धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २११ –
“शिवजीका एक अनुष्ठान संपन्न किया, तो सबका अरिष्टका कुळ तो निवारण होगा। शिवरात्री आयी है इसलिये…” शिवभक्त असल्याने कुलेश म्हणाले.
“केवढ्या धावपळीची ही हयात कविजी! शिवरात्र तोंडावर आली आहे हेही भुलून गेलो आम्ही! आबासाहेबांनी हर किल्ल्यात सही हाताला शिवर्पिडीची घुमट उठवली. का? तर गड चढताच पिंडीचे दर्शन घेता यावे म्हणून! आज त्यांचाच रायगड संकटात पडला आहे. आमच्या हातांनी त्यांचा म्हणून लावा शिवास कौल. पाचाडपागा आम्ही जाईतो नाही द्यायची दाद छाप्यांना.” प्रत्यक्ष रायगडाचा उपराळा करण्यासाठी जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. मन कशाचेतरी पाठबळ मागत होते त्यांचे, रायगडाचा घेर तर उठविणेच भाग होते. तिथली पिछाट तर काळीजच कुरतडणारी होती.
“खेळणा, पन्हाळा, विशाळगड-पागांना वरकड पावलोक रायगडाच्या वाटेस लावायला खलिते द्या. तुम्ही जातीनं अनुष्ठानाची जोडणी लावा. सकाळ, दुपार, संध्याकाळ औरंग न चुकता नमाज पढतो हे ऐकून आहोत आम्ही.” वरवर शांत दिसणारे राजे अंतर्यामी, कुणालाच उकल न होणाऱ्या खोलवटात शिरले होते.
संगमेश्वराचा वाडा हलू लागला. माणसे शंकराच्या अनुष्ठानासाठी खपू लागली. संगमाच्या एकमेकींत मिसळलेल्या नद्या शांत वाहत होत्या. भोवतीचे उंच डोंगरकडे ताठ खडे होते. त्यांना घेरून कोकणचा हिरवाकंच झाडझाडोरा माजला होता. मलकापूर, खेळणा, संगमेश्वर भागाचे व्युत्पन्न ब्राह्मण कुलेशांनी संगमेश्वरात पाचारण केले. सरदेसायांच्या वाड्यातील हमचौकात शिवाच्या अनुष्ठानासाठी यज्ञकुंड सिद्ध झाले. देसायांच्या देवघरातील शिवर्पिडीवर अभिषेकपात्र संततधार बरसवू लागले. त्याचा थेंब-थेंब जसा पुटपुटत होता, “रायगड-रायगड.” कुंडात पडल्या समिधांच्या धुराने वाडा कोंदून जात होता. धार्मिक विधी होताच राजे सदरेवर येत होते. अनुष्ठानाचे दोन दिवस झाल्यावर सदरेवर आल्या छत्रपतींना कुलेश म्हणाले, “अब रायगड कूच करना हे। मलकापूर, पन्हाळा, संगमेश्वर की जिम्मेदारी हे हमपर! इसलिये…” खेळण्यापासून मनात असलेली बाब महाराजांच्या कानी घालायला बेचैन झालेले कुलेश अडखळले.
“तुम्हास तर आम्ही संगतीच घेणार आहोत. आता हा प्रांत नाही तो ठेवा डोळ्यांसमोरस, रायगडचा. इथली जोखीम तर हमेशाचीच.” महाराज म्हणाले.
“रायगडके लिये ये बोलनाही पडेगा की… न्यायदेवता पलट गयी है! खुद्द न्यायाधीश – न्यायाधीशने -” कुलेश पुन्हा चाचरले.
“मतलब?” महाराजांच्या कपाळीचे गंध आक्रसले.
“खुद्द न्यायाधीशने षड्यंत्र की चाल रखी है, स्वामी के खिलाफ!”
“कविजी!” बसले महाराज अंगावर उकळते करंजेल तेल पडावे, तसे ताडकन उठले. उभे अंग शहारले त्यांचे. संताप, एकलेपणा, कोंडी, चमत्कारिक भावनेने ते जागीच थरथरू लागले. “कुणावरही अदावत घेऊ नका छंदोगामात्य! भूल असेल तुमची, कुलएखत्यारीच्या अधिकाराने केलेली! न्यायाधीश… आणि षड्यंत्र? आईने मुलाचा कडेलोट केल्याची बात ऐकवतसुद्धा नाही आम्हास. पुरावा काय यास?” न्यायाधीश प्रल्हादपंतांना पहिल्या कटावाच्या अदावतीतून इतमामाने मुक्त केल्याचे छत्रपतींना आठवले. “पुन्हा असली गफलत करू नका. नाही सोसणार ते आम्हास.” अशी त्या वेळी दिलेली समजही याद आली. रायगडाच्या महाद्वारात ठोकलेल्या खिळ्यांगत त्यांनी आपली नजर कुलेशांच्या डोळ्यांत रोवली. एवढे कुलेश! पण तेही हबकले ती बघताना.
“बोला, कुलएख्त्यार, पुरावा बोला.”
“जी.” अंगभर थरकलेल्या कुलेशांनी कमरेच्या कनोजी शेल्यातून खेचून प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हादपंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्क्याला लिहिलेला खलिता लटलटत्या हातांनी महाराजांसमोर धरला. तो खोलून महाराज वाचू लागले. शब्दाशब्दांतून जसा डोळ्यांवाटे उतरत शिसरसासारखा थेंबथेंब ठिबकू लागला त्यांच्या काळजावर. स्वारीशिकारीसाठी मुलूखभर दौडणारे, गोऱ्यांच्या दरबारात दौलतीची हेजिबी करणारे प्रत्यक्ष न्यायाधीश आरोपिताच्या पिंजऱ्यात जाऊन बसताना गणोजीला म्हणत होते, “रामराजे एकले आहेत. त्यांनाच हातास धरून गादीवर बसविले तर कुलएख्त्यारी तुम्हासच मिळेल. कोण कुठचा कनोजा! कानामागून येऊन साऱ्यांस तिखट झाला आहे. राजे तर त्याच्या सांगीशिवाय कुणाचंच मानीत नाहीत.” या आशयाचा तो नमुनेदार निवाडा होता. हातचा खलिता वाचून होताच छत्रपतींनी गपकन डोळे मिटले. त्यांच्या मिटल्या, व्याकूळ डोळ्यांसमोर प्रल्हादपंतांच्या मुद्राच मुद्रा फेर धरून गेल्या.
डोळे मिटूनच संतापाने थरथर कापत, कुलेशांना; पण स्वत:च द्यावी तशी त्यांनी आज्ञा दिली, “खलिताच द्या धाडून हा पन्हाळ्यावर. म्हलोजींना सांगा न्यायाधीशांसच वाचू दे हे, आरोपपत्र. त्यांच्याच लिखावटीचं – त्यांच्याच खिलाफ. दस्त करा त्यांना असतील तिथं, मिळतील तेव्हा! आणि… आणि बंद करून टाका तुमचं अनुष्ठान –
रायगडासाठी शिवाला कौल घालणारं!” मान खाली घातलेल्या कुलेशांच्या अंगावर खलितावळी फेकून महाराज आपल्या दालनाकडे तरातर निघून गेले. पुरते घायाळ झालेले; सर्वार्थाने एकांती. पुरते एकले होण्यासाठी.
मोठ्या मिनतवारीने बांधल्या अनुष्ठानाची सांगता तरी करून निघावे, यासाठी महाराजांना कुलेशांनी तयार केले. सांगतेचा दिवस संगमेश्वरावर उजाडला. आज तर पुरते संगमेश्वर सरदेसायांच्या वाड्यावर येऊन यज्ञकुंडात समिधा वाहून गेले. सगळे गाव सांगतेच्या भोजनाने हात ओले करून तृप्त झाले.
टळत्या दुपारला कऱ्हाडहून आलेले अर्जोजी यादव महाराजांच्या सामने आले. संगमेश्वरात आल्यापासून मनात घोळणारी एक बाब त्यांनी महाराजांना पेश घातली. अर्जोजी बांधकाम कारखान्याचे नामजाद प्रमुख होते. त्यांचे भाऊ गिर्जोजी यांनी तर राणीसाहेब यांचा माग काढत बऱ्हाणपूर, खुल्दाबाद पावेतो पायपीट केली होती.
यादवांची दौलतीच्या पायी खूप चाकरी रुजू झाली होती. थोरल्या महाराजांनी यादवांना कऱ्हाड व औंधचे वतन देऊ, अशी जबान दिली होती. पण त्या समयाला त्यांचाच काळ झाला होता. यादवांची बाब आठ वर्षे तशीच पडली होती.
“आमच्या कऱ्हाड-औंधच्या सरकारी कागदांचं आता मनावर घ्यावं धनी. मिरज भागाला शहजाद्याच्या फौजा जोराचा तळ धरून हाईत. आम्ही परतावं तिकडं म्हनताय.”
अर्जोजींनी आपली बाब धन्यांच्या समोर ठेवली. रायगडाच्या पायथ्याला पाचाडात येसूबाईच्या शब्दासाठी राजमंदिर उठविणाऱ्या अर्जोजींना महाराजांनी अंगभर निरखले.
“अर्जोजी, केवढ्या घरोब्याचे तुम्ही आबासाहेबांपासून. पण तुम्हाकडेही ध्यानदेणं आम्हास फावलं नाही. नाराज झाला असाल तुम्ही.”
सरदेसायांच्या चिटणिसास काही विचाराने बोलावून घेऊन, कऱ्हाड-औंधचे यादवांच्या नावे कागदपत्र सिद्ध करण्याची आज्ञा महाराजांनी त्यांना दिली. सिद्ध झाल्या वतनपत्रांवर दस्तुर करून ते चिटणिसांना म्हणाले, “शिक्कामोर्तब करून द्या हे अर्जोजींना. आणि अर्जोजी, तुम्ही मोर्तबी कागदपत्र मिळताच कऱ्हाड फाट्यास तुमच्या जमावानं कूच व्हा.”
सांगतेसाठी आलेले ब्राह्मण कुलेशांच्या हातून दक्षिणा घेऊन, राजांना अभीष्ट चिंतून गावोगाव परतू लागले. आता हा शेवटचाच मुक्काम होता संगमेश्वरात. सरदेसायांच्या वाड्यालगत पागेत मोतद्दार जिने खुंटाळ्यांवर ठेवून घोड्यांना खरारा बंदी करू लागले. संगमेश्वराच्या बायाबापड्या रात्री खर्चासाठी लागणारे पाणी कळश्यांनी आपापल्या घरट्याकडे नेऊ लागल्या. पाखरे कोटरांकडे परतत होती.
याच वेळेला गणोजी मुकरर्बखानाच्या कानाडी तोंड देऊन दबक्या आवाजात म्हणाला, “पाचशे घोडा आहे संगमेश्वराला. भवत्यानं खड्या चढणीचं कडं हाईत. कुमक करायला मातब्बरीचं ठाणं न्हाई आसपास. पन्हाळ्याचा घोरपडयाच जरा दबीत ठेवाय पायजे. माजोर दस्त कराया नामी मोका हाय. फत्ते झाली की मातर आमच्या शिरकाणाचं बादशहास्त्री सांगावा विसरू नका खानसाब.”
कोल्हापूरला महालक्ष्मीच्या रावळात सांज आरती चालू होती. घाटेच्या आवाजात गणोजींचे इमानदार शब्द विरून जात होते. लगोलग दीड हजार कडव्या हशमांची फौज बांधून मुकर्रबखान निघाला. कोल्हापुराहून आंबा घाटमार्ग संगमेश्वराकडे.
दीड हजार हत्यारबंद हशमांचे घोडापथक खडखडत्या टापांनी कोल्हापुराहून निघाले.आघाडीला होते मुकर्रबखान, त्याचा मुलगा इखलासखान आणि त्यांना दौडीचा, पन्हाळा बगलेला टाकून जवळ आणि बिनघोरी माग दावायला उजवे गणोजी आणि कान्होजी, डावे नागोजी माने. घोडी आंबाघाटाच्या रोखाने खाडखाड दौडत असतानाच शक आलेल्या इखलासने मोठ्याने ओरडून आपल्या बापाला विचारले – “हाथ नहीं आया काफर और जंगमें जानपे बिती तो आब्बाजान?””
“डरपोक, शहिद हो जाएंगे आका जानके नामपर। फतेह हुई तो मालेमाल कर देंगे हजरत गौरसे।” मुकर्रबखान जिवाच्या कराराने दौडत होता. गणोजी, कान्होजी, नागोजी त्याला, “डावरीकडं – सही हाताला” म्हणत हात उठवून माग देत होते. ओढे, वहाळ, पांदी सपासप मागे पडत होत्या. पुरते सांजावले तसे खिनभर फौज रुकली. पलोते पेटवले गेले. मशालजी घोडाहशमांनी ते एका हाती तोलत आघाडी घेतली. काही फौजफळीत पांगले. एक पेटता जिहादी लोळ पुढे सरकावा, तशी जिद्दी फौज टापांवर पडली.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २११.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.