महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,65,372

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४४

By Discover Maharashtra Views: 4850 7 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४४…

इतक्यात मोरोपंत महालात आले. त्यांनी राजांना आणि जिजाबाईंना मुजरा करून जबान खोलली, “स्वामी, रजपुताकडून आलेली हेजिब असामी उग्रसेन कछवाह

बाळराजांना नजराणा पेश करण्याची इजाजत मागत आहे.”

राजे ते ऐकून क्षणभर विचारात पडले. वास्तविक नजराणा मिर्झा राजांच्या तळावर पेश व्हायचा! तो आधीच कसा काय पेश होतो आहे? की बाळराजांना आपल्याबद्दल जवळीक व धीर वाटावा, यासाठी मिर्झा राजाने टाकलेली ही एक चाल आहे? त्यांना नीट अंदाज बांधता येईना. सावधपणा म्हणून त्यांनी मोरोपंतांना आज्ञा केली, “पंत, नजराणा पेशवे म्हणून तुम्हीच बाळराजांच्यासाठी स्वीकारा! त्या नजराण्याला साजेल असा फेरनजराणा आमच्या वतीनं तुम्ही त्याला बहाल करा.”

“आज्ञा स्वामी,” म्हणत मोरोपंत महालाबाहेर निघून गेले.

राजगडावर आलेल्या उग्रसेन कळवाहचा एक बेत साफ फसला होता. आपल्याला “राणाजीने’ नेमून दिलेली कामगिरी तो हुन्नर चालवून पार पाडू बघत होता. त्याला

संभाजीराजांना बघायचे होते! “शिवाजीराजे कुणाच्याही कुंबवरला राजवेष घालून “आपला कुंवर’ म्हणून तुझ्याबरोबर पाठवून देतील तरी सावध!” ही मिर्झा राजाने दिलेली सूचना तो विसरला नव्हता! पण गडावर आल्यापासून अद्याप त्याला एकदाही संभाजीराजांना बघायला मिळाले नव्हते. तो काळजीत होता.

राणीवशातील सगळ्या मासाहेबांची दर्शने संभाजीराजांनी घेतली. धाराऊने जोडलेल्या न्याहारीचा थाळा रिवाज म्हणून शिवला. शंभूराजांच्या गड-उताराची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध ठेवण्यात आली होती. त्या पालखीभोवती नेताजींनी निवडलेले तगडे, हत्यारबंद धारकरी कडे करून उभे होते. त्या धारकऱ्यांत एका बाजूला उग्रसेन कळछवाह आपल्या राजपुती हशमांसह उभा होता. केशरी साफे आणि पिळलेल्या दाढ्या यामुळे ते सारे वेगळे व उठून दिसत होते. राजे, नेताजी, मोरोपंत, गंगाधरपंत, आनंदराव, येसाजी, प्रतापराव अशा खास

मंडळींसह शंभूराजांनी बालेकिल्ला सोडला.

▶ सारे बालेकिल्ल्यावरून पद्यावतीवर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. नेताजींनी इशारत करताच भुयारावरची धोंड पहारेकऱ्यांनी हटविली. नेताजी पुढे होत भुयारात उतरले. त्यांनी हातजोड देऊन संभाजीराजांना आत घेतले. पाठोपाठ राजे आणि सारी मंडळी भुयारात उतरली. आत येताच पुढे असलेले नेताजी मागे झाले. राजांच्या बरोबरीने संभाजीराजे भुयाराच्या उतरत्या पायऱ्या चालू लागले. निरोपासाठी आलेली मंडळी मागून चालू लागली. भुयाराची वळणे मागे पडत होती. काही पायऱ्या मागे पडल्या आणि कसल्यातरी विचाराने चालते राजे एकदम थांबले! त्यांना शंभूराजांनी याच भुयारमार्गातून चालताना केव्हातरी विचारले होते, “महाराजसाहेब, हे भुयार संपणार तरी केव्हा?”

आज ती आठवण एका वेगळ्याच अर्थाने राजांना जाणवत होती. त्यांना संभाजीराजांना म्हणावेसे वाटत होते, ‘आता कुठं तुम्ही भुयारात पहिल्यानं उतरता आहात! अजून खूप चाल घ्यायची आहे. आई अंबेनं त्यासाठी तुम्हास उदंड हिंमत द्यावी.!

पण राजे काही बोलले नाहीत. आपला हात त्यांनी संभाजीराजांच्या खांद्यावर चढविला आणि ते चालू लागले.

पाठीमागून चालणारी मंडळी क्षणभर घोटाळ्यात पडली. त्यांना राजे असे अंमळ थांबले का, ते कळले नाही. कधीच कळणार नव्हते!

सारी मंडळी पद्यावती माचीवर आली. नेताजींनी आपल्या धारकऱ्यांवर आपली चलाख नजर एकदा फिरवून घेतली. राजे आणि संभाजीराजे पालखीच्या रोखाने चालले. सगळी माची माणसांनी दाटून गेली होती.

“आम्हास न्याल काय धावणीला तुमच्या संगती महाराजसाहेब?” ही संभाजीराजांनी त्यांना अनेक वेळा घातलेली मागणी आठवली. आज तो योग येत होता!

केवढ्या वेगळ्या अर्थाने! शंभूराजांना आपल्या हयातीची “पहिली धावणी’ एकट्यानेच घ्यावी लागत होती! राजांच्या काळजाचा सफेद घोडा थरकून उठला. कुठल्यातरी अज्ञात

हाताने त्याच्या पाठीवर थाप भरली होती. “रजपुताच्या गोटात बाळराजांच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही,’ अशी जिजाऊंची समजूत घालणाऱ्या राजांचा हात झटकन गळ्यातील चौसष्ट कवड्यांच्या माळेकडे गेला! आपल्या कंठातील माळ त्यांनी डोकीवरचा टोप चुकवीत हलकेच उतरली. तिचे दोन पेड करून त्यांनी ती संभाजीराजांच्या गळ्यात चढविली!

“सांभाळून असा.” घोगऱ्या आवाजात बोलून त्यांनी आपल्या फर्जदाच्या पाठीवरून हात फिरविला. भोवतीच्या गर्दीतून उग्रसेन कछवाह हे सारे बघत होता!

शंभूराजांच्याकडे तो संशयी नजरेने बघत होता. राजांनी त्यांच्या गळ्यात कवड्यांची माळ चढविताच त्याने शेजारी उभ्या असलेल्या एका मावळ्याला विचारले, “वो क्या है?

राजासाबने कुंवरके गलेमें क्या चढाया?”

मावळा त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत म्हणाला, “एवडंबी मालून न्हाई व्हय? वो माळ है। आई भवानीकी!” आपल्या कानांना हात लावून नमाजाचा भाव उभा करीत त्याला समजावून देण्यासाठी तो मावळा म्हणाला, “तुमच्या खुदासारखी! बघो, किसकेभी गळ्यात वो माळ नहीं!” मावळ्याने विचारणारा म्लेंच्छ आहे, हे जाणून आपल्या अजब भाषेत सांगितलेले उग्रसेनला बहुधा कळले असावे.

ही माळ देवीची आहे आणि ती इतर कुणाच्याच गळ्यात नाही, ह्याची खातरजमा होताच त्याचा तरतरीत रजपूत चेहरा उजळून गेला! पुढे होऊन त्याने पालखीत चढणाऱ्या

संभाजीराजांना ‘जय एकलिंगजी’ म्हणत कुर्निसात केला.

संभाजीराजे पालखीत चढले. भोयांनी थोपे देऊन पट सरसे करीत पालखी वर उचलली. डावे-उजवे झोले खात पालखी माची सोडून पाली दरवाजाकडे जाऊ लागली. राजांनी धरावा तसाच पालखीचा झुबकेदार राजगोंडा संभाजीराजांनी आपल्या मुठीत धरला होता. हातात नागवे हत्यार धरून नेताजी आपल्या एका हाताने पालखीची डंबरी धरून पालखीबरोबर दुडक्‍्या चालीने चालू लागले.

जखडल्या पायाने राजे दूर जाणाऱ्या पालखीच्या लाल ठिपक्याकडे बघत होते. त्यांच्या मनात विचारांची अनेक हत्यारे एकमेकांवर आदळत होती – “बरड असली तरी पुण्याची स्वतंत्र जहागिरी देऊन आमच्या महाराजसाहेबांनी बंगळूरहून आम्हास इकडं धाडलं. आणि – आणि आम्ही मात्र तुम्हास गनिमाची मनसब स्वीकारण्यासाठी तिकडं धाडतो आहोत!’

“उपजलात आणि धाराऊच्या वरच्या दुधावर अंग धरण्याची पाळी तुमच्यावर आली. आज राजकारणात उतरताहात आणि औरंगशाच्या उसन्या मनसबीचा स्वीकार तुम्हाला करावा लागतो आहे! ज्या तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव गहाण टाकावा, तेच तुम्ही आमच्यासाठी, या दौलतीसाठी जमान म्हणून जाताहात! खरंच शंभूराजे आप्तगणांकडून तुम्ही किती नाडले जाणार? सई, यांना आमच्या हवाली करताना तुम्ही म्हणालात की, हे “एकले जीव.’ आमच्या त्या वेळी हे ध्यानी आलं नाही की राजा – “एकला’ कधीच नसतो!’ गड उतरंड उतरणारा पालखीचा लाल ठिपका बघताना – प्रतापगडावर भवानीचा पोत नाचविणारे संभाजीराजे राजांना आठवले. गोंधळ्याने जगदंबेचा महिमा

गाताना उभे केलेले शब्द त्यांच्या कानांत घुमत फिरू लागले

“उदर परडी देऊन हाती

ब्रह्मांडी फिरवी।

लक्ष चौऱ्याऐंशी घरची भिक्षा

मागविली बरवी।

ज्या-ज्या घरी मी भिक्षा केली

ते-ते घर रुचले।

आदिशक्तीचे कवतुक मोठे

भुत्या मज केले!!”

राजे स्वत:शीच पुटपुटले – “शंभूराजे, आपण आईचे भुत्ये आहोत. ती देईल तो जन्माचा पोत आपल्या हाती आहे. तिची इच्छा थोर आहे!”

राजे माचीवरून माघारी वळले. सह्याद्रीच्या सिंहाचा छावा आपली गुहा सोडून पठारावर उतरत होता. पहिली

राजकीय धावणी करण्यासाठी!

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ४४…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

Leave a Comment