महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,25,957

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२२

Views: 1526
9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२२ –

या वेळी नुकताच नमाज पढून आपल्या शाही शामियान्यात आलेल्या औरंगजेबाला इखलास सजेचा शब्दबर तपशील देत होता. कधी नव्हे ते, पायफेर घेताना औरंगची पावले बुढाप्यातही झपाझप पडत होती. त्याला बेचैन, सैरभैर बघताना इखलास तर पुरेपूर हबकून गेला होता. काही इतराजी झाली हजरतांची तर!

पण औरंग मात्र वेगळ्याच बेचैनीने पायफेर घेत होता – मध्येच थांबत होता. काही विचाराने शामियान्याच्या छताकडे मधूनच बघत होता.

“कुछ नहीं चीखा-चिल्लाया काफर इतनी सख्त सजा लेकर भी?” स्वतःलाच विचारावे, तसे त्याने इखलासला विचारले.

“जी, बिल्कुल नहीं.” द्यायचा म्हणून इखलासने लवत जाब दिला.

तो ऐकताना एकाच विचाराने हिंदोस्थानचा बादशहा हैराण, हैराण झाला. “इसी जगह होता हमारा बागी शहजादा अकबर तो? आती ऐसी सजाकी नौबत उसपर तो?”

जायच्या चळ कमाची वाट बघत इखलास तसाच ताटकळत उभा आहे, याचेही त्याला भान नव्हते. दक्षिणेतून निघून आग्ऱ्याला आपल्या बापाला कैद केल्यापासून राजस्थान, बंगाल, विजापूर, गोवळकोंडा आणि मराठी मुलूख तुडवीत वणवण भटकलेली आपली हयात, त्याला सताड उघड्या डोळ्यांसमोर सरकताना दिसू लागली. “हमारी एक भी औलाद होती, ‘संबा’ जैसी तो? डालते हम इतने बडे सल्तनतका बोझ भरोसेसे उसके कंधेपर। और – और गुजारते बुढापेकी ये जिंदगी तसल्लीसे, पैगंबरकी खिदमतमें।’ एवढा जवळ-जवळ पुरा हिंदोस्थान हुकमतीखाली येऊनसुद्धा काहीतरी नेमकेच गमावल्याच्या काळीजतोड, बेचैनीने तो स्वत:च हरवल्यागत झाला. इखलास समोर उभाच असलेला बघताच तो केवढ्यानेतरी ओरडला – “जाव!!”

तळावर कुठेतरी कोंबड्याने बांग दिली. पाठोपाठ बांगांमागून बांगा सुरू झाल्या. आता राजे आणि कुलेशांना फक्त या कोंबड्यांच्या बांगांनी पहाट झाल्याचे, उन्हाच्या चटक्यांनी दिवस चढल्याचे आणि नमाजीसमजेसाठी अजॉबरोबर झडणाऱ्या नौबतींच्या दुडदुडीमुळे केवळ अंदाजाने दिवसरात्रीचा प्रहर कळत होता. त्यांच्या आतड्यांतील “भूक’ आता अंगभरच्या वेदनांनीच शमवून टाकली होती!

तळावर फटफटले. उगवतीची उबदार किरणे येऊन राजांच्या अंगाला बिलगली. फार फार जाणवली त्यांना ती ऊब. त्यांच्या मनातून थोरल्या आऊंची, सती गेल्या मासाहेबांची, श्रीसखींची, धाराऊ, भवानीबाई यांची; पुरती कबिला याद करून देणारी सय उफाळली. त्यातच उफाळत्या आणखी दोन आठवणी तीव्रतेने गोदावरी आणि रामराजांच्या मासाहेब यांच्याही.

थोरल्या आऊ! कोण होत्या त्या? त्या होत्या शिवरात्रीची पहाट धरून साक्षात जगदंबेला पडलेल्या गोमट्या स्वप्नासारख्या! त्या स्वप्नानेच पाहिले होते आबासाहेबांच्या रूपाने एक रोकडे मर्दाना सत्य! असते थोरल्या आऊंचे आणि आमचे प्राणप्यारे आबासाहेब आमच्या जागी तर!! कसे, कसे वागते ते?

कसलीतरी प्रचंड झरझर राजांच्या पाठकण्यातून सरसरत वर गेली. पोटात अन्नाचा कणही नव्हता तरी, चेहरा रक्तबंबाळ, तडतडता झाला होता तरी, आबासाहेबांच्या नुसत्या स्मरणानेच नागफण्यागत ताठ झाली त्यांची गर्दन. मनोमन माथाच भिडविला अगोदर त्यांनी, आबासाहेबांच्या पावन पायांना आणि पाचाडच्या छत्र्यांच्या पायऱ्यांना. आमच्या घरच्याच आणि भोवतीच्या कैक माणसांनी केली फितवेखोरी. बळ द्या आम्हास, आमच्या देहाच्या अवयवांनी आणि तुमच्या मायेखाली पोसल्या मनाने तरी देऊ नये आम्हास या निर्वाणीच्या क्षणी दगा!

आपल्या जन्मदात्या आऊसाहेबांचा चेहरा आठवण्याची खूप कोशिश केली त्यांनी. त्या जागी पुन:पुन्हा दिसू लागला त्यांना धाराऊचाच चेहरा. धाराऊ : कुणबी काळजाला मायेचे लिंपण घातलेला निकोप जीव. स्वत:च्या राया-अंतावर नाही, एवढी अमाप माया केली तिने आम्हावर. धाराऊ कोण आमच्या जिंदगीतली? ती थोरल्या आऊंच्या हाती जगदंबेने दिलेली भंडारापरडीच! कुणबाऊ निकोप मायेचा केवढा भंडारा उधळला तिने आमच्यावर!

ऐन आषाढी एकादशीच्या रोजी चितेच्या अग्नीचा घास घेऊनच आपला जीवनभरचा उपवास सोडणाऱ्या, आमच्या सती गेल्या मासाहेब! कुणी काय मन मानेल ते, मागून घेतले आबासाहेबांकडून. पण त्यांनी? काळ्या हौदावरच्या चितेवर अग्निरूप होताना आपल्यासमोर ठेवून घेतल्या त्या आबासाहेबांच्या फक्त मोजड्या. रायगडाने किती जीव देह ठेवताना पाहिले! पण पहिल्याने ‘सती’ जाण्याचा मान मिळविला तो त्यांनीच. काय वाटले असेल त्यांना आगझपेटीने देहाची कापूरराख होताना! आजही कानांत घुमतात त्यांचे, त्यांना चूड देताना त्यांनी काढलेले धैर्यशील अमर बोल – “कधी आलाच प्रसंग तर, आमचं हे रूप ध्यानी ठेवा. पुत्र आहात तुम्ही आमचे!”

त्या बोलांची याद होताच राजांचे मन कसे ढवळून-घुसळून निघाले. मासाहेब, मासाहेब तुमचे हे रूप आम्ही नुसते ध्यानीच ठेवले नाही, तर या क्षणी जगून दाखवतो आहोत ते. तुम्ही गेलात सती, गेल्या आबासाहेबांसाठी. आम्ही? आम्हीही सतीच जातो आहोत – पुरुषदेही – इथल्या मावळमातीचा टिळा मस्तकी लेवून!! तुम्हास रिवाजाचा चूड देण्यासाठी घरचे म्हणून आम्ही तरी होतो! इथे आमच्या भोवती आहेत, औरंगचे तुकडेलाचार बुणगे. तुम्ही नाही, निदान तुमची यादगीर म्हणून आम्हीच उठवले रायगडी तुमच्या नावे ‘सतीचं वृंदावन.’ आमच्या मागे राहील आमची याद आमच्या मुलखाला, आमच्या माणसांना?

का नाही वाटलात कधी तुम्ही परक्या? आणि का नाही वाटल्या रामराजांच्या मासाहेब कधीच घरच्या? खरेच, आम्ही आणि रामराजे तुमच्याच पोटी उपजतो तर केवढे मिटते सवाल आबासाहेबांचे आणि उभ्या दौलतीचे! का नाही वाटलो आम्ही रामराजांच्या मासाहेबांना घरचेच? दौलतीसाठी? मग फरक तो काय उरतो त्यांच्यात आणि औरंगजेबाचा बागी शहजादा अकबरात? कोण होत्या रामराजांच्या मासाहेब आमच्या जिंदगीत? विष घोटून क्षणात त्या होत्याच्या नव्हत्या झाल्या. असत्याच जर त्या आता आम्हास अशा बघायला हयात तर? खातरी आहे आमची, रामराजांना घेत आल्या होत्या तशाच पोटाशी घेतले असते त्यांनीसुद्धा, या क्षणी आम्हाला.

समजू-उमजू केल्या कुठल्याच गोष्टीचा पश्चात्ताप नाही वाटला कधी आम्हास. रुखरुख तर चाटूनसुद्धा नाही गेली.

आमची पाठराखण करण्यासाठी माहेरपणाच्या निमित्ताने आलेल्या आमच्या राणूआक्का! कसले मिळाले माहेरपण त्यांना? आबासाहेबांच्या कन्या असून औरंगच्या कोठडीत बंद होण्याचे? तुमच्या सुटकेसाठी किती जंग केला आम्ही? आबासाहेब आणि आम्ही सुटलो आग्ऱ्याच्या विळख्यातून, पण तुम्हाला मात्र आम्हास सोडविता आले नाही. छे, छे! कसले हे आमचे जिणे? असेल – असेल – राजा म्हणजे उपभोगशून्य स्वामीसुद्धा असेल! पण – तुम्ही, थोरल्या आऊ, सती गेल्या मासाहेब, आमच्या श्रीसखी यांच्यासारख्या राजस्त्रिया म्हणजे कोण? खूप विचार केला तरी नाही मिळाला त्याचा जाब कधी आम्हास.

आणि – आणि लिंगाण्याच्या कड्यावरून देह झोकून दिलेली अश्राप गोदावरी! ती म्हणजे तर, कुठेतरी आभाळात तडकणाऱ्या विजेने दूरवरच्या भुईवर कोसळून, भेगाळावे तिचे अंतरंग, तसा आमच्या हयातीतला अदावती-सल. खुद्द आबासाहेबांनी बांधले तिच्यासाठी “सतीचं वृंदावन’ लिंगाण्याच्या पायथ्याशी. अण्णाजींना हत्तीच्या पायी दिल्याची कधीच खंत वाटली नाही आम्हास, पण हकनाक बळी गेलेल्या गोदावरीचा सल डोळ्यांत खुपून गेलेल्या सलाखीसारखा या क्षणीही सलतो काळजात. जाळत जातो तो काळजाचा ऐल-पैल तीर!

आणि आमच्या श्रीसखींचा चेहरा आठवला की, झगमगती चांदणवेलच डोळ्यांसमोर उभी राहते. आमच्या पत्नी एवढे नाते वगळले, तर उरल्यासुरल्या श्रीसखी आबासाहेबांच्या कन्याच शोभाव्या अशा! का कुणास ठाऊक, त्यांना आवतीभोवती बघताना नेहमीच याद होत राहिली, ती थोरल्या आऊंची. केवढ्या घोर यातनेत पडल्या असतील त्या या क्षणी? बोलताना त्या नेहमीच म्हणायच्या, “आम्ही आपलं बाशिंग बांधलं आहे रानवाऱ्याशी!”

खरोखरच काय करतील – कशा वागतील त्या आम्हामागे? केवढी भाऊबीज घातली आहे, गणोजी-कान्होजींनी आपल्या पाठच्या भगिनीला? याद करताना केवढी अपराधाची जाणीव होते! पण रायगडाच्या श्रीसखींना याद करताना मन क्वःणाइताच्या भावनेने कसे शिगोशीग भरून येते. येसू, गांगोलीत तुम्हाला मासोळीच्या वाणाची अंगठी बाळराजांच्या बारशात नजर देताना आम्हाला काय कल्पना होती की, आमच्यामागे तुम्ही पाण्याबाहेरच्या मासोळीसारख्याच व्हाल!

“हं:” कबिल्याच्या आठवणीच आठवणी अनावर झाल्याने त्यांनी मान झटकली.

समोर इंद्रायणी आणि भीमा एकमेकींच्या गळ्यात गळा घालून उन्हाला पीत, तळपत वाहतच होत्या. सूर्य आता तर ऐन माथ्यावर तळपू लागला!!

दूरवरून जवळ-जवळ येणाऱ्या घोडेपथकांच्या टापांची थडथड मोठी-मोठी होत जावी, तशी शंभूमनात आता अष्टप्रधान मंडळाच्या आणि औरंगबरोबर जागजागी झडलेल्या हातघाईत कामी आलेल्या कैक मर्दान्यांच्या आठवणी थडथडू लागल्या.

भ्रमात गेलेले, शेवटच्या क्षणी उशीखालून काढून भिकबाळीची आणि पेशवेपदाच्या शिक्के-मुद्रांची डबी पुत्र निळोपंतांच्या हाती देणारे मोरोपंत! कसे लागले कच्छपी ते अण्णाजींच्या आणि मासाहेबांच्या? कोण आणि कसा देणार त्याचा जाब? परकक्‍्याचे वतन कर्जापोटी आपल्या घशात घालण्याची घालमेल करणाऱ्या पहिल्या पेशव्यांना – शामराजांना पेशवेपदातून मुक्त करणारे आबासाहेब असते आमच्या ठायी, तर काय करते मोरोपंतांचे? कोण आणि कसे सांगणार ते? एवढेच कशाला? कुठल्या भिरमिटीने खुद्द आम्ही गेलो आपणहून दिलेरच्या गोटात, याचा काय जाब देणार आम्ही झालो तरी?? आमच्या जागी ते आणि त्यांच्या जागी आम्ही असतो, तर कसे वागतो आम्ही? का काही क्षणच असतात कुट्काळे प्रत्येक माणसाच्या जगत्या हयातीत? नाही तर गेले का, एवढ्या पल्ल्याचा विचार करणारे आबासाहेब प्रत्यक्ष औरंगच्या भेटीस आग्ऱ्यात? आणि पडते कशासाठी अडकून कैदकोठीत?

क्रमशः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२२.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment