महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,90,510

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२०

Views: 1357
11 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२० –

“मूँन्खोलो शायरके बच्चे!” कुलेशांचा मुखडा हातपकडीत धरून इखलासने तो डावा-उजवा हासडला. त्याची बकबक ऐकूच न आल्यासारखे कुलेश शांतच होते. हा हुक्‍्म फर्मावणारा इखलास किती मूर्ख होता! आपली जीभ छाटण्यासाठी आपला जबडा कोण आणि कसा काय देणार खोलून! एकटक रोखून बघणाऱ्या कुलेशांचा शांतपणा बघून तर इखलास पिसाळूनच गेला. पुढे होत त्यांचा जबडा फाकण्यासाठी ताकद लावून दोन्ही हातांनी झटू लागला.

कुलेश काही नुसते शायर नव्हते. स्वारीशिकारीत तावून-सुलाखून निघालेले सूरमे लढवय्ये होते; ते. खूप खटपट करूनही एकल्या इखलासला काही त्यांचा जबडा फाकविणे साधेना. दातकुडी बसल्यागत जाम आवळूनच धरला होता, त्यांनी आपला जबडा! त्या जबड्याशी झटून घामाघूम झालेला इखलास शेवटी वैतागून, संतापून उठला. कुलेशांच्या गालावर संतापी थप्पड देत ओरडला, “पकड बेठी क्या मूँह को तेरे सुव्वर?”

आपल्या जल्लादांकडे बघत हात उठवून तो चरफडत कडाडला, “सब मिलके खोलो ये जबडा. खींचो बाहर इसकी जबान!” चार-पाच हबशी जल्लाद चटकन पुढे झाले. त्यांनी मराठी दौलतीचे छंदोगामात्य कवी कुलेश यांचा मुखडा आपल्या बळकट पंजानी, चारी बाजूंनी जागीच दाबून धरला.

आता – आता जाणारच आपली जबान म्हणून सगळा जीव जिभेतच एकवटून आणलेले कुलेश आरोळी फोडत मोठ्याने ओरडले, “प्रणाम स्वामी मामूली कानोजी शायरका, भाग्यवान है हम कि आज – आज आपके साथ पंक्तिमें बैठनेका मौका तो मिला – मौतकी पंक्तिमें!! जै भवानी जै चंडी!” जल्लादांनी कुलेशांची बडबडणारी जीभ तोंडात सांडस खुपसून जाम पकडली. एका झटक्यात, ताकदीने खसकन जबड्याबाहेर खेचली. त्या कळीने ती कविजीभ सांडशीतच लवलव हलली. हाती तळपती तेग घेऊन उभ्या असलेल्या एका जल्लादाकडे मुकर्रबने इशारती नजर टाकताच जल्लादने कुलेशांच्या जिभेवर एवढा जबर वार उतरवला की, जिभेचा कंडका पाडून, दोन-तीन दात तोडीत, खालचा ओठ आणि हनुवटी चिरत तो उतरला. एक चीत्कारी हंबरडा फुटला. भोवतीच्या बेहोश जल्लोषांत तो मुरूनही मेला. अंगावरचा तख्ता-कुलाह चिंब भिजवून टाकणारा रक्तचिळकांडीचा फव्वाराच फव्वारा उडाला कुलेशांच्या चिरफाळल्या तोंडातून! त्यांच्या कपाळीचा, आतापर्यंत नावापुरताच उरला कनोजी पद्धतीचा गंधटिळा त्या फव्वाऱ्याने दिसेनासाही झाला. अंगचा विदूषकी पेहराव ओघळत्या रक्ताने चिंब भिजला.

आपल्या खोड्यातून राजांनी, रक्तधारांत न्हाऊन निघालेल्या कुलेशांच्या चेहऱ्याकडे बघितले. आपल्या बाळराजांनाच लावी तशी केवढीतरी हळुवार साद त्यांनी कुलेशांना घातली – “कविराज!”

तुटल्या जीभगड्ड्यातून असह्य वेदनांचा आगडोंब उसळला असताही आपले डोळे उघडून छंदोगामात्य कुलेशांनी आपल्या स्वामींकडे शांतपणे डोळाभर बघितले.

भोवतीच्या जमावाच्या कल्लोळत्या आरोळ्यांनी इखलास तर आता पुरता बेभान झाला होता. कुलेशांच्या जबड्याचा अनुभव घेतल्याने आपणहून त्याने शहाणपणाने राजांच्या जबड्याला काही हातही लावला नाही! सजेचा अंमल करणाऱ्या जल्लादांवर मात्र तो खेकसला, “डर गये कमजोर, डरपोक? खोल दो ये भी जबडा! काट डालो काफरकी हजरतको गाली देनेवाली मनहूस जबान!”

हुकमांचे ताबेदार पाच-सात जल्लाद पुढे सरसावले. जुंपली! जखडबंद राजांचा जबडा खोलण्यासाठी खुल्या पाच-सात हबशी जल्लादांची राजांशी झोंबाझोंबी जुंपली. काही केल्या त्यांच्या पंजात आपला जबडाच देत नव्हते राजे.

“वो था शायर, उसने कितना सताया! ये तो है शेर, कभी नहीं मानेगा, सब मिलके पूरी ताकदसे चिपको इसको!” मुकर्रब-इखलास ओरओरडून आपल्या जल्लादांना चेतना देऊ लागले. बघ्यातलेच चार-पाच आपणहून जल्लादांच्या मदतीला धावले ठेवला! राजांचा मुखडा काळ्याकभिन्न केसाळ दहा-वीस हातांनी, तसूभरही हलवता येणार नाही, असा जागीच दाबून ठेवला. काळ्याशार नांगीदार विंचवांनी शिवर्पिंड पुरती झाकाळली! राजांचा जबडा कनशिलाजवळ दोन्ही बाजूंनी एवढ्या जोरात दाबला की, तिथल्या जोडहाडांच्या अनावर कळीसमके, रायगडाच्या महाद्वाराचे दोनही दरवाजे खुलावेत, तसा भोसलाई राजजबडा आपोआप खुलला.

ज्या ओठांआड जगदीश्वराचे तीर्थ आणि जिजाऊ, धाराऊ, येसूबाई, पुतळाबाई यांच्या हातून पडलेल्या दह्याच्या कवड्या गेल्या होत्या, त्याच ओठांआड जल्लाद हबशाने लोखंडी सांडस ताकदीने खुपसली.

आनंदाच्या आणि दु:खाच्या दोन्ही क्षणी, कुलदेवतेचे स्मरण करणारी “जगदंब जगदंब” अशी नांदी उठविणारी, क्षत्रियकुलावतंस, श्रीमन्महाराज, हिंदुपदपादशहा, गोब्राह्मणप्रतिपालक संभाजीराजे यांची जीभ सांडशीत घट्ट धरण्यात आली. “लाइलाह” अशी बघ्या हशमांच्या पाठकण्यात सुरसुरी उठवणारी गर्जना फोडून, विस्फारता येतील तेवढे हबशी डोळे विस्फारून हत्यारी जल्लादाने हातच्या तेगीचा ताकदवर वार, सांडशीत पकडलेल्या, बाहेर खेचलेल्या राजांच्या अंजिरी जिभेवर उतरवला. रक्ताची फवारती कारंजीच उडाली.

“धीन धीन” कानठळ्या बसविणारा, बघ्यांच्या कल्लोळी, कालव्यांच्या आरोळ्यांचा पाऊसच पाऊस पडला. सांडशीत पकडलेल्या “बेगुमान मगरूर’ जिभेचा वळवळता तुकडा जल्लादाने त्यावर पचकन थुंकून “खाने दो कुत्तोंको -” म्हणत सांडशीसह बढू बुद्रुकाच्या तापल्या धुळीत फेकून दिला!

ज्या देहावर अभिषेकसमयी देशभरच्या पवित्र नद्यांच्या जलाचा वर्षाव मंत्रघोषात झाला होता, त्याच देहावर त्याच्याच रक्ताच्या चिळकांड्या उतरल्या. वेदनांचा ऐवढा आगडोंब उठला त्यांच्या जीभगड्ड्यातून, पण बेभान होत एक साधा हुंकारसुद्धा फुटला नाही त्यांच्या ओठांबाहेर! ओठ दातांखाली घट्ट दाबून, गनच्च मिटल्या डोळ्यांनी आवरता येत नव्हते, म्हणूनच त्यांनी जीभगड्ड्यातले ओघळते रक्त ओघळू दिले! काही वेळाने शांतपणे डोळे उघडले. समोरच्या धुळीत आपलीच पडलेली वळवळती जीभ बघताना मात्र काळीज गलबलून उठले त्यांचे – फक्त एकाच विचाराने –

“आजवर कधीच नाही पडला भुईवर, याच जिभेतून बाहेर पडलेला आमचा सादिल शब्दसुद्धा! पण – पण आज ती जीभच पडली आहे भुईवर! शांत होण्यापूर्वी वळवळून ती आम्हासच म्हणते आहे – “धनी, द्या एखादा साजेसा हुकूम – या क्षणीही पाळीन तो!”” त्या विचाराने तर राजे देहातीत होऊन आपल्याच जिभेकडे एकटक बघताना पुरते हेलावले. खळबळ-खळबळ माजली त्यांच्या काळजाच्या खोलवटात –

राजे आणि कुलेश रक्तमाखल्या तोंडांनी एकमेकांकडे बघत होते. आता ते दोन जीव नव्हतेच. मावळबोलीतल्या एकाच “राजकाव्या’चे दोन दिसले तरी एकाच मतलबाचे अर्थपूर्ण सर्ग झाले होते! छत्रपती आणि छंदोगामात्य ही दोन वाटणारी त्यांची रूपे, त्यांच्या जीभगड्ड्यातून अंगभर ओघळून एकमेकांत मिळू-मिसळून गेलेल्या रक्तओघांनी त्यांच्या पायतळी एकरूप केली होती. अंगच्या वाहिल्या रक्ताने लालेलाल – मनोमन एकरूप! असताच आबासाहेबांचा प्यारा ‘कवी भूषण’ हे बघायला आता तर रचूनही टाकला असता त्याने “शिवराजभूषण’सारखा काव्यग्रंथ – ‘कवी-राज-भूषण ‘ असा!

सजेचा पहिला हप्ता संपला होता. तुटल्या जिभांच्या गड्ड्यांतून दोन्हीही कैद्यांना मरणप्राय यातना होत होत्या. त्या यातनांची नव्हती एवढी खंत दोघांनाही एकाच गोष्टीची वाटत असावी, बागलाणपासून तंजावरपर्यंत पसरलेल्या मराठी दौलतीच्या बाबीने, यापुढे औरंग कुठल्या चालीने जाईल? पण या तर्काने मनात उठणारे विचार त्यांना एकमेकांशी बोलण्याचे साधनच आता उरले नव्हते. कुलेशांना राजांना मनसुब्याचे म्हणून म्हणायचे होते, “इससे जादा जलकोट उठाने चाहिये, फिरंगी- मुघल मिलनेसे पहले – हो सकता है, स्वामीपर हथियार उठानेवाले शिर्के औरंगकीही मदद लेकर खुद महारानीको भी नहीं देंगे चैनकी नींद!!” पण – पण काहीच न बोलता आल्याने नरड्याची नुसती घाटीच हलत राहिली त्यांच्या. व्याकूळ, व्याकूळ झाले होते, त्यांचे डोळे, फक्त त्याच कुचंबणेने!

राजांचे मन तर पिंजऱ्यात कोंडलेल्या गरुडपक्ष्यासारखे नरड्याच्या घाटीला धडकाच धडका देऊ लागले. त्यांनाही कुलेशांना सांगायचे होते – “हंबीरराव, म्हलोजीबाबा तर जिवाचे सोने करून गेलेच! कंककाका तर वयाने झालेत. आमच्या चौतर्फा दौडणाऱ्या फौजफळ्यांना जाणता निवाडा देणारे आता सरलष्कर कोण? आमचे रूपाजी, मानाजी, विठोजी की संताजी-धनाजी? केवढी गफलत होईल आमच्या श्रीसखींनी आमच्या ठायी बाळराजांनाच मानून चालविले तर? औरंगच्या रेटयाला जाब देईल, असे निघतील धडाडीचे आमचे रामराजे? आणि होईल काय आमच्या मागं खुद्द आमच्या श्रीसखींचं??”

आता सूर्य कलतीकडे झुकला होता. कणाकणाने मोठा होत होता.

कैद्यांची जबान काटण्यात घामेघूम झालेले जल्लादी पथक इखलासने – “जाव आराम फर्माओ” म्हणत हटवले. दुसरे तवाने जल्लादी पथक, दुसऱ्या सजेच्या अमलासाठी पुढे घेतले. हातघाईच्या जंगात मैदानावर हालत नव्हता एवढ्या तडफेने आज इखलास हालत होता. खातर होती त्याला, पुरी केली तर एवढी बिकट खिदमत वाया जाणार नव्हती. त्याचे मालिक हजरत नोंद घेणारच होते त्याची.

बघ्यांना तर बागी कैद्यांचे डोळे काढण्याची सजा बघून आपले डोळे शांत करून घेण्याची एवढी उतावीळ झाली होती की, हुकमाची संधी मिळती, तर त्यांनीच पुढे होत मनची मुराद झटक्यात पुरीही करून घेतली असती!

पुढे घेतल्या तवान्या पथकातील दोन तगडे हबशी निवडून इखलासने बाजूला घेतले. आपणच वाकून लोहारी चुल्ह्यातल्या, एव्हाना तापून लालेलाल झालेल्या लोखंडी सलाखा, त्यांच्या कातडी मुठींना धरत इखलासने चुल्ह्याबाहेर खेचल्या. निवडल्या हबशी जल्लादांच्याच डोळ्यांत त्या खुपसल्यासारख्या नेऊन खुद्द तेच कचदिल नाहीत, याची अजब पारख करून घेतली त्याने! निवडलेले हबशी हात, पाय, डोळे होते म्हणूनच माणूस म्हणायचे, नाहीतर – गंजल्या लोखंडी पुतळ्यासारखेच दिसत होते ते! तसूभरही हलले नाहीत ते. त्यातल्या एकाच्या हातात आपल्या हातातील तापल्या सलाखा खुशीने देत, कुलेशांच्याकडे बघत इखलास त्याला म्हणाला, “घुसेड दो ये जलती सलाखें इस बम्मन शायरकी ऑखोंमें। देखेगा इसका मालिक कैसी टपकती है शायरी, खून के बजाय अपने शायरकी ऑखोंसें!!”

घोंघावते समुद्रवादळ, भक्कम खडकाळ बेटाकडे सरकले तसे “जी हुजूर” म्हणत हाती तापल्या सलाखा घेतलेला हबशी कुलेशांच्या समोर आला – त्यांचे डोळे जाळून काढण्यासाठी.

कुलेश तर कवी होते. इथला निसर्गाने नटलेला मावळी मुलूख त्यांनी डोळाभर बघितला होता. तो, उंचापुरा रायगड, आपला कबिला आणि सर्वाहून अधिक कनोज सोडून एवढ्या दूर ज्याच्यासाठी आलो, त्या स्वामींना पुन्हा बघण्यासाठी डोळेच उरणार नाहीत, या जाणिवेने रक्ताळल्या तोंडाच्या राजांना त्यांनी अगोदर डोळाभर बघून घेतले. जल्लाद जसजशा रसरशीत तापल्या, लालेलाल सलाखा डोळ्यांजवळ आणू लागला तसतशी कुलेश आपली गर्दन इकडे-तिकडे गरगरा फिरवू लागले. जल्लादाने त्यातूनही निकराने घुसडलेल्या हातच्या सलाखा कैद्याच्या गालावर, कानावर चरचरत भिडू लागल्या. ती जल्लादच चिडून ओरडला – “देखते क्‍या हो बेवकूब! जकड दो इसकी गर्दनका हिलता पत्ता!”

तसे धक्का बसलेले हबशी लगबगीने पुढे धु झाले आणि त्यांनी कुलेशांचा मुखडा जागीच पकडून ठेवला. त्यांना धक्का अशासाठी बसला होता की, तख्ता-कुलाहातल्या जखडबंद कैद्याचे डोळे काढणाऱ्या त्या सराईत साथीदाराला आजवर अशी कुणाच्याच मदतीची गरज कधीही पडली नव्हती.

“चर्रर चर्रर” सुताराने शिसवी फाकांना भोके पाडण्यासाठी हातचे किकरे फिरवावे तशा, आपलेच डोळे विस्फारलेल्या जल्लादाने हातच्या लालेलाल लोखंडी, तप्त सलाखा कवी कुलेशांच्या डोळ्यांत खुपसून चराचर फिरविल्या. जळल्या बुबुळांच्या मांसाचा उग्रर वास चारीकडे पसरला. कुलेश कुडीभर धडपडले, “आ:आ:” जीभ गमावल्या त्यांच्या कंठातून कसनुसाच आवाज फुटला.

नाकात घुसल्या उग्र जळकट मांसाच्या वासाने आणि कानात शिरल्या त्यांच्या आवाजाने राजे गैरसमजात गेले. त्यांना वाटले मरणाच्या भयाने छंदोगामात्य चरफडून तळमळताहेत. अनावर झाल्याने खुद्द त्यांच्याच कंठातून तसेच कसनुसे शब्द सुटले – “ऑ:ऑ:!” त्यांना कुलेशांना निर्धाराने म्हणायचे होते – “दौलतीचे छंदोगामात्य असे केव्हापासून लागले मरणाला भ्यायला?”

खरे तर कुलेशांना म्हणायचे होते – “राजन हो तुम साँचे खूब लडे तुम जंग।”

जरी एकजीव झाले होते ते अंतरंगाने, तरी असा गैरमेळ पडला होता त्यांच्या विचारांचा – गमावल्या जबानीमुळे. आता तर भोवतीचे बघे खुशीने पिसाळल्यागत टाळ्याच टाळ्या पिटत ओरडू लागले. “बहोत खूब! अल्ला मेहरबान! जल्दी करो भाद्दर! निकालो इसकी भी ऑखकी कौडियाँ!”

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२०.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment