महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,032

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२१

By Discover Maharashtra Views: 1350 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२१ –

सजेचा अंमल करणारा जल्लाद आता हातच्या जळकट रक्ताने काळपटलेल्या, तरीही तस सलाखांहून अंगभर पेटून उठला होता. वापरून नाकाम झाल्याशा वाटल्याने “बेकार हो गयी सलाखें ये” म्हणत तिरस्काराने त्याने हातच्या सलाखा थेट जीभ-डोळे काढलेल्या कुलेशांच्या अनवाणी पायांवर मुद्दाम फेकल्या.

मागे वळून दुसऱ्या चुल्ह्यातल्या तावणी खात पडलेल्या नव्या सलाखांची लालेलाल जोडी त्याने खसकन उचलली. लाल डोळे तिच्यावर गरगर फिरवीत बघ्यांना तिची लाली दिसावी म्हणून हात उंचावून ती “लाइलाह’ म्हणत नाचवली. त्याने ओरडण्यापूर्वीच त्याच्या चार-पाच मददगारांनी रायगडाधिप, मराठी दौलतीच्या, शिवपुत्र छत्रपती संभाजीराजांची गर्दन जल्लादाच्या सोयीसाठी चारीकडून जखडून केव्हाच जाम करून टाकली होती.

क्षणानंतर जळून होत्याचे नव्हते होणारे राजांचे डोळे अपार शांत, स्थिर होते. ते डोळे नव्हतेच! दोन तेजोगोलच होते ते. हयातीत कधी नव्हते, एवढे चमत्कारिक तेज उतरले होते त्यांत. एरव्ही उलथा पडणारा खालचा ओठ आता दातांखाली घट्ट पकडून, हातच्या रसरशीत सलाखा रोखत जल्लाद राजांच्या समोर आला. डुईच्या केसांपासून तुमानीखालच्या पायांपर्यंत घामाने आज पुरता निथळला होता तो. हातच्या तापल्या सलाखा पेलून, द्याव्या लागणाऱ्या कठोर सजेच्या मानसिक उष्म्याने घामेघूम झाला होता.

अर्धवट-अर्धवट कदम पुढे टाकत तप्त लाल सलाखा पेलून क्षणाक्षणाला तो राजांच्या डोळ्यांकडे एकटक बघत पुढे -पुढे सरकू लागला. आणि – आणि – काय झाले कुणास ठाऊक! हातच्या सलाखा तशाच पेलून तो जागीच पुतळ्यागत गुमान उभा राहिला. अपार तेज उतू जाणाऱ्या, राजांच्या निर्भय, तेजवंत पुष्करी डोळ्यांकडे बघताना त्याचे त्यालाच मनोमन जाणवले – “कितनी जला दी ऑसखे सलाखोंसे जिंदगीभर – मगर – मगर कभी देखी तक नहीं ऐसी आँखें! नहीं – नहीं – ये ऑँखें जलानेके लायक नहीं! जतानेके लायक है!’

एवढा पत्थरदिल तो जल्लाद! पण तोही स्वत:शीच चरकून, राजांकडे बघत मान डोलावून दोन कदम मागे हटला!! आणि खुद्द त्याच्याच पाठीत एक सणसणीत तमाचा पडला, भिजल्या पाठीवरून घामाचे तुषार उडाले. कानात इखलासचे करडे, जरबी शब्द घुसले – “नमकहराम! रुक क्यों गया? निकाल दो ये आँखे!”

ताबेदार जल्लाद त्या कळीसरसा स्वत:च्या काळजातला माणूस पायतळाशी टाकत पुन्हा पुढे सरसावला. राजांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांजवळ हातच्या धगधगीत लाल सलाखा नेताच त्याने कराव्या लागणाऱ्या कठोर ताबेदारीच्या दडपणामुळे आपलेच डोळे गपकन मिटून घेतले! त्या क्षणभरातच शंभूनेत्रांसमोर अष्टभुजांची कुलदेवी तुळजाभवानीच चमत्कारिक रूपात तरळून गेली. तिचा मुखडा होता थोरल्या आऊंसारखा, डुईवर मुकुटाऐवजी आबासाहेबांच्या राजटोपागत टोप होता, आठही हातांच्या जागी दिसत होत्या कबिल्यातल्या आकृती. सती गेल्या मासाहेब, श्रीसखी आणि होय – रामराजांच्या मासाहेबसुद्धा! त्या हातांच्या एक-एक बोटात बालपणी-मोठेपणी बघितलेले प्रतापराव, मालुसरेकाका, मुरारबाजी, कोंडाजी, कृष्णाजी कंक, हंबीरराव, म्हलोजीबाबा असे कैक मुखडे दिसून गेले. कानात कुठंतरी नांद्या, किलकाऱ्या घुमून गेल्या- “जय जय रघुवीर समर्थ! – उदं गं अंबे उदं! हर हर महाद्येव! या गोंधळासी माय अंबे लौकर यावे!!”

“चर्रर चर्रर” हातच्या तप्त सलाखा समोरच्या कैद्यांच्या डोळ्यांत खुपसून, सवयीप्रमाणे त्या जागीच गरगर फिरवून, सलाखा तशाच डोळ्यांत ठेवून, मिटल्या डोळ्यांच्या जल्लादाने थकावटीने आपलेच गुडघे भुईवर टेकले.

बघ्यांनी बेभान होत हैदोसी गिल्ला घातला – “धीन धीन – छोड दो अब इसे, जायेगा ये औरंगाबाद, बऱ्हाणपूर तक!”

याही स्थितीत राजांना एका गोष्टीची खंत जरूर वाटत होती – ‘का नाही ठोकले आलमगिराच्या कोणी इमानदार जल्लादाने आमच्या नाकात आणि कानात, तोफांच्या रंजुकांना ठोकतात तसे खिळे? म्हणजे आलाच नसता आमच्या आणि कवी कुलेशांच्या जळक्या मांसाचा एकमेकांत मिसळलेला वास आम्हास! आणि कानांवर पडलाही नसता बुजगावण्यांचा हा आनंदाने उकळणारा खिजवता कल्लोळ!’

आता राजे आणि कुलेश यांचे चेहरे एवढे भयाण दिसत होते की, औरंगजेबाच्या पोरउमरीच्या एखाद्या नातवंडाने त्यांना तसे बघितलेच असते, तर दातखीळच बसली असती त्याची! डुईवर उंच लाकडी टोप्या, गळ्याहातांना जखडणारे तख्ता- कुलाह, अंगावर ढगळ विदूषकी, रक्ताळलेले कपडे, कमरेला बांधलेल्या काटेरी वेली आणि जागजागी रक्तथेंब पडलेल्या घंटांच्या माळा, जळून गेलेल्या डोळ्यांच्या खोबणी, त्यांच्यातून उतरलेले जबानी काढल्याने ओठ आणि तोंडभर कुरळ्या दाट दाढीत मिसळलेले, साकळलेले रक्त! कसे दिसत होते ते? वळीव पावसाच्या मारगिरीत तडाखून निघालेल्या, मूळच्या अनेक रंगांत चितारलेल्या, रेखीव, देखण्या; पण क्षणात ओघळून फिसकटून गेलेल्या भित्तिचित्रांसारखे!

मावळतीच्या डोंगरकडांआड सूर्य डुबला होता. इंद्रायणी आणि भीमा यांचे एकमेकींत मिसळलेले संगमपाणी थरकत्या लाटा उठवीत वाहत होते.

तळावर सांजेच्या नमाजाची समज देणाऱ्या नौबती दुडदुडु लागल्या. थोड्याच वेळात तळभर नमाजी अजानच्या ललकाऱ्या उठू लागल्या – “अल्ला हु अकबर”

राजे आणि कुलेश आता वेदनांसह देहाच्या पार झाले होते. राजांची तर कधी नव्हती, अशी मनाची मनाशी फक्त स्वत:शीच अशी बातचीत चालली होती. अंधारून आल्याने ठायी-ठायी तळभर पलोते शिलगले होते. त्याहून कितीतरी पलोते शिलगले होते, शंभूराजांच्या दुनियापार पोहोचलेल्या भोसलाई राजमनात.

रातपहाऱ्याचे गस्ते हशम, औरंगजेबाचाच हुकूम असल्याने तळपती हत्यारे पेलून जागजागी फेऱ्या घेताना गस्त देत होते – “होश्शियार!”

डोळे, जबान, हातपाय यांसह पुरत्या देहापार गेल्या राजांच्या मनात, खुद्द त्यांनाच अनोखी वाटावी अशा विचारांची प्रचंड धुंदळ माजली होती. स्वत:च बघत होते ते तिऱ्हाइतासारखे आपल्यालाच, आठवत होते त्या बालपणापासूनच्या आत्तापर्यंतच्या, हयातीकडे.

सुरू झाली! राजांच्या मनात विचारच विचारांची अनावर कारंजी. उसळू लागले त्या कारंजांतून अस्मानी विचारांचे तजेलदार पाणीच पाणी! ते नेहमी मांड घेत आलेल्या “चंद्रावता’ पेक्षा सफेद, आता डोळ्यांआड झालेल्या, पुन्हा कधीच न दिसणाऱ्या आकाशीच्या तेजर्बिंबाच्या रसासारखे, रायगडाच्या निशाणकाठीवर, मावळवाऱ्याने फडफडत्या जरीकाठी भगव्याच्या वाणाचे, आबासाहेबांच्या तोंडून वेळोवेळी बाहेर पडलेल्या; शिवबोलांचेच आसवाब ल्यालेले! समर्थांच्या तपस्वी कमंडलूतील “रामतीर्था’सारखे, थोरल्या आऊंच्या तोंडून वेळोवेळी सहजगत्या बाहेर पडणाऱ्या “जगदंब, जगदंब’ ह्या जगन्मातेच्या स्मरणासारखे, आपल्याच हयातीत हे ‘श्रीं’चे राज्य राखून चालविण्यासाठी मुलूखभर वेगवेगळ्या जागी देह ठेवलेल्या कोंडाजी फर्जंद, कृष्णाजी कंक, तुकोजी पालकर, निळो बल्लाळ, हंबीरराव, म्हलोजीबाबा यांच्या वाहून गेल्या रक्ताची आण सांगणारे!

आता त्यांच्या मनच्या डोळ्यांना दिसू लागला दौडीत डोळ्यांत भरलेला तिन्ही हंगामांतला मराठी मुलूख – रायगडावर उतरणाऱ्या त्या पावसाळी तिन्हीसांजा. तास फोडून उतू जाणारा कुशावर्ताचा आणि गंगासागराचा तलाव. पाणधारांखाली निथळणारे आघाडी मनोरे, जगदीश्वराचे राऊळ, बालेकिल्ला, व्यापारपेठ, मंत्रिबाडी, हिरकणीमाची, भवानीटोक, टकमकटोक, सातमहाल, सिंहासन चौक यांसह अभिषेकपात्रांतून संततधारेखाली निथळून निघणाऱ्या शिवपिंडीसारखा दिसणारा आमचा प्राणप्रिय रायगड!

गडउतरंडीवर करवंदीच्या, रामेट्याच्या. अंजनीच्या गचपणात किरकिरणाऱ्या रातकिड्यांचे आणि गडटाक्यात एकलग घुमणाऱ्या बेडकांच्या जमेतींचे पाणधारांच्या सरसरीत एकरूप झालेले आवाज. एरवी पायथ्याशी स्पष्ट दिसणारा, थोरल्या आऊंचा, कोसळत्या पावसात धुरकटता दिसणारा पाचाडवाडा. पडत्या पावसाची तमा न बाळगता, गडभरच्या चौक्याचौक्यांवर कांबळी पांघरून जागल्यांच्या नजरेने गस्त देणारे मेटकरी. गडावरून चहूबाजूंनी पायथ्याशी कोसळताना अखंड घरघरणारे लहान-मोठे स्फटिकसाफ धबधबे. महापुराचे पाणी दुतर्फा फेकून देत नागिणींसारख्या सळसळत धावताना दिसणाऱ्या पायथ्याच्या काळ आणि गांधार नद्या.

हिवाळ्याच्या हंगामात मुलूखभराच्या गडकोटांना बिलगून बसलेले, दहीदाट गर्द धुके. चढत्या दिवसाबरोबर त्याच धुक्याचे तटबंदीच्या थंडगार दगडबंदीवर उठणारे दहिवराचे थरारते थेंब. गडागडांवरच्या नगारखान्यांच्या पायथ्याशी धुमसत धूरफेक करणाऱ्या, पेटत्या शेकोटीतील आंब्याच्या आणि बाभळीच्या लाकूडगाठी. पागेपागेत जनावरांच्या तोंडूनसुद्धा गारठ्याने फुटणारे फव्वारते वाफारे, उरफोडी धाव घेऊन मुलूखभरातून गोळा केलेल्या खबरा पेश ठेवताना गडथंडीने लटलट कापणारे, तरीही सावरत अदबशीर बोलणारे बहिर्जी, विश्वास, कर्माजी यांच्या पथकांचे खबरगीर, वऱ्हाड, खानदेश, कोकण, मराठवाडा, बागलाणपासून ते गोव्यापर्यंत आमच्या ‘चंद्रावता’च्या टापांवर टापा ठेवत दौडताना झोंबत्या, थंडगार मावळवाऱ्याने दातवाणे धडाधड आपटणारे आमचे शेकडो, हजारो घोडा व पावलोक. रायगडाच्या मुक्कामी असताना खुद्द श्रीसखींच्या हातून समोर येणारा हुलग्याच्या माडग्याचा वाफाळता गरम कटोरा!

उन्हतापीच्या हंगामात जागजागी गडपायथ्याशी शिवारांत, मृग तोंडावर आल्याने पालापाचोळा एकवटून मातीस तावणी देण्यासाठी कुणब्यांनी पेटविलेले रानतरवे. आंबा, वड, पिंपळ, चिंचेच्या घेरांखाली रवंथ करीत विसावलेली, तान्हेली, दमगीर गुरेढोरे. पन्नास कोसांची एकलग धावणी मागे टाकून आल्यावर, तळाच्या जागी पाणथळाकडे ओढ घेणारी, फेसाळती दमगीर घोडी. उन्हाने आणि पेटलेल्या भात्यांच्या धगीने घामाने निथळताना कपाळपट्टीवरची थेंबावळ तर्जनीने निचरून टाकून, हत्यारघडाई करणारे लोहार. फिरत्या चाकांवर त्या हत्यारांना ठिणग्याच ठिणग्यांची फिरती चक्रे उठवीत शिकल देणारे शिकलगार. पागे-पागेसमोर खूर जखडलेल्या घोड्यांच्या नख्या तासळून, त्यांना तोंडात खिळ्यांचे पुंजके आवळून मजबूत, तवाने नाल ठोकणारे नालबंद. मुलूखभरच्या रावळा-रावळांत दर्शनासाठी आमच्या मागून प्रवेशण्यापू्वी पायीची पायताणं उतरून, धूळमाखले पाय साफ करण्यासाठी उंबरठाबाहेरच थपाथप पाय आपटणारे आमचे धारकरी.

माती! बालपणी माणसास दूध देणारी, उभारल्या, पुढच्या बांड आयुष्यात त्यास अन्न, पाणी भरविणारी, गोळ्याची मूरत रेखणारी ही माती! एक राजा म्हणून नव्हे, सेनापती म्हणून नव्हे, शिलेदार धारकरी म्हणून नव्हे, एक ‘माणूस’ म्हणून आमचे या मातीशी नाते काय? माणसाचे मातीशी नाते असते? होय. माणसाचे मातीशीच नाते असते तसे “मातीत’ मरणारे कैक असतात. ‘मातीसाठी’ मरणारे फार थोडे!! मिळेल आम्हास ते भाग्य या क्षणाने तरी?

“जगदंब जगदंब” घशाला कोरड पडल्याने ते स्वत:शीच मनोमन पुटपुटले. पाण्याच्या थेंबांऐवजी रक्ताचे थेंब उतरले त्यांच्या घोटल्या घशाआड.

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२१.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment