धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०७ –
पुरंदरचा शिखरटाक दिसू लागला. गाड्यांचे कापूरहोळ आले. राजे येणार म्हणून पुरंदरहून आलेले बाजी घोलप होळाच्या शिवेवर सामोरे आले. याच बाजींनी सर्जेराव जेध्यांना फिरून दौलतीत आणण्याच्या कामी मदत केली होती.
सर्वांसह राजे राया-अंताच्या वाड्याकडे चालले. राजांच्या मनात धाराऊच्या कैक मुद्रा फिरू लागल्या. गाड्याच्या वाड्याच्या दारात मंडळी येताच राजांच्या मनात जपून ठेवलेले आठवणीचे पळसपान फडफडले. राया-अंताच्या बायका वाड्यातून पाण्याच्या भरल्या कळश्या घेऊन बाहेर आल्या. सोनेरी तोडा असलेल्या राजांच्या चंद्रावताच्या खुरांवर त्या त्यांनी ओतल्या. राजे पायउतार झाले. धाराऊच्या सुनांनी त्यांना निरांजनांनी ओवाळले. त्यांच्या कपाळी कुंकुमटिळा भरला.
आज राया-अंता भरून पावले होते. पाणथरल्या डोळ्यांनी आपल्या धन्यांना बघू लागले. कैक दिवसांची आस होती त्या भाबड्या, कुणबाऊ, गाडेबंधूंची. आज ती पूर्ण होत होती. दोघाही भावांना वाटत होतं, “म्हातारी असाय पायजे हुती आज.”
समर्थांच्या घुमटीतील रेखलेल्या चित्रातील रामलक्ष्मणागत दोघेही गाडेबंधू माणूसमेळात उभे होते. थोरल्या रायाला, राजांनी आपली हनुवटी छातीशी नेत मानेने बोलावले. रायाला प्रथम ते उमगलेच नाही.
“राया” हलकी राजसाद आली. “जी” म्हणत राया पुढे झाला.
“ढाल उतरा रायाजी, पाठीची.” शंभूबोल ऐकताच राया-अंतासह नारायण रघुनाथ सोडून बाकीचे सर्व जण चरकले. शंका आली साऱ्यांना की, “काय झाली आगळीक रायाची की त्याला शिपाईगिरीच्या चाकरीतून बडतर्फ केले राजांनी?” थरकलेला राया तर न राहवून पुटपुटला, “धनी, पर…” त्याच्या हातातली ढाल थरारली.
राजांनी तिरके होत फक्त नारायण रघुनाथांकडे पाहिले. ते एका स्वारासह पुढेसे झाले. स्वाराच्या हातात सरपोसबंद तबक होते. रायगडाहूनच आणले होते ते. राजांनी चिमटीने सरपोस ओढून घेतला. तबकातील सोनमाया उन्हाच्या तिरपेत कशी झळाळून उठली. पुरे तबक सोनेरी होनांनी भरले होते. त्या तबकातच राजनेत्रांना थकल्या उमरीची धाराऊ दिसू लागली. ती जशी म्हणत होती, “…माज्या दुदाच्या लेकरा.”
राजांनी हातातले तबकच रायाने पसरलेल्या ढालीत ठेवले. ते घोगरले, “राया, आऊंच्या छत्रीवर एक घाट बसवून घ्या! रोज दुबार तिचे टोल होळात कानी पडू द्यात. चला तिकडे.”
राया-अंता ढालीतल्या तबकाकडे बघतच राहिले. पुढे होत अंताने रायाला ठोसरले. राया त्याचा अचूक माग ताडत लगबगीने म्हणाला, “कशापायी हे धनी आम्हासत्री? नगं हये.” शिवेवरून वाहत असलेल्या होळासारख्या मनाच्या रायाने परते करण्यासाठी ढालीसह तबक पुढे केले.
हातस्पर्शाने ते पुन्हा मागे लोटताना राजांच्या तर्जनजीतला पुखरखडा किरणांत तळपून उठला. ओठांतून त्याहून तळपदार बोल सुटले, “राया-अंता, अंगची कातडी उतरवून तिच्या मोजड्या करून पायी घातल्या असत्या आऊच्या तरी नसती झाली भरपाई तिनं ओठाआड सोडलेल्या दूधधारांची. राहू द्या हे.”
सर्वांसह राजांनी धाराऊच्या छत्रीचे दर्शन घेतले. तिच्यावरच्या पादुकांना माथा भिडविताना उगाच त्यांना वाटले, ‘पुरंदरापेक्षा लगतच्या ह्या कापूरहोळात उपजतो आम्ही तर किती ब्येस होतं!
गाड्यांच्या वाड्यावर एक मुक्काम टाकून राजे रायगडी परतले.
“बादशहा फौजेसह विजापूरहून हलला स्वामी. शहजादा आझमची कुमक करायला त्याच्या फौजा अकलूज जवळ करताहेत.” निळोपंतांनी बादशहाची हालचाल महाराजांसमोर ठेवली.
“जिंजीहून हरजीराजांनी धाडलेले संताजी मुलखात पावले आहेत. पन्हाळ्यावर ते आपल्या जमावानिशी तळ टाकून आहेत.” खंडोजींनी हरजीराजांची हालचाल दिली.
दोन्ही तपशील ऐकून छत्रपती त्यावर विचार करू लागले. तो आझमच्या मदतीने मिरज कोल्हापूर मार्ग पन्हाळ्यावर उतरण्याच्या विचारात असेल का? ह्या विचाराने ते खंडोजींना म्हणाले, “चिटणीस, पन्हाळ्याला म्हलोजीबाबांना स्वार द्या – औरंग पन्हाळा पटात घेण्याच्या बेतात दिसतो. तुम्ही-संताजी बरे हुशारीनं असा.”
“पंत, तुम्ही सोलापूर, अकलूज प्रांतात चलाखीचे नजरबाज पेरा, औरंगची प्रत्येक हालचाल समय जाया न करता बिलाकसूर आम्हास पावली पाहिजे.” पेशवे खंडोजी कानी पडणाऱ्या आज्ञा ध्यानपूर्वक ऐकत होते. कल्याण-भिवंडी भागातून आलेले येसाजी कंक राजांच्या भेटीस आले. वय झाले होते आता येसाजींचे. ते राजांना म्हणाले, “आम्हास्त्री आता नवी जोखीम द्यावी एखांदी!”
येसाजींना निरखून आवाजात हल्लक भरत राजे म्हणाले, “कंककाका खरे तर विश्रामाची उमर तुमची. तुम्ही – तुम्ही आता रायगड सोडून जाऊ नका कुठंच. केव्हाही गड उतरावा लागतो आम्हास. तुमच्या जोगं जाणतं, वकुबाचं कोण आहे दुसरं?”
म्हातारे कंक आपल्या छत्रपतींना “जी” म्हणून न्याहाळत राहिले. त्यांना थोरल्यांची सय झाली. त्यांचा कृष्णाजी तर गोव्याच्या स्वारीत दौलतीच्या कामी आलाच होता. पोराच्या आठवणीला लिंपण घालून येसाजींनी ती बुजवूनही टाकली होती. महाराजांना शब्द देत ते म्हणाले, “थोरल्यांच्या गडाची चिंता नसावी महाराज. लागली गरज तर बोरगाव तर्फेला सातारा प्रांतात असलेल्या जाधवांच्या धनाजीस्तत्री घेऊ बोलावून. खाशास्त्री भिंगरीगत चौमुलूख तुडवा लागतो, हे जाणताव आम्ही.”
“काका, हंबीरराव गेले तेव्हापासून, का कुणास ठाऊक खूप एकलं वाटतं आम्हास. केवढा डोंगराएवढा आधार होता मामासाहेबांचा आम्हास!” हंबीररावांच्या आठवणीने राजे-येसाजी दोघेही ढवळून निघाले.
“खंडुबाची इच्छा त्येला कोन काय करनार? किती बघितलं या म्हाताऱ्या ध्यायीनं. अजून काय-काय बघा ऐकायची नौबत हाय कळत न्हाई.” येसाजी स्वत:शीच बोलल्यागत बोलले.
“काका, पेशव्यांच्या संगती दफ्तरात जा. कृष्णाजींच्या साठी इनामपत्रांचे कागद सिद्ध झाले आहेत. ते घेऊन जा. आमची याद म्हणून ही कृष्णाजींच्या छत्रीवर ठेवा.” राजांनी हातातील तर्जनीची अंगठी येसाजींच्या समोर धरली.
रांगडे येसाजी गडबडून गेले. न राहवून म्हणाले, “हे आम्हासी नगं. घालायची कुनी ही बोटावर? आन् असतं कुनी तर हिंमत बी झाली नसती त्येची.”
राजांनी अंगठी पुन्हा स्वत:च्या बोटात बसती केली. येसाजी, निळोपंत, खंडोजी निघून गेले.
विचारगत झालेले राजे दरुणीदालनात आले. शिसवी मंचकावर बसून कुणाशीतरी बोलत असलेल्या येसूबाई वर्दी मिळताच चाललेले बोलणे तोडून, सावरून खड्या झाल्या होत्या. त्या बोलत होत्या कुलेशांच्या कबिल्याशी. राजे त्यांना बघून परत जायला निघाले. येसूबाई ते ताडून म्हणाल्या, “तसं खास नाही, सादिलच बोलतो आहोत आम्ही. स्वारीनं यावं.” तरीही राजे क्षणैक घोटाळले. येसूबाई तपशिलाने म्हणाल्या, “ळछंदोगामात्यांची वाजपूस करीत होतो आम्ही यांच्याकडे. ते पन्हाळा- खेळणा फिरते राहून बरी नजर ठेवून आहेत शिर्काणावर.”
महाराणी आणि राजे यांची बोलण्यात अडचण होऊ नये म्हणून कुलेशांचा कबिला येसूबाईना, “चलते है हम। ” म्हणत झटकन दालनाबाहेर निघून गेला.
थोडा वेळ शांतता पसरली. दोन्ही राजमनांत शिर्के, औरंगजेब, कोकणपट्टीचे बंडखोर वतनदार, हंबीरराव यांचेच विचार फिरू लागले.
“काय खबर आहे कुलेशांची शिर्काणाबाबत?” राजांनी समोरच्या झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या डोंगरकडेला निरखत शांतता फोडली.
“छंदोगामात्यांचे आणि शिर्क्यांचे काहीतरी बिनसलेलं दिसतंय, असं म्हणत होत्या बाई.” आज येसूबाईंनी आपल्या माहेरचा उल्लेख ‘शिर्के’ असा केला. राजांना तो जाणवला.
“कोण वजेनं बिनसलंय?” राजांनी तपशील समजण्यासाठी विचारले.
“ते नाही समजलं.” येसूबाई त्याच्या कारणाचा अंदाज करीत म्हणाल्या. त्यांची चर्चा चालली आहे, तो राजांना कसलीतरी याद होऊन ते म्हणाले, “कारभारी कुठं तुमचे?
त्यांना सांगा येसाजी दाभाड्यांना वर्दी द्या म्हणावं, आम्ही रामराजांच्या भेटीस येतो आहोत.” रामराजांच्या नावाबरोबर दोन्ही राजमने डहुळली.
“का चाललीय स्वारी रामराजांकडं? कळलं नाही आम्हास,” येसूबाईंनी विचारले.
राजांच्या मनात एक विचित्र विचार फिरून गेला – ‘पन्हाळ्यावर आम्ही दस्त होतो तर? बसते रामराजे गादीवर तर?” डोंगरकडे निरखणारी आपली नजर तोडत राजांनी येसूबाईच्यावर जोडली. त्यांना जाब देण्याऐवजी उलटच विचारले, “काय वाटतं तुम्हास रामराजांबद्दल?”
“समजलो नाही आम्ही.” येसूबाई गोंधळल्या.
“आमच्या जागी रामराजे बसते तर? बसलो असतो, तुम्ही आम्ही पन्हाळ्यावर सुभेदारी तुकडा मोडत तर?”
ध्यानीमनी नसलेला सवाल राजांच्या तोंडूनच आलेला ऐकून येसूबाई चक्रावल्या. म्हणाल्या, “भलत्यावेळी हा कसला सवाल स्वारींच्या मनी?”
येसूबाईचे खासगीचे कारभारी आले. त्यांच्याकडे रामराजांसाठी महाराणींनी वर्दी दिली आणि चालता विषयच तोडण्यासाठी त्या वेगळीच बाब पुढे घेत म्हणाल्या,
“मिरजेला ठाण झाला शहाजादा स्वारींच्या मुक्कामाचा माग काढण्यासाठी पन्हाळा भागात खानामागून खान पेरतो आहे, अशी खबर आहे. कुठल्याही मुक्कामात स्वारीनं हूल देण्याची खबर घ्यायला विसरू नये.”
ते ऐकताना राजे हसले आणि म्हणाले, “किती काळजी करता आमची? एवढी तुमचे दादासाहेब दौलतीची करते, फलटणकर त्यांना साथ देते, अर्जुनजी-अचलाजी औरंगाबादे ऐबजी गडाची वाट धरते तर – जाऊ द्या. आम्ही भेटून येतो रामराजांना.”
क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०७.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.