धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९८ –
कर्नाटकस्वारीची पूर्वतयारी म्हणून मोरस, कोडग, मलेय व तिगुड येथील नायकांना मदतीसाठी पत्रे धाडण्यात आली. या स्वारीत हरजींना पावलोपावली नडणाऱ्या म्हैसूरच्या चिक्कदेवरायाला खिळते करून हरजींचा भार हलका करायचा होता. औरंगजेबाच्या धास्तीने विजापूर आणि गोवळकोंडा दरबारांनी राजांना खंडणी आणि नजराणे पाठविल्याची बाब चिक्कदेवरायाला मुळीच पसंत नव्हती. आदिलशाही पडल्याचा फायदा घेऊन आपण बादशहाचेच आहोत, असे वरकरणी भासवत चिक्कदेवरायाला कर्नाटकातील मिळेल तेवढा आदिलशाही मुलूख मारायचा होता. रायगडावर कर्नाटकस्वारीची जय्यत तयारी झाली. हरजीराजांना आगेवर्दीचे खबरगीर धाडण्यात आले. स्वारीत राजांच्या सोबतीला जाणारा खंडोजी, रूपाजी, धनाजी, गोपाळ पंडित असा मेळ सिंहासनसदरेला एकवटला.
श्रीसखींचा निरोप घेण्यासाठी राजे देवमहाली आले. घोटीव शिसवी देव्हाऱ्यात पूजलेल्या कुलदेवता जगदंबेला आणि आबासाहेबांच्या नित्यपूजेच्या शिवलिंगाला त्यांनी नमस्कार केला. देव्हाऱ्याशेजारी बाळराजांसह उभ्या असलेल्या येसूबाईनी त्यांच्या हाततळव्यावर तीर्थजल दिले. ते ओठांआड करीत राजांनी पसरल्या हातांनी बाळराजांना जवळ घेत विचारले, “येता आमच्या संगती जिंजीला?” आणि मग हसून त्यांची पाठ थोपटली.
“प्रवासात स्वारीनं तब्येतीला जपून असावं. पल्ला लांबचा आहे.” येसूबाई बाळराजांना पुन्हा आपल्याजवळ घेत म्हणाल्या. “आबासाहेब असेच स्वारीला म्हणून कर्नाटकात गेले. जागोजागचं बदलतं पाणी त्यांना अधिक झालं. तशातच गडावर येताच सूर्यग्रहणाच्या दिवशी कुशावर्ताच्या टाक्यात गळाभर पाण्यात उभं राहून त्यांनी दानं वाटली. आणि – विषम ज्वरानं बिछायतीला खिळून पडले ते….”
“स्वारीशिकारीची सवयच झाली आहे आम्हास. आमची नका काळजी करू. शिवाय घालावा खाडीत घोडा म्हटलं, तरी कर्नाटकात दर्याही नाही. तुम्ही काळजी राखा ती इथल्या कारभाराची. तुमच्या शिक्केमोर्तबावर अडीनडीचं सर्व चालवावं, असं सांगून ठेवलं आहे आम्ही पेशव्यांना. येऊ आम्ही?” राजे जायला वळले.
थांबावं थोडं स्वारींनी.” पुढे होत येसूबाई राजांच्या तिवार पाया पडल्या. “शक मागणं आहे. आठवणीनं पुरं करावं स्वारीनं.” येसूबाई म्हणाल्या.
“बोलावं श्रीसखींनी.”
“बरेच दिवस मनी घोळणारं एक राहून गेलंय. आम्ही नाही निदान स्वारीनं तरी ते पुरं करावं.” येसूबाई देव्हाऱ्याकडे बघत थांबल्या.
“बोला. अशी कोणती बाब आम्ही असताना मनी रेंगाळती ठेवावी लागली?”
“थोरल्या आबासाहेबांची छत्री कर्नाटक प्रांत होदिगेरीस आहे, असं नुसतं ऐकून आहोत आम्ही! कधी जाणं घडलं, तर स्वारींसह जोडीनं पाद्यपूजा करावी त्या छत्रीची असं कैकवेळा येऊन जातं मनी! स्वारी जातेच आहे. आठवणीनं पाद्यपूजा करावी.”
राजे येसूबाईच्याकडे बघतच राहिले. त्यांनी तर मनोमन हे केव्हाच ठरवून टाकले होते. शहाजीराजांच्या न आठवणाऱ्या मुद्रेला डोळ्यांसमोर आणण्याचा त्यांनी खूप यत्न केला. जमले नाही. “तुमचं मागणं नव्हे; ‘आज्ञा’ आम्ही बरी ध्यानी ठेवू. खरं तर तुम्हासच संगती नेलं असतं आम्ही. पण…” पुढे काहीच न बोलता राजे देवमहालाबाहेर पडले.
रामराजांच्या वाड्यात त्यांची वाजपूस करून, येसाजी दाभाड्यांना आवश्यक त्या सूचना करून सिंहासनसदरेला आले. महाडघाटाने तीस हजारांची घोडा व पावलोकांची फौज पहिल्या मुक्कामाला किल्ले पन्हाळ्यावर आली. इथे म्हलोजीबाबा आणि हंबीरराव राजांच्या आगवानीसाठी पाच दरवाजात उभे होते. फार दिवसांनी राजांची ही पन्हाळाभेट होती. पाच दरवाजातच चंद्रावतावरची मांड मोडून पायउतार होताच, ते म्हलोजींना व हंबीररावांना म्हणाले, “चला. प्रथम रंगरूपी शिवर्पिंडीचं दर्शन घेऊ सरलष्कर,”
“चलावं.” हंबीरराव, म्हलोजी, खंडोजी, धनाजी राजांच्या पाठीशी झाले.
“मामासाहेब, आता औरंगनं गोवळकोंडा आणि आपला कर्नाटक चालीखाली धरलाय. आम्ही त्यासाठीच जिंजीला उतरतो आहोत.” जाता जाताच राजांनी सरलष्करांना मनची चिंता बोलून दाखविली.
“कळलंय आम्हास्री ते. पन्हाळा आन बेळगाव मारायची लई झायली क्येली त्येच्या रणमस्त-रुहुल्लानी. पर आम्ही हाव, म्हलोजी हाईत. पार पिटाळलंय त्येखी.”
“तुम्ही आहात म्हणूनच पन्हाळा-कोल्हापूर भागाची धास्त वाटत नाही आम्हास.” बोलता-बोलता मंडळी बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या रंगरूपी शिवर्पिडीच्या घुमटीजवळ आली. दर्शनासाठी घुमटीत गेली. म्हलोजी, हंबीररावांना पन्हाळा प्रांताच्या सर्व सूचना देऊन, एक मुक्काम पन्हाळ्यावर टाकून राजे सैन्यासह सूतकट्टीच्या बारीनं बेळगावला जायला वेशीवर आले.
निरोप द्यायला आलेल्या हंबीररावांना त्यांनी खांदाभेट दिली. न राहवून हंबीररावांनी विचारले, “रायगडाचा काय हालहवाल धनी?” तो सवाल आपल्या ताराऊसाठी हंबीररावांनी विचारला आहे, हे ताडूनच राजे म्हणाले, “सारं सुक्षेम आहे, आमच्या ताराऊ चखोट आहेत.”
राजांनी सर्वांचा निरोप घेऊन पन्हाळा सोडला. मजल-दरमजल करत फौज बेळगाव, धारवाड, गदग, चिक्कनहळळी, चिक्कवबाळापूर असे मुक्काम करत नंदीदुर्गाजवळ आली. नंदीदुर्गाचा कोट नजरटप्प्यात येताच राजांच्या आठवणींचे टाके डहुळले. याच नंदीदुर्गाला घेर टाकायला ते एकदा आले होते. कुणाबरोबर? दिलेरसंगती! त्या आठवणी गेल्या, तो दिलेर गेला.
दोडुबाळापूर, तिरुवनमलईमार्गे राजांची फौज जिंजीच्या वेशीत आली. वेशीत हरजीराजे आगवानीसाठी उभे होते. त्यांच्या डावे-उजवे केसो त्रिमल, संताजी, जैतजी काटकर, दादाजी काकडे, तिमाजी हणमंते अशा असामी उभ्या होत्या. चंद्रावतावरून राजे पायउतार होताच त्यांच्या स्वागतासाठी कर्नाटकाच्या तोफांची भांडी फुटली. नौबती झडल्या. पुढे होत राजांनी हरजींना खांदाभेट दिली. कर्नाटक प्रांताच्या आणि बरोबर आणलेल्या माणूसमेळासह ते जिंजीच्या कोटाकडे पालखीतून निघाले. त्यांच्या मनी आबासाहेबांच्या आठवणी दाटून आल्या. “केवढ्या पल्ल्याची त्यांची दृष्टी! कुठे रायगड, कुठे जिंजी? हे सारे त्यांनी उभे गेले. आग्ऱ्याच्या कोठीतून सलामत सुटल्यावर. ते राखण्यासाठी आम्हास पडेल ते मोल द्यावे लागणार.’
सारे जिंजीकर गच्ची, माळवद धरून शिवपुत्राचे दर्शन घेत होते. औरंगजेबाला पिछाट घ्यायला लावणारा राजा डोळे भरून पाहत होते. सर्वांना त्या उमद्या, जवान रूपाचा अभिमान वाटत होता. राजे जिंजीच्या कोटात आले.
बालेकिल्ल्यातील हरजींच्या खासेवाड्यातील हमचौकात राजांना त्यांच्या भगिनी अंबिकाबाई एक तेवत्या निरांजनाचे तबक घेऊन सामोऱ्या आल्या. सोनमोहरांनी राजांचा सतका उतरून त्यांनी आपल्या बंधूंना ओवाळले. दोघा बहीण-भावांच्या डोळ्यांत, निरांजनांच्या उजेडात एकाच सत्याची राजवेदना वितळून पाझरताना दोघांनाही जाणवली – “मोगली कोठडीत खुलदाबादेला बंदिस्त पडलेल्या राणूआक्का यांची.’
ती परती सारत राजे पुढे होत झुकले. आपल्या आक्का साहेबांच्या पायांना बोटे भिडवितानाच त्यांनी घोगरट विचारले, “बऱ्या आहात?”
“जी. गोमट्या आहोत. आमच्या येसूबाई, बाळराजे कसे?” अंबिकाबाईनी तबक दासीच्या हाती देत राजांना खांदे धरून उठते घेताना विचारले. किती वर्षांनंतरची भेट होती ही दोघा बहीणभावंडांची! दोघांनाही शेवटच्या समयीच्या आबासाहेबांची भेट घडली नव्हती! विचारायला सवाल कैक होते, दोन्ही मनांत. दुपारचे थाळे होताच राजे व हरजी खासेवाड्याच्या सदरेच्या बैठकीवर बसले. कर्नाटक व दौलतीच्या खाशा असामी बगलेने दुहाती उभ्या राहिल्या होत्या. सदरेवर कर्नाटकी उंची रुजामे पसरले होते. कासवाच्या माटाची पानदाने मांडली होती. दक्षिणी तलम वाणाचे आडपडदे चौहातीच्या दरवाजावर सळसळत होते.
हरजींनी छत्रपतींना प्रवासाचा हालहवाल विचारला. हरजींनी नुकताच गोवळकोंड्याचा कर्नाटकातील अकेरा, सोंदीपत्ती, कोतवारा असा मुलूख कब्ज केला होता, त्याची माहिती दिली.
संताजी घोरपड्यांना हातरोख देत हरजी म्हणाले, “बाकी संताजी ही असामी फार मोलावकुबाची बाची धाडली तुम्ही राजे.” आणि आमचे केसोपंत?” राजांनी त्रिमलांकडे बघत विचारले.
हरजी क्षणभर घोटाळले. तांबुलाच्या निमित्ताने समोरचे पानदान पुढे घेत त्यांनी सवालाला कसबाने बगल देत तिसराच सवाल आपणहून खडा केला.
“एवढी आदिलशाही जोरावारीची, पण नाही टिकली ती औरंगजेबापुढं. आता गोवळकोंड्याचा मोहरा धरलाय त्यानं. तुम्हास काय वाटतं पुढचं राजे?”
हरजींनी सवालाला बगल दिलेय, हे राजांनी जाणले. पण त्यांनी उभा केलेला पेचही महत्त्वाचा होता म्हणून गंभीरपणे ते हरजींना म्हणाले, “तुम्ही जमेल तेवढा इदल आणि कुत्वशाहीचा मुलूख लूख आताच दस्त करून घ्या. उद्या त्याचेच निमित्त करून मोगली फौजा प्रांतावर ! फार काळ नाही तग धरायचा आता गोवळकोंडा.”
ते ऐकताना सारी सदर ताणावर पडली. तो सुमार करण्यासाठी हरजी म्हणाले, “कांजीवरमजवळ याचप्पा नायकाशी झाली आमची हातघाई वांदीवाशच्या मैदानात. हे संताजी होते संगती. पार पिटाळला आम्ही याचप्पाला म्हैसुराकडे. तिथला चिक्कदेव ओडियार कुमक मागतो आहे आमची. बेंगळूर भागात मोगलांचा कासमखान फिरतोय. त्याला शिकस्त द्यायचा इरादा आहे चिक्कदेवाचा.”
“चिक्कदेव असामी कशी?” राजांनी हरजींना विचारले.
“जी. सुलुखाचे संबंध राखण्याजोगी नाही. राजांच्या भेटीसाठी खासा येणार चिक्ुदेवराय. पण त्यांचा बेंगळुरावर डोळा आहे.”
बराच वेळ राजे हरजींची कर्नाटक प्रांतावर बोलणी झाली.
“इथून बेंगळूर किती मजलांवर राजे?” छत्रपतींनी हरजींना विचारले. “जी. असेल की साताठ मजलांवर.” त्या सवालाचा नीट अंदाज न लागल्याने हरजी गोंधळले. “हेत काय राजांचा?” त्यांनी विचारले.
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १९८.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.