धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०८ –
पडणाऱ्या राजांना रूपा कुणबीण व भवानीबाई यांच्यासह येताना बाळराजे दिसले. त्यांना जवळ घेऊन थोपटताना राजे म्हणाले, “येणार काकीसाहेबांच्याकडं? बाळराजांनी होकाराची मान डुलविताच रिवाजी पहाऱ्यात रामराजांच्या वाड्याकडे जायला निघाले. जसे मनात फिरून जाऊ लागले त्यांच्या, तसा त्यांचा हात सोबतच्या बाळराजांच्या खांद्यावर फिरू लागला. मनात अनेक सवाल उठले, एकमेकांवर थडकू लागले. “कसे वागतील पुढे जाऊन हे आपल्या हयातीत काका- काकूंशी? का वाटत नाही आम्हास फरक यांच्यात व रामराजांच्यात?’
रामराजांचा वाडा आला. येसाजी दाभाडे राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे वाड्याच्या बैठकी दालनात प्रवेशले. एका मंचकावर बसलेले रामराजे उठते झाले. पुढे येऊन त्यांनी आपल्या दादामहाराजांची पायधूळ मस्तकी घेत बाळराजांना राजांपासून आपल्याजवळ घेतले. लालसर गौर वर्णाचे रामराजे बघताना राजांना त्यांच्या मासाहेबांची आठवण झाली. “काय क्र्णानुबंध होता त्यांचा आमचा? केवढं घडू नये ते गेलं घडून त्यांच्यामुळं? या रामराजांच्या बाबत मात्र काहीच का आलं नाही उणं-वावगं मनात?
ज्या डोळ्यांनी आमचे हंबीरराव बघत आले यांच्याकडे तसंच आम्हीही नाही का बघितलं?’
“ताराऊंना घ्या बोलावून.” बाळराजांचे खांदे थोपटणाऱ्या रामराजांना छत्रपती म्हणाले. ऐन बांड्या उमरीच्या रामराजांचे गाल लालावले. त्यांनी येसाजींना नजर दिली. येसाजी अंत:पुरी दालनात जाऊन ताराऊंच्यासह आले. ताराऊंनीही राजांची पायधूळ घेतली. हंबीररावांच्या आठवणीने हातचा पदरशेव तोंडात घेऊन ताराऊ हमसू लागल्या. दालनभर कोंदवा करणारी शांतता पसरली.
“सुमार व्हा. आम्हीहून आलोत भेटीला ते खास बाबीनं. कोणी काही; कोणी काही सांगतील, तर उभयता तिकडं ध्यान देऊ नका. प्रसंग पडला तर याहून अधिक पणास लावावं लागेल तुम्हा आम्हाला. काही वावगं घडलं-खटकलं तर आमच्या श्रीसखींना हमेशा बिनासंकोच विचारत चला. आम्हाला केव्हाही गड उतरावा लागतो. गनीमफौजा चौफेर पांगल्या आहेत.” राजांचा शब्दन्शब्द अंगी हंबीररावांचे रक्त वागवीत असलेल्या ताराऊ खंबीरपणे ऐकत होत्या.
रामराजांच्या वाड्याबाहेर पडताना राजांनी येसाजींना आपल्या संगती येण्याची इशारत केली. बाळराजांसह जाणाऱ्या पाठमोऱ्या राजांकडे, रामराजे आणि ताराऊ कितीतरी वेळ बघत राहिले.
किल्ले खेळण्यावरून शिर्काणात उतरलेले कुलेश शिबंदीसह शृंगारपूरच्या वेशीवर आले. त्यांनी आपला खासगीचा कारभारी चार-पाच स्वारांसह गणोजींच्या भेटीसाठी गावात पाठविला. कुलेश राजांच्यावतीने शिर्क्यांशी रदबदली करायला आले होते. कसेही झाले तरी शिर्के मंडळी येसूबाईच्या माहेरची माणसे होती.
आपल्या कारभाऱ्याची वाट पाहत कुलेश वेशीवरच थांबले. त्यांना माहीत होते, शिर्के औरंगजेबाचे मनसबदार झालेत. तरीही त्यांना भरोसा वाटत होता – बडीलधारे पिलाजी आपल्या गणोजी, कान्होजींची समज पाडतील. अटीतटीच्या या बाक्या समयी अजूनही विचार करतील. राजांच्या पाठीशी राहतील.
कुलेशांचे कारभारी शिर्क्यांच्या वाड्याच्या सदरेवर आले. ही तीच सदर होती. जिथली सुर्व्यांच्या गादी आबासाहेबांनी सिद्दी जोहरच्या वेढ्याच्या वेळी सुर्व्यांनी जोहरला मदत केली म्हणून, ‘वाडे-हुडे बांधतात. बसकणी तयार करून गनिमास सामील होतात’ म्हणत संतापाने लाथेच्या ठोकरीने उधळून लावली होती. याच सदरेवर सुर्व्यांच्यावतीने नेकीने लढणाऱ्या पिलाजी शिर्क्यांना त्यांनी आपल्या पदरी घेतले होते. याच वाड्यातून शिर्क्यांच्या येसूबाई भोसल्यांची सून म्हणून बाहेर पडल्या होत्या.
शिरक्यांच्या कारभाऱ्याने आत जाऊन वर्दी दिली. आता उतारीला लागलेले पिलाजी सदरेवर आले. त्यांना कुलेशांच्या कारभाऱ्याने आपण कोण, कशासाठी आलोत याचा तपशील दिला.
पिलाजींच्या मनी केबढेतरी रामायण फिरून गेले. येसूबाईच्या आठवणीने त्यांचे मन हेलावले. थोरल्या महाराजांची आठवण त्यांच्या मनी जागी झाली. “कसलं वतन? ही कोण इमानदारी की दोन दिसांचा मुगल त्याच्या पाठीशी व्हावं? एवढ्या बिकट समयाला पोरीचं कुंकबळ एकलं टाकावं? कोण हुताव आम्ही? कुना गुणं एवढं तालेवारीचं झालाव?” ते निर्धाराने म्हणालेही, “वबेशीवरच का थांबलं कब्जी? ह्यो वाडा काय परका न्हाई. मेळाजोळाचं काय असंल ते बोलू की बसून निवांत.”
कुलेशांच्या कारभाऱ्यांच्या मनी आशा पालवल्या. ते म्हणाले, “आम्ही परत जाऊन त्यांना घेऊनच येतो.” ते जायला वळलेही. एवढ्यात मध्यम वयाचे, भरदार छाताडाचे गणोजी मुजरे घेत सदरेवर आले. त्यांच्या अंगी ईदलशाही माटाचा हिरवाकंच जामा होता. त्यांची मुद्रा येसूबाईशी बरीचशी मिळतीजुळती होती. फरक एकच होता, येसूबाई देवमहालातील देव्हाऱ्याच्या तेवत्या निरांजनासारख्या दिसत, तर गणोजी मावळमाचीवर भकभकत पेटत्या पलोत्यासारखे! ते येताच सदरेवर जरब पसरली.
“काय आबा, कुनास्री आनतो म्हंत्यात हे?” गणोजींनी भुवई वाकडी करून कुलेशांच्या कारभाऱ्यांना निरखत पिलाजींना विचारले. त्यांच्या चौकशीला शिरक्यांच्या कारभाऱ्यांनी सगळी माहिती दिली. “काय? त्यो कब्जी पुरात? कशापायी बलवता त्येला वाड्यावर आबा? का घेतलं त्यानं तुमास्रीबी मुठीत?” गणोजी संतापाने कुलेशांच्या कारभाऱ्यांकडे बघू लागले. म्हणाले, “सांगा तुमच्या धन्याला, हे शिरकान हाय म्हनावं, संगमेसुर न्हवं.”
“छुंदोगामात्य राजांकडून आलेत. काही खास निरोप आहे राजांचा. ऐकून घ्यावा तो.” कुलेशांचे कारभारी नम्रपणे म्हणाले. ते ऐकताच गणोजी केवढ्याने तरी त्यांच्यावर कडाडले. “कोन राजे? ह्ये शिरकानं हाय, इथले राजे शिर्के. न्हाई चालत दुसऱ्या कुनाचं राजेपन हितं. सांग त्या कब्जीला, बऱ्या बोलानं आला तशी जनावरं मागं पिटाळा म्हनावं!” डोळे विस्फारलेल्या गणोजींना संतापाने धड बोलवेना.
सदरेवरचे त्यांचेच चाकर चरकले. कुलेशाचे कारभारीही काय बोलावे, या विचारात पडले. कसेतरी म्हणाले, “असं भलतंच मानून कसं चालेल?”
“भलतंच? इदलशाही, कुत्बशाही पाडणाऱ्या बादशांनीच केलंय नामजाद आम्हास्री! काय पाड लागतो भोसल्यांचा त्येंच्या म्होर दिसलंच लौकर. तुमचा कब्जीच हाय आतल्या अंगानं बादशहाकडं! आम्हासत्री वरवरनं चाचपून बघायलाच आलाय!”
कुलेशांचे कारभारी ते ऐकताना हादरलेच. “निघतो आम्ही.” म्हणत मान खाली घालून बाहेर पडले. पिलाजी त्यांना थांबविण्यासाठी म्हणाले, “थांबा कारभारी थोडं.”
“आबा, रायगडावर झालेली शोभा विसरला वाटतं? काय दिला होता जाब भोसल्यांनी शिरकानाबाबत हे तुम्ही इसरला असलात, तरी आम्ही न्हाई इसरलो.” गणोजी त्यांनाच रोखत म्हणाले.
आता मात्र बडीलकीच्या अधिकाराने पिळवटलेले पिलाजी म्हणाले, “भोसले काय म्हणाले ते न्हाई मोलाचं. पोर दिलीया घराला त्या. कसं इसरायचं ते?”
“त्या “’पोर’ नाहीत तुमची. “रानीसाब’ हाईत दौलतीच्या! तुम्ही मानता पर त्या न्हाईत मानत तुम्हासी.” गणोजींनी पिलाजींचे बोलणेच खुंटते केले. आल्या कारभाऱ्याला जरब देत ते म्हणाले, “शिरकानात आल्या माणसाला दस्त करायची रीत न्हाई शिर्क्यांची, सांगा तुमच्या कब्जीला.” कुलेशांच्या कारभाऱ्यांच्या पाठीवर गणोजींची करडी जरब पडली.
सुन्न कारभारी मान डुलवीत कुलेशांच्याकडे जायला निघाले. हताश पिलाजी येसूबाईना आठवत “वागजाईची इच्छा’ म्हणत सदर सोडून आत गेले. गणोजी सदरेवरच संतप्त पायफेर घेऊ लागले. बाहेर शिवारावर देख टाकून आलेले कान्होजी वाड्यात शिरले. त्यांना झाल्या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. त्यांना बघताच, कारभाऱ्याकडून धाडल्या निरोपाने कदाचित कुलेश पुरावर चालून येतील, या शंकेने गणोजी त्यांना पुन्हा बाहेर पिटाळत म्हणाले, “जो असंल त्यो घोडा घ्या पागेचा. कब्जी शिवेवर थांबलाय पुराच्या त्येला पिटाळा.” आणि स्वत:च गणोजी पुराच्या पावलोकांची शिबंदी घेऊन त्यांना कुमक करण्यासाठी निघाले.
दोघा शिर्के बंधूंनी शिवेवर थांबल्या कुलेशांच्या फौजेच्या पाठलाग करून त्यांना शिरकाणाबाहेर हुसकावून लावले. खेळण्यावर परत येताच आपल्या चिटणिसाला कलमी सेवेवर घेत झाल्या प्रकाराची वार्ता राजांना कळविण्यासाठी संतप्त, अस्वस्थ, हैराण झालेले कुलेश कनोजी बोलीत मजकूर सांगू लागले –
“राजश्रिया विराजित स्वामी के चरणोंपें – आज्ञापालक छंदोगामात्य दंडवत विशेष -”
रायगडावर या वेळी देवमहालातील सांजारती झालेल्या कुलदेवतेला – वाघजाईला तळहाती पदरशेव घेऊन नमस्कार करताना “दौलतीच्या राणीसाब’ मनोमन नेहमीसारखे म्हणत होत्या – “पुराची सारी माणसं सुक्षेम ठेव! वय झालंय आबांचं. एकदा घडव भेट त्यांची!”
आणि कोल्हापूरच्या आझमशहाच्या तळावरून या वेळी ‘मरहृट्टोंका राजा, मोजदा संभा पनालेपर है’ अशी खबर लागल्याने शेख निजाम दख्खनी आणि त्याचा मुलगा इखलास किल्ले पन्हाळ्यावर चालून जात होते!
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०८.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.