धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९३ –
समर्थांच्या चाफळमठाच्या यात्रेसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी येत होत्या. त्यांच्याकडून भरमसाट कर घेतले जात होते. याला कुठेतरी पायबंद बसणे आवश्यक होते. त्यासाठी राजांनी धर्मखात्याच्या मोरेश्वर पंडितांना, त्यांच्या चिटणिसासह याद घेतले. “पंडित, चाफळमठाची कोण तक्रार?” राजांनी मोरेश्वरांना जाब विचारला.
“जी. मठाच्या निगराणीची बाब काही मार्गी लागत नाही. उद्धव गोसावी मनमाना कारभार करतात. त्यांच्या चिथावणीनं दिवाणी लोक व्यापार – उदिमासाठी येणाऱ्या लोकांकडून भरपेट कर घेतात.” मोरेश्वरांनी चाफळची हालहवाल सांगितली. ती सांगताना समर्थांमागे मठाच्या होणाऱ्या आबदांनी त्यांचेही मन व्याकूळले.
राजे चिंतागत झाले. चिटणिसांकडे बघत म्हणाले, “कलम घ्या. कऱ्हाडचे देसाधिकारी रंगो विश्वनाथ आणि साताऱ्याचे अंबाजी मोरदेव यांना ताकीदपत्र द्या.”
राजे धर्मखात्याच्या चिटणिसांना ताकीदपत्राचा मजकूर सांगू लागले – “चाफळ श्रीरघुनाथ यात्रेचे नंदादीप, लिहिणार व अफराद यांचे वेतनाची मोईन सादर आहे. त्याप्रमाणे तुम्ही ऐवज पाववत नाही. सिंगणवाडी येथे सारे ऐवजाची वरात बिलाकसूर पावावी. दिवाणी लोक वाणियांजवळ उचापती करतात ते धास्तीने यात्रा मोडू पाहते. ऐसे सहसा न करणे. दिवाकर गोसावी हस्ते पूर्वीप्रमाणे महोत्सव चालवावा. उद्धव गोसावियास मधेच कथले करावयास संबंध नाही. शहापूर येथे हनुमंताचे हनुमंताचे देवालय आहे. ते उत्पन्न वाहगावचा कृष्णाजी पाटील व पुजारी भक्षतो. तर बरजोद ताकीद करणे आणि पाटलाने खादले, ते इनाम बेरीज त्यापासून घेऊन दिवाकर गोसावियास पावते करणे.”
मठाच्या बारीक – सारीक बाबींचा निवाडा राजांनी सांगितला. त्यांचे मन मात्र समर्थांच्या आठवणीत गुंतून गेले.
गेली तीन-चार वर्षे झालेल्या फौजांच्या धावणींनी जागजागची शिवारे उजाड झाली होती. त्यातच नुकतेच दुष्काळी साल चाटून गेले होते. गावोगावचे कुणबी हवालदिल झाले होते. त्यांना धीर, दिलासा देऊन राने तवानी करणे भाग होते. फौजा घोड्यांच्या खुरांनी आणि शिवारांच्या पोटाने धावतात, हे जाणलेल्या राजांनी सुरनीस शंकराजींना सदरेवर घेऊन मुलूखभरच्या सुभेदारांना आज्ञापत्र देण्यास सांगितले – “जागजागच्या वतनी देशमुखांनी मशागत व लागवडीसाठी कुणब्यांना पाठबळ द्यावे -”
विजापूरभोवती चौटाप दौडणाऱ्या हंबीररावांचे स्वारामागून स्वार येत होते – कुमक धाडावी. नागोजी बल्लाळांना त्यासाठी याद घेऊन राजांनी फौजबंदीने विजापूरचे रोखे त्यांना पाठवून दिले.
बहिर्जी नाईक रामघाटात झालेल्या हातघाईची खबर देऊन गेल्यापासून महाराज संत्रस्त झाले होते. कुडाळचे खेम सावंत फिरंग्यांना मिळाले होते. त्यांच्या मदतीने गोव्यालगतचा प्रदेश लुटत होते. त्यांना सोंद्याचा राम दळवी, पंधरा हजारांच्या फौजेने हातभार लावीत होता. कारवार जाळत – लुटत होता.
या बंडखोरांना खीळ घालावी म्हणून रामचंद्रपंत आणि धर्माजी नागनाथ आटापिटा करीत होते. पण – पण एवढी आदिलशाहीला राजे कुमक करीत होते, तरी त्यांचाच सालार सर्जाखान याने रामघाटात सहा हजार हशमांचा तळ टाकून रामचंद्रपंत आणि धर्माजी यांना रोखून धरले होते. हत्ती, घोडे टाकून त्यांना पिछाट घ्यायला लावले होते. या घटनांचे साफ कारण होते. आदिलशाहीला राजांची कुमक घ्यायची होती, देसाई – दळवींच्या मार्फतीने मिळेल तेवढा कोकणपट्टीचा मुलूख मारून विजापूरचा खजिना भरायचा होता! कसेही करून औरंगच्या रेट्यापुढे होते.
कोकणातील देसाई – दळव्यांचा उपद्रव कसा वारावा, या विचारात असतानाच प्रल्हाद निराजी राजांच्या भेटीला आले. त्यांच्याबरोबर विठोजी बापूजी व गोर्विद नारायण या चेऊलच्या दोन असामी होत्या. त्यांनी राजांना रिवाज दिला.
“या उभयतांवर मोठा अन्याय झाला आहे स्वामी. सूर्याजी विसाजी प्रभू याने या गरिबांकडून जोरावारीने खतपत्र करून घेतले आहे. यांचा जमीनजुमला जुलमाने खादला आहे.” प्रल्हादपंतांनी सगळा कथला सांगितला.
विठोजी आणि गोर्विद हात जोडून वाकून एकसारखे गयावया करू लागले – “मायबाप, न्याय द्या आम्हास. वाऱ्यावर सोडू नका.”
“न्यायाधीश, चौलास देशाधिकारी कोण?” राजांनी पंतांकडे तपास घेतला.
“जी. येसाजी अनंत.”
“त्यांना तातडीनं आज्ञापत्र द्या. या बाबांच्याकडून बळजोरने करवून घेतलेले खतपत्र रद्दबादल ठरवावे. ज्यांच्या काळात हे खतपत्र झाले, ते पूर्वील देशाधिकारी?”
“हरी शिवदेव, महाराज.” प्रल्हादपंतांना राजे एवढ्या मुळापर्यंत जातील याचा अंदाजच नव्हता.
“त्यांस एक सख्त समज द्या न्यायाधीश – विठोजी बापूजी व गोर्विद नारायण हुजूर आले आहेत. खतपत्राचा मामला जुलूम कानी आला. तुम्ही सुभेदार! तमाशा पाहता.
वरतून सूर्याजीची कोशिस करिता. यावरून तुमची कारकुनी कळो आली. जोरावारीने एकाचे काढून दुसऱ्याचे घशात घालावे, ही कोण दिवाणी चाकरी?” संतप्त राजांनी हरी शिवदेवना काय समज द्यावी हे प्रल्हादपंतांना सांगितले.
इकडे आपल्या अश्राप रयतेला वाजवी न्याय मिळावा, यासाठी राजे तिळतिळ तुटत होते. त्या वेळी सोलापूरच्या औरंगजेबाच्या प्रचंड तळावर घडणारा प्रसंग तुळजापूरची भवानी तिकडे पाझरत्या डोळ्यांनी बघत होती. आणि नुसतीच बघत होती.
रेशमी तणावांनी पेललेला औरंगजेबाचा आलिशान शामियाना हिवाळी वाऱ्यावर लहरत होता. चांदताऱ्यांचे हिरवे निशाण त्यावर फडकत होते. साठ हजार फौजी तळाच्या राहुट्या जागजागी पडल्या होत्या. शाही शामियान्याच्या बाहेर नगारा, झेंडा, पोहच्यांचे च्यांचे तबक हे सामान हारीने मांडले होते. हत्यारी हशम एका हत्तीभोवती कडे धरून पहारा देत होते. साखळदंड वाजवीत चीत्कारत तो हत्ती डुलत होता.
शामियान्यात मुहम्मद आझम, मुईजुद्दीन, बेदारबख्त, रणमस्तखान अशा खाशा असामी कदमावर नजर लावून खड्या होत्या. उंची आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या डाव्या हाताशी मौलवींचे पथक बसले होते.
चाळीस-पन्नास घोडेस्वारांच्या दुड्या पथकातून दोन अरबी, उमद्या घोड्यांवर मांड घेतलेले खासे स्वार शामियान्याजवळ आले. पहारेकऱ्यांनी त्यांना तसलीम दिली. दोघेही आत शिरले. दोघांनी बादशाहला तिवार कुर्निसात केला. त्यांतील तरण्याबांड, उंच असामीला बुढा औरंगजेब बारकाईने निरखत होता. दुसरा वृद्ध वयस्क इसम पुढे झाला. त्याने आपल्या ‘जिल्हे सुबहानीं’च्या उजव्या हाताशी असलेले तबक उचलून बादशहासमोर धरले. बादशहाने आपला माळधारी हात तबकाला लावला. तबकधारी होता वजीर असदखान. त्याने तबकातील हिरवीशार खिल्लत उचलून, आपल्या बरोबर आलेल्या तरण्याबांड सरदाराच्या खांद्यावर पांघरली. तिच्यावरचा जरीबतू चांदतारा झगमगला. बांड्याने औरंगजेबाला कमरेत झुकत पुन्हा कुर्निसात केला. त्याला पंचहजारी आणि बाहेर मांडलेल्या चीजवस्तू हत्तीसह बक्ष केल्याचे जाहीर करण्यात आले. हत्तीने बडा माणूस साखळबंद करून टाकला. तो होता अचलोजी महाडिक! आबासाहेबांच्या जावयाचा भाऊ!
अचलोजीच्या कानी आल्या बातमीने घायाळ व्हायलाही राजांना उसंत मिळू नये म्हणून की काय, अशी जंजिऱ्याच्या हबशी कासमने पुन्हा उचल खाल्ली. चौल, राजापुरात आपले हबशी तांडे घुसवून त्याने निर्दय कत्तली करविल्या. जंजिरा सोडून दर्यामार्गे तो स्वत:च कल्याणवर चालून आला. दाभोळ बंदरात तर त्याच्या आणि गोर्विदजी कान्हो यांच्या आरमारी दर्याभांडणात गोर्विदजी मारले गेले.
आदिलशाहीचे एक-एक मातब्बर ठाणे कोसळत होते. एवढा भक्कम मिरजेचा भुईकोट, पण तोही किल्लेदार आसदखानाने रणमस्त आणि रुहुल्लाखान यांच्या सुपुर्द केला. मिरज ताब्यात येताच कोल्हापूर-पन्हाळा भागात मोगलांच्या हालचाली वाढल्या. एकटे हंबीरराव मावळतीची पन्हाळ्यापासून हुक्केरीपर्यंतची आदिलशाही तुडवीत, ती राखण्यासाठी जिवाचे रान करीत होते.
लक्ष्मेश्वराच्या रवणगौडा देसायाने मोगलांविरुद्ध चिवट झुंज दिली होती. त्याला इनामपत्र देण्यासाठी राजांनी पेशव्यांना पाचारण केले.
आपणाला कशासाठी याद केले आहे, याची काहीच कल्पना नसलेले निळोपंत पुण्याहून दामाजींनी कळविलेली बाब पुढे ठेवीत म्हणाले, “रुहुल्ला आणि रणमस्तखान मिरजेहून पुण्यावर उतरले आहेत महाराज. तिथल्या देशमुख, देशपांड्यांना मसलतीत घेऊन फितवण्याचे यत्न चाललेत त्यांचे.”
असले ऐकून काही वाटावे असे दिवसच राहिले नव्हते. आज राजांना फार जाणवले की, कुठूनतरी समर्थमुखातली गोसावी नांदी कानी पडावी. भोवतीच्या यातनांनी मनाची तल्खली होत असलेले राजे अंत:पुरी दालनात आले.
बराच वेळ ते काही बोलत नाहीत; हे जाणवल्याने येसूबाई म्हणाल्या, “पाटगावहून मठाचा माणूस आलाय. मौनीबाबांची तब्येत सुमार असल्याचं कळतंय.”
राजांनी चमकून येसूबाईच्याकडे बघितले. ते काहीच बोलले नाहीत. या धावपळीच्या काळात मौनीबाबा, मोरया गोसावी, मल्हारबाबा या कुणाचेच दर्शन घेणेही जमले नव्हते. मन चुटपुटले त्यांचे त्या जाणिवेने. दुहाती बाळराजांचे हात घेऊन राया – अंता आले. बाळराजे ‘मासाहेब’ म्हणत येसूबाईना बिलगले. मायलेकरांचे रूप बघताना राजांना आपल्या थोरल्या आऊंची सय झाली.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९३.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.