धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०६ –
राजमन ढवळून गेले. किती विषय होते बोलायला! भाषा कोणती? किती आरोपसफाया होत्या! कुणीतरी ढकलल्यासारखे राजे आपसूकच झरोक्याशी झाले. येसूबाई आल्या. त्यांनी महालभर नजर फिरविली. महालातले पहारेही मतलब पकडत बाहेर निघून गेले. विचित्र शांतता दोन राजमनांत कुचमून पडली. गळ्याच्या घाट्यापर्यंत आलेले शब्द थडकून परतत मनातच पडू लागले. “एक सांगण्यासाठी आलोत आम्ही.” येसूबाई घोगरल्या. राजांनी वळून नुसते श्रीसखींच्याकडे बघितले.
मान डोलवीत येसूबाई म्हणाल्या, “ऐकावं आमचं. शरमिंद्या आहोत आम्ही. ज्या वजेनं शृंगारपुरानं माहेराकडून स्वारींच्याबाबत आवया उठविल्या, त्या कानी आल्या आहेत आमच्या.”
“येसूः…” आभाळात वळीव भरून यावा, तसे शंभूनेत्र डवरले. पुन्हा शांततेने पंख फाकले. काय बोलावे दोघांनाही साधेना. डोळ्यांसमोर गणोजी आणि पिलाजी यांच्याच मुद्रा उभ्या राहिल्या दोघांच्याही.
“आमच्या गुणं खूप तापदरा झाली आहे तुम्हांस. बोलली शृंगारपूरची माणसं काही, तरी वाटत नाही त्याचं एवढं, तुम्हाकडं बघताना.” झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या आभाळाच्या निळाईत नजर रोवत राजे संथ, घोगरट म्हणाले. “तसं काही उणंदुणं बोलायचा अधिकार नाही आमच्या दादा, आबांना स्वारींबाबत. शिवारातला पेरा मागं टाकतो कुणबी, तसं झालं. घडलं मागं टाकावं स्वारीनं. आबासाहेब आणि स्वारी जोडीनं अडकून पडली आगऱ्यात त्याहूनही बाका प्रसंग आहे सांप्रत. गनिमांनी चौफेर पाय पेरलेत आणि आपल्यांनी मात्र ते फिरविलेत! ” बोलल्या येसूबाई मनाच्या कढाने भरून आल्या. आवाज धरल्याने क्षणभर रुकल्या.
“याद आहे तुम्हाला? रानवाऱ्याशी बाशिंग बांधलंय आम्ही, असं म्हणाला होता एकदा तुम्ही.” राजे पाठमोरेच म्हणाले. पसरले पंख शांततेने अधिकच फुलविले.
“जातात कधी आमचे बाळराजे रामराजांच्या वाड्यात? बोलतात ते त्यांच्याशी घरच्यासारखं?”’ तो विषयच तोडावा म्हणून राजांनी विचारले.
“जी.” रामराजे, ताराऊ आणि बाळराजे यांच्या बिल्वदलासारख्या तीन मूर्ती डोळ्यांसमोर तरळल्याने येसूबाईंनी हुरुपाने दाद दिली.
बराच वेळ राजे आणि येसूबाईंचे बोलणे चालले. महालात आलेले रोषणनाईक कोनाड्या-कोनाड्यांतील पलोते हातच्या दिवल्यांनी शिलगावून गेले.
असेच कुडाळच्या भुईकोटातील बैठकमहालातील पलोते भकभकत होते. त्यांच्या उजेडात लोड-गिरद्यांच्या बैठकीवर बसलेले खेमसावंत, जलालखान आणि दुलबा नाईक यांच्याशी खलबतात गेले होते. कसल्या? तर दौलतीतल्या चंदगड तरफेच्या किल्ले पारगडावर चालून जाण्याच्या!
आता थंडीने अंग धरायला सुरुवात केली. खंडोजी, निळोपंत, चिमणगावकर यांना याद घेऊन राजे एवढ्या पडझडीच्या काळातही गावोगावच्या वतनदारांना खलिते पाठवीत होते. जे खाशा वकुबाचे होते, त्यांना शंकराजी, निळोपंत, खंडोजी कुणी ना कुणी सोबत घेऊन जातीने भेटत होते. साऱ्यांना पिळवटून सांगत होते, “दोन दिवसांचा गनीम, त्यासी साथ देते होऊ नका. जसा आमचा रामसेज झुंजला तसे हरगावकूस निकरानं लढते.
येसाजी कंक, रूपाजी भोसले, बारदरमल, संताजी जगताप, जानराव, धनाजी यांच्या अटीतटीने चौफेर पांगलेल्या तळांना राजे भेट देत होते. विचारला तर हरजींना कर्नाटकात अचूक सैन्यचालीचा सल्ला स्वारामार्फत तातडीने धाडत होते. औरंगच्या टोळधाडीसमोर त्यांना ना मराठी मुलूख, ना कर्नाटक डळमळू द्यायचा होता. परत आलेले सर्जराव जेधे नेकीने चाकरीला लागले होते. पन्हाळा, खेळणा, राजापूर असा पट्टा धरून म्हलोजी, कुलेश, गंगाजी दादाजी सावधानगीत होते. पुरंदर, पुणे, वाई, सातारा भागात बाजी घोलप, विनायक उमाजी, येसाजी मल्हार, कोनेरे रंगनाथ असे मर्दाने हत्यार परजून ठाकेठीक होते.
अशाच एका थंडीच्या दिवशी येसूबाई आपल्या स्वारीच्या आवडीचे वाफारते, गरम हुलग्याचे माडगे कटोऱ्यात घेऊन राजांच्या भेटीस आल्या. त्यांनी कटोरा चौरंगीवर ठेवला. त्यातून उफाळत्या वाफांकडे बघत राजांनी त्यांना विचारले, “किती दिवस झाले नाही माडग्याला?” झटकन कटोरा उचलून स्वारीच्या हातात देत येसूबाई म्हणाल्या, “स्वारीचं ध्यान नसतं खाण्याकडं आताशा. बघावं चाखून जमलंय का.” राजांनी माडगे चाखले. हसून ते म्हणाले, “छान जमलंय.” आणि मग हातच्या वाडग्याकडे ते बघतच राहिले.
“हे काय?” येसूबाईंनी नाराज होत विचारले.
“नाही. आम्ही विचार करतो आहोत, कितीतरी मोहिमांचे बेत आखले असतील आबासाहेबांनी असं माडगं चाखत असताना. तुम्ही आम्हाला दिलं तसंच देत असतील माडगं आमच्या मासाहेब आबासाहेबांना. बोलताना बोलले असतील दोघेही केवढंतरी जिवाभावाचं!”
ते ऐकताना आपल्या स्वारींच्या मासाहेब कशा दिसत असतील याचा अंदाज ताडण्यासाठी येसूबाई राजांच्या मुद्रेकडे निरखून बघू लागल्या. मोठे गमतीदार होते ते चित्र. हातच्या कटोऱ्यात आपले आबासाहेब आणि मासाहेब यांचे रूप मनोमन बघणारे छत्रपती आणि त्यांना तसे बघणाऱ्या महाराणी. येवढ्यात राया-अंताच्या हातांना धरलेले बाळराजे आपल्या दोघा काकांना काहीतरी विचारीत महालात प्रवेशले.
आल्या-आल्या त्यांनी तक्रारच गुदरली. “त्या काका महाराजांच्या वाड्यात आम्ही जाऊ तेव्हा नेमके न्यायाधीश आणि दोन असामी असतात. आम्ही गेलो की बोलायचंच थांबतात. का? आमचं येणं आवडत नाही त्यांना?”
ती बाल-तक्रार ऐकताना महाराज गंभीर झाले. “न्यायाधीश रामराजांच्या वाड्यात का जात असावेत? छे? कानी पडणाऱ्या फितव्यांच्या खबरांनी आपलं मनच कातर झालं आहे.’ मनी आला शक त्यांनी झटक्यात उडवूनही लावला. राया-अंताकडून बालराजांना आपल्या जवळ घेत त्यांना थोपटून म्हणाले, “तुम्ही आपले आपल्या काकीसाहेबांनाच जाऊन भेटत चला. तिथं असणार नाहीत, कुणी अशी मोठी मंडळी.” ताराऊंच्या उल्लेखाबरोबर राजांच्या मनी हंबीररावांची मुद्रा खडी ठाकली. वाईच्या लढाईत ते गेलेत असे अजून मन घेतच नव्हते. पेटल्या टेंभ्याच्या तेवत्या ज्योतीभोवती निळसर प्रकाश-कड थरथरताना दिसावी, तशी सरलष्कर हंबीररावांची मुद्राच राजनेत्रांसमोर खडी ठाकली. तीच तिन्ही टाकं उचललेली लाल पिळाची डुईची घेरदार कंगणी पगडी, ओठांवरून फिरून गालावरच्या कानकल्ल्यात मिसळून गेलेले भरदार मिश्यांचे कंगोल, कपाळीचा गंधटिळा, कानातले चमकते सरलष्करपदाचे मानकरी डौलदार सोनचौकडे, मूळची लालबुंद पण पल्ल्याच्या दौडींनी रापलेली रातांब्यागत दिसणारी करडी, पण भाबडी मुद्रा. राजे हंबीररावांच्या आठवणीतच डुंबून गेले.
बाळराजे त्यांना कितीतरी वेळ सांगत राहिले, “महाराजसाहेब – महाराजसाहेब, तुम्हाला नेलं होतं, थोरल्या आबांनी लहानपणी उत्तरेकडं. खूप दूर. तुम्ही नाही ना नेत कधी आम्हाला गडाखाली. आम्हाला स्वप्न पडलं होतं -”
बडबड्या बाळराजांना पुन्हा राया-अंताच्या हवाली करताना राजांनी विचारलं, “आमच्या धाराऊची छत्री कापूरहोळात उभी झाल्याचं कैकदा बोललात. पण दर्शन घ्यावं, ते जमलं नाही. एकदा जावं म्हणतो होळाकडं. कोण-कोण आहे तिकडं?”
“जी. समदी हाईत. आम्हा दोघांचं कबिलं, म्हातारा, पोरंठोरं.” धाराऊच्या दुग्धाळ आठवणीने सारेच विचारगत झाले. कुतुबशाहीचे भागानगर पडून एक साल उलटले. बागलाण, खानदेश, वऱ्हाड, पुणे, सातारा, पन्हाळा दौलतीची उगवती धरून जागजागी औरंगचे फौजबंद सरदार पांगले होते. आता त्याला आदिलशाहीचा सर्जाखान, फिराजजंग आणि असेच दोन्ही शाह्यांचे काही सरदार मिळाले होते. तरीही फितुरीने काही गडकोट घशात घालण्याशिवाय त्याच्या पदरात फारसे काही पडले नव्हते.
राजांच्या आरमारी फळीने टोपीकर, फिरंगी-हबशी आपल्या जरबेत ठेवले होते. औरंगजेब मनोमन ताडून होता की, जसा विसापूर, गोवळकोंड्यावर दिला तसा नुसता फौजी रेटा देऊन “शिवा-संभा’चा हा मुलूख दस्त होणार नाही. दोन सालांपूर्वी त्याने याचा अनुभवच घेतला होता. त्यासाठी शहजादा आझमला धारेवर धरून तो बजावीत होता. “पिछा करो, चाहे जितने दिनार खर्च करो लेकिन मरहठोंका सुबेदार दस्त करो। जिंदा या मुर्दा पेश करो। यूँ उसका मुल्क गिर जायेगा।”
राजांनीही हे मनोमन ताडले होते की, औरंगची ताकद माणसे फोडण्यात आहे. त्यासाठी ते एवढ्याशा कामगिरीसाठी सुद्धा संबंधितांचा मरातब करत होते. चहूबाजूचे गाव अन् गाव अटीतटीने मोगल फौजांशी झुंजत होते. नेहमीची खबरगिरांची टप्प्याने जुळत येणारी साखळी तुटल्यागत झाली होती. तरीही खंडोजी, निळोपंतांचे स्वार राने तुडवीत ठाण्याठाण्यांवर आज्ञापत्र पाठवीत होते.
राजांनी आज्ञा केल्याप्रमाणे सुरनीस शंकराजी, कोकणपट्टीचे अधिकारी रामचंद्रपंत, मुजुमदार नारायण रघुनाथ अशा शेलक्यांनी गड जवळ केला. राया-अंताला सांगितल्याप्रमाणे हुजुरातीची शिबंदी घेऊन राजे रायगड उतरले. संगती खंडोजी, नारायण रघुनाथ आणि राया-अंता होते. वरंदा घाटाने सर्वांसह राजे कापरहोळाकडे चालले. राया-अंताने खासे धनी येताहेत, अशी आगेवर्दी होळाकडे धाडली चंद्रावतावर मांड घेतलेले राजे जनावर धिम्या चालीवर असतानाच खंडोजींना म्हणाले, “फिरंगाणाच्या स्वारीवरून परतल्यावर आम्ही तुम्हाला पालखीचा मान दिला खंडोजी. तुम्ही कधी पालखीत मात्र बसलेले दिसला नाहीत ते?”
“जी. स्वामींनी पालखी दिली पण – पण…” दौडते खंडोजी बोलताना रुकले.
“पण काय?”
“पण आमच्या पायाला भिंगरी बांधली आहे त्याचं काय?” खंडोजी हसत उत्तरले.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०६.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.