महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,457

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१०

Views: 1454
9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१० –

शृंगारपुराहून पळालेले गणोजी आणि कान्होजी याच मुकर्रबखानाच्या तळावर येऊन त्याला भेटून गेले असतील, याची कल्पना राजांना किंवा म्हलोजींना अर्थातच नव्हती. सायंकाळचा गार मावळवारा चढीला पडला. त्यावर राजांच्या अंगचा जामा फरफरू लागला. टोपातील मोतीलग हिंदकळू लागली. गडाची सांज नौबत दुडदुडली. छातीशी हात नेत तिला मान देताना त्यांना पाचाडसदरेवर घणघणणारी थोरल्या आऊंची घाट याद आली. पन्हाळगडाचे पाच-दरवाजा, तीन-दरवाजा सर्व दरवाजे बंद होत होते. कोठीखाली गडपायथ्याच्या वाडीत घरट्याघरट्यांत दिवल्या पेटत होत्या. शांत, निसूर अशी ती पन्हाळी सांज उरात भरून घेत महाराज सज्जाकोठीचा कठडा सोडून जायला म्हणून वळले. एवढ्यात कोठीचे जिने झापा टाकतच चढलेला, धापा टाकणारा पन्हाळ्याचा किल्लेदार लगबगीने म्हणाला,

“रायेगडाला …गडाला …गलिम …गलिम एतिकादखानाचा घेर पडला …राबत्या बाजूने धनी!” त्याला धड बोलवतही नव्हते. रिवाज द्यायला तर तो विसरलाच होता. शिवारावर गोफण फिरावी तसे विचार फिरले राजांच्या मनात. येसूबाई, बाळराजे, रामराजे, चांगोजी, जोत्याजी… चर्याच चर्या फिरल्या त्यांच्या उघड्या, विस्फारल्या डोळ्यांसमोर. रायगडाला राबत्या बाजूचा घेर!

वर्मी तीर बसलेले, शिकारीतले जनावर, आडव्या येणाऱ्या झाडझाडोऱ्याची पर्वा न करता झेपावत सुटते, तसे ते कुणाकडेही न बघता झपाझप कोठी उतरू लागले.

अर्ध्या घंट्यात धावणीची फौज सिद्ध झाली. तिला रायगडाच्या रोखाने दौडते सोडून निवडक असामींनिशी पन्हाळा सोडताना ते म्हलोजींना म्हणाले, “काळीज टाकू नका म्हलोजी. धीरानं असा. लागली गरज तुमची तर हारकारा देऊ. चढ्या रिकिबीनं पाठोपाठ या.”

म्हलोजी, संताजी, प्रल्हादपंत यांनी दिलेले मुजरे आपले करत – पाठीवर पन्हाळी सांज आणि मनी रायगड घेऊन चंद्रावताला टाच दिली गेली. पन्हाळा मागे पडला. बत्तीस शिराळा, वाई-महाड मार्गावर, औरंगच्या फौजी राहुट्या पडल्या होत्या. खेळणा, संगमेश्वर मार्गाशिवाय दुसरा रस्ताच नव्हता रायगड जवळ करायला. राजांचे सैन्य त्या मार्गाने दौडू लागले.

खेळण्याच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थ बेचैन फेर घालणारे छत्रपती कुलेशांना म्हणाले, “आम्ही तातडीनं कूच करणार आहोत, रायगडाकडं कविजी. तुमच्या प्रांतीचा जमेल तितका धारकरी संगती घेणार आहोत. आता क्षणाचाही उसंत नाही कसलाही विचार करायला.” किल्ल्याच्या सदरी दालनात त्यांच्याभोवती उभे राहिलेले कुलेश, किल्लेदार, राया-अंता सारेच चिंताक्रांत होते. औरंगचा रायगडाला घेर – याचा मतलब पुरते जाणून होते सारे.

“कौनसी भी जोखीम हो, हमको हुकम देना स्वामी!” कुलेश निर्धाराने म्हणाले. पण त्यांच्या मनीही राजांच्या कानी घालावी, अशी कुठलीतरी बाब घोटाळत होती.

“संगमेश्वराला हरकारा द्या कुलेश. आम्ही येतो आहोत.”

“जी.” सवयीने कुलेशांनी रुकार दिला. पण त्यांचे मन कशाततरी गुंतले होते.

भागच होते म्हणून त्या दिवशीचा मुक्काम खेळण्यावर टाकून राजे पहाट धरूनच निवडीच्या धारकऱ्यांची शिबंदी पाठीशी घेत संगमेश्वराकडे निघाले. पूर्वकड धरून नव्या दिवसाचा सूर्य डोकावत उगवत होता. दौडत्या घोड्यावर राजांच्या मनात विचारांच्या टापा थडथडत होत्या. त्यांना बगल धरून दौडणाऱ्या कुलेशांना, पाठीशी दौडणाऱ्या एकाही स्वाराला कल्पनाच नव्हती की, रात्रभर कोल्हापूरच्या तळावर मुकर्रबखानाला, छत्रपती कुठे आहेत, दिमतीला माणसे किती आहेत, या साऱ्याची खडान्खडा माहिती पुरवून तळाबाहेर पडलेले गणोजी, कान्होजी शिर्के आणि नागोजी माने शिवरात्र तोंडावर आल्याने कोल्हापूरच्या अंबाबाईचे पहाटदर्शन करून परतत होते!

संगमेश्वराची वेस आली. हे दोन नद्यांच्या संगमाचे ठिकाण होते. संगम काठाला शिवालिंगाच्या राउळाने गावाच्या नावाला साजेसा अर्थ दिला होता. कधी मनाचा भार असह्य झाला की, याच संगमावरच्या शिवालयात राजे दर्शनासाठी येत होते. आज ते संगमेश्वर दौडीच्या वाटेवरच होते. गावठाणातून संगमावर घोड्यांना पाणी दावून मोतद्यारांची एक तुकडी पागेकडे परतताना वेशीत घुसल्या महाराजांच्या सामने आली. मोतद्दार खाशांना रिवाज देण्यासाठी पटापट उतरू लागले. तिकडे ध्यानही नसलेले महाराज त्या पथकातील जनावर, उजाडताच सामने आलेले बघून चंद्रावताचे कायदे खेचून जागीच थांबले. जनावर “ऐबी’ होते ते!! त्या पुऱ्या काळ्याशार जनावराच्या आघाडीच्या खुरांना पांढरे फटफटीत चांदवे होते.

महाराजांच्या मनी ते जनावर बघताना शकाची टिटवी केकाटत फडफडून गेली, “रायगडावर काही बरंवाईट तर…’

राजांनी संगमावर जाऊन शिवदर्शन घेतले. समोरच्या शिवर्पिडीला हात जोडून ते मनोमन म्हणाले, “’आम्हाहून आबासाहेबांस प्यारा असलेल्या रायगडास धक्का लागू नये. त्यासाठी हयातीचं बेलपान करून वाहू तुमच्या या पावन पिंडीवर.’

शिबंदीसह राजे संगमेश्वराच्या सरदेसाई आणि कऱ्हाडहून आलेले अर्जोजी- गिर्जोजी यादव वाड्यात जमले होते. सज्जनगडाहून आलेले रंगनाथस्वामी गोसावी महाराज संगमेश्वरात आले आहेत, याची खबर मिळाल्याने दुपारच्या थाळ्यानंतर भेटीसाठी सरदेसायांच्या वाड्यावर आले. भेटीसाठी आलेल्या गोसाव्यांनी ‘जय जय रघुवीर समर्थ’ अशी नांदी उठवताच बैठकीवरून उठून महाराजांनी त्यांच्या चरणांवर आपला माथा टेकला. रंगनाथस्वामींनी त्यांच्या राजटोपावर तळहात ठेवून आशीर्वाद देताना त्यांच्या तोंडून समर्थबोल निसटले.

“जरी पाटांतील तुंब निघेना,

तरी मग पाणीच चालेना,

तैसे जनांच्या मना,

कळले पाहिजे!”

“आम्ही निघतो राजे… वाघापुरीला जायचं आहे.” नांदी उठवून खडावांची चटपट करीत रंगनाथस्वामी बाहेर पडले.

राजांच्या मनात समर्थांनी लिहिलेल्या पत्रातील बोध फिरला… ‘अवघे लोक एक करावे। गनिमा निपटून काढावे। चढती वाढती कीर्ती) पावाल येणे।।’

“अवघे लोक एक करावे… कसे? समर्थ हे कैसे व्हावे? हवस पेटल्याने नेकी भुललीत माणसे! फंदफितुरीने धारकऱ्यांची बुजगावणी झालीत. सामने येणाऱ्या असामीच्या नेकीचा मागमूसही लागू नये, एवढी आतबाहेर दुटप्पी झालीत माणसे. ओंजळीत मिळेल तेवढाच शिधा शिजवून खाणारे, वणवण करीत मुलूखभर मावळ वाऱ्यासारखे पायीच भटकणारे तुम्हासारे संत कुठे! ‘कीर्तिरूपे उरावे’ म्हणालात. ते तरी असते का माणसाच्या हाती? आबासाहेब उरले… कीर्तिरूपे उरले. ते – तुम्ही “माणसे’ कशी म्हणावी? “देवमाणसे’ तुम्ही. जगदीश्वराच्या मंदिरातील हमचौकातील दगडी कासवाचे तरी भाग्य मिळेल आम्हास? की पडतील नुसतेच कदम पाठीवर येणाऱ्या प्रत्येक दर्शनभक्ताचे? नाही झाला हा मुलूख एक दिलाचा, एक जिवाचा तर? फिरविली जर अकरा दिशांना तोंडे तुम्ही स्थापन केलेल्या अकरा हनुमंताच्या मूर्तीनी आपली तर?

“मग जाणावे फावले गनिमांसी!’ समर्थांच्या बोलांनी छत्रपतींच्या समोर जिकडे-तिकडे मुगल फौजा दौडताना दिसू लागल्या. खूप कोशिश केली त्यांनी; पण औरंगची चर्या काही केल्या नजरेसामने येईना त्यांच्या. समर्थ ‘गनीम-गनीम’ म्हणून गर्जून सांगताहेत तो ‘गनीमच’ दिसेना त्यांना. त्यांनी मनोमने भोवतीच्या खंडोजी, रायाजी, रामचंद्रपंत, कुलेश सर्वाशी ते औरंगसारखे दिसतात का, याचा पडताळा पाहिला. नाही! ‘औरंग’ काही स्पष्ट होईना त्यांच्या नजरेसमोर. मनातले विचारच त्यांनी रंगनाथस्वामींच्या पादुकांच्या रुजाम्यावर उमटलेल्या ठशांवर ठेवले. मन शांत, स्थिर करून घेतले.

सदरेबाहेर शिरकाणातील मौजे मसूचा हरबा देसाई येऊन खाशांच्या भेटीसाठी केव्हाचा खोळंबला होता. त्याची विठोजी शिर्क्यांची भावजय काशीबाई हिच्या खिलाफ मौजे कोतळुक आणि मसू या गावच्या मोकाशाबद्दल तकरार होती. हा गाव “बाधेरीतीने’ म्हणजे पूर्वीचा वारसा-हक्क रद्दबातल होऊन हरबाकडे आला होता. राजांनीच त्याचे मोकासे, शिर्के हरघडी लष्करी कामाचे म्हणून शिर्क्यांना दिले होते. त्यानेच शिर्के माजोर झाले होते. शिर्क्यांचे धारा वसूल करणारे “दाणेकरी’ भरल्या खळ्यावरून बलात्कारे दाणे उचलून नेत होते. त्याने कातावून देसायांच्या माणसांनी शिर्क्यांची पागाच मुळे मोडून काढली होती. हरबाला मौजे मसूचे सरकारी शिक्के- मोर्तबाचे मोकासे पाहिजे होते, म्हणून कुलेशांनी हरबाला पेश घेतला होता.

“धनी, मौजे मसूचं मोकासं द्यावं आता आमास्त्री. लई कट्टाळलाव. सरकारास्त्री मानत न्हाईत, तर आमास्त्री काय मानतील शिर्के! भरल्या खळ्यावयनं दाबजोरीनं दाणा काय नेत्यात! कातावून पागाच मोडून काडली आमी त्यांची. कागुद करून दिला की, आमी चाकरीला हावंच धन्यांच्या.” रिवाज देताना हरबा देसाई नरड्याला चिमट लावून म्हणाला.

महाराजांच्या डोळ्यांसमोर फिरत होता – एतिकादखानाने घेर टाकलेला रायगड! आणि समोर आला होता, एका मौजाच्या मोकाशाचा कथला! हरबाला कुडीभर न्याहाळत छत्रपती म्हणाले, “पागेच्या रखवालदार धर्मा कवठेकराची काय बाब?” तो वर्माचा सवाल ऐकून हरबा चरकला. शिर्क्याच्या पागेचा रखवालदार धर्मा याला देसायाच्या माणसांनी जीवे मारून पेंढ्यात घालून डाग दिला होता! धर्मा महार होता.

“जी. लई झ्यायली क्येली त्येनं पागेवर.” हरबा चाचरत कसातरी म्हणाला. त्याला माहीत होते, राजांच्या दिमतीला जासूद-चाकरीला बहिर्जी, विश्वास असे पट्टीचे रामोशी खबरगीर होते.

“खामोश! जबान कशी उठते इमानदार चाकराच्या जिवास नख लावून मोकास मागावयास?” शंभूतेज कडाडले, “कुलेश, अमानत करून टाका मौजे मसू, कोतुळक, तुरवटे तर्फेचा सारा गाव सरकारात!”

हरबा देसाईला फेकून देणारी आजा सुटली थप्पड खाल्ल्यागत हरबा गुमान बाहेर पडला. खाशांचा राजसंताप सुमार होईपर्यंत कुलेश काही क्षण कसे बोलावे म्हणून थांबले. त्यांनाही रायगडाची चिंता लागली होती. धैर्याने ते म्हणाले, “रायगड जानेके पहले….”

“बोला कविजी.” महाराज आपल्याच विचारात होते.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१०.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment