महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,640

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३८

Views: 3734
9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३८…

पाठीकडे झुकते झालेले किमांश डोक्यावर घेऊन, चुनीदार विजारीचे, डगल जाम्यावर झगमगीत जाकिटे चढविलेले दिलेरचे पठाणी आणि बहलिया हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले. डोक्यावर केशरी साफे बांधलेले, हनुवट्यांजवळ दाढ्या पिळलेले मिर्झा राजांचे ‘कुंवर’, “सिंग’ आणि ‘ठाकुर’ राजांच्या खबरा उचलण्यासाठी बारा मावळांत घुमू लागले.

आले! दिल्ली दरबारचे सगळ्यांत ताकदवर आक्रमण मराठी दौलतीवर चालून आले. प्रभू रामचंद्राच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजा, राजांचे ‘श्रीं’चे राज्य

तसनस करण्यासाठी स्वामिनिष्ठेच्या खिल्लती, काबे पांघरून आला. येताना तो रणचंडीचा कोटियज्ञ पेटवून आला होता. त्यात काही कमी पडायला नको म्हणून तो आता मराठी मुलखाची होळी पेटविणार होता. त्याची उमर साठ वर्षांची होती. साठीला बुद्धी नुसती नाठीच होत नाही, तर खोटीसुद्धा होऊ शकते. कारण आजवर जे कधीच घडले नव्हते, ते आता घडणार होते. मराठे-रजपूत एकमेकांवर उभे हत्यार धरणार होते! सूर्यवंशजाकडून

लवकरच एक साक्षात सर्जा सूर्यच ग्रासला जाणार होता.

पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कब्जा आपल्या हाती घेऊन राजा जसवंतसिंगाला रिहा केले. जसवंतसिंग दिल्लीच्या रोखाने कूच झाला. आपल्या डेऱ्यात बसून हुक्‍्क्याच्या नळीतून धुराचे फव्वारेच फव्वारे फेकीत

दिलेरखान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग ओकावी, या खयालात डुबून गेला होता. मुहम्मद तर्खान, रसूलबेग रोझमानी, कुवतखान, सैयद बुखारी, तुर्कताझखान,

झबरदस्तखान, घैरत आणि मुजफ्फर, मीर अतिशखान हे शाही बंदे हात बांधून त्याच्या समोर खडे होते.

आपल्या आलिशान शामियान्यात खुशबुदार सरबताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढंगाच्या चाली रचाव्यात याचा विचार करीत होता. उन्हाच्या तलखीने त्याचे पातळ ओठ पुन्हा-पुन्हा सुकत होते. सरबत कामी येत नव्हते. अफजलखानाला ऊरभेटीत फोडणारा, शास्ताखानाची बोटे छाटणारा, शाही सुरतेची शान

लुटणारा “सेवा’ त्याच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हता.

मध्येच त्याच्या कपाळावरचा केशरी कुलटिळा आक्रसत होता. चढत्या उन्हाबरोबर त्याच्या जिवाची नुसती काहिली होत होती!!

▶ नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगावर राजांनी आपल्या सडक बोटांनी बेलपत्र वाहिली. क्षणभर आपल्या दळदार पापण्या मिटत त्यांनी हात जोडले. हे शिवलिंग

कैकवेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलीत बोलत आले होते. काजळणाऱ्या त्यांच्या मनाला हे स्फटिकस्वच्छ करीत आले होते. आज मात्र कधी नव्हे; ती निळ्याशार कंठाची,

भस्ममंडित अशी साक्षात शिवाची मुद्राच त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खडी ठाकली! तिचा दाट निळा कंठ बघताना राजांचे उभे राजेपणाचे भान थरकून उठले. त्यांनी डोळे

उघडले. समोरचे स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपतच होते.

शेजारी उभ्या असलेल्या संभाजीराजांना राजांनी नजरेने शिवलिंगावर बिल्वदले वाहण्याची इशारत केली. शंभूराजांनी तबकातील दोन बेलपत्रे स्फटिकसुंदर शिवलिंगावर वाहिली. राजांनी मिटले तसेच त्यांनी हात जोडून आपले डोळे मिटले. त्यांच्या मिटलेल्या

छोटेखानी डोळ्यांसमोर मात्र महाबळेश्वरच्या माथ्यावर, कृष्णेच्या पात्रात गळाभर पाण्यात उतरलेल्या आबासाहेबांची – शिवपिंडीसारखी दिसणारी मुद्राच क्षणात उभी ठाकली!! ती दिसताच त्यांनी जोडलेले हात उचलून आपल्या कपाळाला नेऊन भिडवले.

“चला.” राजे त्यांच्या खांद्यावर हात चढवीत म्हणाले आणि शंभूराजांच्यासह राजे जिजाबाईच्या महालाकडे निघाले.

जिजाबाईंना वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर आले. सदरेवर सरलष्कर नेताजी, आनंदराव, कुडतोजी, येसाजी, मोरोपंत, निराजी, रावजी, कर्माजी, अण्णाजी दत्तो, सिदोजी, रघुनाथपंत कोरडे अशी मंडळी हात बांधून उभी होती. कुणाचीच मान वर नव्हती.

अदबमुजरे झडले. राजे, जिजाबाई आणि बाळराजे सदरबैठकीवर बसले. वर्मी बाण लागलेले पाखरू, चीत्कारण्याची ताकद नसल्याने तसेच फडफडत जावे, तसे काही क्षण गेले. एक सेवक जगदंबेच्या भंडाऱ्याची परडी घेऊन सदरेवर राजांच्यासमोर आला. काही न बोलता त्याने हातची परडी राजांच्यासमोर पेश केली.

भंडाऱ्याची पहिली चिमट सदरेच्या देवतेला उधळून राजांनी दुसरी चिमट आपल्या कपाळीच्या शिवगंधावर घेतली. भंडाऱ्याची परडी सदरभर फिरली. इमानी कपाळे भंडाऱ्याने भरली. राजांच्या हात-इशारतीवर सगळी मंडळी बसती झाली. भयाण शांतता पसरली.

कधी नव्हे, एवढ्या जाणवणाऱ्या गंभीर आवाजात

🔊 राजे बोलू लागले, “आम्हास ज्याची धास्ती होती ते समोर आले. औरंगशहाच्या मनी आमचे श्रींचे राज्य सलते. ते बुडवावे म्हणोन त्याने नामजाद केलेले दिलेर व मिर्झा पुण्यावर उतरले. मिर्झा राजाची चाल अजून खुली जहाली नाही. पण आम्ही ती जाणतो. आता त्याच्या जमेती कोंढाणा किंवा पुरंदराच्या रोखानं कूच करतील. औरंगशहास रजाबंद करण्यास मिर्झा राजा हरहुन्नरची कोशिस करेल. बोला मंडळी, तुमची जाणती मसलत बोला.” राजे थांबले. बोलताना त्यांच्या तोंडी ‘औरंगशहा’चं नाव येताच त्यांचे पेटून उठणारे डोळे आणि कातर

आवाज संभाजीराजांना जाणवून गेला.

▶ “रजपुताच्या गोटावर मारत्या समशेरीने चाल घेऊ या.” कुडतोजी गुजर मान उठवून म्हणाले.

“तुमच्या निधड्या स्वभावाला धरून बोललात कुडतोजी! पण रजपूत एवढा गाफील नाही. मागच्या सरदारांच्या गफलती त्याच्याकडून होणार नाहीत. बादशहांच्या

दोन डुया त्याने बघितल्या आहेत.” राजे शांतपणे म्हणाले.

“मोगलाई मुलकात घुसून हूल देत त्येला अंगावं घेतला तर…” नेताजींनी आपली थोराड पगडी डोलावीत मसलत पेश केली.

“मनचं बोललात नेताजी. आम्ही तीच कामगिरी तुम्हांस जोडून देणार आहोत.

परिंड्याच्या परगण्यात तुम्ही फौजबंद होऊन उतरा. पण हा हुन्नरही किती नतिजा पावेल आम्हास शक आहे! मिर्झा राजे मुत्सद्दी आहे. धिमा आहे.”

सगळे सदरकरी खामोश झाले. कुणालाच काही सुचत नव्हते. बराच वेळ राजे बोलत होते. मिर्झा राजाचा, पठाण दिलेरचा हुबेहूब परिचय करून देत होते. औरंगजेबाच्या चालबाज, धूर्त राजकारणी डावाची उकल करून सांगत होते. शेवटी ते म्हणाले, “आम्हांस औरंगजेबाच्या कडव्या चालीची खंत वाटत नाही. कीव वाटते ती मिर्झा राजाची. दिल्लीपती होण्याची त्याची योग्यता. तोच आज आमच्या पहाडीयांच्या मुलखात बादशहाचा नमकहलाल चाकर म्हणोन उतरतो आहे. आता श्रींची इच्छा बलवत्तर. आमचा भार त्यांच्यावर,” म्हणत राजे उठले.

मने जखडलेले सदरकरी उठले. त्यांच्यातील रघुनाथपंत कोरड्यांच्याकडे बघतराजे म्हणाले, “रघुनाथपंत, तुम्ही जरा आमच्या महाली भेटा.”

राजांच्या पाठीवर झगमगणाऱ्या जाम्यावरच्या जरीबतूच्या ठसठशीत कोयरीवर डोळे जोडून जिजाबाईच्या बरोबर चालताना संभाजीराजे कसल्यातरी विचारभिंगरीत

अडकले होते. राजांच्या महालात येताच त्यांनी राजांना विचारले, “हा ‘औरंगशा’ असा कोण लागून गेला आहे की, तुम्ही त्याच्याबद्दल इतकं बोलावं?”

त्यांच्या प्रश्नाने जिजाबाई आणि राजे चमकून एकमेकांकडे बघतच राहिले. आपल्या फर्जदाला औरंगजेबाची खूणगाठ कशी द्यावी, हे राजांना क्षणभर उमगलेच नाही बाळराजांच्या जवळ येऊन त्यांच्या दोन्ही खांद्यावर आपले तळहात चढवून, त्यांचे खांदे आवळत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे बघत राजे म्हणाले, “तो दिल्ली तख्ताचा

बादशहा आहे शंभूराजे! तो आम्हास कधीच दिसला नाही. तसा तो त्यांच्या बंद्या सरदारांखेरीज कुणासच दिसत नाही. पण त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते! त्याच्या सख्ख्या भावांना दिसली! खुद्द त्याच्या जन्मदात्या बापाला दिसली!” राजे बोलता-बोलता थांबले.

“आम्ही त्या औरंगशहाला भेटून विचारावं म्हणतो -“” संभाजीराजांचे बोल पुरे झाले नाहीत. राजांनी त्यांच्या ओठांवर आपली तर्जनी ठेवीत झटकन त्यांची जबान

रोखली. “हा शंभूबाळ, सांब करो आणि तुमच्यावर तो प्रसंग कधीच न येवो!” चौरंगावरील तबकात ठेवलेल्या स्फटिक शिवलिंगाकडे बघत राजे म्हणाले.

▶ मिर्झा राजाने आपली चाल खुली केली. तीन पवित्र्यांत त्याचे सैन्य हलू लागले. सुप्यापासून जोडलेल्या पिछाडीच्या प्रत्येक ठाण्यावर तो हत्यारबंद, जागती शिबंदी पेरत आला होता. आपल्या प्रचंड फौजेचे गिधाडी पंख त्याने आता बारा मावळांत पसरले. खासा तो आणि दिलेरखान दोघे हुजरातीचे ताकदवर सैन्य घेऊन किल्ले पुरंदरच्या रोखाचे

कूच झाले. मीर अतिशखान आणि निकोलो मनुची या गोऱ्या दरोग्यांच्या नजरेखाली खडखडाट करीत मिर्झा राजाचा तोफखाना पुरंदर जवळ करू लागला.

पेटली! बारा मावळांची होळी ऐन तावत्या उन्हात पेटली. डोंगर-पायथ्यांना आसरा धरून उभी असलेली मौजी, खुर्दे, बुद्रेके घोड्यांच्या दौडत्या टापांखाली रगडली जाऊ लागली. सर्पणाच्या रानशेणी आणि काटक्या गोळा करण्यासाठी बाहेर पडलेल्या तरण्याताठ्या कुणबी बायका, “काफरकी दौलत – कमीनेकी औरत!’ म्हणत चालत्या घोड्यांवर घेऊन, त्या हातपाय झाडीत किंचाळत असताना पळविल्या जाऊ लागल्या. त्यांच्या थरकत्या किंकाळ्या मावळाच्या दऱ्यांत गायब होऊ लागल्या. दावणीची जनावरे, नंग्या तेगींनी दावी छाटून तांड्यातांड्यांनी मोगली गोटांकडे हाकारली जाऊ लागली. शेपट्या उचलून, खूर झाडीत नवख्या मुलखाकडे फेसाटत धावताना ते अश्राप तांडे

केविलवाणे हंबरू लागले. दिवसाढवळ्या पेटत्या मशाली घेऊन वाडीखेड्यांत घुसणारे पठाणी, तुर्की, मुगल, बहलिया हशम गंजी-घरट्यांना मशाली भिडवू लागले. वेठबिगार करून घेण्यासाठी पकडलेल्या कुणब्यांच्या पाठी कोरड्यांच्या फटक्यांखाली फुटू लागल्या. गावेच्या गावे लुटली, जाळली, रगडली जाऊ लागली.

काढण्या चढवून, ताणीव गावचौकात आणलेल्या मावळ्यांवर कोरडे ओढताना दिलेरचे हशम गर्दना मागे टाकीत खदखदा हसत विचारू लागले, “सुव्वरकी अवलाद,

कहाँ है तुम्हारा सेवाजी?” उभ्या मुलखाचे सुरूरपण सुकत चालले. तावत्या उन्हात बारा मावळांवर अवकळा उतरू लागली. शाही फौजेचा घरघरता वरवंटा अश्रापांच्या

मोडक्‍्यातोडक्या संसारावर निर्दयपणे फिरू लागला. माणसे हकनाक मरू लागली.

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment