महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,740

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१८

By Discover Maharashtra Views: 1334 8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१८ –

सांजावत आल्याने आता मावळकडेवर तापदेवाचा रसरशीत गोळा दिवभरापेक्षा मोठा दिसू लागला. त्याच्या आवतीभोवती लाल, गुलाबी, केसरी यज्ञकुंडच जसे पेटले होते. मनात आणले तरी कधीही तो तेजोगोल खुद्द आभाळालाही दस्त करता येणार नाही, ह्या एकाच विचाराने जखडबंद राजे स्वत:ला हरवून एकटक त्याच्याकडेच बघू लागले. त्यांना याद आली. रायगडाच्या हिरकणी माचीवरून दिसणारा हाच तो सूर्यगोल. एकदा तर श्रीसखींच्याबरोबर माचीवर उभे असताना त्यांनी विचारले होते, “काय वाटतं समोरचा सूर्यनारायण बघताना तुम्हास?”

क्षणभरच थांबून त्या पटकन म्हणाल्या होत्या,“माचीच्या या उंचवट्यावरून तो घरचाच वाटतो – आबासाहेबांगत!”

आबासाहेब! केवढा भाग्यवंत, यशवंत आत्मा! रायगडी काळ होताना भोवतीच्यांना ते म्हणाले होते, “ये तो मृत्युलोक – येथे जितुके आले तितुके गेले.” – कशासाठी येतात माणसे – आणि जातात काय उभवून? का पेटतो तुमच्या आणि समर्थांच्या आठवणीने जिवाचा पोत उजळून? का वाटत नाही तुम्ही गेल्यागत?

हिरकणीमाचीवरून फरशीच्या आकाराचे रूप घेत डुंबताना दिसणारे बिंब, आता खांबाला जखडल्या राजांना कोरीगत सपाट दिसू लागले. हाताच्या तख्ता- कुलाहाचे भानच नव्हते त्यांना. डाव्या हातच्या कुलेशांना म्हणून ते म्हणाले, “डुबतीला चाललाय आभाळाचा स्वामी. रिवाज द्या, त्यास छंदोगामात्य!” छातीशी नेण्यासाठी त्यांनी आपला हात खेचला. तख्ता-कुलाहच्या लाकडी कड्याला तो खटकन कचला. सणकारती कळच हाताकडून उमटून मस्तकात भिनली त्यांच्या. त्या वेदनेची वाटली नाही, एवढी एकाच बाबीची खंत त्या भोसलाई कुलवंतांच्या मनाला पिळवटून गेली, ‘आम्हाला मुजऱ्याचा रिवाज देण्यासाठी किती अदबशीर हात आजवर लवत हालले. पण-पण आज खुद्द आमचा हात मात्र आमचाच राहिला नाही. साक्षात सूर्यनारायणास वंदन करण्यास!’ शरीरापेक्षा मनाच्या या कोंडीने डोळे मिटतेच घेतले त्यांनी. तरीही हालता हालेना त्यांच्या डोळ्यांसमोरून लालीलाल झालेले ते आकाशस्वामी तेजोर्बिंब. राज्याभिषेकाच्या वेळी कानांवर पडलेले ब्रह्मबोल घुमू लागले – “शिसोदिया वंशज सूर्योकुलोत्पत्न – क्षत्रिय कुलावतंस -”

आता तळभरच्या सांजनौबती दुडदुडु लागल्या. खानसाम्यांनी तांब्याची, कल्हईदार, थोराड भगुणी रसोईसाठी चुलाणांवर चढवली. कसायांनी काटलेले बैल-बोकड जागजागी त्यांवर रटरटू लागले. त्याचा एक तिखट, उग्र वास तळभर पसरला. आता सारा तळ रात्रीचा नमाज पढून, भरघेराच्या मोठमोठ्या परातीसारख्या थाळ्यांतून, पाच-पाच दहा-दहांच्या मेळाने खाना रिचवणार होता. उपाशी आतड्यांनी आणि जागत्या डोळ्यांनी त्या साठ हजारांच्या तळावर फक्त दोनच जीव भुईवरच्या लाकडी खोड्यांत असूनही त्यात नसल्यागत आपापल्या कुलदेवता जगदंबा आणि चंडीची प्रार्थना करणार हाते… छत्रपती आणि छंदोगामात्य!!

जागजागी शिलगलेल्या पलोत्यांच्या आगझपेटी वाऱ्यावर वेड्यावाकड्या फरफरू लागल्या. उतरती सांज थरथरू लागली!

आता बहादूरगड सोडून खुद्द औरंगजेबच कोरेगावच्या तळावर येऊन शाही शामियान्यात ठाण झाला. दिल्ली सौडतानाच त्याची पहिली मुराद होती ती “सेवाची’ मराठशाही इस्लामची बंदी करण्याची. त्यासाठीच सलामीचा पहिला फौजी रेटा देऊन बघितला होता, त्याने या पहाडी मुलखाला. नाकामयाबीने हात चोळत चार सालांपूर्वीच त्याला फौजी “पिछाट’ घ्यावी लागली होती, सेवाच्या बच्चासमोर. आज तोच ‘संभा’ कैदी म्हणून दस्त झाला होता, त्याच्या पंजात. हालहाल करून त्याचा काटा काढताच त्याच्या या पहाडी मुलखातले दुबळेपतले, अर्धनंगे हशम हातच्या माळेत सहज गुंडाळून टाकणार होता तो. आपल्या शामियान्यात मात्र आता तो विचित्र खयालात गुरफटला होता. त्याला आपला बच्चा अकबर आणि दिलेरचा मिरबातखान यांचा संभालाच शामिल होण्याचा मतलब कळत नव्हता.

संभाने दिल्या बेमुर्वतखोर जाबांची नोंद त्याने घेतलीच होती. फितवेखोरीने ठिकठिकाणचे मराठे सरदार त्याने केव्हाच मुठीत टाकले होते. राहून-राहून त्याला एकच विचार छळत होता : ‘देहली छोडके आये बडे मुरादसे। बुढापा आया नजदीक। होगी हमारी ख्वाईश पुरी? कांजीवरम से काबूल इस्लामका बंद करनेकी?’

वढूच्या तळावरून मुकर्रबखानाकडून रोज त्याला हरकाऱ्यांकडून खबरा येत होत्या – “कैदी कुछ बोलते नहीं – कुछ खाते नहीं।॥”

बादशहाबरोबर त्याच्या सेवेसाठी आलेली त्याची मुलगी झीनतुत्निसा रोज अब्बाजानबरोबर खान्याचे कटोरे, त्याच्यासमोरच त्यातील पदार्थ चाखून, त्यात काही “जहरी ऐब’ नाही याची खातरजमा त्याला करून देत होती! मगच खान्याचे थाळे मांडीत होती. अशाच एक खान्याच्या वेळी मुकर्रबकडून खबऱ्या आला –

“जिद्दी काफरोंने अबतक कुछ नहीं खाया.”

रोज मसालेदार मोगली पदार्थांचे शाही थाळे राजांसमोर आणि सिरकुर्म्याचे गोडे थाळे कवी कुलेशांसमोर नेऊन त्यांची भूक चाळवण्याच्या प्रयत्नात मुकर्रब-इखलास पुरते नाकामयाब झाले होते. कैदी दस्त करताना जो जोश मुकर्रबखानात होता त्याचीच जागा आता भयशंकेने घेतली होती – “ऐसेही मर गया काफर तो?”

कैदी काही खात नाहीत, ही मुकर्रबची खबर ऐकून बेचैन औरंगजेब आपल्या थाळ्यापासून उठून फेर घेऊ लागला. मांडल्या अन्नावर माश्या बसू नयेत म्हणून त्यावर पितळी झाकणे झीनतुन्निसा तत्परतेने ठेवू लागली. ते बघून जागीच थबकला. चमत्कारिक असा स्वत:शीच हसला. आपल्या पदार्थ चाखण्यात काही गफलत झाली काय?

अब्बाजानना काही शक आला काय? याने भांबावलेली झीनत मोठ्या धाडसाने म्हणाली, “हॅस पडे अब्बाजान? शक है कोई?”

खदखदून हसत औरंगजेब तिला म्हणाला, “मक्खियाँ बैठती है थालेपर इसलिये तूने डाल दिये ढक्कन उनपर। बेटी, कभी-कभी इन्सानके दिलपर भी बैठती है मक्‍खियाँ!

क्‍या लाओगी उसके लिये ढक्कन? एक भाई है तुम्हारा अकबर, जो घूमता है गाँव-गॉँव तख्त के लिए, अनाज के लिए! और एक है ये सेवाका बच्चा संबा जो हाथ तक नहीं लगाता थालेको।” स्तिमित झाल्या आपल्या मुलीकडे बघतानाच त्याने हुकक्‍्म दिला, “ले जाव ये खाना। हम नहीं चाहते।”

वजीर असदखानाला याद फर्मावून बादशहाने हुक्म दिला, “हम – खुद हम देखना चाहते हे कैदी संबाको!! जाव। इंतजाम करो।” औरंगच्या हयातीतली ही पहिलीच वेळ होती की, तोहून एका कैद्याला बघायला राजी झाला होता!

कैदी खांबांना जखडून आता तीन दिवस झाले होते. एकाही शाही सवालाचा दोघांनीही बादशाहाच्या मनाजोगा जाब काही दिला नव्हता. दोघेही उपाशी होते. कोणीतरी अल्लाचा रहमदिल बंदा मिनत्नत करकरून त्यांना फक्त पाणी प्यायला लावत होता. जाताना आपलेच डोळे टिपत कैद्यांना ऐक्‌ जाईनासे, पण मनोमन वाटणारे म्हणूनच स्वत:शीच पुटपुटत होता – “कैसी जिद्द पैदा की है, अल्लातालाने इनमें! हत्यार होते हाथ में तो खुदही काट देते ये अपनी गर्दन! क्या तकदीर है एक एककी! परवरदिगार, इन्हे अच्छे खयाल दो.”

रुहुल्लाकडून कैद्यांच्या गुंगेपणाची हकिगत ऐकलेल्या बादशाहाने आपल्या मुल्लामौलवींची तातडीची मजालस भरवली. आपल्या मनचा फैसला मग तो कुणाच्याही बाबत असो, तो नेहमीच मुल्लामौलवींच्या तोंडून वदवून घेत असे. असे तो नेहमीच करीत आला होता. म्हणजे आपल्या फैसल्यावर तो इस्लामी धर्माचे शिक्कामोर्तब नेहमी करवून घेई. या कैद्यांबाबत त्याने तेच केले. “शाही शहर लूटने, जलानेवाले, मुसलमानों की बेरहम कत्ल करनेवाले, मसजिद तसनस करनेवाले, बगावतखोर को कुराने शरीफसे सजा कौनसी? तो सजाये मौत!” असा दस्तुर केलेला लेखी फैसला मौलवींच्या मजलसीनं बादशहाच्या हातात ठेवला.

आला! आपल्या शाही शामियान्यातून बाहेर पडलेला हिंदोस्थानचा शहेनशाह औरंगजेब आपल्या सजल्या हत्तीच्या, चांदीच्या हौद्यात बसून, सोनेरी छताखालची, आपली भुईतळसुद्धा शोधणारी नजर भोवतीच्या सरंजामावर गरागरा फिरवीत शेवटी आला. पाठच्या हत्तींवर बादशाहाचे शहजादे आणि नातू अशा सवाऱ्या होत्या. एक हत्तीवर तर झीनतसह शाही जनानाही बसला होता. आग्रादरबारात बगावतखोर “सेवा’ला बघण्याचे नव्हते, एवढे कुतूहल आज त्याचा बल्चा कैद ‘संबा’ बघायला साऱ्यांच्या मनात दाटले होते. आस्ते कदम चालणाऱ्या कैक खानांतील अनेकांच्या मनात – अलमगिराच्या या कैदी बघण्याच्या निवाड्याचं “ताज्नजुब’ फिरत होते.

बादशाहा औरंगजेबाची सवारी बुद्रुक वढूच्या ठाण्यावर आली! माहुतांनी अंकुश- टोच देऊन हत्ती बसते केले. तळावर आगवानी मरातब कानठाळ्या बसविणाऱ्या तोफा फुटल्या. बादशहा शहजादे, नातवांसह भुईउतार झाला.

ही चमत्कारिक भेट होती. दिल्ली तख्ताचा अधिकारी असलेल्या, डामडौलात आलेल्या औरंगजेबाची आणि रायगडाच्या सिंहासनाचे अधिकारी असलेल्या, गेली आठ वर्षे चारी आघाड्या सांभाळण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या कैद संभाजीराजांची! तुळापूरच्या वढू बुद्रुकच्या इंद्रायणी-भीमाच्या संगमी माळरानावर! पुरा तळ गर्दीने दाटला असून न तरीही चिडीचाप असताना.

शहेनशाह जखडबंद कैद्यांच्या रोखाने निघाला.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१८.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment