धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २२५ –
वढूची मावळी सांज आता उतरली. पण दोन्ही कैद्यांना एवढीसुद्धा कल्पना नव्हती की, आता सांज आहे, सकाळ की दुपार? आता त्या दोघांनाही पुरते कळून चुकले की, हयातीच्या दौडीचा शेवटचा मुक्कामी तळ जवळ येत चालला आहे. मांडाखालचे हात, पाय, डोळे, जबान यांचे जनावर पार फेसाळलेय, थकदिल झालेय ते. त्याला टाच मारावी असेसुद्धा नाही वाटत आता.
दिवसभर आभाळाची दौड करून थकावटीला आलेली मावळकिरणे मायेने जवळ घेत, त्यांच्या थकल्या पाठवानांवरून, आपल्या असंख्य लाटांचे हात फिरवीत शांतसंथ वाहतच होत्या, फक्त इंद्रायणी आणि भीमा!
राजे आणि कुलेश यांचे डोळे-जबान काढल्यापासूनचा बारावा दिवस उगवला. हालहाल झालेले छंदोगामात्य कुलेश मध्यरात्रीच केव्हातरी गतप्राण झाले होते. मरण्यापूर्वी त्यांनी “प्रणाम स्वामी!” म्हणण्यासाठी केवढ्यातरी मोठ्याने “ऑ ऑ” केला होता. त्या चमत्कारिक आवाजाने कैद्यांभोवती गस्त देत फिरणारे, पेंगुळलेले गस्तेही दचकले होते. “ऑ ऑ” करत राजांनी कुलेशांना प्रतिसाद दिला. छंदोगामात्य आता छत्रपतींना प्रतिसाद देऊच शकत नव्हते. काय झाले असावे, हे राजांनी मनोमन ताडले.
कवी कुलेशांच्या जिंदगीचा छंद परमात्म्याच्या महाकाव्याला जाऊन मिळाला होता. त्यात एकरूप झाला होता.
बारावा दिवस! राजांना कल्पनासुद्धा नव्हती की, असेच रायगडी मंचकावर पडलेले रुग्ण आबासाहेब बाराव्या दिवशीच अनंतात लय पावले होते, त्या दिवशी पायांच्या नखांपासून डुईच्या केसावळीपर्यंत एक-एक अवयव गार पडत होता त्यांचा. आज असे काय होते आहे? आमचा पायांच्या नखांपासून डुईच्या केसावळीपर्यंत गेल्या दहा-बारा दिवसांत नव्हता असा अवयवन्अवयव का पेटून उठतो आहे? गेल्या थोरल्यांनी ऊरफोड करून इथल्या माणसा माणसाला जगण्यातला अर्थ पटवून सांगितला होता. जाते धाकले आज इथल्या माणसामाणसाला प्रसंग पडलाच, तर मरावे कसे याचा अर्थ पटवून देणार होते.
“शिव’ आता “जिवा’च्या अगदी नजरटप्प्यातच दिसू लागला राजांना.
आबासाहेब गेल्यानंतर हितोपदेश म्हणून लिहिला समर्थांचा खलिताच शब्दबर दिसू लागला, त्यांच्या जीवज्योतीला –
“शिवराजाचे आठवावे रूप। शिवराजाचा आठवावा साक्षेप। शिवराजाचा आठवावा प्रताप। भूमंडळी।।
शिवराजाचे कैसे बोलणे। कैसे चालणे। सलगी देणे। कैसी आहे।।
याहून विशेष ते करावे। जीवित तृणवत मानावे।”
धर्मातून राजकारण मार्गी लावणारे समर्थ आणि राजकारणाच्या धामधुमीतही धर्मकारण मार्गी लावणारे आबासाहेब! केवढे पारखले होते त्यांनी परस्परांस!
“जीवित तृणवत मानावे। – ” समर्थखलित्यातील हितोपदेश राजांच्या कानामनात – उभ्या देहात घुमू लागला.
आता तर त्यांना उभ्या मराठी दौलतीचाच केवढातरी भव्य ‘गोंधळचौक’ समोर मांडल्यागत दिसू लागला. हंबीरराव, खंडोजी, निळोपंत, बहिर्जी, कोंडाजी फर्जंद, म्हलोजीबाबा, कृष्णाजी कंक, रामचंद्रपंत, कुलेश – गेलेले – असलेले कितीतरी लोक हाती संबळ तुणतुणी घुमवीत मिटल्या डोळ्यांनी उदोकारच उदोकार उठवीत होते – “उदं गं अंबे उदं” केवढा भव्य हा, आम्ही यापूर्वी कधीच न बघितलेला आई जगदंबेचा गोंधळ! सगळ्याच मानकऱ्यांच्या माथी भंडाऱ्याचा मळवट भरलेला साफ दिसतो आहे आम्हास! दिसत नाही फक्त तुळजाभवानी! कुठे आहे ती? हे काय चमत्कारिक दिसते आहे? हा भास तर नाही? ही जगदंबेचीच मूरत दिसते आहे. फक्त तिचा मुखडा थोरल्या आऊंगत दिसतो आहे. तिच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी आबासाहेब आणि समर्थांच्या मुद्रा दिसताहेत! जगदंबमूर्तीच्या मळवटाच्या आडव्या दुबोटी रेघांत दिसताहेत आमच्या श्रीसखी आणि रामराजांच्या ताराऊ. रामराजांच्या मुद्रेचा पसरता भंडारा या दुबोटी मळवटामागे खडा दिसतो. पण – पण असे का होते आहे? या एवढ्या भव्य जगदंबमूर्तीत आम्ही – आम्हीच कसे नाही दिसत कुठे? का? का?
आता या क्षणी राजांना सभोवर मांडल्या भव्यच भव्य गोंधळातले आपल्या जीवज्योतीचे नेमके, रसरशीत, स्पष्ट-स्पष्ट मानकरी स्थानच दिसू लागले. इथून तिथवर पसरलेल्या, रंगावल्या, नादभरल्या आभाळाने तेजाळ सूर्यगोळ्याला केवढ्यातरी भरल्या डोळ्यांनी नुसते निरखावे, तसे शंभूराजांचे डोळे हरवलेल्या देहाचेच सारे अवयव त्या जीवज्योतीला भरून पावल्या डोळ्यांच्या भावनेने बघू लागले –
ती ज्योत आरोपित संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले नव्हती –
“उभा सह्याद्रीच जिंकण्यास येऊ आलो तर!” म्हणणारी, दिलेरला मिळणारी, भिरमिटलेली, खुद्द त्या ज्योतीलाही कायदे न आवरता आलेली, बेलाग उधळलेली भ्रमचित्त जवानीची ऊर्मी नव्हती –
ती कुणाची छत्रपती, स्वामी, धनी नव्हती. कुणाचे बार्शिंगबळ, कुणाचे आबा, कुणाचे भाऊ नव्हती – आता ती जीवज्योत कुणा माणसाशी, मातीशी कसलेही नाते सांगणारी नव्हतीच.
“क्षत्रियकुलावतंस, सकळगुणमंडित, अखंड लक्ष्मीअलंकृत गोब्राह्मणप्रतिपालक, श्रीमन्महाराज राजा शंभू। ” ही गेली अनेक साले धारण केलेली बिरुदावली अंगच्या रक्ताने त्यांनी केव्हाच धुऊन टाकली होती.
जमिनीपासून थेट आभाळापर्यंत आपल्या जिवाची एक नजर ठरणार नाही अशी भव्य, फरफरणारी ज्योत भासू लागली त्यांना.
“कसे आहोत आपण?” ज्योतीने सवाल केला आपणालाच!
“कसे? कसे?” शिवालयातल्या ऐकू येणाऱ्या घंटांनी केवढातरी घोष धरला आता. संबळ तुणतुणी शिगेला चढली. भंडाऱ्याच्या उधळल्या मुठी-मुखींनी आभाळ कसे कोंदून
“कशी दिसते आहे ही ज्योत?” भोवतीच्या पंचेंद्रियांना आपल्यातच ओढून घेतलेल्या त्या जीवज्योतीचा झाला होता, आई जगदंबेच्या मांडल्या या भव्य गोंधळ चौकातील अंगभर पाजळलेला, फरफरता, पाचपेडी पोत!!!
संताजी-धनाजी यांनी तो आपल्या हातांत नाचविता धरला होता. त्यांच्या हातातून तो कैकांच्या हातात जात गोंधळचौकभर अखंड फिरू लागला.
जगदंबेचा तो पाचपेडी पाजळता पोत. क्षणभर त्याने फरफरता सवालच स्वत:ला केला. “जीवित तृणवत मानावे?” आपणच जाब दिला – “समर्थ, तृणाच्या पात्यालाही असतं जळून भस्म होण्याचं भय! आम्हास तेही नाही उरलं!!” त्या पोतालाच – पोतमाहात्म्य ऐकू येऊ लागले –
“पंचेद्रियांचा जीवपोत हा – त्रिगुण गुणी वळला।”
कानांतले चौकडे काहून न टाकावेत, तसे त्या पोताने पाजळते होतानाच ‘त्रिगुण’ काढून केव्हाच दूर फेकले होते. पोताला आता काही-काही दिसेना. दिसू लागला फक्त इंद्रायणी आणि भीमेचा एकजीव झालेला पावन संगम! याच इंद्रायणीच्या काठी ज्ञानोबांनी आपल्या वारकऱ्यांना मऱ्हाटमोळी गीता सांगितली – ज्ञानेश्वरी! तुकोबांनी आपली गाथा रचली. आमच्यातून वाहून गेल्या रक्ताच्या करंजेलाने आज रेखली जाते आहे, एक “राजगाथा’, एक ‘शंभूगाथा ‘, एक ‘शंभूभूषणम्!’
पोत फरफरून-फरफरून उठला. औरंगजेबाच्या हुकुमाने, जल्लादी पथकांच्या हाते इखलासने उद्ध्वस्त केलेला “शंभूदेह’ सोडून चालला.
समोरच्या इंद्रायणी आणि भीमा यांच्या पावन संगमात तो आता डुबवला जाऊ लागला! डुबतानाही तो फरफरला – “जगदं$ब – जगदं$ब!”
“चर्रर” आवाज उठला.
जगदंबपोत उरात घेऊन इंद्रायणी आणि भीमा आज पहिल्याने माना वाकड्या करून काठावरच्या सजेच्या खांबाकडे बघत-बघत संथ वाहू लागल्या. त्यांना दिसत होती, मान टाकलेल्या शंभूदेहाच्या छातवानावर अजूनही मावळतीच्या किरणांत, रक्ताने न्हाऊन गेलेली; तरी तळपणारी चौसष्ट कवड्यांची अशरण तळपती माळ आणि फक्त माळ!!
मित्रांनो इथेच या कथेचा प्रवास समाप्त होतोय. “The Great Maratha Warriors पेज तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करित आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवन हे “छत्रपती शिवाजी महाराज” या नावा शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तसेच जीवन कसे जगावे आणि मरणोत्तर सुध्दा कसे झंझावे हे “छत्रपती संभाजी महाराज” या नावा शिवाय पुर्ण होऊच शकत नाही
ही कादंबरी “शिवाजी सावंत” यांनी लिहलेली आहे. त्यांच्या या कार्यस संपूर्ण शिवप्रेमी कडून मानाचा मुजरा….. तसेच छावा कादंबरी तून “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा” फेसबुक वर मालिकेचे आतुरतेने रोज वाट पाहत असणाऱ्या माझ्या शिवभक्तांचे व रणरागिणींचे “रमेश साहेबराव जाधव”. यांना मानसिक बल व आपुलकीची भावनिकता आपल्या वाचनाच्या उतंकटने दिली आणि मला कांदबरी तील मजकूर लिहण्यास भाग पाडले. प्रेरणा दिलीत त्या बद्दल माझ्याकडून मनःपुर्वक आभार..
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.