश आज्ञा घेऊन निघून गेले.
मिरज, सोलापूर, अकलूज, इंदापूर अशी उभी पट्टी धरून राजांनी आता हंबीरराव, कुलेश यांच्या फौजफळ्या आदिलशाहीच्या पाठीशी उभ्या केल्या. बाहेर गडमाथ्यावर पाऊस कोसळत होता. राजमनात विचारधारा थडथडत होत्या. याच वेळी लंडन दरबारचा खलिता घेऊन एक जहाज सुरत बंदराला लागले होते. त्या खलित्यात लंडनकरांनी स्पष्ट शब्दांत लिहिले होते – “राजा शंभूजी याच्या गोटात दाखल होऊन तुम्ही त्या युद्धसंमुख राजाशी दाट मैत्री संपादन करा. मग तुम्हाला मोगल किंवा पोर्तुगीज यांना भिण्याचे कारण नाही. मुंबईजवळ सिद्दी किंवा मोगल यांना फिरकू देऊ नका. त्या राजाशी झालेल्या तहाच्या पूर्ततेसाठी सोबत बंदुका आणि दारूगोळा पाठविला आहे. अधिक लागल्यास मद्रासच्या जलकोटातून घ्या.”
राजांच्या ताकदीचे जे मोल सात – दर्यापार, टोपीकर दरबारला कळले होते, ते या देशचे असून, आप्तेष्ट असून कैकांना कळले नव्हते! लंडन दरबारने राजांना ‘युद्धसंमुख वीर’ म्हटले होते.
निळोपंत आणि प्रल्हादपंत राजांच्या भेटीस आले. पोटशुळाची व्यथा सुमार होताच निळोपंत प्रल्हाद निराजींच्यासह वानापूर येथे इंग्रज वकील रिचर्ड स्टॅन्ले याच्याशी बोलणी करून आले होते. स्टॅन्लेशी झाल्या बोलण्याचा तपशील राजांना देत निळोपंत म्हणाले, “आपले सुभेदार टोपीकर व्यापाऱ्यांकडून कर घेतात, अशी तक्रार हा इंग्रज वकील करतोय महाराज.”
“जकातीपोटीचे आहेत ते कर पेशवे. नेहमीचीच आहे ही त्यांची तक्रार.”
“जी. आम्ही गोऱ्या वकिलास त्याची समज दिलेय. या भीतीनं ते जादा वखारी घालायला तयार नाहीत आणि खुल्या व्यापारावरचे कर द्यायला कुरकुरतात. पण वरून काहीतरी कानपिचकी आलेली दिसते. भाषा नरमाईची वाटली वकिलाची.”
“काय शेवट झाला तुमच्या बोलण्याचा पेशवे?”
“टोपीकरांनी आपला वकील मुंबईला ठेवून घेण्यास मान्यता दिली आहे. त्यांचाही एक वकील आपल्याकडे राहील.” पंतांनी प्रल्हाद निराजींच्याकडे बघत जाब दिला.
“आता न्यायाधीशांना टोपीकर दरबारात गुंतवून नाही भागायचं. कुणी दुसरी असामी पाठवा पेशवे मुंबईला. काय प्रल्हादपंत?” राजांनी न्यायाधीशांचा सल्ला विचारला.
“जशी आज्ञा. नबी माणसं तयार झाली पाहिजेत हेजिबीत.” प्रल्हादपंतांना आपले वकील म्हणून झालेले मागील वेळचे हाल राजांना पसंत पडले नसावेत की काय, अशी शंका आली.
“आम्ही गोऱ्यांच्या वकिलाकडे दोन बंदुकांची मागणी घातली. त्यानं ती मान्य केली आहे स्वामी.” पेशवे उजळ चर्येने म्हणाले. “बंदुका देतीलच ते निळोपंत. सिद्दी, मोगलांना ते पाठीशी घालतात त्याचं काय?” राजांनी मूळ धरले.
“हबश्यांना टोपीकरांनी हाकललंच आहे. हबशी आता आपल्या समुद्रपट्टीत फिरतो ते उंदेरीतून, असं इंग्रज वकिलाचं म्हणणं आहे. मोगली आरमारालाही त्यांनी सख्त ताकीद अलीकडे दिली आहे.”
बराच वेळ प्रल्हादपंत काही बोलत नाहीत, हे ध्यानी आल्याने राजांनी त्यांना विचारले, “न्यायाधीश, बोलत नाही ते? तब्येत?”
“जी. तसं काही नाही. बरे आहोत आम्ही.” त्यांच्या घशाला हे बोलताना कोरड पडली. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या फडफडल्या. दोघेही मुजरे देत निघून गेले.
विचित्रगडाचा हवालदार संताजी निंबाळकर याचा आलेला खलिता घेऊन खंडोजी बल्लाळ राजांच्या भेटीस आले. मामला कारीच्या सर्जेराव जेध्यांचा होता. कारीच्या जेधे घराण्याने दौलतीची, कान्होजी जेध्यांपासून सेवा केलेली होती. औरंग दक्षिणेत उतरला आणि जेध्यांच्या बुद्धीने पलट खाल्ली! भाऊबंदकीने मने पोखरली. सर्जेराव जेध्यांचा भाऊ शिवाजी जेधे मोगलांना मिळाला. त्याने सर्जेरावांची गुरेढोरे वळवून नेली. त्यांचा मुलूख तसनस केला. हा कथला वास्तविक स्वराज्यातला; पण सर्जेरावांनीही मोगलांचीच पाठ धरली. शिरवळच्या मोगली अधिकाऱ्या कडे विचित्रगडचा हवालदार संताजी निंबाळकर याला मध्यस्थ घालून आपली भाऊबंदकीची बाब सोडवून घ्यायची खूप कोशिश केली. राजांच्या कानी जेध्यांचा हा सगळा करीणा आला होता.
संताजी निंबाळकरांचा सर्जरावांची सफाई देणारा खलिता खंडोजी वाचू लागले – “,..आम्ही राजमान्य स्वामींच्या पायी एकनिष्ठच आहोत. स्वामी कृपाळू होऊन आमचे देशमुखी वतन, अभयपत्र देऊन स्वाधीन करतील, तर निष्ठेने सेवा करू.”
शब्दांगणिक जेध्यांचा दुटप्पीपणा ऐकून महाराजांच्या कपाळीची शीर थडथडू लागली. सरसर पायफेर घेत ते म्हणाले, “चिटणीस, कलमदास्तान घ्या. आम्ही सांगू तो मजकूर शब्दबर रेखून तातडीनं पाठवा.”
खंडोजी कलमी सेवेवर बसले. समोर सर्जेराव जेधेच असल्यागत महाराज मजकूर सांगू लागले, “…तुम्ही, संताजी निंबाळकर मुद्राधारी विचित्रगड यासी पत्र लिहून मुद्दा सांगोन पाठविला की, आपला भाऊ शिवाजी जेधा याने हरामखोरी करून शिरवळास गेला. त्याने आपली गुरेढोरे वळून नेली. पुढे आपणास बरे पाहणार नाही. याबद्दल आपण उठोन सिरवळास आलो आहे. ऐसियासी आपण रा. स्वामींच्या पायाजवळी एकनिष्ठच आहे… त्यावरून हे आज्ञापत्र तुम्हास लिहिले आहे.
“तरी आधी तुम्हीच सरासरी हरामखोरी केली की, वतनदार होऊन इमानेइतबारे वर्तावे ते गोष्ट न करिता स्वामींचे अन्न बहुत दिवस भक्षिले. त्याचे सार्थक केलेत की, स्वामींच्या पायाशी दुर्बुद्धी धरून दोन दिवसांचे मोगल त्याकडे जाऊन राहिलेत. तुमचा भाऊ गनिमाकडे केला; तो बरे पाहिना ऐसे होते तरी तुम्ही हुजूर यावे होते!! म्हणजे तुमचा एतबार व एकनिष्ठता कळो येती. ते केले नाही. तरी बरीच गोष्ट जाहली. या उपरेही गनिमाकडे राहाणेच असेल, तरी सुखेच राहणे. तुमचा हिसाब तो काय? या क्षणी स्वामी आज्ञा करितात तरी गनिमादेखील तुम्हास कापून काढवीतच आहेत, हे बरे समजणे!
“शकनिष्ठेने स्वामींचे पायाजवळी वर्तावे असे असेल, तरी जो राबता करणे तो हुजूर लेहून पाठवावा. हुजराती खेरीज दुसरियाकडे एकंदर राबता न करणे.
“तुमचेजवळ एकनिष्ठताच आहे, ऐसे स्वामींस कळलियावरी जे आज्ञा करणे ते करतील. तेणेप्रमाणे वर्तणूक करणे.”
खंडोजींनी खलित्यावर वाळूची चिमट शिवरून तो थैलीबंद केला.
“पेशव्यांनी खानदेशात धरणगावच्या वखारी लुटल्याची पलटी म्हणून मुंबईच्या टोपीकरांनी आपलं धोरण बदललं आहे स्वामी.” खंडोजींनी दुसरी बाब पुढे घेतली.
“बदलाचं धोरण काय आहे खंडोजी?” राजे त्रस्त झाले.
“आपला समुद्रपट्टीचा मुलूख मारण्याचा ते यत्न करताहेत. पण आपले सारंग डोळ्यांत तेल घालून आहेत.”
राजांनी समाधानाचा सुस्कारा सोडला.
“चेऊलच्या खबरा आहेत. हबश्यांनी चेऊल जागजागी जेर केलं आहे. थोरल्या स्वामींच्या निर्वाणाची व्यथा दवा देऊन बरी करणाऱ्या पिलाजी न्हाव्याचा मुलगा बजाजी यानं हबश्यांच्या उंदेरी बेटावर जोरावारीचा हमला केला. त्यामुळं चिडून हबशी चौलात मेळानं घुसले आहेत. कित्येक चौलकरांची कापाकापी केली त्यांनी.”
खबर सांगताना खंडोजी आणि ती ऐकताना महाराज पिळवटून निघाले. राजांच्या मनी आबासाहेबांचे अखेरचे बोल थडथडत फिरले – “जंजिरा – उंदेरीवर हबशी पाय ठेवून आहे.”
गलबतात लादून हबश्यांनी पसार केलेल्या, मुंबईत कामी आलेल्या सारंग सिद्दी मिश्रीची नेक मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर तरळू लागली. जंजिराखाडीच भरून काढण्यासाठी स्वत: केलेल्या जिद्दी यत्नांची सय मनात फडफडून गेली. हबशी! दौलतीच्या पदरास कुरतडणारा उंदीर!
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९२.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.