महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,567

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१३

Views: 1375
10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१३ –

खास काफरांच्या राजाला अंगलटीने भिडण्याच्या आड म्हलोजीच येतात हे हेरलेला इखलास म्हलोजींकडे बोट रोखत ओरडला – “घेर डालो बुद्रेको.” राजांची आघाडी धरून लढणाऱ्या म्हलोजींच्या भोवती चवताळल्या हशमांनी दाटीच दाटी केली. फळीपासून म्हलोजी तुटून एकले झाले. तरीही हातचे हत्यार लाजून जावे, असे खरस पडल्या तोंडाने ‘बुढ्या बोलीत’ कडकडतच राहिले, “नावडी-व्हडकी- धनी.” सिंहगडावरचे शेलारमामा जसे त्यांच्या रूपाने हात फिरवीत होते. मामा फत्ते घेत टिकले होते. पण म्हलोजी? अंगावर जागा नव्हती त्यांच्या जखम झेलायला. आणि – आणि झालाच वार हाशमी, जाड पात्याच्या तेगीचा त्यांच्या छाताड्यावर!! कोसळले – म्हलोजी जनावरावरून खाली कोसळले! दौलतीचे दुसरे मर्दाना सरलष्कर कोसळले.

एव्हाना नावडीच्या नदीकाठापर्यंत पोहोचलेल्या लढत्या राजांच्या कानावर जाळासारखी खबर पडली “म्हलोजीबाबा पडले.” ती ऐकताच सुन्न झालेल्या शिवपुत्राच्या हातातली तेग पळभर जागीच रुकली. तोच मोका साधून भोवती भिडल्या हशमांतून आला वार हुकवण्यासाठी झटकन मान कलती फिरवताना राजांच्या डुईचा टोप उडाला. नावडीच्या भुईवर आला. त्याने चरकलेल्या राजांनी कसल्यातरी अनामिक बळाने पायीच्या मोजड्यांची टाच इतक्या जोराने चंद्रावताच्या पोटात खुपसली की, कळीसरशी ते जनावर नदीकाठच्या रोखाने बेफाम उधळले.

पण – पण पात्रात उतरावे तो पुरा नदीकाठ नंग्या तेगी उगारलेल्या हशमांनी केव्हाच रोखून टाकला होता. घोडा फिरवलेल्या छत्रपतींना संताजी-बहिर्जी सावलीसारखे मागे आलेले दिसले. त्यांना बघताच महाराज ओरडले, “थांबू नका इथं. रायगड गाठा. मिळेल त्या असामीनिशी गड राखा – निघा.” भोवतीच्या हशमांचे वार दोघेही परतवत होते – राजे आणि घोरपडे बंधू. काळीजसुद्धा हेलावून गेलेले संताजी पिळवटून ओरडले, “हुयाचं ते हुईल. आबा तर ग्येलेच. कसं टाकावं धन्यास्री मागं एकलं?” “आण आहे  जगंदबेची. हुकूम आहे हा आमचा. निघा -” एवढ्या कोंडीत ऐन जंगमैदानावरसुद्धा त्यांच्या न कळणाऱ्या डोळ्यांकडे बघताना हत्यार फिरवणारे संताजी ओरडून गेले – “जी.” आणि त्यांनी घोडा वळवला. बहिर्जी त्यांच्या मागे झाले.

जागजागी नावडीच्या माळावर कामी आलेल्या मावळ्यांचे आणि हशमांचे देह इतस्तत: पडले होते. निपचित पडल्या सरनौबत म्हलोजीबाबांच्या पांढऱ्या गलमिश्या वाऱ्यावर फरफरत होत्या. त्यांचे उघडे डोळे कसल्यातरी आशेने नावडीच्या नदीकाठाकडे जखडले होते. अर्जोजी, राया-अंता सावलीसारखे खाशांच्या पाठीशी होते. हयातीतला हाही सर्ग पुरा करण्यासाठी राजांची उजवी धरून “कनोजा’ म्हणून सगळ्या मंत्रिमंडळाने हयातभर हिणवलेले, हेटाळलेले कुलेश लढत होते! संगमेश्वराबाहेर निसटण्याचे सर्व मार्ग रोखले गेले होते. लढणे आणि लढणे एवढेच सगळ्यांच्या हाती उरले होते. आणि ते सर्वांनीच पुरते जाणले होते. मने करकचून बांधली गेली. चारी बाजूला सरासर फिरत्या नुसत्या तेगींचा खणखणाट चालू झाला आणि कुठूनतरी सुटलेला एक तीर कुलेशांच्या उजव्या दंडात सपकारत घुसला. डाव्या हाताने उजवा दंड घट्ट पकडून धरतानाच कुलेश घोड्यावरून कोसळले. कोसळतानाच ओरडले, “मैं गिर गया।”

ते ऐकून अंगावर पडते वार सपासप फेकून देत छत्रपती त्यांच्याजवळ आले. पाते लवायच्या आत भुईवर झेप टाकून त्यांना काखेत हात घालून वर उचलताना म्हणाले, “उठा छंदोगामात्य. दिल धरा. लढता-लढता मरू. पुरे करू जिंदगीचे काव्य. साजेसे.” कुलेशांनी तीर केव्हाच काढून फेकला होता. जाम्याचा उजवा हातोपा रक्तचिंब झाला होता त्यांचा. तरीही मुठीतले हत्यार नव्हते सोडले त्यांनी. राजांच्या बरोबरच पायउतार झालेले राया-अंता, अर्जोजी असे कितीतरी धारकरी महाराज आणि कुलेश यांच्यावर तुटून पडणाऱ्या हशमांच्या लाटा थोपवून धरण्यासाठी निकर करत होते. आता भुईवरची हातघाईची मारामारी पेटली. कुणाचीच कुणाला जोड मिळणे शक्‍य नव्हते. इखलास, मुक्रबही पायउतार झाले होते. हशमांची इतकी दाटी झाली होती की, त्यातल्याच कित्येकांना हत्यार फिरविणेही अशक्‍य झाले.

कुणालाच हत्यार फिरवता येणार नाही इतकं माणूसच माणूस राजांभोवती दाटलं. त्यांच्या जखमी अंगाभोवती चौ-बाजवांनी कैक भाल्यांची टोके आणि तलवारींची पाती भिडली. हातची उचललेली, आबासाहेबांची भवानी तशीच रुकली. नैवेद्याचा गुळखडा चहूबाजूंनी काळ्याशार डोंगळ्यांनी घेरला. हीच गत, कुलेश, रायाजी-अंताजी यांची झाली. दाटलेल्या हशमांची कोंडी फोडत मुकर्रबचा तरणाबांड मुलगा इखलास, श्रींच्या राज्याचे वारस असलेल्या, बऱ्हाणपूर, औरंगाबाद तसनस करणाऱ्या, गोव्यातील फिरंग्यांची झोप उडविणाऱ्या, जंजिऱ्यातील हबश्यांना हाय घ्यायला लावणाऱ्या, आका-हजरतला मराठी मुलखातून शिकस्तीनं फौजा माघार घेण्याची नौबत आणणाऱ्या लईम संभासमोर आला.

देहाचे म्यान नावडीच्या मातीवरच ठेवल्यागत तेगीच्या धारेसारख्या तळपत्या नजरेने राजे हातच्या भवानी तलवारीकडे बघत होते. कुणातच नसल्यागत.

“रख दो हथियार” इखलास कडाडला. भक्कम खडकावरून दर्याची लाट जावी तसेच ते शब्द राजांच्या कानांवरून गेले. तसूभरही हालचाल झाली नाही त्यांची.

“काफर सुनते हो? फेक दो हथियार!” घुश्शाने पेटलेला इखलास, अभिषेकसमयी पवित्र नद्यांचे जल, तीर्थ म्हणून मस्तकी घेतलेल्या राजांची केसावळ मुठीत पकडून ती गदगदा हलवीत गरजला. त्या बेगुमानीने राजांनी आपली जळजळीत नजर खानावर टाकली. ती बघून राजांच्या हातचे हत्यार क्षणात गर्दनीवर उतरेल म्हणून खान चरकला.

एवढ्यात गर्दी फोडत लालसर दाट दाढी-मिश्यांचा खासा मुकर्रबखानच त्या जागी आला. त्याला कुर्निसात करून इखलास म्हणाला, “हथियार नहीं छोडता काफर। मगरूर है। ”

“सबूर बेटे। सूरमा आदमी शौकसे हथियार नहीं छोडते।” आपल्या बेट्याला सुमार करत मुकर्रब राजांच्या सामने आला. त्यांच्याकडे बघत भोवतीच्या आपल्या हशमांना म्हणाला, “दस्त करो इसको पहले। रस्से डाल दो हाथोंमे। बादमें खींच लो हथियार। ले जाव।”

लढाई थांबली होती. जिवंत मावळे मंडळी काढणीबंद झाली होती. महाराज आणि छंदोगामात्य कवी कुलेश संगमेश्वराच्या शिवासमोर दस्त झाले!!

नवा दिवस फुटीला पडला होता. या वेळी अकलूजच्या साठ हजार फौजी तळावर आपल्या डेऱ्यात इराजी सतरंजीवर गुडघे टेकून सत्र की नमाज पढताना मुहिउद्दिन मुहंमद आलमगीर गाझी औरंगजेब पुटपुटत होता, “अलहम्दुल्लाल्ललाह – ला इलालिल्लिलाह – मुहम्मद उर्रसूलिल्ललाह -”

नमाज पढून होताच खाशा दरबारी डेऱ्यात त्याने वमीर असदखानाला विचारले, “मुकर्रबखांकी क्‍या खबर कोल्लापूरसे? पीछा कर रहा है, नाचीज संभाका? या पडा हे ऐशोआरामसे लौंडियोंके साथ कोल्लापूरमें?”

आणि मुकरबखानाला परतीचीही वाट दावून संगमेश्वराच्या रानातच आपली घोडी थांबवून लढतीची थकावट दूर करण्यासाठी न्याहारीचा कांदा फोडताना गणोजी आणि नागोजी म्हणत होते, “कांदा फोडला की पानी धरतं डोळ्याला. पर विलाज न्हाई. “भाकरी’ तर जाय पायजे!”

मुकरबखानाला थांबायला वेळच नव्हता. तो जाणून होता, थांबले तर दस्त केल्या आपल्या कैदी राजाला सोडवण्यासाठी, मिळेल त्या जागेला मावळ्यांच्या तुकड्या जीवे तुटून पडणार होत्या. आपले पडले हशम दफन करण्यासाठी हत्यारबंद हशमांचे पथक मागे ठेवून त्याने इखलासला हुक्‍्म दिला, “जो तैयार है इस्लाम बनने उनको रिहा कर दो।” पकडलेल्या मावळ्यांत राया-अंता होते, ते धर्म डुबविणे मान्य करणे शक्‍यच नव्हते. नतिजा साफ होता. अर्जोजी कसेतरी निसटले होते. पण एकल्याने काही करणे शक्‍य नाही म्हणून कऱ्हाडकडे कूच झाले होते. सलामत बचावलेले संताजी-बहिर्जी हुकुमाप्रमाणे रायगडाकडे दौडत होते. संताजीकडे राजांच्या चंद्रावताच्या पाठीवरचे जीन होते. महाराणी येसूबाईना ते खूण म्हणून तेवढेच दाखवणे शक्‍य असल्याने त्याने गर्दीतून उचललेले.

राजे पायउतार होताच मुकर्रबच्या चिडल्या हशमांनी वार उतरल्याने घायाळ झाला ‘चंद्रावत’ चौखूर ताणून भुईवर पडला होता. त्याचे छातवान मंदपणे वरखाली होत होते. उघड्या डोळ्यांतून वेदनांनी पाणधार लागली होती. एका बगलेला आपल्या कामी आलेल्या घोरपड्यांच्या जमावात निष्प्राण पडलेल्या म्हलोजींच्या हातची मरणमूठ हत्यारावर करकचून आवळली होती. डुईची कंगणी, लाल पिळाची पगडी हत्याराजवळ भुईवर पडली होती.

चारी बाजूंनी भालाइतांची टोके भिडवून कुलेश आणि राजांना इखलास- मुकर्रबनी एकत्र आणले होते. खांद्यावरच्या हिरव्या खिल्लतीला झटके देत मुकर्रब कसा गरगरा फिरत आपल्या फौजेला हुकमांमागून हुकूम देत होता. “जल्दी करो। वख्त नहीं है॥” मध्येच लालसर दाढीवर हात फिरविताना त्याचा चेहरा ओसंडल्या उत्साहाने भरून वाहू लागला.

दस्त मावळे काढण्या खेचून कत्तलीसाठी नेले जाऊ लागले. हशम खेचत्या काढण्यांची ओढ दंडावर बळाने रोखत राया-अंता भरल्या डोळ्यांनी, पिळवटून ओरडले,

“धनी” “हयातभर ऱ्हायलाव सावलीगत पाठीशी. पर आता कसली ही ताटातूट? आमास्त्री बी घ्या संगं धनी.” थोरल्या रायाच्या डोळ्यांतून कुणबी इमानाचे पाणी खळकन बाराबंदीवर उतरले.

“दुदाचं झालाव तसं रगताचं भाव करा आमास्री. संगं न्या धनी” जखडल्याच हातांनी मुजऱ्यासाठी धाकल्या अंताने मान लववली.

ल्या आऊ गेल्या तेव्हा, आबासाहेब गेल्याची खबर कानी पडली तेव्हा, समर्थांनी हयातीचा ग्रंथ पुरा केला तेव्हा, काळ्या हौदावर चितेवर चढल्या पुतळा आऊसाहेब बोलल्या तेव्हा, भरून आले तसे राजांच्या डोळ्यांचे टाके सरसरत डबडबून आले. काहीच दिसेनासे झाले. जगदंबेनेच राजांशी जोड घातलेले राया- अंता मागे फिरण्यासाठी उसळत असतानाच हशमांनी खेचले.

आता मुकर्रबखानाची फौज परतीसाठी तयार झाली होती. सगळीकडे देख टाकून सगळे मनाजोगे झाले आहे, याची पक्की खातरी करून घेत मुकर्रब कडाडला, “डाल दो काफरोंको घोडोंपर। जखड दो रस्सेसे कसके, ले चलो ये शाही तोहफा हजरतको। मरहदट्टोंका राजा और उसका बम्मन शायर। बहोत खूब। खैर अल्लाकी।”

भालाइतांनी भाल्याची टोच राजांच्या पाठीला लावली. तसं काढणीवाल्या हशमांनी काढण्या खेचायला सुरुवात केली. बळ एकवटून आपल्याच मुठीने काढण्या पकडून, त्या रोखात पाय भुईत जाम रुतवून एकटक मुकर्रबकडे बघत राजे निर्धारी म्हणाले, “खान, जंग आहे हा. दर्शन घेणार आहोत आम्ही आमच्या सरलष्करांचे.”

गोंधळलेला मुकर्रब भोवतीच्या हशमांकडे बघत म्हणाला, “क्‍या बोलता है? मतलब?”

त्याच्यावरची नजर तशीच ठेवून खुद्द राजेच झटकन हिंदुस्तानीत म्हणाले, “जंग है। राजा है हम। देखना चाहते हे हम कुर्बान हुआ हमारा सालार।”

“शौकसे, शौकसे” गर्दन मागे टाकून मुकर्रब एवढा हसला की, त्याच्या डोळ्यांत पाणी आले. काढणीवाले भालाईत पाठून खेचलेच जावेत एवढ्या ओढीने राजे म्हलोजी पडलेल्या जागेकडे झेपावले. राजांनी गतप्राण म्हलोजींच्या छातीला हात भिडवून तो कपाळीच्या शिवगंधाला लावून भोवतीला कुणालाही कळणार नाही, असा मुजरा घातला. फक्त एकाच विचाराने, “आले असते पावनखिंडीत पडले बाजीप्रभू आबासाहेबांच्या सामने प्रेत म्हणून, तर त्यांनी काय केले असते? सिंहगडावर पडल्या मालुसरेकाकांना बघून काय केले असेल त्यांनी?” म्हलोजींनी मरणाच्या मोलाने मिळवला होता, तो मुजरा. खुद्द मराठी दौलतीच्या राजाकडून!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१३.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment