धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३९…
राजेवाडी-सासवड मार्गाने पुढे सरकलेला फौजबंद दिलेरखान; पुरंदरच्या पायथ्याला भिडला. पाठोपाठ भुलेश्वरच्या खिंडीतून मिर्झा कऱ्हेपठारावर उतरला.
किल्ले पुरंदरला अफाट शाही फौजेचा घेर पडला! कऱ्हा नदीच्या काठाला, ठोकलेल्या खुंट्यांना जखडलेल्या तणावांचा आधार घेत केशरी-करड्या रंगांच्या राहुट्या,
डेरे, तंबू, शामियाने उठले. हत्ती, उंट चीत्कारू लागले.
पुरंदरच्या सदर दरवाजाच्या बाजूला खासा दिलेर, किरतसिंग, मीर अतिशखान, इंद्रमण बुंदेला, उदयभान गौर, रसूलबेग, झबरदस्तखान यांनी आपल्या बर्कदाज हशमांचे
वळे उभे केले. मोर्चे रोखलेल्या तोफांच्या भांड्यांची तोंडे किल्ल्यावर बेसुमार आग ओकू लागली.
किल्ले पुरंदर हा जोडकिल्ला होता. पूर्वेच्या बाजूला “रुद्रमाळ’ उर्फ ‘वज़गड’ हा छोटेखानी किल्ला होता. त्याला धरून पुरंदरच्या माच्या पसरल्या होत्या. मध्ये होती एक
निरुंद खिंड – भैरवखिंड! वज़्गडावर पुरंदरची सारी मदार होती. तो गडच मंदिराच्या पायरीसारखा होता. पायरी ओलांडली की, पाऊल जसे मंदिरात तसे वज़गड पडला, तर पाऊल किल्ले पुरंदरात!
आता जोड होती पुरंदरच्या पराक्रमाची आणि दिलेरच्या दंग्याची. गडावर रामोशी, महार, कोळी आणि कहार या धारकऱ्यांची दीड हजारांची शिबंदी होती. गडाला
आधार होता त्यांच्या नेकीचा. आणि राजांनी स्वत: नेऊन रुजू केलेल्या, मारत्या समशेरीच्या, काळभैरव, पट्टेबाज मुरारबाजींचा!
राजगडाच्या पद्यावती माचीवर कबिल्याचे मेणे सिद्ध होते. जिजाबाई, सोयराबाई आणि राजे बालेकिल्ला उतरून पद्यावती माचीवर आले. बरोबर संभाजीराजे, सखूबाई, राणूबाई, अंबाबाई आणि नानीबाई असा राजांचा गोतावळा होता. आता राजांच्या घरचीच झालेली धाराऊ होती. मोरोपंत, अण्णाजी दत्तो, येसाजी, रघुनाथपंत, कुडतोजी, निराजी रावजी ही मंडळी मासाहेबांना निरोपाचे मुजरे घालायला माचीवर जमली होती. राजांच्या आग्रहाने जिजाबाई राजगड सोडून कोंढाण्याकडे सोयराबाईच्यासह चालल्या होत्या. पुरंदराला चार मजलांवरच दुष्मन फौज तळ टाकून असताना आता सगळ्यांनी एका जागी राहणे, हिसाबी नव्हते. जिजाबाई गड सोडायला तयार नव्हत्या. राजांना आणि बाळराजांना, शत्रू तोंडावर असता; एकाकी टाकून जायला राजी नव्हत्या. पण राजांनी हरतऱ्हेने त्यांची समजूत घालून त्यांना जाण्यास तयार केले होते. राजांनी पुढे होत मासाहेबांच्या पायांना हात लावले. संभाजीराजांनी आऊसाहेबांच्या पायावर कपाळ टेकविले. त्यांना उठवून
जिजाबाई म्हणाल्या, “आम्ही निघालो बाळराजे. आता राजांच्या महाली झोपत जा!”
ते उद्गार ऐकताना राजांचा ऊर गलबलून गेला. संभाजीराजानी सोयराबाईच्या पायांवर मस्तक टेकविले. पण सोयराबाईचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते! त्या गड
सोडण्यापूर्वी नजर जोडून फक्त मिळतील तेवढे “राजे’ डोळ्यांत भरून घेण्यात गुंतल्या होत्या!! राजांची नजर समोर दिसणाऱ्या निशाण-चौथऱ्यावरच्या उंच
निशाणकाठीवरच्या जरीपटक््यावर होती. जिजाऊंच्या जात्या स्वारीला सगळ्यांचे नमस्कार-मुजरे झाले.
▶ पुरंदरच्या वेढ्याला पंधरा दिवस लोटले. किल्ले पुरंदर प्राणबाजीने भांडत होता. रात्री-बेरात्री गडावरचे मावळे तुकड्यातुकड्यांनी दिलेरच्या गोटावर एल्गार करीत चालून
जात होते. सावध असलेला दिलेर निकराने छापे मोडून काढीत होता. हत्यारे चालविताना कामी आलेल्या धारकऱ्यांची प्रेते गडउतरंडीवर तशीच पडत होती. हाती लागलेल्या प्रेतांच्या पायांना काढण्याचे फास अवळून, घोड्यांच्या टापेला बांधून त्यांची दिलेरच्या गोटासमोर फरफटती धूळधिंड निघत होती. कऱ्हेपठार पेटत्या तोफांच्या भांड्यांच्या दणक्याने दणाणून निघत होते. अस्मान धुराने काळवंडत होते. महार, कहार, कोळी,
रामोशी मरत होते. मरता-मरता झुंजत होते.
आपल्याच धिप्पाड पठाणी हशमांच्या घामेजल्या उघड्या पाठीवर कोरडे ओढीत “फत्तेलष्कर ‘, ‘अब्दुल्लाखान’, ‘महेली’ या अवजड तोफा दिलेर, मीर अतिशखान आणि
निकोलो मनुची यांनी वज़गडावर वर्मी आगमार करतील अशा उंचीच्या धमधम्यांवर आणल्या. त्या दणकत्या तीन नागिणींनी वज़्गडाला खिंडार पाडले. गडाला “पान’ लागले!
“दीन दीन!” आक्रोशत पठाणी, बहलिया, मोगल हशम उन्हाने तळपती नंगी हत्यारे पेलत सुलतानढवा करीत वजगडावर तुटून पडले. गडावरचे चालते, फिरते हत्यारे
थांबले. वज़गड पडला! ‘श्रीं’च्या कंठातील रुद्रमाळ तुटली. दिलेरचे पठाणी पाय पुरंदरच्या पायरीवर पडले! आता तो निकराने मंदिरात घुसणार होता. किल्ले पुरंदरात!!
“धनी, लई झटझुज घेतली, पर अपेश पदरात आलं. आमाला त्वांड दावाय जागा नाही. आता होतर आमच्या गर्दना मारा, होतर कडेलोट करा. तेवढे मराण तरी ‘कीरत’
म्हून मागं ऱ्हाईल!” वज़गडचा किल्लेदार खालच्या मानेने राजांच्या समोर आपल्या उरातला कढ मोकळा करीत होता.
एक राजकारणी डावपेचाची चाल म्हणून वज़गडच्या ‘कैदी’ म्हणून सापडलेल्या किल्लेदाराला आणि दोन-एकशे मावळ्यांना मिर्झा राजाने हसत सोडून दिले होते.
राजे किल्लेदाराला काय सजा फर्मावतील याचा चिंतातुर मुद्रांनी अंदाज करीत निळो सोनदेव, कुडतोजी, मोरोपंत, अण्णाजी दत्तो ही मंडळी सदरजोत्यावर उभी होती.
सदरबैठकीवर संभाजीराजांच्यासह बसलेले राजे किल्लेदाराचे पिळवटल्या कढाचे बोलणे ऐकून उठले. संथ चालत ते हमचौकात आले. किल्लेदाराच्या खांद्यावर आपल्या आजानुबाहूचा तळवा चढवीत म्हणाले, “किल्लेदार, काय पारख केलीत तुम्ही आमची!
आम्ही हार-जीत मोलाची मानीत नाही! एवढी मूठभर शिबंदी घेऊन तुम्ही दर्यासारख्या गनिम-फौजेशी शर्थीनं झुंजलात! आज आमचे हात आखडते आहेत, नाहीतर तुम्हा साऱ्यांच्या पाठीवरच्या ढालीत आम्ही शिगोशीग मोहरा भरल्या असत्या!”
▶ “मुजुमदार!” राजांनी मुजुमदार निळो सोनदेवांना याद फर्मावली.
“जी,” म्हणत निळो सोनदेव लगबगीने हमचौकात आले.
“या असामींची मोजदाद करा. आमच्या लोकांचा जमेल तसा मरातब आम्हास करणे आहे! जेवढ्या असामी असतील तेवढी शेला-पागोटी पेश करा.”
निळो सोनदेवांनी मावळ्यांची मोजदाद केली. शेला-पागोट्यांची तबके त्यांनी हमचौकात आणविली. आपल्या हाताने राजे प्रत्येक लढल्या मावळ्याला शेला- पागोटे
बहाल करू लागले. सदरबैठकीवरून उठून संभाजीराजे हमचौकात आले. पुढे होत आपल्या आबासाहेबांची तकलीफ कमी व्हावी म्हणून तबकातील एक-एक पागोटे उचलून अदबीने ते राजांच्या हातात देऊ लागले.
आपल्या उरात खोल-खोल लपवून घ्यावे, असे एक जीवनसत्य संभाजीराजांना कळून चुकले होते- “आयुष्यात हारजितीला काही मोल नसते! मोल असते, ते झगडण्याला! निकराने, प्राणबाजीने, शर्थीने झुंजण्याला!!’
🎪राजे प्रतापगडावर जाऊन जगदंबेचे दर्शन घेऊन आले. बेघर, बेआसरा झालेल्या, सर्वस्व लुटलेल्या, हताश मावळमाणसांची आता राजगडावर दाटीच दाटी झाली होती. बारा मावळांच्या चौकोन्यांतून हुसकलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे रोज नवे-नवे तांडे राजगड चढत होते. राजे जातीनिशी त्यांची विचारपूस करीत होते. अंबारखान्यातील धान्यपोती बाहेर काढण्याच्या आज्ञा देऊन आपल्या माणसांना पोटपाण्याला लावीत होते. पण त्यांच्या चेहऱ्यांवर पसरलेले काकाळपण ते पुसू शकत नव्हते. हा सल राजांच्या मनात खोलवर सलत होता.
नेहमीसारखे राजे, संभाजीराजांच्यासह बालेकिल्ला उतरून लोकांच्या भेटीगाठीसाठी पद्मावती माचीवर आले. गडाच्या सुवेळा, संजीवनी, पद्मावती या तिन्ही माच्यांवर मार खाल्लेल्या मावळ्या-कुणब्यांची दाटी झाली होती. किरणे मावळतीला आली होती. राजे पद्मावतीच्या सदरचौकाबाहेर पडले. त्यांच्या पाठीशी शंभूराजे होते.
राजे बधिरल्या मनाने चालत होते. माणसे पायांवर लोटांगणे घालू लागली. एकाएकी त्या कोंदाटल्या गर्दीतील हैबतबा पांढरे हा चार-विसा वर्षांची उमर झालेला म्हातारा, राजांच्या मागून चालणाऱ्या शंभूराजांना बघून गलबलून गेला. त्याचे पांढरे कानकल्ले थरथरले. लटलटत्या हाताने भोवतीच्या कुणब्यांची गर्दी फोडीत तो पुढे झाला. शंभूराजांचा हात आपल्या सुरकुतल्या हाताने धरून तो कापऱ्या, कातर आवाजात म्हणाला, “थांब वाईच माज्या लेकरा! डोळं भरू दे माजं!”
त्याचे बोल ऐकून राजे थबकले. त्यांनी मागे वळून बघितले. म्हातारा हेबतबा आपल्या रखरखीत, थरथरत्या तळहाताचे पंजे संभाजीराजांच्या रसरशीत गालांवरून फिरवीत होता. ते फिरविताना त्याच्या म्हाताऱ्या पांढरट डोळ्यांतून उठलेली पाण्याची धार त्याच्या पांढऱ्या गलमिश्यांत उतरू लागली.
“काय झालं बाबा? डोळ्याला पाणी का?” राजांनी त्याला विचारले.
म्हाताऱ्या हैबतबाने चटदिशी बाराबंदीच्या हातोप्याने आपले डोळे पुशीत जाब दिला, “कुटं काय हाय धनी? म्हातारपणानं डोळे पाझरत्यात वाईच!” हैबतबा आपला
कढ राजांच्या समोर उघडायला राजी नव्हता.
“बाबा, आम्ही तुम्हास लेकरासारखे. जे सलले ते आम्हास बोलले पाहिजे.” राजे म्हाताऱ्याच्या काळजात घुसले.
हैबतबाची पकती मान लटलट कापू लागली. त्याने निकराने ऊरबंद केलेला कढ डोळ्यांचे बांध फोडून पुन्हा बाहेर फुटला. लटलटत्या आवाजात तो म्हणाला, “काय
सांगू राजा? काय रया ऱ्हायली न्हाई. माजा एकुलता योक ल्योक येडा जाला. त्येची तरणीताठी बाईल त्येच्या मुसक्या आवळून, त्येला झाडाला बांधून, त्येच्या म्होरं
राकिसांनी आपल्या अंगाखाली की रं घेतली राजा! उटाय तराण नसताना घोड्यावं घालून त्ये भडवं घिऊन ग्येलं तिला! तवापून डोसकं चक्कारलं माज्या लेकाचं… त्येचं एकुलतं याक प्वॉर हुतं. त्ये खोपटाच्या दारात मरून पडल्यालं हुतं. शिवारातनं वाडीत आलो नि ह्यो
इस्कोट दिसला नदरला. या हातानं त्या पोराला मूठमाती दिली म्या राजा… तुज्या या धाकल्या धन्याला बघताना त्या पोराची सय जाली!!!
एवड्याच उमरीचं हुतं ते! ‘म्हलू! नाव हुतं त्येचं. आता न्हाई नदरं पडायचं! कशापायनं पोट जाळाय शिधा देतूस मला
राजा? ही म्हातारी गर्दन तुझ्या हात्यारानं उतरून दे फेकून तटावरनं! न्हाई… न्हाई सोसवत ह्यो नरक राजा!” म्हाताऱ्याने आपले तोंड ओंजळीत झाकले. पोरासारखा तो
स्फुंदू लागला.
हैबतबाचे बोलणे ऐकताच राजांचे उभे अंगन्॒अंग ताठरले. डोळे संतापाच्या ठिणग्या फेकू लागले. पण – पण त्या म्हाताऱ्याचे सांत्वन करायला राजांना शब्द सापडेनात! छातीवरच्या कवड्या तटबंदीच्या दगडाएवढा आकार घेऊन जीव दबवून टाकताहेत, असे त्यांना वाटले. म्हाताऱ्या हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवताना राजांच्या डोळ्यांतून टपटपत पाणमोती कोसळले.
ते बघताच मात्र कमरेत वाकलेला जख्ख हैबतबा एकदम ताठ खडा झाला. पेटत्या डोळ्यांनी, डोक्यावरची, लाल पिळाची चक्री पगडी झुलवीत म्हणाला, “न्हाई राजा,
आण हाय या म्हाताऱ्या ध्याईची तुला, डोळ्यांत पानी आनू नगं! आमची कुणबाऊ जात घायपातावानी. योक म्येला तर धा उपाजतील! पर तू… तू जगदंबेच्या दंडातला ताईत हाईस ताईत! खातर हाय, ह्या समद्यांत्नी तारशील तर त्यो तूच. मुजरा राजा.” राजांना मुजरा करून हैबतबा समोरच्या गर्दीत घुसला. दिसेनासा झाला.
क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ३९…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा
संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव