महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,319

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २००

By Discover Maharashtra Views: 1368 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०० –

दोन दिवस हरजी-अंबाक्कांचा पाहुणचार घेऊन राजांनी जिंजी सोडली. त्यांना सोबत करायला हरजी, संताजी-केसोपंतांसह संगती चालले. फौजा बेंगळूरच्या मार्गाला लावण्याची राजांची आज्ञा झाली. ती ऐकताच गोंधळलेल्या हरजींचा गैरसमज दूर करत राजे त्यांना म्हणाले, “आम्ही जाणतो तुम्ही कसल्या विचारात पडलात ते. अर्जुनजीवर कसला राग नाही आमचा. बेंगळुरावर नाही चालून जात आम्ही. आम्ही चाललो आहोत होदिगेरीला! आमच्या थोरल्या महाराजसाहेबांच्या छत्रीचं दर्शन घ्यायला. पाद्यपूजा करायला. त्यांचे आशीर्वाद मागायला.”

हरजींनी ते ऐकून सुस्कारा सोडला. मजला टाकत राजांची परतीची फौज बेंगळूरजवळ होदिगेरीच्या रानात आली. हरजी, खंडोजी, संताजी अशा निवडक असाम्या संगती घेऊन राजांचे घोडेपथक शहाजीराजांच्या छत्रीकडे चालले.

शहाजीराजांच्या छत्रीचे ठिकाण आले. एकोजीकाकांनी इथे नित्यपूजेच्या पुजाऱ्यांची व्यवस्था केली होती. पायउतार होऊन राजे खाशामेळासह छत्रीसमोर आले. कैक विचारांनी मन भरून आले त्यांचे. पायीच्या मोजड्या उतरून, पुजाऱ्याने दिलेली फुल-ओंजळ आपल्या आजोबांची यादगीर झालेल्या पादुकांवर राजांनी वाहिली. शिवगंधी कपाळ त्या पादुकांना भिडविताना नाना विचार त्यांच्या मनात दाटून आले.

“आमच्या मासाहेबांचा नाही तसाच तुमचा चेहराही नाही आठवत! कधी बालपणी दिसले असतील तेवढेच; तुमचे ओझरते पाय. निजामशाहीपासून आदिलशाहीपर्यंत फिरली तुमची पावले. आमच्या आबासाहेबांनी हे केवढं नव्हत्याचं होतं केलं! बागलाणपासून जिंजीपर्यंतच्या आबासाहेबांच्या या राजपादुका राखण्याची आम्ही शर्थ करतो आहोत. आशीर्वाद द्या आम्हास.’ राजांमागून सर्वानी छत्रीचे दर्शन घेतले. हरजींचा निरोप घेण्यासाठी त्यांची खांदाभेट घेताना राजे त्यांना न राहवून म्हणाले, “हा कर्नाटक प्रांत ही गाठीची सबल जागा, बरी बांधून राखून असा ती. येतो आम्ही.”

मराठी मुलखात पन्हाळ्यावर येताच राजांना म्हलोजींच्याकडून कळले की, पन्हाळ्यावर चालून येण्याची औरंगजेबाची हूल होती! त्याच्या मिरज, कऱ्हाड, बेळगाव भागात फिरत्या फौजांना रोखण्यासाठी हंबीरराव तिकडे गेले होते. पन्हाळ्यावर एक मुक्काम टाकून राजांनी म्हलोजींचा निरोप घेतला. ते महाडपाटाने रायगड चढून आले. गडाला जागजागी गवती झड्या लावल्या होत्या. मृग तोंडाशी आल्याने वाळवणाची धान्ये गोणी भरून अंबारखान्यात थप्यांनी रचली जात होती.

गड चढून आलेल्या राजांना निळोपंतांनी मागील हालचालींचा तपशील दिला. कुलेश खेळण्यावर, रामचंद्रपंत कोकणात, हंबीरराव देशावर अशी नेमल्या जागी माणसे जागते फौजीतळ बांधून पावसाळ्यातही जागरूक होती. अंतःपुरात येसूबाईच्या भेटीस आलेल्या राजांनी कर्नाटक स्वारीतले प्रसंग त्यांच्या कानी घातले. येसूबाईना ऐकायची होती, ती छत्री-दर्शनाची बाब. ती सर्वात शेवटी राजांनी त्यांना सांगितली.

पेन्नर, तुंगभद्रा, कृष्णा अशा भरल्या नद्या पार करूनही हरजींच्या प्रांत कर्नाटकाच्या खबरा येत होत्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कासमखानाने एकोजीकाकांचे बेंगळूर मारून ते तीन लाख रुपयांना विकले होते! कुणाला? म्हैसूरच्या चिक्कदेवरायाला! हातचे बेंगळूर हे मातब्बर ठाणे गेले, या धसकक्‍्याने एकोजीकाकांचा तंजावरला काळ झाला होता.

श्रावणाचे दिवस सुरू झाले. मनी घोळणाऱ्या दोन बाबी मार्गी लावण्यासाठी राजांनी मोरेश्वर पंडितरावांना खासेवाड्यात याद घेतले. चिंचवडहून मोरयाबाबांचा एक शिष्य बाबांची तक्रार घेऊन नुकताच राजांना भेटून गेला होता. पुणे प्रांतातील लष्करी धामधुमीच्या काळात फौजेच्या अधिकाऱ्यांनी बाबांच्या मठस्थानाला बेमुर्वत उपद्रव दिला होता. फेर घेणाऱ्या राजांनी विचारले, “पंडितराव, प्रांत पुण्याला सुभा कोण सध्यास?”

“जी. विनायक उमाजी आहेत.” मोरेश्वर विचारात पडत उत्तरले.

विनायकांचे नाव ऐकताच राजांना त्यांचे वडील उमाजींची आठवण झाली. उमाजींनी राजांना बालपणी पुराणग्रंथांची बारीक अर्थबर शिकवण दिली होती.

“पंडितराव, विनायकांना फौजेच्या जुमलेदार, हवालदार, बारगीर, हशम, बाजेलष्कर हुजरात सर्वास समज देण्यासाठी आज्ञापत्र तातडीनं धाडा. कलमात लिहा… तुम्ही अवघे मठाच्या रहदारीस नाहक दरफ्ती करता… उपद्रव देऊन धामधूमही करता. चिंचवडचा मठ मोरयाबाबांचा. कै. आबासाहेबांपासून बाबा चरणधूली घेण्याच्या अधिकाराचे. तुम्ही मठातर्फेच्या रयतेकडून गैरसनदी मनास येईल ते मागत होता, म्हणून कळो आले. तरी हे ढंग आम्हास कैसे मानो पाहतात? या उपरीही बदराह वर्तणूक केलिया तुमचा एकंदर तो मुलाहिजा होणार नाही. जो धामधूम करील त्यास जीवेच मारले जाईल. बरे जाणून मौजे मजकुरास तसदी न देणे. ताकीद असे.”

मोरेश्वर पंडितरावांनी मजकूर ध्यानपूर्वक ऐकला. आज्ञापत्र कुणा स्वारामार्फत जोखमीने पाठवावे, याचा ते मनाशी मेळ मांडू लागले. आपल्याच विचारात फिरणाऱ्या राजांनी दुसऱ्या एका आज्ञापत्राच्या विषयाला तोंड फोडले.

“जसे हे पाठवाल तसेच वाई प्रांतातील कसबे निबच्या सदानंद गोसाव्यांच्या मठाबाबतही आज्ञापत्र द्या. मठास ऐवज देण्यास हयगय करीत आहे. त्यांना कलम द्या…

पहिलेपासून मठाचे अन्नछत्र चालिले असता मध्येच ऐवजाबाबे कुसूर करावया गरज काये? याउपरी ऐवज पाववावया बाबे एवढी ती सुस्ती न करणे. पहिलेपासून मोईन असेल, तैसा पाववीत जाऊन अन्नछत्र चालो देणे. धर्मकार्यास खलेल न करणे. उजूर न करणे. जाणिजे!”

रिवाज भरून पंडितराव निघून गेले. राजांच्या मनात मात्र समर्थ आणि मोरयाबाबा यांची जोड ताडून बघणारे, न आकळणारे विचार फिरून गेले.

गणेशचतुर्थीच्या सणाचे दिवस आले. गडावरची राउळे रंगाऱ्यांनी रंगोटीला घेतली. नुकताच पावसाळा उलगल्याने अधूनमधून उन्हाची किरणे गडमाथ्यावर उतरू लागली. गडवाटा मात्र अजूनही शेवाळलेल्याच होत्या. त्यावरून पुन:पुन्हा पाय घसरत असताही बरोबर दुभाष्या शेणवीला घेऊन मुंबईहून आलेले टोपीकरांच्या दरबाराचे दोन वकील गड चढून आले. त्यांची नावे होती जॉर्ज वेल्डन व रॉबर्ट ग्रॅहॅम. राजांनी नव्याने नामजाद केलेले दौलतीचे वकील त्र्यंबक गोपाळही त्यांच्याबरोबर होते.

सुरत लुटणाऱ्या शिवाजीराजांची कीरत ऐकून असलेले गोरे वकील, गोव्यात फिरंग्यांची दैना करणारे त्यांचे पुत्र – राजे कसे दिसत असतील, आपल्याशी कसे बोलतील याचाच विचार करीत होते. त्या चौघांना घेऊन प्रल्हादपंत राजांच्या भेटीसाठी सिंहासनसदरेला आले. गोऱ्या वकिलाने आणले नजराणे पेश केले. रिचर्ड केजविनला लंडनला परत जायला लावणाऱ्या उमद्या राजांना, दोघेही वकील टेकल्या गुडघ्याने रिवाज देऊन निरखू लागले. त्र्यंबक गोपाळांनी आपल्या स्वामींना त्यांचा परिचय करून “मुंबईजवळच्या कार्लास या बेटाच्या सुलुखासाठी आलेत हे गोरे हेजिब मुंबईहून.” प्रल्हादपंतांनी राजांना त्यांचा येण्याचा हेतू सांगितला.

“काय तपशिली कलम आहे त्यांचे सुलुखाबाबत?” राजांनी दोन्ही गोऱ्यांना बारकाईने निरखत विचारले.

“कार्लास बेटाचे हबश्यांपासून संरक्षण करण्यासाठी राजी आहेत टोपीकर. त्यासाठी ते आपली फौज बेटावर ठेवण्यासही तयार आहेत. पण त्यासाठी त्यांचं एक मागणं आहे आपल्या दरबारकडून.” त्र्यंबकपंतांनी राजांच्या कानी घातले.

“कोण वजेचं मागणं?” राजांचे कपाळ आठ्याळ झाले.

ते म्हणतात, “यासाठी आपल्या दरबारनं त्यांना दोन हजार मुदे भात व रुपये पन्नास हजार रोख द्यावेत!”

“बस्स?” राजे आसनाला पाठ टेकत हसून म्हणाले. त्यांच्या मनी, गेली दोन वर्षे भाताच्या कणासाठी दुष्काळामुळे तळमळणारी मुलूखभराची प्रजा फिरून गेली. औरंगजेबाच्या फौजा परतवून लावण्यासाठी खर्ची पडलेला खजिना तरळून गेला. तरी पण त्यांनी विचारले, “तुमचं काय मत प्रल्हादपंत?”

“घातल्या त्या दरबारनं अटी म्हणजे त्या मान्य केल्या, असं होत नाही. थोडं ओढून धरलं, तर भाताची आणि रोख रकमेची मागणी घटवतील टोपीकर.” प्रल्हादपंतांनी आपला सल्ला दिला.

“तुम्हास काय वाटतं त्र्यंयकपंत या अटींबाबत?”

त्यावर राजांनी आपल्या वकिलांना चाचपले. स्वामीच कौल देतील या आशेने बघणारे त्र्यंबकपंत गोंधळले. म्हणाले, “जी. मोगली फौजांचा ताण दौलतीवर आहे. निभत असेल ही बेटाची बाब परस्पर, तर सुलूख मान्य करावा.”

“नवीन असलात तरी वकुबाचे आहात त्र्यंबकपंत!” राजांनी मध्येच त्र्यंबकपंतांना कौलच वाटावा असे हसत म्हटले, “न्यायाधीश, करावयाचाच तर ओढूनताणून सुलूख कशासाठी? यांना सांगा, आम्हास मान्य आहेत त्यांच्या अटी! त्यांनी तातडीनं बेटाच्या राखणदारीसाठी आपल्या फौजा पाठवून द्याव्या.” त्र्यंयकपंत आणि न्यायाधीश एवढ्या तडकाफडकी तह झाल्याचे आश्चर्य वाटून राजांकडे बघतच राहिले.

ग्रॅहॅम आणि वेल्डन नजराणे मिळताच खूश झाले. आपला तह लवकर फते झाला हे आपल्या नव्या विजरईला सांगायला ते मोकळे होते.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २००.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment