महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,514

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४३

Views: 4865
9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४३…

राजांचे मन बांधील झाले. पुढे होत शांतपणे त्यांनी मासाहेबांच्या पायांना हात लावला. तो निर्धाराने मागे घेत आपल्या कपाळावरच्या शिवगंधाला भिडविला.

“राजे, कोंढाण्यापासून आम्ही बरीक बघतो आहोत. तुम्ही आम्हास टाळू बघताहात. रजपुतांशी तहाची गोष्ट घडली म्हणून बैचेन आहात. राजे, आम्हापासून काही लपविणे तुम्हाला साध्य होणार नाही. राज्य जाते म्हणून धीर जाता कामा नये. तास शाबूत असतील, तर नदी नामशेष होत नाही!” अत्यंत मायेने जिजाबाई धीराच्या शब्दांत म्हणाल्या.

ते शब्दन्शब्द उरात साठवून घेताना खाली पडलेली राजांची मान आपसूकच वर उठली, तर्फेला असलेल्या संभाजीराजांच्या खांद्यावर आपल्या हाताचा, निमुळता, गुलाबी तळवा चढवीत ते जिजाबाईच्या तुळजाई, शांत डोळ्यांच्या आश्वासनावर विश्वासून म्हणाले, “खरं आहे मासाहेब, आम्हास तुम्हापासून काहीच लपविणं साध्य होणार नाही. चारी पायांत आकडेचाप बसविलेल्या हत्तीसारखी आमची रजपुताच्या गोटात गत झाली!

यात काही कमी नको म्हणून रजपुतानं पाच कलमी तहातील शेवटच्या कलमाचा अंकुश आमच्या मर्मात टोचून ठेवला आहे. तुमच्या कानी कसा घालावा, हेच आम्हास उमजत नाही.” क्षणभर राजांनी संभाजीराजांच्यावर आपली नजर खिळविली. त्यांच्या खांद्यावरचा राजांचा हात नकळत त्यांच्या पाठीवर आला. काहीतरी बोलावे तसा उगाच

फिरत राहिला!

“कसला अंकुश राजे? साफ-साफ बोला.” जिजाबाईचे राजांच्या सर्वागाभोवती तटबंदी बांधीत फिरले! मन शंकेखोर झाले. बगलेला असलेल्या संभाजीराजांना आपल्या आणि मासाहेबांच्या मध्ये घेत त्यांना

पोटाजवळ बिलगवून राजे घोगरट आवाजात म्हणाले, “रजपुताच्या तहाची तामिली होईपर्यंत – तेवीस गडकोट त्याच्या हवाली होईपर्यंत आम्हाला बाळराजांना त्याच्या

गोटात धाडावं लागणार… ओलीस म्हणून!” राजांची नजर जिजाऊंच्या मुद्रेवरून घसरली आणि त्यांच्या पायांवर येऊन स्थिरावली.

“राजे” थरारलेल्या जिजाऊ राजांच्या बाकदार नाकाकडे बघत जवळ-जवळ किंचाळल्याच. “काय – काय बोलताहात हे? हे – हे कलम तुम्ही मान्य करून आलात!

“फर्जंद’ म्हणून ही तुमची एकुलती एक निशाणी हातात आहे हे विसरलात? तुमच्या इतबारासाठी रजपुताला ‘ओलीस’च पाहिजे होता… तर… तर मग त्यासाठी आम्ही काय

कमी होतो? नाहीतरी कपाळ फुटलं म्हणून चितेवर चढायला निघालेल्या आम्ही रजपुताचा ओलीस म्हणून पालखीत चढलो असतो!”

त्या बोलांनी गडबडून गेलेले राजे, व्याकूळल्या नजरेने मासाहेबांच्याकडे बघत लगबगीने म्हणाले, “गैरसमज – गैरसमज होतो आहे, मासाहेब. ही अट मिर्झा राजानं

घातली. आम्हाला ती मान्य करण्याशिवाय इलाज उरला नव्हता…. ”

“तेच – आम्हाला पुढं चालवून तुम्हाला, ती बाजूला काढता आली असती. राज्याची स्वप्नं पुढच्या पिढ्यांत बघायची असतात. त्यासाठी टाकावी लागलीच, तर जुनी पिढी खर्ची टाकावयाची असते. उद्या मिर्झाच्या तळात बाळराजांचं काही बरंवाईट झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडं बघावं? उद्या आमचा म्हातारा श्वास सरला, तर स्वर्गी आमच्या सूनबाईना काय जाब द्यावा?” जिजाबाई राजांच्यावर रोखलेली नजर जरासुद्धा ढळवायला तयार नव्हत्या.

▶ “मासाहेब, धीर सोडू नये. मिर्झा राजानं बेल उचलून १ शपथ घेतली आहे. बाळराजांच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही रजपुताच्या . मिर्झा जबानीचा सच्चा आहे. दगाच करायचा असता, तर आम्ही त्याच्या भेटीला बेहत्यार गेलो, तेव्हा त्यानं आम्हालाच तो केला असता. सगळीच माणसं हरामी नसतात मासाहेब.”

मासाहेबांची अदब राखून राजे त्यांना आपली राजकीय चाल समजावून देण्याची कोशिश करत होते. पण संभाजीराजे ही जिजाऊंच्या सोशीक स्त्रीमनाची नाजूक

नातेबंधाची जिव्हाळी होती. खूप बघितलेल्या आणि भोगलेल्या जिजाऊंचा ‘संभाजीराजे’ हा ठेवणीतला खास दागिना होता. शेलका साज होता. गळ्यातल्या तुटल्या मंगळसूत्राचा आघात त्यांनी कष्टाने पचविला होता. स्वारी-शिकारींच्या घाईगर्दीसाठी, आई भवानीचे “श्रींचे’ राज्य उभे करण्यासाठी त्यांनी आपल्या हातांनी राजांना मावळाच्या दऱ्यादरडीत फेकले होते. त्यांच्यातील कुलस्त्रीचे काळीज “शंभूराजे’ हा भोसलेकुळीचा रक्तपोत पदराखाली जपू बघत होते. म्हणूनच जे त्या राजांच्या बाबतीत निर्धाराने करीत आल्या होत्या, ते संभाजीराजांच्या बाबतीत करताना मात्र थरकून उठत होत्या. स्त्रीला पुत्र असतो, त्याहून कितीतरी जवळचा नातू वाटतो.

“शत्रूचा भरोसा देताहात राजे! पण आम्हास कढ निघत नाही, चला बाळराजे!” असे म्हणत जिजाबाई महालाबाहेर जाण्यासाठी वळल्या. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरा करून राजे म्हणाले, “बाळराजांना राहू द्या आमच्या महाली.” मागे न बघताच जिजाबाई म्हणाल्या, “जशी तुमची इच्छा.” आणि त्या आपल्या महालाच्या रोखाने तडक चालू लागल्या.

▶ मध्यरात्र टळत असली तरी राजे आपल्या महालात शंभूराजांशी बोलत होते.

रजपुताच्या गोटात पाळायच्या रीतीभातीच्या गोष्टी सांगत होते.

“मिर्झा राजांना “दादाजी’ म्हणत चला. आमच्या ठिकाणीच त्यांना माना. कमी बोला. त्यांच्यासमोर मस्तकीचा टोप उतरू नका.” अशा सूचनांवर सूचना त्यांनी संभाजीराजांना दिल्या. राजे बोलता-बोलता मध्येच थांबत होते. सईबाईच्या आणि मासाहेबांच्या आठवणींनी त्यांचे मन घुसळून येत होते. संभाजीराजे त्यांचा प्रत्येक बोल ध्यान देऊन ऐकत होते. राजे बोलता-बोलता थांबले की, त्यांची दगडबंद भिंतीवर पडलेली केवढीतरी मोठी सावली ते आपले डोळे

ताणून साठवून घेत होते. राजांचे दोन अस्सल राजकारणी ओठ संभाजीराजांच्या कानांत जीवनाचा विश्वास भरीत होते. त्यांना ‘पहिल्या धावणीला’ तयार करून घेत होते.

त्यांच्या मनाची बांधणी साधीत होते. एकदा संभाजीराजांच्याकडे आणि एकदा एका मोठ्या चिराखदानाच्या झाडाकडे बघत राजे विचारमग्न झाले. ते झाड त्यांना सईबाईच्यासारखेच वाटले! आपल्या ज्योतीचे असंख्य डोळे करून ते आपल्या “एकल्या जिवाला’ “शंभूबाळांना’ एकटक बघते आहे, असा विचित्र विचार राजांच्या मनात तरळून आला आपली सावळ्या रंगाची सावली मागून चालती घेत, राजे संभाजीराजांच्या

अगदी जवळ आले. त्यांचा चेहरा आपल्या निमुळत्या बोटांच्या ओंजळीत घेऊन त्यांनी त्यांच्या डोळ्यांत क्षणभर एकटक रोखून पाहिले. लागलीच त्यांचे छोटेखानी खांदे आपल्या बळकट बोटांनी घट्ट आवळून धरीत त्यांनी केवढ्यातरी निर्धारी आवाजात त्यांना विचारले, दैवी संकल्पाने मानवी साधनाला विचारावे तसे, “खरं -खरं सांगा. रजपुताच्या गोटात जायला तुमचं मन कच तर खात नाही?….”

“नाही!” फरसबंदीवर पडलेल्या झळझळीत सोनमोहरेचा यावा, तसा खणखणता जबाब आला!

“मग विचार कसला करताय? काहीच बोलत नाही तुम्ही, शंभूबाळ?” राजांनी त्यांचे खांदे हलविल्यासारखे केले.

“त्या गोटात आमची एक अडचण होणार आबासाहेब!” राजांच्या डोळ्यांना डोळे जोडून संभाजीराजे म्हणाले.

“कसली अडचण? बोला.” राजांच्या भुवयांनी अंदाज घेताना कमानबाक चढविला.

“इथं गडावर रोज अंघोळ करून पेहराव चढविल्यावर थोरल्या आऊसाहेब आमच्या कपाळी शिवगंध रेखतात. रजपुताच्या गोटात ते कपाळी कोण रेखणार?”

काहीच अंदाज नसलेला तो प्रश्न ऐकून राजे थरकून उठले. न राहवून त्यांनी शंभूराजांचे मस्तक आपल्या छातीशी बिलगते घेतले. संभाजीराजांच्या कपाळीचे शिवगंध

राजांच्या छातीवरील कवड्यांना भिडले!

👉ज्येष्ठाच्या पौर्णिमेचा दिवस उजाडल्यागत झाला! पावसाळी ढगांची शिबंदी आभाळात तळ टाकून पडल्यामुळे उजाडले तरी तसे वाटत नव्हते. आज संभाजीराजे नेताजीराव पालकरांच्या सोबतीने गड उतरणार होते. उग्रसेन शंभूराजांना घेऊन जाणार होता. सगळ्या गडावर एक विचित्र कोंदटलेपण पसरले होते.

पहाट-स्रान केलेल्या संभाजीराजांनी अंगावर खास ठेवणीतला पेहराव घेतला. जरीकोयरीचा निळाशार जामा आणि गडद केशरी टोप असा राजांच्यासारखा तो पेहराव

होता. कमरेला छोटेखानी जमदाडीचे बंद आवळले होते.

दर्शनासाठी संभाजीराजे जिजाऊसाहेबांच्या महाली आले. तिथे पुतळाबाई आणि धाराऊ होत्या. संभाजीराजांनी त्या सर्वांना पायांवर डोके ठेवून नमस्कार केले. धाराऊने अदबीने धरलेल्या तबकातील गंध, अष्टगंधाने जिजाऊसाहेबांनी संभाजीराजांच्या कपाळी शिवगंधाची दळे रेखली. त्यांचे पिंडीसारखे मुख बघताना जिजाऊंचे मन मायेने भरून आले. त्यांना प्रेमभराने जवळ घेत त्या म्हणाल्या, “बाळशंभू, गैरअंदाज कुठं काही खाऊ नका. नेताजी सांगतील ते ध्यान देऊन करा.” जिजाऊंना पुढे

काही बोलवलेच नाही. धाराऊकडे बघत त्या म्हणाल्या, “धाराऊ, बाळराजांच्या न्याहरीचा थाळा जोडून आणा.”

“जी!” म्हणत ती निघून गेली.

जिजाऊ, पुतळाबाईंनी संभाजीराजांना देवमहालात आणले. देव्हाऱ्यात अष्टभुजा जगदंबेची हत्यारे पेललेली, डोळे विस्फारलेली, क्षात्रमंगल मूर्ती पायाखाली महिषासुर

रगडीत उभी होती. तिच्या पायावर बेलभंडारा वाहून शंभूराजांनी तिला दंडवत घातला. जिजाऊंनी भंडाऱ्याची दोन बोटे संभाजीराजांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आडवी ओढली आणि शंभूराजांना घेऊन त्या राजांच्या महालाकडे चालल्या. पुतळाबाई बाळराजांच्या न्याहारीची व्यवस्था लावण्यासाठी माघारी वळल्या.

राजे आपल्या महालात सरलष्कर नेताजी पालकरांना हरतऱ्हेच्या सूचना देत होते. म्हणून आपली थोराड पगडी डोलवून नेताजी त्या ध्यान देऊन ऐकत होते. त्यांच्या

हाताची मूठ कमरेच्या तलवारीच्या मुठीवर घट्ट आवळलेली होती.

▶ “मासाहेब येताहेत.” अशी वर्दी राजांना मिळाली. राजे आणि नेताजी आपले बोलणे तसेच सोडून महालाच्या उंबरठ्यापर्यंत आले. जिजाऊ संभाजीराजांच्यासह राजांच्या महालात प्रवेशल्या. मुजरे झाले. संभाजीराजांनी राजांच्या पायावर डोके ठेवले. त्यांना उठवून जवळ घेत राजे म्हणाले,

“बाळराजे, नेताजीकाका तुमच्या संगती येताहेत. काही लागलं-सवरलं, तर त्यांना सांगा. मिर्झा राजांना “दादाजी’ म्हणत चला.”

“जी.” संभाजीराजांनी होकार भरला.

“नेताजीराव, बाळराजांची खुशाली-खबर आम्हास रोज पोहोचती करीत चला. सावलीसारखे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा.” जिजाऊंनी नेताजींना आपली खास इच्छा सांगितली.

“मासाब, बाळधन्याच्या केसाला ढका लागला, तर बेलफळागत त्येंच्या डुईवरच्या केसाएवढ्या मुंड्यांचा सडा पडेल कऱ्हेपठारावर. तुम्ही निवांत असा.” नेताजींनी ताठ मानेने जिजाबाईंना धीर दिला..

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४३…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment