महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,722

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४०

By Discover Maharashtra Views: 3729 10 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४०…

सुन्न-सुत्न झालेले राजे संजीवनी माचीकडे पुढे न जाता तसेच माघारी फिरले.

रानराघू, भोरड्या, धनछडी या पक्ष्यांचे कितीतरी थवेचे थवे गडाच्या माच्यांवरून कलकलत, झेपावत गुंजणमावळाच्या रोखाने मावळतीला चालले होते. त्यांचा कलकलाट नेहमीसारखा बिनघोर नव्हता. भेदरट, कातरलेला होता. राजांना तो जाणवला. ते पक्षी दिलेरच्या तोफखान्यातील भांड्याच्या उडणाऱ्या भयानक दणक्याने भेदरून, कऱ्हेपठार सोडून गुंजणमावळाच्या आसऱ्याला चालले होते. नवख्या रानाशी जमवून घेताना त्यांचा कलकलाट बदलला होता!

राजांनी कर्माजीबरोबर मिर्झा राजाला थैली पाठविली होती. दोन किल्ले देऊ करून तहासाठी हात पुढे केले होते. आदिलशाहीच्या विजापूरवर चाल घेतल्यास मिर्झा

राजाला ससैन्य मदत करू असे सुचविले होते. हरतऱ्हेचा डाव राजे रजपुतावर टाकू बघत होते. मध्यंतरी कुडतोजी गुजरांनी मिर्झा राजाच्या गोटात घुसून त्याच्यावर नंग्या

हत्याराची चाल करून बघितली होती. पण कुडतोजी पकडले गेले होते. मिर्झा राजाने त्यांना एक घोडा व तलवार पेश करून मुद्दाम इतमामाने सोडून दिले होते. राजांना

डिवचण्याची एकही संधी कावेबाज मिर्झा राजा वाया जाऊ देत नव्हता. पुरंदरच्या वेढ्यातील माणसे उचलून त्याने राजांचा मुलूख जाळण्या-लुटण्यासाठी फेकली होती.

रात्री-बेरात्री ते घोडेस्वार मशाली नाचवीत थेट राजगडाच्या पायथ्याने दौडत होते.

मिर्झा राजांच्या गोटातून परत आलेल्या कर्माजीला बाळाजी आवजींनी राजांच्या समोर पेश केले. कर्माजीचा चेहरा पार पडला होता. मुजरा करून त्याने कमरेला लटकवलेली मिर्झा राजाची थैली राजांच्या हाती दिली. राजांनी ती बाळाजींच्या हाती दिली. बाळाजी चिटणीस मिर्झा राजाचे पत्र वाचू लागले –

“आमची शाही फौज आसमानातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे. तुझा पहाडखायांचा मुलूख तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्याच्या टापांखाली कुठलाही मुलूख तसनस होऊन जाईल. जिवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्करून शरण ये! असे न करशील, तर आपल्याच हातानं तू आपली आणि आपल्या रियायाची खराबी करून घेशील!”

मिर्झा राजाला पाहिजे होती, राजांची संपूर्ण शरणागत! ते पत्र ऐकत असताना राजे सुन्न, बधिर झाले.

“रजपुताच्या गोटात दोन फार खराब गोष्टी कानांवर पडल्या सरकार.” समोर उभा असलेला कर्माजी म्हणाला.

“बोल… आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलं आहे.” राजे म्हणाले.

“पुरंदरच्या सफेदबुरुजासमोर दिलेरनं लाकडी धमधमे उभे करून तोफांची मारगिरी जारी केलीय. त्या धमधम्यावरून आलेला एक तोफगोळा सफेदबुरुजाच्या बारूद कोठारात पडला! कोठाराच्या भडक्‍्यानं चिरेबंद सफेदबुरूज अस्मानात उडाला. त्यावरच्या ऐंशी धारकऱ्यांच्या, डोळयाचं पातं लवायच्या आत नुसत्या ठिकऱ्या-ठिकऱ्या

उडाल्या धनी! त्यांच्या तुटक्या हातपायांचा पाऊसच पाऊस माचीवर कोसळला. किल्लेदारानं ते पडलेले हातपायच गोळा करून सगळ्यांना एकदमच आगीनडाग दिला!

आणि – “आणि काय कर्माजी? बोल. गड पडला काय?”

“नाही, गड नाही पण एक छातीचा गडी पडला! काल दिलेरनं गडावर पाच हजार पठाणांनिशी सुलतानढवा केला. तो मोडून काढण्यासाठी सरदरवाजा उघडून सातशे रामोशी, महार धारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी त्याच्यावर तुटून पडले. दोन्ही हातांत पट्टे चढवून मुरारबाजी विजेच्या लोळासारखे गडउतरंडीवरून दिलेरवर कोसळले.

हातघाईची हत्यारमार झाली. “’हाणा-मारा – हर हर हर महादेव!’ असं ओरडत मुरारराऊ चढत्या उन्हात तळपणारे पट्टे दोन्ही हातांनी फिरवीत होते. भरल्या शिवारातील कणसं कापावीत, तसे पठाणी हशम कापून काढीत होते. फार जोरावर जंग झाला.

▶ “एका टेकाडावर उभा असलेला दिलेरखान पठाण, आपल्या ओठांवर हाताची बोटं ठेवून मुरारराऊंच्या हातातील तळपत्या पट्टयांचं कडं बघून म्हणाला, “या अल्ला, अरे तू कैसा सूरमा सिपाही खुदाने पैदा किया! आलिजाहके कदमोंपर आ, मालेमाल कर देगे!?”

“खिनभर पट्टे थांबवून, त्यांच्याकडे पेटल्या डोळ्यांनी बघत, घाम थबथबल्या मदरेचे मुरारराऊ तिरस्काराने पचकन थुंकले! “ये तो सिवाजी राजियांच्या इनामबंद

श हाये! तुझा कौल घेतो की काय?” असे मोठ्याने गर्जत ते सिधे दिलेरच्या रोखानेच हत्यार चालवीत पुढे चालून गेले.

“कुणीतरी फेकलेला एक सरसरता बाण आला आणि कचकन त्यांच्या गळ्यात आरपार रुतला. रक्ताची फव्वारती चिळकांडी उमळली. “आई अंबे’ म्हणून मुरारराऊ क्षणभर कळवळले. आणि – आणि गळ्यात रुतता बाण तसाच घेऊन हत्यार मारत तसेच दहा हात पठाणी गर्दीत पुढे घुसले. गळ्यातल्या बाणाने त्यांना “हर हर महादेव’ ओरडता

आले नाही.”

“दहा हात पुढं घुसलेल्या मुरारबाजींनी निकराने मिळतील तेवढे पठाण गडउतरंडीवर लोळविले आणि – आणि मुरारबाजी कोसळले. उतरंडीवर त्यांनी चार-पाच

पलट्या घाल्ल्या. त्यामुळे गळ्यातला बाण भुईला थडकून जखम फुटली. उताणे पडलेले मुरारराऊ धेसपांड्ये गडावरच्या निशाणाकडे भरल्या डोळ्यांनी बघत साहेब-कामावर खर्ची पडले! किल्लेदाराने काल त्यांच्या देहाला गडावर अग्नी दिला. सरकार, मारत्या समशेरीचे मुरारबाजी कामी आले! आता पुरंदर टिकणं मुश्कील हाय.” ती गैरखबर सांगताना कर्माजीच्याच डोळ्यांत पाणी उभे राहिले. कर्माजीचे बोलणे ऐकताना संभाजीराजांच्या मनात दोन विचित्र गोष्टींची सरभेसळ झाली होती. म्हाताऱ्या हैबतबाची थरथरती मावळबोली त्यांच्या मनात फिरत होती – “राजा, तू – तू तर जगदंबेच्या दंडातला ताईत हाईस ताईत!’ आणि त्यांच्या डोळ्यांसमोर मात्र उभे होते, ते गळ्यात रुतता बाण घेऊन, पट्टे चालवीत पुढे जाणारे

तुझा कौल घेतो की काय?’ म्हणणारे रक्ताळलेले मुरारराऊ!

▶ रघुनाथपंत कोरड्यांची पालखी राजगडाच्या पाली दरवाजातून बाहेर पडली. त्यांच्या हातात राजांनी मिर्झा राजाला दिलेली, ‘संपूर्ण शरणागती’चा खलिता असलेली

लाल फासबंदाची थैली होती! पालखीला संरक्षण देत दहा हत्यारबंद धारकरी मिर्झाच्या गोटाकडे चालले. पंत हेजीब म्हणून राजांचा निर्वाणीचा खलिता घेऊन रजपुताच्या

गोटाकडे चालले. राजे रजपुताशी शरणागतीचा सुलूख करताहेत ही बातमी वाऱ्यासारखी गडभर पसरली होती.

संभाजीराजांना “सुलूख’ म्हणजे काय तेच नीट कळेना! आपल्या महालातून ते राजांच्या महालाकडे आले. मिटला दरवाजा त्यांनी लोटून बघितला. तो बंद होता.

“महाराजसाहेब!” संभाजीराजांनी साद घातली. दरवाजा जाब देत नव्हता. देण्याच्या मन:स्थितीत नव्हता. क्षणभर त्या मिटल्या दरवाजासमोर शंभूराजे घोटाळले आणि त्यांची पावले मासाहेब पुतळाबाईच्या महालाकडे वळली.

आपल्या कपाळावर मेणमळल्या कुंकवाची ठसठशीत, दोन आडवी बोट दर्पणात बघून रेखून घेतलेल्या पुतळाबाई, कुणबिणीने समोर धरलेल्या पोसाला ती बोटे पुसत

होत्या. महालात येताच मुजरा करून संभाजीराजे पुतळाबाईच्या जवळ आले. त्यांच्या ताज्या, ओल्या कुंकवाकडे बघत त्यांनी विचारले, “आऊसाहेब, “सुलूख’ म्हणजे काय? का करायचा तो? कुणाशी करायचा? तुम्ही केला आहे कुणाशी सुलूख?” त्यांचे प्रश्न ऐकून

पुतळाबाईची चर्या, गडावरच्या त्या ताणलेल्या अवस्थेतही आरक्त झाली. त्यांना म्हणावेसे वाटले, “आम्ही केला आहे जन्मोजन्मीचा “सुलूख’ आमच्या कपाळीच्या कुंकवाशी! अंबेनं तो निभावण्याची ताकद आम्हास द्यावी पण त्या तसे काहीच बोलू शकल्या नाहीत. म्हणाल्या, “सुलूख म्हणजे तहकोंडीत फसल्या गेल्या माणसाची शरणागत!”

त्या शंभूराजांचे समाधान करू बघत होत्या. बाळराजे त्यांच्या ओल्या कुंकुपट्ट्याकडे बघत होते. त्या दोघांचे प्रतिर्बिब बाजूच्या दर्पणात पडले होते. तो दर्पण

स्वत:लाच म्हणत होता, “या धाकट्या मासाहेब आणि बाळराजे यांचा किती जन्मांचा सुलूख’ आहे, हे त्यांचे त्यांनाही माहीत नसेल.”

▶ जिजाऊसाहेबांना सोबत म्हणून कोंढाण्यावर पोहोचते करून आलेल्या सोयराबाई आपल्या महालात होत्या. त्यांच्या कानावर मात्र यातले अजून काहीच आले नव्हते.

आज राजे गड उतरणार होते, रजपूत मिर्झा राजाच्या गोटात जाण्यासाठी! बिनशर्त शरणागत पत्करून बेहत्यार भेट घेण्यासाठी! आपल्या माणसांची आणि मुलखाची

झाली, त्याहीपेक्षा होणारी मसनवट रोखण्यासाठी!

आयाळ उतरविलेल्या सिंहाचे जसे असेल, सोंड छाटलेल्या राजहत्तीचे जसे असेल वशिंड कापलेल्या अटकर पाड्याचे जसे असेल, तसेच हे जिणे होते. शरणागतीच्या

मरणयातना कळायला राजाचे जातिवंत मनच असावे लागते. जिवापाड प्रेम केलेली कवड्यांची माळच छातीवर असावी लागते.

या तहाच्या कागदावर राजे शाईने दस्तखत करणार होते. पुढे ही शाईच प्रथम राजांना गिळणार होती आणि नंतर अवघी शिवशाही, तमाम मराठशाही डुबविणार होती! तह म्हणजे पहिल्याने माघार आणि शेवटाला सर्वनाश!

राजे कुणाशीच काही बोलत नव्हते. सर्व दरवाजे बंद असलेल्या, दाभणधार पावसाने निर्दयपणे झोडपून काढलेल्या गडासारखे त्यांचे मन सुन्न, बधिर होते.

निरोपाचे अदबमुजरे झडले. राजे संभाजीराजांच्या जवळ आले, तसे त्यांच्या पायातील भगव्या, बाकदार मोजडयांवर कपाळ टेकवून संभाजीराजे वर उठले.

दुष्काळी भुईकडे कोरड्या आकाशाने बघावे, तसे राजे आपल्या फर्जद शंभूकडे बघत होते! सईबाईंचा ‘सावळा’ चेहरा राजांच्या डोळ्यांसमोर तरळू लागला. तो बोलत

होता – “आमचे शंभूबाळ, एकला जीव – स्वारींच्या पदरी घातला.”

राजांच्या पिळवटल्या मनात विचार येऊन गेला, ‘सई, तुम्ही तुमचा एकला जीव आमच्या पदरी घातलात. मोठ्या भरोशानं आणि आज – आज आम्हीच आमचा आणि

आमच्या साऱ्या मावळमाणसांचा जीव रजपुताच्या शेल्यात टाकायला चाललो आहोत!! सई, माणसाच्या हयातीचं त्याच्या हातात काही राहात नाही, हेच खरं.’

काही न बोलता राजांनी शंभूराजांच्या खांद्यावर आपला तळहात ठेवला, स्वत:लाच जडशीळ वाटणारा तो तळहात दोनदा त्यांच्या खांद्यावर कसनुसा थोपटला.

राजे पालखीत बसले. डावी-उजवी हेल खात पालखी वर उठली. आनंदराव, रघुनाथपंत, निराजी रावजी, नागोजी-बहिर्जी फर्जद, विश्वासराव, कृष्णाजी जोशी यांनी

पालखीभोवती कडे केले. तळपती पाती हातात पेलत हत्यारबंद धारकरी चालू लागले.

“श्रींच्या राज्याची’ शपथ घेणारा सर्जा सूर्य अंधाराशी तह करायला निघाला!

राजांच्या पालखीकडे संभाजीराजे एक नजर बघत होते. कधी नव्हते, ते आज घडले होते. गड सोडताना महाराजसाहेब त्यांच्याशी काहीच बोलले नव्हते.

पालखी दूर जात होती. संभाजीराजांना महाबळेश्वरावर सूर्यग्रहणाच्या दिवशी राजांनी कृष्णाकाठी सांगितलेले बोल आठवत होते. “राहू-केतू हे सूर्याच्याच भावकीतले पापग्रह त्याच्या धावणीची वाट रोखून धरतात. त्याची चाल-दौड मुश्कील करून सोडतात; बाळराजे! सूर्यासही ग्रास पडतो!”

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४०…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment