महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,463

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१९

Views: 1368
8 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१९ –

चांगले दहा हातांचे सुरक्षित अंतर ठेवून, हत्यारबंद पहाऱ्यातला औरंगजेब, वजीर असदखान, रुहुल्लाखान, मुकर्रबखान, इखलासखान यांच्या घेरात, खांबाला जखडबंद, ताठ गर्दनीच्या कैदी संभाजीराजांसमोर खडा ठाकला!!! जखडबंद राजांना पायांपासून न्याहाळत, काळजात प्रचंड खळबळ माजलेली त्याची शाही नजर राजांच्या डोळ्यांवर येऊन खिळली. घालमेल-घालमेल झाली नुसती त्याची. काळजाचा देठच हलला गेल्याचे आज पहिल्यानेच त्याला जाणवून गेले, “इतने हुए बच्चे पैदा हमारे। तैमूरका ये खानदान। एक भी नाबकार की आँखे क्यों नहीं देखी हमने ऐसी! आफताबसे रिश्ता बतानेवाली!’

एकदा रुहुल्ला आणि असदकडे बघत खुद्द औरंगनेच राजांना जाब केला, “बताओ, कहाँ हे तुम्हारा लूटमारका खजाना? कौन-कौन थे गद्दार, बगावतखोर फितूर तुम्हे हमारा नमक खा कर?” पायीच्या मोजड्यांकडे बघावे, एवढ्या नफरतीने आणि फक्त नफरतीनेच आपले सूर्यपेट डोळे औरंगजेबाच्या डोळ्यात रोखून राजे एकटक नुसतेच त्याच्याकडे तिरस्कारानं बघत राहिले. ती नजर नव्हतीच! बघणाऱ्यांचे काळीजच पोखरून टाकील अशी, कुणालाही जाणवावी अशी डोंगरटोकावर बसलेल्या गरुड पक्ष्याची तीक्ष्ण चोचच होती ती!! ती नजर आणि पापण्यांचा काठ फोडून टाकत उतू जाणारी नफरतच, एवढा काळीजकठोर औरंगजेब, पण त्यालाही स्पष्ट जाणवली. गर्दन वर करून बघणाऱ्या माणसाची त्याला कधीच सवय नव्हती. सर्वच त्याच्यासमोर येत, ते ‘कदमबर’ नजर ठेवूनच! आणि अशा फेकून देणाऱ्या नफरतीच्या नजरेची तर नव्हतीच नव्हती.

त्या अटीतटीच्या कुचमलेल्या ल्या क्षणांनी मनोमन थरकलेला रुहुल्लाखान पुढे होऊन कमरेत लवत, हातचा राखीव उपाय आपल्या आलमपन्हांना सुचवीत दबक्या आवाजात म्हणाला, “रहम कर दो आका अली। अभी बन जायेगा ये मगरूर, इस्लामका बंदा कौडीमोल – बादमें बतायेगा सब अपने आप!” मराठी मुलखात आपण केलेल्या फितवेखोरीच्या इमानदार चाकरीचे पाठबळ मानून हजरत हा सल्ला मानतील असा पागल भरोसा होता त्याला.

“चूप! बिलकूल बेवकूफ हो तुम बक्षी!” नाचवावी तशी नाचणाऱ्या कठपुतळी बाहुलीकडे टाकावी, तशी कीव करणारी एक जळजळीत नजर बादशाहाने बक्षी रुहुल्लाखानावर टाकली. राजावर रोखली नजर जराही न चाळवता तो म्हणाला, “जरा गौरसे देखो एक दफा उसकी ऑँखें। अरे, अपने बापके साथ पेश आया था आग्रादरबारमें, तो कितनी मासूम थी ये आँखे! ये अपनायेगा इस्लाम? बनेगा बंदा? पढेगा कभी नमाज?

भूल हे तुम्हारी। देखो तो कैसे घुरके देखता है नफरतसे! ऑँखे नहीं ये – जलती मशालें हे मशालें! इसको बंदा बनाना अस्तनीमें अंगार रखना हे!!

“दख्खनी, निकाल दो… निकाल दो ये बेमुर्वत ऑँखें! जलती सलाख घुमाओ इसकी ऑँखोंमें! दे दो इस मगरूर काफरको नयी नजर!!” रुहुल्लाकडे ढुंकूनसुद्धा न बघता, दख्खनी इखलासला शहेनशाहचा क्षणात आखरी हुक्‍्मही सुटला.

हयातभर हिंदोस्थानात वणवण भटकलेले मोगली, शाही बुढेपण अंगभर थरारले. लाकडी खोड्यातले मावळी तरुणपण ते ऐकताच आपले उभे शरीर भुईवर फेकून देत डोळ्यांतच एकवटले. तोफेचे भांडे फुटावे, तशी राजांची भोसलाई जबान तडतडली – “अरे! तुला दिसतात, खुपतात तसे दोनच नाहीत आमचे डोळे. आमचे शेकडो, हजारो मावळे आमचे डोळेच झालेत! हिंदोस्थानचा शहेनशाह असलास, तरी काढू शकतोस ते सांडसी वापरून? काढ – पळाचाही वखत न गमावता आमचे हे डोळेच पहिल्याने काढून टाक. तुझी शक्‍लसुद्धा बघायची इच्छा नाही आम्हास! गेलीच तर आमची एकल्याची नजर जाईल, पण मिळालीच, तर मिळेल त्यानंच नवी नजर आमच्या घरट्याघरट्यांतील जान कुर्बान मावळ्यांना!!” त्या ‘बकवासी’कडे लक्षही द्यायची गरज न वाटलेला औरंगजेब क्षणभरच कैदी कुलेशांच्या बाजूने दोन कदम सरकला. त्यांनाही निरखले त्याने खालवर. एवढ्या घालमेलीतही निसटती चुटपुट त्याला चाटून गेलीच, “इसी तख्ता-कुलाहमें जखडबंद होता बागी शहजादा अकबर तो? क्‍या खैर होती अल्लाहकी!’

कुलंगी कुत्र्यागत मागून चालणाऱ्या इखलासला, कुलेशांकडे बघतच त्यांच्या बाबतही तसाच निवाड्याचा हुक्‍्म त्याने क्षणात दिला, “कर दो हर सजाका अमल पहले इस बम्मन शायरपर! सुनेंगे हम, कैसे देखती हे काफर सेवाकी खुदको “शेरदिल’ माननेवाली औलाद अपने शायरकी तिलमिलाहट!”

“जी हुजूर,” दोन्ही कैद्यांच्या सजा ऐकून हबकलेले मुकर्रब-इखलास एकदमच कमरेत लवत म्हणाले.

सफेद, कोरीव दाढी फिरलेली गर्दन बादशाहाने झटकली. कुत्तेमोल काफर कैद्यांसाठी आपण जादा वख्त खराब केला, हे जाणवल्याने तो जायलाही वळला. त्याच्या किमॉशातले हिरवेकंच पाचूपदक आणि मोतीलग उन्हात कशी झगझगत तळपून उठली.

आता तो पुन्हा कधी, कधीच नजरेससुद्धा पडणार नाही, म्हणून राजे कसे अंगभर उकळून गेले. तडफडाट… तडफडाट झालेल्या राजांच्या तोंडून बळीच्या बोकडाचीही झाली नसेल, अशी राजा असूनही झालेल्या आपल्या विटंबनेचा बदला घेणारी, त्याच्याच सरंजामासमोर त्याला ठोकरून लावणारी एक सणसणीत शिवीच तोंडातून सुटली, “सुळवरकी औलाद! शेरके बच्चे शेर जैसे जीते हे, मरते है तो भी शेर जेसे!”

असला कुठलाच नापाक शब्द कधीही ऐकण्याची कधीच सवय नसलेला औरंगजेब, उभ्या देही संतापाने कसा थरथर कापू लागला. एका मामुली कैद्याने हिंदोस्थानच्या शहेनशाहला चक्क तोंडावर ‘सुव्वर’ म्हणावे! तेही शहजादे, वजीर, सरदार, प्यादे यांच्या सामने!! आत मुडपलेले त्याचे पाताळयंत्री पातळ ओठ शाही घुश्शाने थरथर कापू लागले, तटतटून फुगलेली मस्तकावरची शीर धडधडू लागली. देहाबरोबरच त्याच्या ऐटदार शाही रोबावरची नकसदार, झगमगती कलाबतूही लटलट कापू लागली. हातची तसबीहची माळ गोळा होऊन गपकन मिटल्या मुठीत कोंडून पडली. अंगभर तैमुरी रक्त कसे धडका देत उकळले. टोकदार नाकशेंडा आणि मांसल कानपाळ्या सरसरत लालेलाल झाल्या. कुठलाही कठोर हुक्‍्म देताना हयातभर त्याच्या संथ, धिम्या जबानीने त्याला कधीच दगा दिला नव्हता; आज मात्र दिला – ऐकताना त्याचाच वजीर असदखानही लटलट कापावाच असा, आजवर कुणालाच न दिलेला हुक्म देत तो कडाडला –

“इखलास दख्खनी, ऑखे निकालनेसे पहले ये -ये बेगुमान, मगरूर जबान कटा दो जडसे! फेंक दो कुत्तोंके सामने!!!”

“हं , बेवकूब औरंग, मरत नाहीत जबान काटून कुणाचेही बोल कधीच!” आपल्या सुकल्या राजओठांवरून जीभ फिरवत, अगदी शांत निर्धारी बोल राजांच्या तोंडून सुटले.

कुणाचीही दखल न घेता औरंग तरातर चालत हत्तीवरच्या हौद्यात जाऊनही बसला. बुद्गुक वढूच्या माथ्यावरचा, माध्यान्हीचा सूर्य जळत्या किरणांनी ठिबकू लागला. वढूची काळीशार भुई त्याने तावून-सुलाखून निघू लागली!!

हजरतांची मुरादच होती, डोळे जाळण्यापूर्वी जबान छाटली जावी. त्यासाठी इखलासने जल्लादी पथकातून न कचरणारे नेटाक जल्लाद, त्यांच्या उघड्याबंब केसाळ छाताडांवर मुठीचे भक्कम कुमके मारून निवडले. बाजूला घेऊन, ते डरू-कचरू नयेत, म्हणून त्यांना प्रथम तांब्या-तांब्याभर हबसाणी कडक शराब पाजण्यात आली.

इखलासने तळावरच्या लोहारमेटाचे फौजी लोहार, पेटत्या शेगड्या आणि सांडशींसह बोलावून घेतले. हातभर लांबीच्या दोन-दोन लोखंडी सळया लोहारी भात्यावर पेटलेल्या, शेगडीसारख्या लोखंडी चुल्ह्यांत लोहारांनी तावणीला टाकल्या. धरणाऱ्यांचे हात पोळू नयेत, म्हणून त्या कापडी बासनांच्या घट्ट मुठीत गुंडाळल्या होत्या.

काही जल्लादांनी कैद्यांच्या जिभा जबड्यातून बाहेर खेचण्यासाठी हातात सांडशी घेतल्या. काहींनी त्यांच्या जिभा छाटण्यासाठी खांद्यांना टेकून धारदार नंग्या तेगी पेलल्या. हुकमाची वाट बघत ते सारे शिस्त धरून एका बगलेला खडे झाले.

आलममपन्हांचा हुकक्‍्म होता – “ऑसखे निकालनेसे पहले जबान काट दो। हर सजाका अमल पहले शायरपर करो। बादमें संबापर!”

प्रत्येक संजेचा अंमल पहिल्याने कवी कुलेशांवर करण्याचा हुक्‍्म देण्यात काय मतलब होता औरंगजेबाचा? तर आपल्या प्याऱ्या शायराचे सजा भोगताना होणारे हालहाल बघून राजांचा दिल कचावा, मनोधैर्य ढळावे त्यांचे. फाटूनच जावे त्यांचे काळीज. हताश होत हात पसरून कोणत्याही अटीवर भीकच मागावी त्यांनी जान बचावण्याची. ते नाहीच झाले, तर किमान चाकराचे हाल बघताना त्यांना दिलतोड यातना तरी व्हाव्यात.

कमरेला फक्त तुमानी आवळलेल्या उघड्याबंब आणि घामात निथळणाऱ्या, हातात सांडशी आणि नंग्या तेगी पेललेल्या, पाच-दहा काळ्याकभिन्न उलट्या जाड ओठांच्या हबशी जल्लादांचा मेळ घेऊन इखलास कुलेशांच्या समोर आला!

आतापर्यंत सजेची बातमी पुऱ्या तळभर सरकली होती.

जखडबंद कैद्यांची सजा बघून डोळे निववावेत म्हणून फौजी स्त्री-पुरुष सारेच खचाखच दाटले. टाचा वर करून एकमेकांच्या खांद्यावरून कधी बघितले नव्हते, अशा सजेचा नजारा ते बघू लागले. एवढा तळ एकवटला होता खांबाभोवतीने, पण डुईवरून उडणाऱ्या रानभोरड्यांची भरभरसुद्धा साफ ऐकू यावी, एवढी शांतताच शांतता पसरली

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २१९.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment