महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,437

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१६

By Discover Maharashtra Views: 1344 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१६ –

आता डोळे सताड उघडे केलेल्या क्षत्रियकुलावतंस शिवपुत्र संभाजीराजे यांच्या नजरेत अपार, अशरण तेज उतरले होते. देहात नसल्यासारखेच दिसत होते ते!

मांडाखालच्या उंच जनावरापेक्षा, डोक्यावरच्या उेच लाकडी टोपीपे क्षा, एवढेच काय; रायगडाच्या उंच आघाडी मनोऱ्यापेक्षा नजर ठरणार नाही, अशा उंचवट्यावर जाऊन बसल्यागत दिसत होते त्यांचे डोळे. एवढ्या जोश कल्लोळातही कुलेशांच्याकडे बघत त्यांना विचारलेही, नेहमीच्याच राजबोलीत – “कचरलात छंदोगामात्य?”

झटकन आपली गर्दन राजांच्याकडे करून ती किंचित लवती करत कुलेश उत्तरले, “जी नहीं, नहीं होती ये आंखें, तो ऐसा नहीं देखना पडता स्वामीको!”

मध्येच मागे वळून इखलास खेकसला, “क्या बकते हो आपसमें? नाम लो खुदाका.”

एरवी जो फासला काही पळात काटला गेला असता, तोच सगळ्या तळाचे डोळे निववीत चांगला दोन-तीन घंटे काटला जात होता. हिंदोस्थानच्या शहेनशहा

आलमगिरांचीच शाही मुराद होती ती. तसा हुकूमही होता.

धिंड बहादूरगडाच्या आघाडी दरवाजात आली. दरवाजातच बहादूरखान, रणमस्तखान, शाब्दिखान, हसनअलीखान, गझनफरखान असे मुलूखभर तळ टाकून पडलेले खासे सरदार खडे होते. काही ना काही निमित्त काढून त्यांनी आज बहादूरगड जवळ केला होता. खिल्लती फेकून उभा मावळमुलूख फितव्याने फोडणारा बक्षी रुहुल्लाखान तर साऱ्या सरदारांत गरगर फिरत होता. त्यालाही बघायचा होता ऑँख भरून एकदा, दख्खनेत आल्यापासून हैराण-हैराण करणारा शैतान संबा! या खुशीच्या क्षणाची नौबत म्हणून गडावर तोफांची भांडी दणादण कडकडत फुटली.

अंगावरचे विदूषकी, ढगळ कपडेसद्धा कपडेसुद्धा जागजागी फाटलेले, उन्हाने घामेजलेले, अंगावर पडलेल्या दगडगुंड्यांनी जागजागी जाया झालेले कैदी – राजे आणि कुलेश, उंटावरून खाली उतरविण्यात आले. गडाच्या लोहारमेटावरून निवडून पाठवलेल्या लोहारांनी झटाझट दोन्ही कैद्यांच्या खांदा-छातीवरून आवळून त्यांच्या पायांत लोखंडी बेड्या सांडशी, हातोड्याने पक्क्या करून टाकल्या. संशयी आणि गैरवाजवी सावध खुद्द औरंगनेच प्रथम कैद्यांना बेड्या आवळण्याचा सख्त हुक्म दिला होता! त्याने सर्व सावधानगी घेतली होती. शक्‍य असते तर त्याने राजांच्या भोसलाई राजस मनालाही बेड्यात जखडण्याचा हुकूम दिला असता!!

बहादूरगडात दिवाण-इ-आमचा दरबार खचाखच भरला होता. त्यात सगळीकडून आलेले मोगली सरदार, सर्जाखानसारखे इदलशाही, कुत्बशाही सरदार, सर्वात आघाडीला शहजादे कदमबरहुकूम नजर बांधून दरबारी रिवाजाप्रमाणे खडे होते.

अल्काबाच्या ललकाऱ्या उठताच गुर्झबारदारांनी हातचे गुर्श्बी दंड रिवाजी होशियारीसाठी तिबार फरसबंदीवर आपटले. य:कश्चित माशी फिरली, तरी ते ऐकू यावे, असा सन्नाटाच सन्नाटा पसरला होता दरबारभर. सिंहासन बैठकीच्या पाठच्या दरवाजातून प्रथम वझीर असदखान बाहेर आला आणि पाठोपाठ हिंदोस्थानचा शहेनशाह मुहिउद्दीन मुहंमद आलमगीर गाझी औरंगजेब आला. त्याची कोरली दाढी आता पुरी-पुरी सफेद झाली होती. शेलाटी अंगकाठी मात्र उमर झाली असताही ताठ होती. डोळे शोधक, तीक्ष्ण होते. तो येताच उभा दरबार तसलीम देण्यासाठी खाडकन लवला.

“पेश करो दरबारके सामने नापाक काफर कैदियोंको।” असदखानाने आपल्या अली हजरतांचा हुकूम मुकर्रबला सुनावला. मुकरर्बने इखलासला नजर इशारत करताच दहा-पाच हत्यारी हशमांनी घेर टाकलेले, दख्खनेत आल्यापासून औरंगला घोर लावलेले दोन्ही कैदी दरबारच्या मधोमध पेश घालण्यात आले. कैदी ताठ होते.

आग्ऱ्याच्या कोठीतून तुरी देऊन सलामत सुटलेला सेवाचा बच्चा संभा, त्याच्या बम्मन एखत्यारासह तख्ता-कुलाहात सामने बघताच, आपले सगे भाई दारा-शुकोह, मुराद, शुजा आणि अब्बाजान शहाजहान यांच्या मौतीची खबर ऐकतानाही फुटल्या नव्हत्या एवढ्या आनंदाच्या उकळ्या बुढ्या औरंगच्या काळजात उसळून उठल्या. कधी भुलून वा चुकूनही तो दरबारी रिवाज मोडत आला नव्हता. पण आज नकळतच तो त्याच्याकडून मोडला गेला! बसल्या आसनावरून तो ताडकन उठला. कैदी संभाजीराजे आणि कुलेश यांच्या गर्दनी एवढ्या घेरावातसुद्धा ताठ खड्याच होत्या. झाली! आज या क्षणाला आग्ऱ्यातल्या दरबारानंतर प्रथमच मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि दिल्ली तख्ताचा शहेनशाह मुहम्मद औरंगजेब यांची इतकी वर्षे कुचमलेली “’नजरभेट’ झाली! जसे अंगपूत पेटलेल्या ज्योतीला वादळ बघत होते! चिवट जीवनशक्तीला सर्वग्रासी मौत बघत होती! माणसातल्या मर्दपणाला राजकारणातले गाळीव कपट न्याहाळत होते!

काफरी जिंदादिलीला तख्तनशीन बेरहम, शाही मगरुरी पारखत होती!

घरेलू नाचीज मामल्याचा विचार एरव्ही कधी औरंगच्या मनात येणे शक्‍य नव्हते, पण या क्षणी मात्र एक चमत्कारिक खयाल त्याच्या मनाला धडक देऊ लागला.

“कैसे पैदा करते हे, परवरदिगार ऐसे बेडर सूरमा शख्स काफरों के कोखमें? नहीं तो हमारा कमअस्सल बगावतखोर बच्चा। क्‍या नाम भी रख्खा हमने उसका शाही शोहरतसे – बडे आब्बाजान की याद जगाने – अकब्बर!!’

रानावनांत बरेच दिवस राहिलेल्या बच्चाला राजवाड्यातील गमती खेळणे बऱ्याच दिवसांनी मिळावे तसाच आनंद बुट्डा असूनही शहेनशाहला झाला. वरवर तो धीमा, शांत दिसत होता, पण आतून खुशीची अनावर कारंजी उसळ्या घेत होती त्याच्या काळजात.

त्यातला एक लब्जही कुणालाही बोलावा अशा हैसियतीचे कोणीही दिसत नव्हते, त्याला दरबारात! झाली खुशी कुठेतरी बाहेर ओतून टाकण्यासाठी बेचैन झालेला शहेनशाहा हिंदोस्थान सिंहासनासमोरच्या रुजामेदार पायऱ्या शांतपणे उतरून आज पहिल्याने दरबारी मसनदीच्या चक्क गालिच्यावर आला! क्षणभर त्याने दरबारभर नजर फिरवली आणि मक्केकडे तोंड करून, अस्मानाकडे बघत त्याने पायीच्या गालिच्यावरच खुशीच्या नमाजासाठी गुडघे टेकले!!! कुराणे शरीफच्या आदेशाप्रमाणे तो रोजचे पाच वेळांचे नमाज स्वारीशिकारीतही न चुकता पढत आला होता. तो नमाज पढत असताना कुणाचीच काय; वझीर असदखानाचीही शामत होत नव्हती, आत जाण्याची! आणि – आणि आज मात्र खचाखच भरल्या दरबारात नेक इस्लामचा मनःपूर्वक नमाज पढताना त्याचे डोळे आनंदाच्या अश्रूंनी भरून आले! हातच्या तसबीहच्या माळेवर ते थबकले. त्याचाच दरबार ते ताज्ुबीने बघू लागला. त्यातल्या कैकांनी तर मागून ‘गुस्ताखी’ची आफत नको म्हणून आपोआप गुडघे टेकले!

दरबाराबरोबर छत्रपती संभाजीराजेही तो नजारा बघत होते. एवढ्या जीवघेण्या विटंबनेनंतरही त्यांच्यातला, कवी भूषणाची कदर करणाऱ्या आबासाहेबांचा वारसा सांगणारा, “बुधभूषणम्‌’चा रचनाकार काव्यप्रेमी, मराठमोळा, जातिवंत राजा उफाळून आला. छंदोगामात्य कवी कुलेशांच्याकडे रोखून बघत भरला दरबार थरकून जाईल अशा संथ; पण ठणठणीत राजबोलीत ते म्हणाले, “एवढी चर्चा केलीत आमच्याशी काव्याची हयातभर छंदोगामात्य! करून दावा या औरंगला बघताना आत्ता काय वाटतं त्याचं काव्य! या क्षणी! हाती कलम नाही असं न म्हणता!”

निघाल्या धिंडीने पुरते घायाळ झालेले कवी कुलेश त्या नुसत्या शब्दांनीच ढवळून निघाले. झटकन गर्दन वर घेत राजांच्या कपाळीच्या फिसकटल्या शिवगंधाकडे बघतच राहिले. प्रत्यक्ष औरंगच्या सेवेला खिदमतगार रुजू होणार नाहीत, अशा तत्परतेने शारदेचे मानकरी कनोजी शब्द त्यांच्यासमोर हात जोडत रुजू झाले. आपोआप त्यांच्या ओठांतून ते त्वेषाने बाहेर प्रकटले –

“जो आग्या – सुनिए –

राजन हो तुम साँचे खूब लडे तुम जंग!

तुव तप तेज निहारके तखत त्यजत औरंग!!”

त्या दोघांच्यापासून दूर असल्याने औरंगला ते ऐकू येणे शक्‍य नव्हते. दरबार मात्र ते ऐकून चळवळला. जागजागेंतून कुजबुज उठली, “इन्शाल्ला सच तो है! क्या बकता हे

कुत्ता, काट दो जबान हरामजादेकी… असली शायर है… क्या मिसाल है शायरी!… सबूर – आस्ते… जबान काट जायेगी… इसी दरबार में!” दरबारी कुजबुजीची दखलही न घेता नमाज पढून उठत बादशाहा मुकर्रबला म्हणाला, “ले जाव इनको कोठीमें! हटाव सामनेसे!” औरंगच्या एकाच वाक्यावर दरबारी खसखस खाटकन थांबली! उतरला तसा औरंग संथपणे पुन्हा पायऱ्या चढून दरबारातून निघूनही गेला. दरबार उलगला. साखळबंद कैदी कोठीकडे नेले जाऊ लागले.

त्या खतरनाक आणि आजवर हैराण केलेल्या कैद्यांना बहादूरगडासारख्या शाही ठाण्याच्या कोठीत ठेवणेही औरंगजेबाला काही मानवले नाही. त्याच्या हुकमानेच दुसऱ्याच दिवशी, दरबारी पेश करण्यापूर्वी निघाली होती, तशाच धिंडीने, तशाच वेशात दोन्ही कैदी कोरेगाव जवळच्या तुळापूर ठाण्यालगतच्या वढू बुद्रुकात बंदोबस्ताने आणण्यात आले. अकलूजहून हललेला औरंगचा साठ हजार फौजीतळ बहादूरगड रगड धरून, कोरेगाव, तुळापूर, वढू भागात राहुट्या टाकून दाटून पडला होता. इथेच होता संतश्रेष्ठ ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या तोंडून स्फुरलेले संतबोल ऐकून पुलकित झालेल्या इंद्रायणी आणि भीमा यांचा पावन संगम! या संगम काठालाच मावळतीचा पुढा धरून दोन भक्कम खांब रोवण्यात आले होते. हशमांच्या कड्यातून आणलेले दोन्हीही कैदी उंटांवरून खेचूनच पायउतार करण्यात आले. तख्ता-कुलाह आणि साखळदंडांत अगोदरच जखडलेल्या त्यांना मुकर्रब-इखलासच्या देखरेखीखाली, त्या खांबांना मनगटासारख्या दोरखंडांनी पुन्हा जाम जखडण्यात आले! कंठांतल्या तख्ता-कुलाहांनी त्यांचे हात पंखांसारखे पसरतेच होते. संगमेश्वरातून निघाल्यापासून न कुठलाही अन्नाचा कण दोघांच्याही घशांआड गेला नव्हता. चेहरे ओढले होते त्याने त्यांचे, पण डोळे मात्र शरीराच्या वेदनांचे कडे फोडून अपार शांत आणि तेजवंत दिसत होते. त्यांची मनेच जशी उतरली होती, त्यांच्या फक्त डोळ्यांत!

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१६.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment