धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०५ –
आता सरत्या पावसाळ्यावर श्रावणासरींचा खेळ सुरू झाला. पुरी कोकणपट्टी पिवळ्या, हिरव्या कुरणांच्या लाटांनी क्षणात उजळून निघू लागली, क्षणात झाकाळून जाऊ लागली. या वेळी विजापुरात महामारीची साथ पसरली होती. भागानगरात देखणा, बांडा तानाशाहा आपल्या नेक सरदारांसह दोरखंडांनी जखडबंद होऊन औरंगजेबाच्या कोठडीत अस्वस्थ फेर घेत होता.
रायगडाहून उधळलेला खबरगिरांचा म्होरक्या नाईक बहिर्जी श्रावणसरी अंगावर घेत धापावत संगमेश्वरला देसायांच्या वाड्यात शिरला होता. जिवाची बाजी लावून त्याला दौलतीचा ताईत पुन्हा नेऊन रायगडाच्या दंडात बांधायचा होता. महाराणींचा अतिमोलाचा कठोर, कडक तसाच एकदम खाजगतीचा खलिता त्याने संगती आणला होता. कुणाची पर्वा न करता चिंताक्रांत बहिर्जी खांद्यावरची कांबळी खोळ मुठीत घट्ट पकडून थेट देसायांच्या वाड्यात चंडीच्या दालनात घुसला.
यज्ञकुंडाजवळ भगवी वस्त्रे नेसून बसलेल्या राजांना बघून चरकून क्षणैक थांबला. केवढी पालटून गेली होती राजांची मुद्रा! श्राद्धाचे विधी पार पाडण्यासाठी उभ्या राहिलेल्या आप्तेष्टांसारख्या दिसणाऱ्या कुलेश, शिवयोगी आणि शिष्यगण यांच्याकडे ढुंकूनही न बघता न राहवून म्हणाला, “धनी, गडास आलुया पाऊसपान्याचं. ऊर फुटेतो. वळी दिलीया ही रानीसायबांनी. म्होरं घालून घेऊनच यायला सांगितलंय धन्यास्री.” बहिर्जी रिवाजाचा जोहार द्यायलाही विसरला होता.
राजे बैठकीच्या व्याघ्रचर्मावरून उठले. यज्कुंडाजवळून बहिर्जीकडे चालले. शिवयोगी, कुलेश, शिष्य, पुरुषा एवढेच काय; प्रत्यक्ष चंडीचेही काळीज धडाडले. आता नायकाची खैर नाही, असेच सर्वांना वाटले. थोरल्यांपासून बहिर्जीने केलेली नेक चाकरी सारे जाणून होते. सुरतेपासून मद्रासपावेतो भुईचा चकता पायांखाली घेतला होता, बहिर्जीनी दौलतीच्या सेवेसाठी. येसूबाईच्यासाठी तर गणोजी पारखे झाल्यापासून त्यांचीच जागा घेतली होती बहिर्जीने. सख्ख्या भावाची. येसाजी कंकासारखी डुई, ओठांवरची केसावळ पांढरी झाली होती, बहिर्जी नाईकांची भोसल्यांच्या सेवेत. राजांना येताना बघून चरकले नाहीत, ते एकले बहिर्जीच.
आता राजे काही बोलणार तोच सय झाल्या बहिर्जीने झटकन वाकून पायच धरले त्यांचे. डुईवरचे रामोशी पागोटे हालवून गदगदत म्हणाला तो, “आन हाय बिरूबाची. लय झाली ही ताकदीची पूजा. धनीच असं एकलं हुतो म्हणालं, तर मुलखाच्या आयाबापड्यांनी बघावं कुणाकडे? बास झाली ही चंडी, तकडं जगदंबा इदूळ धरनं वाट बगतीया. चला बघू आमासंगे. नायतर टाका या म्हाताऱ्याला ह्या कुंडात.”
राजांच्या हातातली समिधांची छोटी जुडी गळून फरशीवर पडली. चंडी, कुंड, बहिर्जी असे ते टकमक बघू लागले. ते कमरेत वाकले. सर्वांना वाटले पडली मोळी उचलायला ते झुकलेत. पण त्यांनी आपल्या दोन्ही पायांवर डोके भिडवून ते डावे- उजवे डोलवीत स्फुंदणाऱ्या बहिर्जीच्या पाठीवर तळहात ठेवला. सूर्यबिंबातून किरण सुटावेत तसे तुटक बोल बहिर्जीच्या कानी पडले, “नाईक, कुचाचा सरंजाम ठेवा. तुम्हा संगतीच निघू आम्ही गडी.” खांदे धरून त्यांनी बहिर्जीला उठते केले. त्याने दिलेली खलिता वळी स्वत:च खोलून त्यावर नजर फिरविली. डोळ्यांसमोर लिखावट फिरली त्यांच्या. श्रींच्या राज्यासाठी श्रीसखींनी रेखलेली –
“झाली तितुकी चंडीची भक्ती पूजा पुरे झाली. एक चंडी स्वारीस पाऊन शक्ती देते तर काय? अवघा मुलूख शक्तिपात झाल्यागत झाला आहे. देखतपत्र, स्वार होऊन नायकसमेत निघोन यावे. ना तर -ना तर आम्हीच निघोन येऊ. आबासाहेबांनी दिधली शिक्केकट्यार आणि श्रीसखी ही मुद्रा यज्ञकुंडात टाकून आम्ही पंथाचे भक्त होण्यासाठी गड सोडून तिकडेच येऊ!”
छत्रपतींनी हातचा खलिता मुठीतच आवळला. त्यांच्या आज्ञेप्रमाणे खासातळ हालविण्याच्या तयारीला सगळे लागले. कुलेशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आपल्या दिमतीसह खेळण्याची वाट धरली.
या वेळी विजापूरच्या शाही मशिदीत नमाज पढून आलेला औरंगजेब आपल्या वजीर असदखानाला सांगत होता – “हमने कसम ली हे, आज नमाज पढते समय कुराने शरीफकी। सेवाके बच्चेका ये तख्त बिखोबुनियाद उखाड देंगे जैसा यहाँ, गोवलकोंडामें लगाया वैसा लगा देंगे चांदतारोंका निशान रायगढपे। शहजादे आझमको लिखो संबापर जासूद फेको, उसका पिछा जारी रखो।”
बालेकिल्ल्याच्या तटबंदीबाहेर मात्र महामारीने मेलेल्या गरीब आदिलशाही रयतेची प्रेते चुपचाप कबरस्तानाकडे नेली जात होती. गांगोली-संगमेश्वर दोन्ही ठिकाणच्या पंथस्थानातील मूर्ती सांगता करून राजाज्ञेने हलविण्यात आल्या. व्याघ्रचर्माच्या वळ्या काखोटींना मारून शिष्यगणासह आले तसे शिवयोगी निघून गेले. पंथाचे एक प्रचंड वादळ राजजीवनात घोंघावत डोकावून सरकून ठेवून गेले. शंभूमनात शक्तिशाली शिवाचा भक्तिभाव जागा झाला होता, तो तसाच रेंगाळता ठेवून गेले.
रायगडी आलेले राजे निळोपंतांनी कानी घातलेल्या तपशिलाने बेचैन झाले होते. पेशव्यांनी खालमानेने राजांच्या कानी घातले होते की, “होनगड हसनअलीखानानं आणि त्र्यंबकगड मातब्बरखानानं पाडला आहे.” मतलब साफ होता. मोगलांनी नाशकापर्यंत धडक दिली होती.
जिकडे शिर्क्यांच्या बंदोबस्तासाठी कुलेश निघून गेले होते, त्या खेळणा व प्रचितगड भागात नागोजी माने व मुलतफितखान यांचे जोडतळ पडत होते. प्रचितगडावरच्या नेक किल्लेदाराने त्यांच्याशी हातघाई करून प्रचितगड राखला होता.
निजामशाही मोडताच आदिलशाहीकडे जाताना ज्या माहुलीच्या किल्ल्यावर थोरले महाराज शहाजीराजे यांनी आसरा घेतला होता, त्या माहुलीचा किल्लेदार स्वराज्याला हूल देत होता. किल्ल्याच्या भोवती फटका टाकणाऱ्या अब्दुल कादर या मोगली सरदाराशी तो संधान बांधू बघत होता. भरपेट इनाम दिले, तर किल्ले माहुली त्याच्या घशात सोडायला तयार झाला होता.
कानी पडणाऱ्या एका-एका वार्तेने राजमन कुरतडले जात होते. त्यातच कुडाळचे देशाधिकारी नीळकंठ नारायण राजांच्या भेटीस आले. त्यांनी तर चक्क तह केला होता. कसला? तर आमचे कुडाळचे वतन “बादशहानी राखून चालवावे. आम्ही कोकणपट्टीचा वरकड मुलूख जिंकून बादशहास द्यावयास तयार आहोत’ असा.
गडावर आल्यापासून महाराजांची येसूबाईशी भेट झाली नव्हती. कशी व्हावी? पंथाचा सल दोन्ही राजमनात खुपत होता. हटता पावसाळा धरून मोगलांच्या हालचाली वाढल्या होत्या. विजापूरहून औरंगजेबाचे शहजादा आझमला कोल्हापूर- मिरज भागात खलित्यावर खलिते जात होते. हंबीरराव पडताच राजांनी सरलष्कर म्हणून नामजाद केलेले म्हलोजी घोरपडे पन्हाळ्याच्या आसऱ्याने शहजाद्याच्या चाली थोपवीत होते. खंडोजी, पेशवे, खबरगीर यांनी कानी घातलेले बारकावे छत्रपती मनाशी घोळवीत होते. वर्दी घेऊन आलेल्या चांगोजी काटकराने त्यांची तंद्रा तोडली. तो म्हणाला, “कल्याण प्रांतांचे सूर्याजी अन् बोपजी प्रभो आल्यात भेटाय.” चांगोजीला इजाजत देऊन राजांनी प्रभूबंधूंना भेटीस बोलावून घेतले. प्रभूंनी परगणे साक्से, पंचमहाल, पणे येथील आपल्या जमिनींच्या कथल्यांची बाबत राजांना सांगितली. शांतपणे प्रभूबंधूंचे बोलणे ऐकून राजांनी न्यायाधीश प्रल्हादपंतांना निवाड्यासाठी बोलावून घ्यायला सांगितले.
पंत आले. बारकाव्याने पाहिले असते, तरच त्यांची मुद्रा कावरीबावरी आहे, हे कुणालाही कळून येते.
“या प्रभूबंधूंची काय चलबिचल आहे बघा न्यायाधीश?” राजे कसल्यातरी विचारात असल्याने म्हणाले. प्रभूंना निरखत न्यायाधीशांनी टाकला.
“या. आम्हा सोबत दफ्तरात” असे प्रभूंना म्हणून प्रल्हादपंत जायला वळले.
“वादळवाऱ्यातही झाडेपेडे डुलली तर चालतात, पण मुलखातले कडे थरकून नाही भागत, असे बोललो होतो आम्ही तुम्हाला एकदा न्यायाधीश. ते ध्यानी ठेवून यांचा निवाडा करा.” राजे त्यांना सूचना म्हणून म्हणाले. ते ऐकून, “जी” म्हणताना पाठमोऱ्या प्रल्हादपंतांच्या पापण्या फडफडल्या, डोळ्यांच्या बाहुल्या क्षणैक गरगरल्या.
औरंगजेबाचा, त्याने पेरलेल्या खानांचा, फितलेल्या जागजागच्या किल्लेदारांचा, फोंडा, कुडाळ, कारवार येथील देसाई, सावंत, दळवी यांचा विचार करत महाली फेर घेणाऱ्या राजांकडे कुणबीण रूपा पेश होऊन म्हणाली, “रानीसाब येत्यात.”
क्रमशः………..!
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.