महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,67,737

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९६

By Discover Maharashtra Views: 1348 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९६ –

निळोपंत, मुद्रा त्रासिक दिसत्येय. तुमची तब्येत?” महाराज बोलत दफ्तरी दालनातील पेशव्यांच्या समोरच आले. निळोपंतांनी चमकून वर पाहिले. त्यांचे डोळे पाणथरून आले. उपरण्याचा शेव त्यांनी नेत्रकडांना लावला.

“पेशवे, झालं काय?” राजांचाच आवाज विचारताना चिरकला. भोवतीचे हत्यारी पहारेकरीही चमकून बघू लागले. “काय सांगायचं स्वामी! आम्ही पेशवे – कुणास आता कसं तोंड दावणार? आमचाच… एक जवळचा नातेवाईक कैद करून गुलाम म्हणून घेऊन गेला माजोर हबशी. डोळ्यांस डोळा नाही लागत ते ऐकल्यापासून.”

“पंडितराव, चेऊलच्या सुभेदार रायाजी सदर प्रभूंना स्वार द्या.” धर्मखात्याचे प्रमुख मोरेश्वर राजांचे सांगणे ध्यानपूर्वक ऐकत होते. “कोण वजेचा रायाजींना स्वार द्यायचा स्वामी?” मोरेश्वरांनी विचारले.

“चेऊलच्या एका निपुत्रिक बाईची अखेरची इच्छा होती की, आपला जमीनजुमला मोरयाबाबांच्या चिंचवडमठास आपल्या माघारे द्यावा. बाई आता गेल्या. जाण्यापूर्वी त्यांनी आम्हास आपली इच्छा निरोप्याकडून कळविली आहे.” त्या बाईंचे नाव, जमिनीचा तपशील मोरेश्वर पंडितरावांना सांगता-सांगताच महाराज थांबले. केवढ्यातरी चमत्कारिक सत्याने त्यांचे मन भरून आले. “कोण, कुठली, आम्ही ना पाहिली, देखलेली स्त्री असामी. आपले सारे हक्काचे ते मोरयाबाबांच्या धर्मस्थानास अर्पून टाकते. आणि -आणि शिर्के, अर्जुनजी, अचलोजी, महादजी – ‘जी’ म्हणत- म्हणत मन्सबांसाठी औरंगतळावर चालत जातात!

भागानगराहून आलेल्या कुतुबशहाच्या वकिलासह पेशवे महाराजांना पेश आले. वकिलाबरोबर चार-पाच सरपोसबंद तबके घेतलेले खिदमतगार होते.

“हे कुतुबशाहीचे राजदूत भेटीस आले आहेत महाराज.” सिंहासनसदरेला आसनावर बसलेल्या राजांना निळोपंतांनी वकिलाचा परिचय दिला. वकिलाने कुर्निसात करून आपल्या हजरत तानाशाहांचा निरोप राजांना सांगितला, “हमारे हजरतने ये एक लाख पेशकश राजासाबके खिदमत में पेश भेजी है।” वकिलाने आपल्या खिदमतगारांवर नजर टाकली. त्यांनी झुकून पुढे होत, हातस्पर्श द्यावा म्हणून तबके राजांसमोर धरली. त्या तबकाकडे आणि वकिलाकडे आळीपाळीने बघत राजांनी वकिलाच्या ध्यानीमनी नसलेला धक्का त्याला दिला – “ही खास कुतुबशाही रीत दिसते निळोपंत. आमच्या आणि भागानगरच्या दरबाराशी सलोख्याचे संबंध राहावे, म्हणून धडपडणाऱ्या मादण्णा आणि आकण्णा यांचे कुतुबशाहीत भररस्त्यात खून करविले जातात. का? तर दिल्ली सल्तनतीच्या औरंगची त्यांच्यावर ‘काफर’ म्हणून नाराजी होती यासाठी? तोच औरंग गोवळकोंड्यावर चालून येतो आहे, हे साफ झाल्यावर आम्हाला ही लाखाची पेशकश पाठविली जाते. का? तर या बाक्‍्या समयी आम्ही कुतुबशाहीच्या पाठी राहावं!”

निरुत्तर झालेला कुतुबशाही वकील निळोपंतांनीच आता काही बोलावे यासाठी त्यांच्याकडे बघतच राहिला. निळोपंतांनी अनुभवी बोल पुढे ठेवले.

“रास्त आहे स्वामी म्हणतात ते. मादण्णा आणि आकण्णा काय वकुबाच्या असामी होत्या, हे लवकरच कळून येईल कुतुबशाही दरबारास. पण त्यांच्या आडमुठ्या धोरणाची चाल धरून नाही भागायचं या दरबारास असं वाटतं आम्हाला.”

“यासाठीच पूर्वीपासून पाठीशा आहोत आम्ही गोवळकोंड्याच्या. जे आबासाहेबांनी राखलं तेच धोरण कुतुबशाहीशी राखून चालविलं आम्ही – पुढंही चालविणार आहोत.” पेशकशीची तबके निरखत महाराजांनी त्यांना हातस्पर्श दिला.

वकिलाने सुटकेचा नि:श्वास टाकला. तानाशाहासाठी त्याला फेरनजराणा देताना महाराज म्हणाले, “तुमच्या हजरतास सांगा, आम्ही पाठीशी आहोत कुतुबशाहीच्या. आपल्या संकटाला भरदमानं तोंड देण्याची तयारी ठेवून असा. या.” वकिलाची रीतसर बोळवण करण्यात आली.

महाराज गोवळकोंड्याच्या कुमकेला कुणाला पाठवावे, या विचारात गढले असतानाच किल्लेदार चांगोजी काटकर त्यांच्या सामने आला. गळ्यातील गोफबंद व चांदीपेटीचा ताईत डुलवीत त्याने वर्दी दिली, “गोवयाचं सुंदरजी बाजी आल्यात.”

महाराजांनी रुकाराचा हात उठविला. चांगोजी सुंदरजींना घेऊन आला. फिरंग्यांनी गोव्यालगतचा मुलूख लुटला, गावे बाटविली, वतनदार त्यांना मिळाले, असलेच काही अशुभ आता ऐकायला मिळणार यासाठी राजांनी मनाची तयारीही केली.

चर्या मात्र शांत ठेवून एवढ्या दूरवर आल्या सुंदरजींना त्यांनी आपुलकीने हालहवाल विचारली. ती देऊन प्रसन्न चर्येने सुंदरजी म्हणाले, “एक खास बाब स्वामींच्या कानी घालण्यासाठी जातीनं आलो आम्ही एवढ्या पल्ल्यावर.”

“बोला.” महाराजांना ते कशाबद्दल बोलणार याचा काहीच अंदाज आला नाही.

“आता पणजीच्या बंदरातून खाशा स्वाऱ्या घेतलेली गलबतं निघालीही असतील.”

“कसल्या सवाऱ्या?”

“विजरई कोंद-द-आल्वोर आणि त्याच्या कबिल्याच्या!”

“मतलब?” महाराज विचारातच पडले.

“पोर्तुगालच्या बड्या दरबारला स्वामींनी गोव्याची केलेली दैना शब्दबर पावली आहे. दरबारनं त्यासाठी खरमरीत खलिता लिहून विजरईची चांगलीच खरड केली आहे. मराठी मुलखावर गैरलागू चालून जाण्याचा त्यास जाब विचारला आहे.”

सुंदरजी हुरुपाने रुपाने सांगत होते. राजांच्या पाणीदार डोळ्यांसमोर तरळत होता, घोंगडीवर झोपविलेला, पळसवृक्षाला लाजविणारा कृष्णाजी कंक!

“विजरईला बड्या दरबारनं पोर्तुगालला परत बोलावून घेतलंय स्वामी. त्याच्या जागी दोम-रुद्रिगो-द-कोस्त म्हणून कुण्या नव्या विजरईची नामजादी झालेय गोव्यावर.”

तळपत्या शंभूनेत्रांसमोर मांडवीची निळी पांढरट खाडी तरळू लागली. ते सुंदरजींना म्हणाले, “आमच्या कानी कुणी मनास संतोष देईल असं काही घालत नव्हतं. सुंदरजी, चला जगदीशाचं दर्शन घेऊ. तुम्ही बरी खबर आणली आहे.”

महाराज जगदीश्वर मंदिराच्या दिशेने सुंदरजी, चांगोजीसह चालू लागले. या वेळी त्या तिघांनाही कल्पना असायचे कारण नव्हते की, कैलासवासी स्वामींनी सुरतेला जवळचे म्हणून खजिन्यासाठी निवडलेल्या बागलाणातील साल्हेर- मुल्हेर किल्ल्यांपैकी साल्हेरीचा किल्ला नेकनाम खानाने या वेळी फितुरीचा फास टाकून ओढत औरंगजेबाच्या घशात आणून घातला होता!

दिवाळी आली नि गेली. पुणे, सातारा, मिरज, सांगली, बेळगाव, हुबळी या देश व कर्नाटकप्रांतात या दिवाळीच्या दिवल्या काही पाजळल्या नाहीत. गेला पावसाळा कोरडाच परतल्याने त्या भागात भयाण दुष्काळ पसरला. त्याच्या काळीजवेधी वार्ता रोजाना राजांच्या कानी पडू लागल्या. लढते सैन्य आणि राबता कुणबावा या बिकट काळी राखणे महत्त्वाचे होते. खद्द राजे रायगडाच्या अंबारखान्यातील धान्यगोणी घेऊन देशावर पाठविल्या जाणाऱ्या काबाडीच्या बैलांच्या तांड्यावर जातीने देख देत होते. पन्हाळ्याहून कुलेश व म्हलोजीबाबा गंगा-जमुना या अंबारकोठ्यांचे धान्य बेळगावच्या वाटेला लावीत तीन-चार साल लढून दमगीर झालेला प्रत्येक गडकोट, नुकतीच आदिलशाही पडलेली, वतनदारांची जागजागी माजलेली बंडाळी, त्यातच पडलेला हा दुष्काळ. गेल्या चार सालांतील घटना कशा चित्रांसारख्या फिरत होत्या राजांच्या डोळ्यांसमोर.

ही औरंगची दक्षिणेत उतरायची दुसरी वेळ होती. पहिल्याने तो आला होता दख्खनसुभा म्हणून. परतला होता बंडखोर शहजादा म्हणून. आता दुसऱ्या वेळी आला होता, दिल्लीतख्ताचा शहेनशहा म्हणून पुरी दख्खन गिळायला. त्याच्या दाबजोर रेट्यासमोर आदिलशाही कोसळली होती.

आता त्याने दुतोंडी हालचाली सुरू केल्या. एकीकडून गोवळकोंडा पाडायचा, दुसरीकडून मराठी दौलतीचा कर्नाटकातील मिळेल तेवढा प्रदेश कुरतडायचा. तिला खिळखिळी करण्यासाठी त्याचे खास अस्त्र “फोडाफोडी’ आणखी चालूच होते. कर्नाटकात घुसलेल्या औरंगच्या फौजांच्या पाठलागावर हरजींचे गोपाळ दादाजी व विठ्ठल पिलाजी हे तोडीजोडीचे सरदार कोसळून पडत होते. जे कानी येत होते, त्याचाच मेळ मनाशी घालत राजे खासेवाड्याच्या दफ्तरी सदरेत खंडोजींना जागजागी धाडायच्या खलित्यांचे मजकूर सांगू लागले. कसल्यातरी खोलीच्या विचारात गढल्याने त्यांचा मजकूर सलग येत नव्हता. एवढ्यात गिरजोजीने दफ्तरी येऊन वर्दी आणली, “पेशवं येत्यात.”

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९६.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment