धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०४ –
दोन महिने झाले. गडावरची माणसे हवालदिल झाली. आषाढाचे दिवस आले. राजांच्या फक्त खुशालीचे स्वार गडावर येत होते. गांगोली संगमेश्वरात पंथाची उपासना चालूच होती. शिवयोगी कुलेश राजांना “गडी चला – परतू या” म्हणून विनवून थकले होते. राजे कुणाचे काही ऐकत नव्हते. कुणाशीच बोलत नव्हते.
शंभूदेहात राहून त्यांचा प्रलयंकर शिवाला “शक्तीच्या रूपात’ साद घालणारा भोसलाई आत्मा, खुद्द त्यांनासुद्धा जीवनाचे टोक हाताशी गवसू नये, अशा संवादात गुंतला होता. कसला संवाद?
“पुरंदर! जिथं आम्ही जिंदगीचा पहिला श्वास घेतला. सासवडच्या कऱ्हा नदीच्या काठी असलेल्या सोपानदेवांच्या समाधीलगतचा. केवढी फिरली ही पावलं पुरंदरावर आकार घेतल्यापासून! आमच्या जन्मदात्या मासाहेब आम्हास नीट याद येत नाहीत. त्यांची जागा घेतली थोरल्या आऊंनी, धाराऊनं. काय योग हे! शेवटच्या क्षणी आम्ही नाही भेटू शकलो आबासाहेबांना, धाराऊला. थोरल्या मासाहेब आमच्या समोरच पाचाडवाड्यात गेल्या. सती गेल्या मासाहेबांना तर आमच्या हातांनीच द्यावा लागला चूड आम्हास. खरंच! मर्थुरेहून त्रिमलांच्या सोबत मुलखाकडं यायला निघतानाच गवसतो आम्ही पेरल्या पहाऱ्यांच्या तावडीत तर? पन्हाळ्यावर आम्हाविरुद्ध रचलेला विषप्रयोगाचा कटाव सफल होता तर? करता जेरबंद दिलेरच आम्हास आपल्या गोटात तर? केवढ्या प्राणघाती कृष्णच्छायेतून गेली ही हयात!
“गडकोट, जामदारखाने, खजिने यांची, रायगडाच्या सिंहासनावरची हवस वाटली आम्हास? उगाच सख्ख्या बहिणीला पाठमोर होऊन आमच्या पाठीशी उभे राहिले हंबीरराव? उगाच दिली त्यांनी आपली लाडकी ताराऊ आमच्या एका शब्दाखातर रामराजांना? का म्हणून आले शहजादा अकबर आणि दिलेरचा भाऊ मिरबातखान आम्हाकडं? समर्थ म्हणाले, ‘आबासाहेबांहून विशेष ते करावे.’ आम्ही ते मानलं का? नाही. का? आबासाहेब आकृती – आम्ही केवळ सावली, हे बरं समजून आहोत आम्ही.
“येता औरंगजेब फौजबंद होऊन आबासाहेबांच्या हयातीत दक्षिणेत, तर जाते त्यास शरण ते? कधीच नाही. दुर्गाबाईंच्या रूपे जो गुदरला तसा प्रसंग औरंगच्या बेट्यावरही कधी गुदरू नये, असेच का वाटत आले आम्हास?
“हा औरंगचा आणि आबासाहेबांचा – आमचा खाजगीचा जंग आहे? नाही. दोन वृत्तींचा जंग आहे, असं एकल्या आम्हासच का वाटतं? पाण्यात ढेकळं विरघळावीत, तसं मी-मी म्हणणारे का होतायत या दौलतीस पारखे? की त्यांनाही वाटतं ही एकल्या भोसल्यांची दौलत आहे म्हणून? नवरात्रात जगदंबेचा गोंधळी तिला आळवताना ऐकलं आम्ही – “कुठवर पाहू वाट – माझ्या नेत्रा भरला ताट…’
“कशाच्या पाठबळावर जगत असतो, धडपडत असतो माणूस? का? आज तेच बळ कमी पडलं असं का वाटतं आहे? मामासाहेब हंबीरराव गेले म्हणून? लगतच्या दोन्ही शाह्या पडल्या म्हणून? साऱ्यांनी एकजुटीनं कंबर कसली तर निभाव लागू नये, अशा औरंगसमोर आमचीच माणसं आम्हाला पारखी झाली म्हणून?’
सवालाचे शेपूट धरून सवाल खडे ठाकत होते. त्यांची उकल व्हावी, असा जाब मात्र गवसत नव्हता. बाहेर आषाढी पावसाखाली मावळमाती कशी झोडपून निघत होती.
“तुम्ही छंदोगामात्य असाल, कुलएख्त्यार असाल, पण आम्ही महाराणी आहोत. गडावर पेशवे आहेत. पाऊस माऱ्यातून गनीमफौजा मुलखात दौडताहेत. मोक्याच्या गडकोटांना घेर पडताहेत. आणि तुम्ही… तुम्ही स्वारींना गडाबाहेर काढून ऐषारामात! कोण मजाल ही?” रायगडाच्या दरुणीमहालात अनावर संतापाने लालेलाल झालेल्या येसूबाई उभ्या देही थरथर कापत होत्या. त्यांचे ते रूप बघून दिमतीच्या कुणबिणीही थरकून गेल्या. त्यांनी राणीसाहेबांना ‘असं’ कधीच नव्हतं बघितलं.
समोर उभे कवी कुलेश ते राजबोल ऐकूनच लटलट कापू लागले. काय जाब द्यावा, हे न सुचल्यामुळे त्यांची गर्दन खाली गेली होती. खांद्यावरचे गुलाबकाठी उपरणे थरथर कापत होते. खास खबरगीर पाठवून येसूबाईनी त्यांना संगमेश्वराहून तातडीने बोलावून घेतले होते. पेश येताच जबानीवर घेतले होते.
“परंतु रानीसाब – हमारी सुनिये – हम.” कुलेश बोलू बघत होते. महाराणी त्यांचा एक शब्दही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. स्वत:शी बोलाव्या तशा त्या कुलेशांना सुनावीत होत्या. बेलाग फडाफड बोलत होत्या.
“पावली चंडी? झाला तिचा कृपाशीर्वाद? कधीच का केली नाही, अशी उपासना आमच्या आबासाहेबांनी? केवढं होतं गुदरलं त्यांच्यावर? तुम्ही कवी म्हणवता – कसा शिरला कली तुमच्यात?” येसूबाईच्या कानीही उठलेल्या आवया पडल्या होत्या. अंगाचा तिळपापड झाला होता त्यांचा, त्या ऐकून. मध्येच थांबवून त्या कवींना कुडीभर न्याहाळत होत्या; संशयाने.
“कलुशा बादशहाचा हस्तक आहे!” ही कानी पडलेली जहरी बातमी तर त्यांच्या मनी टिटवीसारखी कर्कश केकाटत होती. काय बोलावे – कसे बोलावे त्यांना समजेना.
“आमच्या कानी आलंय तुमचं कर्तुक. बादशहाच्या बतीनं फितवा करून स्वारीला भलत्याच वाटेस लावणारी तुमची हवस जाणून आहोत आम्ही. शरम कशी वाटली नाही तुम्हास स्वामींच्या खाल्ल्या अन्नाचे असे पांग फेडताना? त्यांच्याशी खेळ ही आमच्याशी गाठ आहे हे समजून असा छंदोगामात्य!” असह्य संतापाने, कोंडीने येसूबाईना नीट बोलताही येईना.
अंगभर चरकलेल्या कुलेशांचे डोळे डबडबून आले. डुईवरचा पगडीघेर त्यांनी डुलविताच आसवांचे दोन थेंब त्यांच्या डोळ्यांतून उडाले. काय केले नव्हते त्यांनी दौलतीसाठी? मथुरेहून राजांना बालपणी सुखरूप पाठविण्यात त्यांनी थोरल्यांना निष्ठेने, धोका पत्करून मदत केली होती. राजांच्यावतीने शहजादा अकबरासह फिरंगी दरबारात वकिली जमवून तह साधला होता. जीव गलबलून उठला त्यांचा. झटकन पुढे होत त्यांनी राणीसाहेबांचे पायच धरले. त्यांनाही धड बोलवेना.
“रानीसाब, चाहे तो गर्दन उडा देना हमारी। हम… कुलदेवताकी शपथ लेते है, चरणोंमे… हम – हम बेमान नहीं। कुछ भी कीजिये… हमारे राजासाब को, बडे स्वामीके इस दौलत को बचाइये।” लहान मुलासारखे छंदोगामात्य स्फुंदू लागले.
येसूबाई सुन्न झाल्या ते ऐकताना. झाल्या प्रकारात कुलेशांचा दोष नव्हता. असता तर ते राणीसाहेबांच्या भेटीलाच आले नसते. ते आलेच नसते, तर मागचा पुढचा कसलाही विचार न करता निळोपंत, खंडोजींना फौजबंदीने धाडून त्यांना जेरबंदच केले असते येसूबाईंनी.
मग दोष होता तरी कुणाचा? राजांचा? एवढे बऱ्हाणपूर ते पणजी घोडे फेकणारे, प्रत्यक्ष औरंगलाच पिछाट घ्यायला लावणारे राजे. त्यांच्याबद्दल असे म्हणायची शामत तरी होती कुणाची? दोष असलाच तर होता, सभोवार पसरलेल्या असंख्यात कोत्या मनांचा. लालचावलेल्या कैक जिवांचा. हाती पेटती मशाल द्यावी आणि वर धरायला कोणतेच छत न देता ऐन पावसात उभे करून ती तेवती ठेवा, असे सांगावे तशी गत झाली होती राजांची. कुणी केले होते हे! जगदंबेनेच. नाहीतर “आशीर्वादाचं बळ कमी पडतंय’ असे तरी का यावे त्यांच्या मनी?
येसूबाई काहीच बोलल्या नाहीत. मनोमन काहीएक पक्का निर्णय घेऊन त्यादालनातून निघून जाताना कुलेशांना एवढेच म्हणाल्या, “आता आमच्या जागी तुम्ही आहात. सावलीसारखे स्वामींच्या पाठीशी असा. आजच गड सोडा.”
कुलेश संगमेश्वरला येऊन पोहोचले. लागलीच त्यांना राजांची आज्ञा झाली. “तुम्ही टाकोटाक खेळण्यास दाखल व्हा. शिर्काणात काही गडबड दिसते. त्यावर ध्यान ठेवा. मामला घरचा आहे. प्रसंगी आम्हाला लिहा. आम्हीच सोडविला पाहिजे तो.”
राजांच्या कानीही शिर्क्यांनी उठविलेल्या आवया व त्यांच्या संशयास्पद हालचाली आल्या होत्या. बेळगावचा कोट जिंकून कोल्हापूरकडे सरकलेल्या शहजादा आझमला गणोजी, कान्होजी भेटत होते. घटकाघटका त्याच्याशी कसलातरी गुफ्तगू करीत होते.
आज्ञा मिळाली तरीही कुलेश महाराणींच्या सूचनेप्रमाणे राजांच्या जवळच राहिले. संगमेश्वर गांगोलीच्या वाड्यात समद्य शक्तीची पूजा चालूच होती. ती कधी थांबणार की नाही, असे भय निर्माण झाले. संगमेश्वरचे देसाई, गांगोलीचे कारभारी, खिदमतगार पुरुषा, एवढेच काय पंथाचे अधिकारी प्रत्यक्ष शिवयोगी; कुणीच राजांसमोर काही बोलू धजत नव्हते. कुलेशांची तर अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीगत अवस्था झाली
राजे कुणाशीच काही बोलत नव्हते. आवतीभोवती सेवा करणारे एक-दोन खिदमतगार सोडले, तर दुसऱ्या कुणाला थांबू, फिरकू देत नव्हते. त्यांच्या एकाच बाबीवर स्वत:शी खल चालला होता, ‘हे राज्य आम्हा एकल्याचंच आहे का? तसं नसताही तसं का वाटतं आहे?’ सवाल उठत होता, साद काही मिळत नव्हती.
ऐन समोरची चंडी त्यांना नानारूपात दिसताना भासू लागली. कधी ती जगदंबेचे रूप घेत होती. कधी थोरल्या मासाहेब, धाराऊंचे रूप धारण करीत होती, कधी तिच्या डोळ्यांतूनच समर्थ आणि आबासाहेब रायगडाच्या महाद्वारातून बाहेर पडल्यागत दिसत होते. कधी तोफगोळा आदळून तिच्या छातीच्या ठिकऱ्या होऊन आसमानात उडताना दिसत होत्या – हंबीररावांसारख्या!!
बाहून-घडून गेलेले सारे प्रचंड गतीने त्यांच्या डोळ्यांसमोर धावत होते. एरव्ही कुणाचेही काळीज चरकून जावे, असा तो पट होता. पण शेतकऱ्याने शिवाराकडे, बांधाकाठी राहून बघावे, तसेच राजे आपल्या उभ्या हयातीकडे तिऱ्हाईतपणाने बघत होते. न कचरता, मनाचा टवका उडू न देता. पुन: पुन्हा त्यांच्या डोळ्यांसमोर येऊन थिरावत होती ती फक्त एकच एक मुद्रा – आबासाहेबांची! पन्हाळ्यावर अखेरची ऊरभेट घेताना, हात पसरते कवेत घेऊ बघताना म्हणणारी, “लेकरा, कुठं गेला होतास?”
जामदारखान्याचा, अंबारखान्याचा तपास घ्यावा, तसे त्यांचे मन आपल्या उभ्या हयातीचा तपास घेत होते – “ज्या तडकाफडकी आम्ही दिलेरच्या गोटात जाऊन आबासाहेबांस पारखे झालो त्यानं – त्यानंच खचले ते. आबासाहेब, केवढा थोर कलंक घेतला आहे आम्ही एवढ्या बाबीनं आमच्या हयातीवर. निघेल कधीकाळी तो धुऊन? मिळेल ती संधी?’ राजमनात कसली भिंगरी फिरते आहे, याची ना कुलेशांना, ना शिवयोग्यांना; एवढेच काय प्रत्यक्ष चंडीलाही कल्पना नव्हती!
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०४.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.