महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,516

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४१

Views: 3732
11 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४१…

मिर्झा राजाच्या गोटाकडे राजे निघून गेले. आता राजगडावर जिजाऊसाहेब नव्हत्या. राजे नव्हते. नकळतच संभाजीराजे पुतळाबाईच्या महाली रेंगाळत होते. पुतळाबाईची एकचित्त देवपूजा, कुणबी दासदासींबरोबर सुद्धा माया ओसंडत बोलणे, राणीवशातील इतर “बाईसाहेबांची’ अदब राखणे, सखू, राणू, अंबा, बाळीबाई ह्या आपल्या मुलीच आहेत, अशी त्यांची देखभाल ठेवणे, थोडकेच; पण खूप काळ लक्षात राहील असे घंटानादी बोलणे आणि केवड्याच्या कणसाभोवती पीळ धरून बिलगलेल्या असंख्य पात्यांपैकी एकाच पाकळीपात्याने, बाहेर डोकावून पिवळ्याधमक उन्हात अंगभर तळपावे, तसे त्यांचे सतेज “दिसणे’ या साऱ्या बाबींचा शंभूराजांच्या मनावर एक खोल ठसा, त्यांना नकळतच उमटून गेला होता. मायाळू स्त्रीला आपल्या मायेची दवंडी पिटावी

लागत नाही, हेच खरे!

आपल्या महालात गवाक्षाच्या महिरपीजवळ पुतळाबाई उभ्या होत्या. बाहेरच्या आभाळात दाटलेल्या अभ्रामध्ये आपली चिंतावली नजर त्या हरवून बसल्या होत्या.

मध्येच भान येताच त्यांच्या डोळ्यांची टपोरी पाखरे फडफडत होती. दाटल्या आभाळाखालून सरसर धावत दूरवर होऊन पुन्हा माघारी फिरत होती. त्यांनी पूजा बांधलेल्या अष्टभुजा जगदंबेकडे बघत संभाजीराजे त्यांच्या पाठीशी उभे होते. मध्येच वळून गवाक्षातून डोकावत होते. दूरवर दिसणाऱ्या गुंजवणी नदीची धुरकट वळणे बघत होते.

“सरकार, थोरल्या म्हालानं याद केलीय.” सोयराबाईच्या खाजगीकडच्या चंद्रा या कुणबी दासीने महालात येऊन अदबीने वर्दी दिली. ती ऐकताच पुतळाबाई मागे वळल्या. एकवार त्यांनी संभाजीराजांच्याकडे बघितले. पदरकाठ ठीक जमवून घेतला. चंद्रा कुणजीण आली तशी निघून गेली.

▶ “चला बाळराजे, थोरल्या महालाची वर्दी आहे,” म्हणत पुतळाबाईनी जगदंबेच्या मूर्तीकडे नकळतच एकदा नजर दिली. आणि शंभूराजांच्या खांद्यावर आपला सुवर्णकंकणे

भरलेला हात ठेवून त्या थोरल्या महालाकडे चालू लागल्या.

आपल्या महालात, निळ्याशार पदरपोताचा शालू नेसलेल्या देखण्या सोयराबाई आपल्या कन्याराजे बाळीबाई ह्यांच्याशी काहीतरी बोलत होत्या. दगडबंद भिंती धरून दोन-चार कुणबिणी अदबीने उभ्या होत्या. महालाचा उंबरठा ओलांडताच पुढे होत शंभूराजांनी मासाहेब सोयराबाईंच्या

पायांना हात लावले. सोयराबाईंनी त्यांना वर उठवून घेतले.

बाळीबाई ह्या सोयराबाईंच्या कन्याराजे पुतळाबाईना बघताच धावत येऊन त्यांना बिलगल्या. त्यांचे दोन्ही दंड मायेने धरीत पुतळाबाईंनी सोयराबाईंना विचारले, “का वर्दी देणं झालं आम्हास? स्वारींची गोटातून काही खबर…. ”

👉 “बहिर्जी आणि नागोजी रजपुताच्या गोटातून आत्ताच गडावर आलेत. त्यासाठीच तर वर्दी दिली धाकल्या बाईंना.”

“काय झालं…” तहबंदाच्या आड असलेले पुतळाबाईंचे काळीज फडफडले. “स्वारीनं सुलूख मान्य केला! पुरंदर, कोंढाणा, रोहिडा, माहुली, लोहगड असे तेवीस किल्ले आणि त्यांच्या तर्फेचा चार लक्ष होनांचा मुलूख रजपुतास देऊ केला! आता स्वारीकडं कुल बारा किल्ले आणि अवघा एक लक्ष होनांचा मुलूख राहील!”

“स्वारी कशी आहे?” पुतळाबाईंनी त्यांच्या लालसर सरळ नाककळीकडे बघत शांतपणे विचारले.

“ठीक आहे. उद्या कोंढाणा रजपुताच्या माणसांच्या हवाली करून स्वारी मासाहेबांच्यासह गडावर येत आहे.” सोयराबाई तुटक बोलल्या. त्यांच्या बिब्बेवाणाच्या

काळ्याशार डोळ्यांत कसलीतरी चिंता तरळत होती. ती गडकिल्ल्यांची होती की राजांची, ते कळत नव्हते!

सोयराबाईंच्या तोंडून जिजाबाई आणि राजे येणार हे ऐकताच संभाजीराजांचा चेहरा पोतासारखा उजळून गेला. पुतळाबाई आणि सोयराबाई यांच्याकडे बराच वेळ

आलटून-पालटून बघताना शंभूराजे विचार करीत होते – ‘ह्या दोन्ही मासाहेब उजळ आहेत. पण मग एवढा फरक का वाटतो यांच्यात? त्या दोघी मासाहेबांचे बोलणे थांबलेले बघून शंभूराजांनी सोयरावाईंना विचारले, “मासाहेब, तुम्ही… तुम्ही केला आहे, कधी कुणाशी सुलूख?’

त्या प्रश्नाने पुतळाबाई चमकल्या. शंभूराजांच्याकडे बघतच राहिल्या. सोयराबाईचे बिब्बेवाणाचे काळशार डोळे कसल्यातरी विचित्र तेजाने उजळल्यासारखे झाले. नाकाचा लालसर शेंडा थोडासा अधिक लालावला. त्या पटकन

बोलून गेल्या – “नाही!! सुलूख आम्हास कधीच पसंत नव्हता! आता स्वारीनंच तो मान्य केल्यावर इलाज कुणाचा?”

थोरल्या बाईसाहेब काय बोलतील हे ऐकण्यासाठी पुतळाबाईनी त्यांच्या कपाळाच्या कुंकुमपट्टयावर नजर जोडली होती. त्यांचे बोलणे ऐकताच ती तिथून सुटली

आणि सोयराबाईंच्या पायांच्या बोटात घातलेल्या चंदेरी जोडव्यांवर येऊन पडली!

शंभूराजांना जवळ घेत सोयराबाई त्यांना म्हणाल्या, “तुमचं मात्र ठीक झालं. कसलाच ‘सुलूख’ न करता रजपुतानं तुम्हास पंचहजारी मनसब देऊ केलीय! तुम्हाला ती

घेण्यासाठी रजपुताच्या गोटात जावं लागणार एवढंच वाईट. चिंता वाटते तुमची. ही जिम्मेदारी तुम्ही कशी पेलणार?”

शंभूराजे काहीच उत्तरले नाहीत. कारण इतके किल्ले देऊन आबासाहेबांनी पंचहजारी मनसब का घेतली, या गोंधळात शंभूराजे गुंतले होते.

सोयराबाईचे बोलणे पुतळाबाईना नीट कळलेच नाही. त्या सादिलवारीने बोलाव्या तशाच बोलल्या होत्या. नेहमीच बोलत होत्या. पदरकाठच्या जरतारी वीणेत गळ्यातले मंगळसूत्र अडकले की जसे वाटले, तसेच पुतळाबाईंना सोयराबाईंचे बोलणे ऐकताना नेहमी वाटत आले होते! काही न बोलताच मग त्या शंभूराजांना म्हणाल्या,

“चला बाळराजे, कालेश्वरीचं दर्शन घेऊ.”

पुतळाबाईसाहेबांनी कालेश्वरीला फूलपत्ती चढविली. तिच्या रुद्रमंगल रूपाकडे क्षणभर बघून डोळे मिटून हात जोडले – ‘आई, काळाचा किल्ला तुझ्या हाती असता कसला फितवा केलास हा? तहाचा विपरीत काळ आणलास! बाळराजांना पंचहजारी सरदारकीचं दान देववलंस!’ मनोमन असे म्हणताना पुतळाबाईंचे जोडलेले हात थरथरले.

कपाळीच्या कुंकवाचा जोडपट्टा आक्रसला. कालेश्वरीचे दर्शन घेऊन पुतळाबाई आणि शंभूराजे परतले. दिवस मावळतीला कलाटणी घेत होता.

▶ कऱ्हेपठारावर पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झा राजाचा केशरी रंगाचा, आलिशान रजपुती शामियाना उभा होता. त्याच्या झालरीदार कनाती वाऱ्याने फडफडत होत्या.

समोर तोफामाऱ्याने काळवंडलेला पुरंदर खडा होता.

रजपुताच्या शामियान्यात हिंदुस्थानी तलम, नकसदार गालिच्यांची बैठक अंथरली होती. जरीबतूच्या झगझगीत खोळी घातलेले लोड मांडले होते. सोनेरी वेलबुट्टीचा एक उंच हुक्का नक्षीदार चौरंगावर ठेवला होता. त्याची पट्टेदार, काळीबाळी धूरनळी डाव्या हातात घेऊन मिर्झा राजा बैठकीच्या लोडाला रेलून बसला होता. एका कोपऱ्यात धूपदानातील कनोजी धूपाच्या धुराची वळी वर उठत होती.

मिर्झा राजासमोर खाली मान घातलेले राजे बैठकीवर मांडलेल्या शतरंजाच्या पटावरील, एकमेकांना लागून पसरलेल्या काळ्या-बाळ्या चौकांकडे एकटक बघत बसले

होते. ते चौक त्यांच्या जिवाची घालमेल निरखीत होते!

निकोलो मनुची हा गोरा साहेब आपल्या मांडीवर पिसे खोचलेली थोराड टोपी ठेवून तिथे आदबीने बसला होता. तो मिर्झा राजांच्या तोफखान्यावरचा अधिकारी होता.

शतरंजच्या ‘अक्कलबाज’ खेळात त्याला चांगलाच रस होता.

राजांच्या पापणीकडा लालावल्या होत्या. रात्रभर जागून त्यांनी मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज आणि सूरतसिंग कछवाह यांच्याशी तहाच्या वाटाघाटी केल्या होत्या.

उत्तररात्रीला मिर्झा राजाचा पाच कलमी तह मान्य करून त्यावर दस्तखत केले होते! शेल्यात हात बांधून मिर्झा राजांची खालमानेने भेट घेतली होती.

या तहाने राजांनी औरंगजेबाला तेवीस किल्ले आणि चार लक्ष होनांचा मुलूख देऊ केला होता. हुकूम होईल तेव्हा औरंगजेबाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजेनिशी मोहिमेवर जायचे मान्य केले होते. तहाची तामिली होईपर्यंत शंभूराजांना रजपुताच्या गोटात ओलीस म्हणून ठेवण्यासाठी आणून पोहोचविण्याचे पत्करले होते

कस्तुरी हरवलेल्या मृगावर रानदवन्याचा उग्रर वास शोधीत फिरण्याची पाळी यावी, तशी राजांची स्थिती झाली होती! या अवस्थेत हा शतरंजचा पट मांडण्यात आला होता. मिर्झा राजाने पेश केलेल्या तबकातील शतरंजाची सफेद मोहरी राजे आपल्या सडक बोटांनी पटावर मांडू लागले. हत्ती, घोडे, उंट, वजीर पटावर चढले.

वनगाईच्या काळ्या शिंगांची बनविलेली काळीशार प्यादी-मोहरी मिर्झा राजाने आपल्या गरगरीत बोटांनी पटावर मांडली.

दोन्ही बाजूंचे पट मांडून झाले, तरी काही क्षण असेच गेले. उत्तर हिंदुस्थानी बोलीत मिर्झा राजा संथपणे म्हणाला, “खोलिए चाल राजासाब.” त्याच्याकडे न बघताच राजे पटावर नजर ठेवून म्हणाले, “आप खोलिए राजाजी.

हक और दर्जा आपका है!”

“नहीं॥” मिर्झाने पुन्हा एकदा धुराची वळी खोलवर चूस करून बाजूला फेकली. कपाळावरचा केशरी टिळा चढवीत तो म्हणाला, “शतरंजका एक दस्तुरी रिवाज हे! सफेद

प्यादे-फर्जी जनाना होते है! और शतरंजमें पहली चाल रहती है जनाने की!! काले प्यादे- फर्जी मर्दाना होते है! जवाब रहता है मर्दानिका!” मिर्झा राजे स्वत:वरच खूश झाले. मांडीवर थाप देऊन, मनुचीकडं बघत गडगडून हसले.

राजांनी चमकून मिर्झा राजाकडे पाहिले. त्यांच्या छातीवरची कवड्यांची मा थरकून उठली. डोळे आग-ठिणग्या फेकू लागले. पण ते काही बोलू शकत नव्हते.

ती नजर बघून मिर्झा राजा चरकला. डाव्या हातातील नळी बाजूला ठेवून तो लगबगीने म्हणाला, “बुरा ना समझो राजासाब. हमने सिर्फ रिवाज बताया! आप चाहते

हो, तो हम खोलते है पहली चाल.” मिर्झाने राजांच्या पटावरील सफेद प्याद्यांना आपल्याकडे घेण्यासाठी आपला हात पुढे केला.

त्याचा हात मध्येच थोपवून आपल्या पटावरचे एक प्यादे राजांनी पुढे सरकविले. खेळ सुरू झाला! बराच वेळ खेळ चालला होता. राजांचे शतरंजात लक्ष नव्हते. पटाच्या

चौकात त्यांना मिर्झा राजाने गिळलेले तेवीस गड दिसत होते! त्या चौकांनी जखडून टाकलेले शंभूराजे दिसत होते! रुजाम्यावर बसलेला निकोलो मनुची आपल्या लाल

नाकावर दाटणारे घामाचे थेंब अधून-मधून रुमालाने टिपत, राजे आणि मिर्झा राजे यांची प्यादीमार टक लावून बघत होता. राजांच्या चाली त्याला विचित्र वाटत होत्या.

जनाना आणि मर्दाना कितीतरी प्यादी आता पटावरून हटली होती. एका तबकात एकमेकांना बिलगून खेळ बघत पडली होती! खेळ शेवटच्या भरडाव टप्प्यात आला.

एकाएकी मिर्झा राजाने कौशल्याने आपला वजीर पुढे घेत सफेद राजाला शह दिला! एक मोहरे आडवे घालून राजांनी तो शह मोडून काढला. खेळ हातघाईला आला. आता प्रत्येक मोहरे विचाराने हलवायला पाहिजे होते.

पुढे काढलेल्या वजिराच्या पाठबळात मिर्झा राजाने आपला तिरक्या चालीचा उंट हलविला! राजांच्या सफेद राजाला पुन्हा शह पडला! बराच विचार करून राजांनी अडीच

घरे छलांग घेणारे, आपले दुडक्या चालीचे घोडे आडवे टाकून तो शह पुन्हा मोडून काढला! त्या घोड्याने मिर्झा राजाच्या ‘काळ्या’ राजाला शह घातला!

मनुची एकटक खेळ बघत होता. राजांची घोड्याची चाल त्याला एकदम आवडली. आपल्या टोपीच्या पिसांवरून हाताची बोटे सरासर फिरवीत तो, राजे आता आपले घोडे कसेकसे हलवतील याचा मनोमन अंदाज करू लागला. मिर्झाचा “काळा’ राजा राजांच्या एकाच घोडेशहाने पुरा-पुरा कोंडून टाकलेला त्याला स्पष्ट दिसू लागला!

राजांनी पुढे टाकलेल्या घोड्याला सफे मारून काढण्यासाठी मिर्झा राजाने आपल्या वजिरावर हात ठेवला. ही एकच चाल खेळता येण्याजोगी उरली आहे असे त्याला वाटले. राजांनाही मिर्झा आता तीच खेळी खेळणार असे मनोमन वाटले. आपले घोडे आपण फुका बळी दिले अशी चुटपुट लागली.

धुराच्या वळ्यांचा एक दमदार झुरका खेचून, “आपका घोडा छलांग मारके हमारे राजापर बेमुर्वतीसे आ गया! मगर हकनाक काम आया!” असे म्हणत मिर्झा राजाने पांढरे

घोडे पटावरून पटकन उचलले आणि त्याच्या चौकात आपला काळा वजीर पुढे सारला! घोडे तबकात टाकले.

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४१…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment