धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१५ –
मिरजेच्या भुईकोट ठाण्यातून बाहेर पडलेले मुकर्रब-इखलास जोखमीचे कैदी घेऊन अकलूजच्या तळावर विश्रांती आणि रसद घेऊन बहादूर गडाकडे निघाले.
पिछाडीला राहिलेला अकलूजचा शाही तळही त्यांना सामील झाला. पुराने नदी फुगावी, तशी आता मुकर्रबची फौज दिसू लागली. माथ्यावरची उन्हतापीची झळ चुकवावी म्हणून फौजेच्या हशमांनी टापश्या बांधून गर्दनी खाली घातल्या होत्या. राजांना आणि कुलेशांना तर लादलेल्या जनावरांच्या गर्दनीशीच दोरखंडाने जखडून टाकले होते. तळपत्या उन्हाखाली हजारो घोड्यांचा काफला, रखरखीत, उजाड प्रदेशात संथ चालीने चालला होता. सगळ्या फौजेतल्या तीनच मनांत विचारांची खाई रखरखत होती. दक्षिणेत आल्यापासून शहेनशाहला असा जिंदा तोहफा नजर करण्याची किस्मत लाभलेल्या मु्करबखानाच्या मनात एकाच विचाराची की, ‘जी चाहे सो फैसला लेनेवाले हजरत संबाको ही दख्खन सुभा करें तो क्या? कल उसको भी कुर्निस करना पडेगा!’ आणि जनावराच्या गर्दनीशी आपली गर्दन जखडलेल्या राजांच्या मनात – एकाच विचाराची की, “पडलाच रायगड तर काय गुजरेल श्रीसखींच्यावर?’ आणि त्यांच्याच मागून खेचल्या जाणाऱ्या कवी कुलेशांच्या मनात एकाच विचाराची की, “हमारे साथ नहीं बैठे भोजनमें कभी रायगडके कोई मंत्रिगण। और इस आखरी भोजनमें स्वामी भी नहीं मिले साथ तो?’
मजला मागून मजला मागे पडत होत्या. उन्हाने घायाळ झाल्या राजे, कुलेशांना जवळ येऊन घोड्यावरूनच इखलास खोचकपणे जाब करत होता, “प्यास लगी हे, मरहट्टोंके शहेनशाह और वझीर?” आणि कैद्यांनी मान फिरवताच काखेतल्या बांधल्या पखालीचे पाणी त्यांच्या मुखड्यावर शिंतडून, पखाल आपल्याच तोंडाला लावून घटाघटा पाणी पिऊन खदखदा हसताना म्हणत होता, “क्या गर्मी है? कितना ठंडा है पानी!”
उन्हाची मार असह्य झाली की, आपली जनावरे आणि फौज वाटेतल्या आमराईच्या गर्द सावलीखाली उभी करून राजे, कुलेशांची घोडी मात्र मुद्दामच उन्हात खडी केली जात होती. दिवस आता कलायला झाला आणि फौज बहादूरगडापासून दोन कोसांवर येऊन रुकली. मुकर्रब-इखलास कुणाचीतरी वाट बघत होते. एकसारखे घोडे फौजेला आघाडीला काढून तळहाताची झड डोळ्यांवर नेत बहादूरगडचा माग घेत होते. बऱ्याच वेळाने एक घोडेपथक समोरून येताना दिसू लागले. त्याच्याबरोबर दोन उंटही होते. पण त्यांच्या पाठीवर स्वार नव्हते. ते माना वरखाली डुचमळ करत तसे दौडत पथकाबरोबर येत होते. तेही बिचारे उन्हाने कासावीस झाले होते.
बहादूरगडाहन खुद्द औरंगजेबानेच फत्ते घेऊन येणाऱ्या मुकर्रबखानच्या आगवानीसाठी ते त्याचे नेक सरदार होते – सरदारखान आणि हमिदुद्दीनखान! त्यांच्याबरोबर मुकर्रबसाठी मरातबाच्या नव्या खिल्लती देण्यात आल्या होत्या. एका ख्रिदमतगाराच्या घोड्यावर दोन “तख्ता-कुलाह’ म्हणजे इराणी पद्धतीचे लाकडी खोडे होते. सरदार आणि हमिदुद्दीनला बघताच मुकर्रब आणि इखलास पायउतार झाले. पुढे होत त्यांनी त्यांना कडकडून खांदाभेट दिली. हमिदुद्दीन मुकर्रबला म्हणाला, “मुबारक हो खान – आलममपन्हाका हुक््म हे, दोनो कैदिओंको ‘तख्ता-कुलाह ह’ डालो। उतार दो उनके बदनसे काफर असवाब और चढाओ ये खास खुशामदगारोंके कुर्त! जकड दो उनको उंटके पीठपर और ले चलो बाजे बजाते, ढिंढ निकालकर, बहादूरगड!”
मुकरबखानाच्या हशमांनी पटापट हालचाली करून घोड्यांवर जखडल्या राजे आणि कुलेशांना खाली घेतले. त्यांच्या गळ्यातील मोतीकंठे, कानांतील सोनचौकडे असे
मौलिक डाग कुणी-कुणी ओरबाडले. त्यांच्या अंगावरचे जामे ओरबडून काढण्यात आले. त्याऐवजी विदूषकासारखे ढगाळ कुर्ते दोघांच्याही अंगी जबरीनं चढवण्यात आले. कमरेला घंटांच्या माळा आणि काटेरी वेलींची कडी आवळण्यात आली. डोकीवर उंच माटाच्या, लाकडी, विदूषकी टोप्या चढवण्यात आल्या. हात आणि गर्दन जखडून टाकणारे इराणी पद्धतीचे, लाकडी “तख्ता-कुलाह’ त्यांच्या हाता-कंठात करकचून आवळण्यात आले.
दोघाही कैद्यांनी सरदारखान, हमेदुद्दीन दीन आणि मुकर्रबखान यांनी दिलेले हुकूम पाळणाऱ्या खिदमदगारांना कसलाही विरोध केला नाही.
कसे दिसत होते राजे आता! कुठल्याही फौजी मावळ्याने त्यांना दुरून तसे बघितले असते, तर गनिमाचा बहुरूपी खबरगीर म्हणून दस्तच करून टाकले असते!
ते ‘राजे’ नव्हतेच. विदूषकी पोशाखात बादशहासमोर पेश केले जाणारे ‘बळी’ होते. राजचिन्हाची एकच खूण ‘नाचीज’ म्हणून कुणीही उचकटून न टाकल्याने त्यांच्या अंगावर तशीच होती आणि तीही आबासाहेबांनी दिन-रात छातीवर वागविलेली, चौसष्ट कवड्यांची फक्त भवानीमाळ! संगसोबतीला एकच माणूस होते – कुठल्या कुठे कनोज देशात उपजलेला एकमेव कवी – छंदोगामात्य कुलाएख्त्यार कुलेश!
सरदारखान, हमिदुद्दीन, इखलास-मुकर्रब यांनी कैद्यांना चौफेर कडेकोट घेर टाकणारी फौजेची हत्यारबंद शिस्त लावून घेतली. हात रश्यानं जखडलेल्या दंडात काढण्या आवळलेल्या कैद्यांच्या भोवती हजारो हशम तळपत्या नंग्या तेगी नाचवत हारीने उभे ठाकले.
शाही शहाजणे, तुताऱ्या, नगारे, चौघडे यांची एकमेकांत मिसळती घोष गर्दी उसळली. बेहोश हशमांनी नरड्यांच्या घाट्या फोडत किलकाऱ्या उठविल्या – “धीन न धीन.”
निघाली! काफर कैद्यांना कडेकोट बंदोबस्तात घेराने जखडून धिंड निघाली. औरंगजेबाच्या पुऱ्या हयातीत त्याने सग्या भावांपासून कैक गनिमांची बेरहम कत्तल केली होती. पण आज त्याच्या हुकमाने निघणारी ही अशी पहिलीच धिंड होती. का घेतला होता त्याने हा असा निर्णय? एकाच हेताने. ही अशा धिंडेची खबर मराठा मुलखात गावोगाव पांगेल – वाऱ्यासारखी. ती ऐकून हाय खाल्लेले जिंदे मरहट्रे आपसूक झक्कत येतील तसलीम करत मन्सबीची खिल्लत मागायला. पडला मराठी मुलूख एकदाचा की, करून टाकता येईल कांजीवरमपासून तहत काबूलपर्यंतचा पट्टा इस्लामचा बंदा!!! आणि त्या अफाट सलतनतीची राजधानी करता येईल – देहली!
मोतद्ारांनी हाती धरलेले कैद्यांचे काढणीबंद खेचले. राजे-कुलश तिरपागडत त्या झटक्याबरोबर ओढले गेले. भोवतीच्या जमावातून शेलक्या शिव्या कल्लोळू लागल्या –
“नाबकार लईम, मोजदा – खिंचो कसके शैतानोंको।”
गेल्या नऊ वर्षांत याच सांबरूपी संभाने त्यांची बऱ्हाणपूर, औरंगाबाद अशी कैक ठाणी तसनस केली होती. कैक सुरम्या लढवय्यांना मौतीचे कंठसान घातले होते. फकीर फकिराण्याला जिम्मा रोजचा नमाजसुद्धा नामुमकिन केला होता. त्यांचा नुसता हा नव्हता – शक्य असते, तर सपासप हत्यारे चालवून त्यांनी दोन्ही कैद्यांचे एकाच गोळ्यात केव्हाच गाठोडे केले असते.
देठ मोडल्या खालमानेने मराठी दौलतीचे मानकरी छत्रपती आणि छंदोगामात्य कुलेश हत्यारी धारकरी खेचतील तसे भेलकांडत चालू लागले. तशाही स्थितीत त्यांना एकदा तरी बघण्यासाठी कैकजण गर्दी करून पुढे घुसत होते.
जे पाय रुजाम्यांच्या पायघड्यांवरून आत्मविश्वासाने रुपत, चालत आजवर आले होते, तेच छत्रपतींचे रक्तदाट, गुब्बार पाय आज पेडगावच्या वाळवंटात फरफटत चालले.
ज्या देहाने रायगडावर सोन्याच्या झुलेनं सजल्या हत्तीवरून राजा म्हणून मिरवून घेतले होते, तोच जखडबंद देह धिंडीचा भोग भोगू लागला.
राजांनी भोवतीचं काहीच नजरेस पडू नये म्हणून डोळे मिटतेच घेतले होते. कुलेशांचे डोळे उघडेच होते – पण त्यांना दिसले तरी काही भासत नव्हते. त्यांच्या उजव्या दंडातून, संगमेश्वरात रुपल्या बाणाने ओघळून-ओघळून थकलेले रक्त आता साकळले होते. काळपटले होते. भोवतीच्या हजारो मुगल हशमांचा आनंदी जल्लोषाचा नुसता कलकलाट चालला होता. कुणाचेच कुणालाही काहीही ऐकू येत नव्हते. लोक ओरडत होते – “खिंचो -जोरसे खिंचो। मरहबा – मुकर्रब-इखलास – आफरीन.”
काढणी खेचणाऱ्याने वैतागून एवढा जोरदार हिसडा हातातल्या काढणीला हासडला की, जगदंबेच्या कपाळी चढविलेले कौलाचे फूल घरंगळत कोसळावे तसे राजे छाताडावर थेट भुईवर आडवे झाले! तशी भोवतीच्या गर्दीत खुशीच्या ऊर्मीची लाटच लाट उसळली. कमरेला नेट देऊन उठणाऱ्या राजांना एकाकी भवानीबाई नि बाळराजांची आठवण झाली. “ते बचपणी कमरेलाच घालत होते विळखा! थोडे मोठे झाले आणि सुटला त्यांचा विळखा! आता घालायचे मुजरे! मुजरे – मुजरे! आहेत याद किती हातांनी घातले या कुडीला मुजरे? कशासाठी घातले त्यांनी ते? लाचार होते म्हणून? माणसे मान झुकवतात – कशापुढे? सत्तेपुढे? साफ गल्लत! माणसे झुकतात प्राणापल्याड जाऊन भोवतीच्या कैकांचे माणूसपण जपणाऱ्यांसाठी. आबासाहेब तसेच. ते गेलेत तरी का नाही वाटत गेल्यासारखे? कसे वागते, असते तर ते आत्ता?’
आणलेले, गर्दीमुळे बुजलेले उंट सांडणीस्वारांनी चुचकारून कसेतरी एकदाचे बसते केले. त्यावर लादण्यासाठी राजांना आणि कुलेशांना काढण्या धरलेले हशम खेचू लागले. ते त्यांना साधेना. पाय भुईत जाम रुतवलेले कैदी तसूभरही हलायला तयार नव्हते. काढणीधारी हशमांची आणि कैद्यांची खेचाखेच बघत असलेला इखलास भोवतीच्या हशमांना बघून कडाडला, “देखते क्या हो बेवकूब, गद्दार! उठाव दोनोंको, डाल दो उंटोंपे।” भोवतीच्या हशमांतले पाच-दहा धिप्पाड हशम हातातल्या तेगी म्यानबंद करत पुढे झाले. लुटीची बोचकी उचलावी, तसे राजांना आणि कुलेशांना बळजोरीने उचलून त्यांनी उंटावर लादले. दोरखंडांनी दोघांनाही उंटाशी करकचून आवळले. खूर वेडेवाकडे करत वेड्यावाकड्या अंगचणीचे उंट, भोवतीच्या जमावातून “धीन धीन”’चा कल्लोळ उठत असतानाच भेदरून वर उठले. सांडणीस्वारांनी त्यांच्या शेपट्या करकचून पिरगाळल्या. त्या कळीसमके माना मागेपुढे करत ती मुकी जनावरे डुचमळत चालू लागली. राजे आणि कुलेशांचे पाय त्या उंटांच्या पोटाभोवती जखडून बांधले होते. दोघांच्याही हातातल्या काढण्या धरून आघाडीला मुकर्रब, इखलास खासे घोड्यावर बसले होते. वाद्यांचा, आरोळ्यांचा कालवा कानठळ्या बसवत असतानाच कधी निघाली नव्हती, अशी जल्लोषती धिंड निघाली.
वाटेवर येणाऱ्या मौजे-बुद्रकातली औरंगची रिआया मुकर्रब व इखलासवर खोबरे आणि खारकांचे तुकडे फेकत हर्षाने नाचत होती. दिवस ईदसारखा साजरा होत होता. रात्र “शबेबारात’सारखी सजली जाणार होती. वाटेवर पसरलेल्या लांबलचक तळावर अशी एकही असामी नव्हती की, तिला दोजखी कैदी बघून डोळ्यांचे पारणे फेडायची जन्नती ख्वाईश नव्हती. फौजेचे हत्यारी लोकच “सबूर, पीछे हटो,” म्हणत आपल्याच बाया, मर्दाना, बज्ञष्यांना मागे हटवीत होते. त्यांची नजर सुकवून बच्चेसमोगल आणि औरती उंटावरच्या कैद्यांना हाती मिळतील ते पायतळीचे गुंडे मारत होते. “कुत्ते, शैतान, काफर” असे पोटतिडकीने म्हणत, नफरतीने मनातला घुस्सा थुंकीत एकवट करून पायाशी पचापच थुंकत होते.
क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१५.
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.