धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३७…
जिजाबाई म्हणाल्या, “थांबा आम्ही येतो आहोत!” आणि ते ऐकत असताना शंभूराजांच्या डोळ्यांत पुनवेचे दहीदाट चांदणे उतरले! अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेल्या मासाहेब बरोबर शंभूराजांना घेऊन होळीचौकीकडे चालल्या. प्रतापगडची जगदंबाच आपल्या बालभुत्याला घेऊन चालावी तसे ते दृश्य दिसत होते! एक जाणता ‘स्त्रीवसा’ आपल्या नेणत्या “बाळवशा’ला घेऊन चालला होता.
“खाशा आऊसाहेबांची स्वारी बाळराजांच्यासह होळीचा मान राखण्यासाठी येते आहे.’ ही वाऱ्यासारखी होळीचौकात पोहोचली होती. हरखून गेलेल्या मावळ्यांच्या
जमावात चैतन्याचे कसे उधाण उठले. रणहलग्यांनी टिपेच्या सुरांची तडतड घुमवायला सुरुवात केली.
निळो सोनदेव, प्रतापराव सिलीमकर, झुंजारराव मरळ, गोमाजीबाबा, सिदोजी थोपटे, अंतोजी आणि रायाजी अशा सरंजामात जिजाऊ आणि शंभूराजे होळीचौकात आले. मावळ्यांचा चंदेरी कालवा थांबला. रणहलग्यांच्या टिपऱ्यांची तडतड निसूर झाली. आभाळातून झिरपणारे चांदणेही खिनभर थिरावले!
शंभूराजांच्यासह जिजाऊ चौथऱ्याच्या खाशा बैठकीवर सुखावल्या. चौकातल्या हुडव्याचा मानकरी हाती पेटता चूड घेऊन मुजरा करीत मासाहेबांच्या सामने आला. अदबीने म्हणाला, “होळीचा मानाचा चूड धाकल्या राजांनी हुडव्याला द्यायला पायजे, मासाब.”
जिजाऊंनी मान वळती करून शंभूराजांच्याकडे बघितले. शंभूराजे बैठकीवरून उठले. मासाहेबांच्या पायांना हात लावून ते चौकातल्या हुडव्याजवळ आले. मानकऱ्याने
आपल्या हातातील चूड त्यांच्या हाती दिली. आपली नजर शंभूराजांनी हातातील चुडीच्या उसळत्या ज्वाळेवर क्षणभर रोखली. चूड अधिकच पेटून उठली!
“जय भवानी” गर्जत शंभूराजांनी होळीच्या लाकडी हुडव्याला चूड दिली. आगीची पाखरे आभाळाच्या रोखाने झेपावू लागली. हुडवा धडधडू लागला. तोंडाच्या हलग्यावर
पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून घुमल्या! होळीने सूर धरला. शंभूराजे बैठकीच्या चौथऱ्यावर येऊन बसले. नारळाची फळे पेटत्या हुडव्यात धडाधड फेकली जाऊ लागली. ती बाहेर काढण्यासाठी आगवेड्या, धाडसी मावळ्यांनी हुडव्याभोवती रिंगण धरले. एकेक निधडा हात बेधडक रसरसत्या निखाऱ्यात घुसू लागला. होरपळून मागे हटू लागला रोखल्या नजरेने जिजाबाई हुडव्याच्या चटचटत्या, लाल-पिवळ्या ज्वाळांकडे बघत होत्या. त्यांच्या मनात शिवाजीराजांचे विचार रिंगण धरून फिरत होते – “कुठं असतील राजे? काय करत असतील?’
“मासाहेब…” शंभूराजांच्या आवाजाने त्या भानावर आल्या.
“काय बाळराजे?”
“अशाच एका होळीसणाला आम्ही आबासाहेबांना विचारलं होतं….”
“काय?”
“आबा, तुम्ही काढाल काय हुडव्यातील नारळ बाहेर म्हणून?”
“मग काय म्हणाले ते?” जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले.
“म्हणाले – कोशिस करू!” शंभूराजांनी उत्तर दिले.
ते ऐकताना डोकीवरचा पदरकाठ ठीक करीत जिजाबाईंनी एक लांब नि:श्वास सोडला. बाळराजांच्याकडे बघत त्या म्हणाल्या, “शंभूबाळ, प्रसंग ठाकलाच तर तुम्हासही
आणि आम्हासही ती कोशिश करणे पडेल!”
होळी पुनवरात चांदणे पेरत गडावर चढत होती. मावळे निखाऱ्यातील नारळ फळे हुडव्यात हात घालून बाहेर काढीत होते. होळीच्या मानाची सोनकडी शंभूराजे
मासाहेबांच्या साक्षीने मानकऱ्यांना बहाल करीत होते. त्यांना किंवा जिजाऊसाहेबांना काहीच कल्पना नव्हती की, बसनूर लुटून, गोकर्ण महाबळेश्वरावर शिवलिंगाचे दर्शन
घेऊन नेमके आजच राजे कारवार बंदरावर उतरले असतील. कारवारात टोपीकर इंग्रजांच्या वखारी लुटण्याचा राजांचा मनसुबा होता, पण शेरखान हा आदिलशाही सरदार फौजेनिशी होळीच्याच दिवशी कारवारात घुसला होता. त्याने पाच हजार होनांची खंडणी राजांना देऊन कारवार वाचविले होते. त्यांच्याकडून आलेले खंडणीचे पाच हजार होन थैलीबंद करून कारवार सोडताना राजे सरलष्कर नेताजींना म्हणाले, “आज शेरखानाने आमच्या होळीची शिकार घालविली!!”
कर्नाटक प्रांतीची लूट घेऊन राजे कारवार, भीमगडमार्गे राजगडावर आले. गडावर येताच त्यांना खबर मिळाली की, औरंगाबादेत शाहजादा मुअज्जमची भेट घेऊन मिर्झा राजे जयसिंग आणि पठाण दिलेरखान पुण्याच्या रोखाने कूच झाले आहेत. पावसाळी नदी क्षणाक्षणाला फुगावी तशी मिर्झा राजांची फौज फुगून ऐंशी हजारांवर गेली आहे. जव्हारचा राजा, अफजलखानाचा मुलगा फाजलखान, जावळीकर मोरे, देसाई, दळवी ह्या राजांच्या शत्रूंना मित्र मानून, त्यांच्या मिळतील तेवढ्या जमेती पोटात घेऊन,
ऐंशी हजारांची हिरवी वावटळ चालून येत होती. ती येती प्रचंड लाट परतविणे शक्य नव्हते. थोपवून धरणे अशक्य होते आणि नुसते बघत राहणे तर केवळ असह्यच होते!
बारामावळाचे आघाडीचे गडकिल्ले बंदिस्त स्त राखणे भाग होते. बालेकिल्ल्याच्या सदरेवर राजे चिटणीस बाळाजी आवजींना खलित्याचे मायने-मजकूर सांगू लागले. त्यांच्या उजव्या हाताच्या तर्फेला संभाजीराजे बसले होते. सदरबगल धरून मोरोपंत, कुडतोजी गुजर, येसाजी कंक, मानाजी भोसले, मुरारबाजी, नागोजी आणि बहिर्जी फर्जंद, निराजीपंत, अण्णाजी दत्तो अशा मंडळींनी बैठकीचा फेर धरला होता. कुणीच काही बोलत नव्हते. राजे मजकूर सांगू लागले. बाळाजींच्या हातचे शहामृगपीस कुरकुरु लागले – अक्षरांचे मोती उमटू लागले.
“प्रस्तुत जासुदांनी समाचार आणिला की, मिरजा राजा जयसिंग रजपूत बरोबरी दिलेरखान पठाण ऐंशी हजार बाकी फौज घेवोन चालोन येतो आहे. तरी तुम्ही जेवढे-जेवढे कदीम, जाणते असाल ते-ते बरे सावध हुशारीने जागचे जागी असणे. पहारेकरी-मेटकरी जेवढे म्हणोन असाल ते रात्रीचा दिवस समजोन चखोट हत्यारबंद राहणे. दाणागोटा, गवतकाडी, बारूदगोळा यावरी बरे ध्यान राखणे. आम्ही खासे तुरंतच गडदाखल होत आहोत….”
बाळाजींनी थैल्यांचे फासबंद आवलून त्या सिद्ध केल्या. राजांनी आपल्या प्रत्येक सरदाराला जरुरीच्या सूचना दिल्या. ते धीराने प्रत्येकाशी बोलत होते. पण त्यांच्या
मुद्रेरची चिंतेची काजळी प्रत्येकाला खोल कुठतरी जाणवत होती. उभा राजगड जखडल्यागत झाला होता. महाराज सरदारांना देत असलेल्या सावध सूचना संभाजीराजे
विस्मित मनाने ऐकत होते.
संभाजीराजांना घेऊन राजे सदरेवरून आपल्या महालात आले. मिर्झा राजा कोण प्रकारची चाल घेईल, याचा विचार करण्यात ते हरवले होते. संध्याकाळची लांबट किरणे
अजून बालेकिल्ल्यावर रेंगाळत होती. मंचकावर बसलेले बाळराजे अस्वस्थ फेऱ्या घेणाऱ्या राजांकडे एकनजर बघत होते. शेवटी न राहवून त्यांनी राजांना विचारले,
“महाराजसाहेब, रजपूत म्हणजे काय?”
राजांचे फेऱ्या घेणारे पाय तो प्रश्न एकताच जखडल्यासारखे झाले. तो प्रश्न राजांचे काळीज पार चिरत गेला होता. क्षणभर ते बाळराजांच्याकडे बघतच राहिले. मग धिम्या
पावलांनी ते मंचकाजवळ आले. शंभूराजांच्या डोळ्यांत आपले डोळे खोल रुतवून दाटल्यासारख्या घोगरट आवाजात त्यांना म्हणाले, “रजपूत म्हणजे राजाचे पुत्र! राजाचे फर्जंद! राज्य करणारे. पण ही फार जुन्या काळची बाब झाली! आता ‘रजपूत’ “राजबंदे’ झाले. नमकहिलाल चाकर झाले! तुम्ही रजपूत आहात, आम्ही रजपूत आहोत आणि मिर्झा राजाही रजपूतच आहे!” आणि मग राजे कितीतरी वेळ शंभूराजांना रजपूत, राजपुताना मिर्झा राजे, औरंगजेब, मोगलशाही याबद्दल बरेच काही सांगत राहिले. एक दीर्घ नि:श्वास फेकता सोडून ते मंचकाजवळ गवाक्षाच्या महिरपीजवळ आले. महालाच्या रोषणनाईकाने
अजून बैठकीत पेटते टेंभे चढविले नव्हते. राजांना उगाच आपली राजमुद्रा आठवली,
“प्रतिपज्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता…
मंचक उतरून राजांच्या पाठीशी येऊन संभाजीराजे उभे राहिले. त्या दोघा पितापुत्रांना परशूचा आकार घेत डुबतीला लागलेले सूर्यर्बरिब दिसत होते. शंभूराजांच्या मनात विचार घोळत होते, ‘आम्ही रजपूत आहोत. मिर्झा राजाही रजपूतच! कसा असेल तो मिर्झा राजा? आबासाहेबांच्या सारखा? छे! मग महाराजसाहेब त्याच्यासाठी एवढे
चिंतेत पडलेच नसते!!’
बाहेर ऊन तावत होते. उभा राजगड आत पोळून निघत होता. संभाजीराजांच्या महालात, आपल्या गोंदल्या हाताने माठातील थंडगार पाण्याचा पेला शंभूराजांच्या हाती
देताना धाराऊ म्हणाली, “कायली व्हतीया जिवाची निस्ती!” आणि तिने आपल्या कपाळावर दाटी केलेला घाम डाव्या हाती पदर घेऊन निपटला. इतक्यात जिजाबाई महालात आल्या. घाम पुसलेला अंगावरचा पदर धाराऊने लगबगीने ठाकेठीक केला. शंभूराजे आऊसाहेबांना बघताच कमरेत वाकले. पेला डाव्या हाती घेत त्यांनी मुजरा केला.
“घ्या,” म्हणत जिजाऊंनी पुढे होत पेला त्यांच्या ओठांना भिडविला. पाणी पिताना बाळराजांच्या पापण्या क्षणभर मिटल्या गेल्या. जिजाऊंची नजर त्यांच्या कपाळीच्या दोनदळी शिवगंधावर गेली. सकाळी त्यांनीच ते बाळराजांच्या कपाळी रेखले होते. गडावर अनेक दासदासी होत्या, राजांचा सात राण्यांचा राणीवसा होता, पण
बाळराजांच्या कपाळी शिवगंध रेखण्याचे काम जिजाबाईंनी कुणाच्याही हाती आजवर जाऊ दिले नव्हते. त्यांचे ते समाधान होते. कसले होते? कसे होते? हे कुणालाही सांगता येणार नव्हते. हातचा रिता पेला बाळराजांनी चौरंगावर ठेवला. जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या, इतक्यात पाली दरवाजावरची गडचढीची दुडदुडणारी नौबत सर्वाच्या कानावर आली. जिजाऊंचा चिंताक्रांत, आक्रसलेला चेहरा क्षणभर त्यामुळे उजळल्यागत
झाला. “चला बाळ शंभू, राजे गड चढताहेत. सदरेवर जाऊ.” जिजाबाईनी बाळराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि त्या सदरेच्या रोखाने चालू लागल्या.
तोरणा, प्रतापगड, चंदन-वंदन, रोहिडा, पुरंदर अशा बारा मावळांतील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाकेबंदी नजरेखाली घालून राजे राजगडाकडे परतत होते.
पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाण झाली. माचीमागून निघणाऱ्या भुयारमार्गाने राजे बालेकिल्ला चढून वर आले. सदरप्रवेश करणाऱ्या राजांना जिजाबाई ळे जोडून बघत होत्या. राजांचे कपाळ घामाने डबडबून गेले होते. दोनदळांचे शिवगंध त्यामुळे चौकाठाने ओघळले होते! ते बघताना जिजाबाईंच्या जिवाची नुसती काहिली होत ती!!
राजे राजगडावर आल्याला आठ दिवस लोटले नसतील तोच, दिलेर-मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामुठेचे पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली. गौर, हाडा, बुंदेला,
राठोड, कछवाह, चंद्रावत अशा राजबंद्या राजपुतांच्या केशरी डेऱ्या- राहुट्यांची प्रतिर्बिबे मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली. दिलेरखानाच्या सगळ्या जातीचा “खान? पुण्यात ठाण झाला. हत्ती, घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाला. अब्दुल्लाखान, फत्तेलष्कर, महेली या अगडबंब तोफांची भांडी तोफखान्याचा प्रमुख
मीर अतिशखान याने रांगेत आखून ठेवली.
क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३७…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव